Login

मायलेकी— सख्ख्या वैरी (अंतिम भाग) (भाग-५)

आई आणि मुलीचं नातं खूप प्रेमळ, विश्वासाचं, मैत्रीचं आणि अतूट मानलं जातं पण हे नातं पोकळ असेल तर? मायलेकीच एकमेकींच्या वैरी असतील तर? ही कथा आहे अशाच मायलेकींविषयी...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

मायलेकी—सख्ख्या वैरी (अंतिम भाग) (भाग-५)

आता साक्षीची निर्विकार प्रतिक्रिया होती. ती केवळ कानावर पडणारे शब्द निमूट ऐकत होती.

"या संपूर्ण प्रकाराने आधीच नैराश्यात गुरफटलेली अनिता आणखी नैराश्यात गुरफटली. तुझ्या आजीला फरक पडला नसला तरी प्रीतमला फरक पडला होता. तो चुकतोय, हे कळत होतं पण अनिताचं निर्विकार असणं त्याच्या मनात वादळ उठवायचं. त्यात तिच्या अनिच्छेने आता काहीच करायचं नाही असं कितीही ठरवलं तरी त्याच्या भावनांवर त्याचा संयम नसायचा. परिणामी परत दोन महिन्यांनी ती गरोदर राहिली. गर्भपात झाल्यावर लगेच गरोदर राहिलं तर भविष्यात अनिष्ट घडण्याची दाट शक्यता असते, हे सगळ्यांनाच ठाऊक होते पण करंदीकरांच्या कुलदिपकाला कोण काय बोलणार? त्याने घराण्याचा वंश वाढवायचाच विचार केला, असं सांगून तुझ्या आजीतर्फे त्याची स्तुतीच केली गेली. पाहता पाहता पुन्हा सहा महिने सरले. परत डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी अनिताची अति सुधारित अवस्था नसली तरी निदान त्याने ती गरोदर असताना परत जुनी चूक केली नव्हती, हे लक्षात आलं होतं पण..." मंजिरी बोलता बोलता थांबली. इकडे परत 'पण' ऐकून साक्षीच्या मनात चक्रीवादळ उठले कारण प्रत्येक 'पण' नंतर खूप धक्कादायक खुलासा होत होता म्हणून आधीच तिने धसका घेतला.

"पण डोहाळ जेवणाच्या मध्यरात्री परत इतिहासाची पुनरावृत्ती झाली. गर्भपातानंतर अनिताला अधुनमधून वाईट स्वप्न दिसायचे. वाईट स्वप्न म्हणण्यापेक्षा प्रीतमने पहिल्यांदा जेव्हा तिच्यावर बळजबरी केली होती ते क्षण तिला आठवायचे. तिचे जरा डोळे मिटले की ती किंचाळून उठायची, हे प्रीतम घरी नसताना मी तिच्या खोलीत एक दिवस झोपले होते तेव्हा कळलेलं. कदाचित डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यावर ती झोपली असावी. सहसा तिचं जागरण जास्त असायचं पण त्या दिवशी ती झोपली आणि परत तिने वाईट स्वप्न पाहिलं. स्वप्नात तिने प्रीतमला आणि त्याच्या प्रेमाला परत नाकारले होते आणि तत्क्षणी प्रीतममधला राक्षस जागा झाला. त्याला वाटलं की ती शुद्धीत असून सगळं बोलत आहे. त्याला उद्युक्त करत आहे; म्हणून तो त्याच्या कलुषित विचारांनी नटलेलं त्याचं पौरुषत्व सिद्ध करत तिच्यावर तुटून पडला पण काही वेळातच प्रचंड रक्तस्त्राव झाला, वेदना असह्य होऊन ती ओरडायला लागली आणि बेशुद्ध पडली. सगळेच प्रीतमच्या खोलीत आले. सगळं पाहून यावेळी तुझे आजोबा चिडले आणि त्यांनी त्याला मारलं. खूप ऐकवलं. मी लगेच अनिताची साडी बदलली. तिला परत इस्पितळात भरती केलं." प्रीतम अनिताच्या आयुष्यात आल्याने अनिताने सुखाची पायरी तर नाही पण इस्पितळाची पायरी बरेचदा चढली होती, हे साक्षीला मंजिरी सांगत असलेल्या भूतकाळाद्वारे लक्षात आले होते.

"यावेळी डॉक्टर चिडले, एकच चूक वारंवार कशी केली जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हते. प्रीतमला हळूहळू त्याच्या कृत्याची जाणीव होऊ लागली. थोडं चिडून ते उपचारासाठी गेले पण काही वेळात डॉक्टर परत आले आणि बाळाचं डोकं बाहेर आलं असल्याचं सांगितलं. बाळ किंवा आई दोघांपैकी कुणी एकच वाचवता येईल, असं सांगितलं. मला माहीत होतं, करंदीकर कुटुंबाला बाळच हवं, ते अनिताचा विचार करणार नाही. तसंच झालं, तुझ्या आजीने बाळाला वाचवायला सांगितलं पण प्रीतमलाच सही करायची होती कागदपत्रांवर, त्याचा निर्णय अंतिम असणार होता म्हणून त्याने अनिताला वाचवायला सांगितलं. साहाजिकच तुझी आजी चिडली त्याच्यावर आणि देवळात प्रार्थना करायला गेली बाळासाठी. मी मात्र तिथेच सगळ्यांसमोर प्रीतमला चापट मारली. बरंच काही ऐकवून त्याला ताकीद दिली. तो आधीच पश्चात्तापाच्या ज्वाळेत जळत होता. काही न बोलता इस्पितळातील बाप्पाच्या मूर्तीजवळ जाऊन त्याने अनिताच्या जीवाची अक्षरशः भीक मागितली." मंजिरी म्हणाली.

सगळा भूतकाळ आज जर मंजिरीऐवजी एखादा अनोळखी व्यक्ती तिला सांगत असता तर साक्षीने कधीच विश्वास ठेवला नसता पण सांगणारी व्यक्ती खुद्द तिची आत्या होती. कितीही नाकारले तरी त्यात सत्य आहे, हे कळून चुकले होते.

"योगायोग, प्रार्थना की नियती काय होते माहिती नाही पण बाळ आणि अनिता दोघेही वाचले. सगळे आनंदी झालेच होते की डॉक्टरांनी आणखी दुःखद बातमी दिली की याआधीही प्रीतमने ती गरोदर असताना शारीरिक संबंध जोडल्याने रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाला होता, त्यानंतर लगेच ती गरोदर राहिली आणि सातव्या महिन्यात परत शारीरिक संबंध जोडला गेला व वेळेआधीच तिचं बाळंतपण झालं म्हणून तिच्या गर्भाशयाला भेगा गेल्या असून रक्तस्त्राव थांबत नसल्याने नाईलाजाने तिचं गर्भाशय कायमस्वरूपी काढण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. प्रीतमकडे पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच नव्हतं. तिचं गर्भाशय काढण्यात आलं. तुझी आजी नाराज झाली कारण मुलगी अर्थात तू जन्मली होतीस, करंदीकरांचा वंश कोण वाढवणार? हाच प्रश्न पडलेला म्हणून त्यांनी प्रीतमचं दुसरं लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला पण प्रीतमने तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्याने स्वतःला बदललं, तिची काळजी घेऊ लागला तुझ्या आजीच्या विरोधात जाऊन पण उशीर खूप झाला होता. आता जिला तो जपण्याचा प्रयत्न करत होता तिचा आत्मा कधीच जीव गुदमरून मरण पावला होता. आता श्वास केवळ तिचं शरीर घेतंय, तिच्यातली अनिता नाहीच." शेवटचे वाक्य मंजिरी निर्विकार चेहऱ्याने म्हणाली आणि शांत झाली.

संपूर्ण घटना ऐकून साक्षी सुन्न झाली. शब्दच नव्हते तिच्याकडे. जे आजपर्यंत तिने पाहिले, ऐकले, समजून घेतले त्यापैकी काहीच खरे नव्हते आणि मंजिरीचे वाक्य आता तिलाही पटले होते की जो व्यक्ती चांगला बाप आहे तो चांगला नवरा आणि चांगला माणूस असेलच असं नाही.

"तुला वाटतं, तुझी आई काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, बोलायची नाही, निर्विकार असायची... अगं तू तर तिच्यावर झालेल्या अन्यायाचं, अत्याचाराचं प्रतिक आहेस. आधी तिचं जगणं हिरावून घेतलं, मग मरणाच्या दारात असताना मरूही दिलं नाही. तूच सांग तिने काय, कसं आणि कोणाजवळ व्यक्त व्हावं?" आता भावूक होत मंजिरीने साक्षीला नजर रोखून विचारले आणि ती चिडीचूप झाली.

"राहिला प्रश्न तुझ्या सासऱ्याला तिने मिठी मारण्याचा तर तो एक भावूक क्षण होता. अनिताचा बलात्कार झाल्यावर आणि प्रसूतीवेळी ज्या डॉक्टरने उपचार केला होता तो कल्पेशचा सख्खा भाऊ होता. त्यानेच कल्पेशला अनिताबद्दल कळवलेलं सारं. तो भेटायला आलाही होता पण करंदीकरांच्या सुनेला परपुरुषांशी बोलायची मुभा नाही म्हणून त्याच्याही तोंडावर दार आपटलं होतं. मी त्याची माफी मागितली. त्यानंतर परत आम्ही भेटत राहिलो पण तिची अन् त्याची भेट झाली नाही. तिला फक्त आमचाच आधार होता पण आम्हालाही तिच्यापासून वेगळं केलं गेलं होतं. आता तुझ्या लग्नाच्या निमित्ताने योगायोगाने तुझ्या सासऱ्याची आणि अनिताची ओळख झाली. त्यातच तिला भीती होती की कधी कळत-नकळत तो तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तुझ्यापुढे बोलून जाईल. तिने मलाही सांगितलं होतं की कल्पेशला भेटून ती वचन घेणार आहे. तुझ्यासाठी तुझी आई वगळता सगळं करंदीकर कुटुंब घरंदाज होतं म्हणून ती त्याला विनंती करायला गेली की तिचा भूतकाळ त्याने कधीच चव्हाट्यावर आणू नये कारण तू तुझ्या बाबाविरूद्ध काहीच ऐकून घेणार नाहीस, ह्याची जाणीव तिला होती. कल्पेशनेही तिच्या आग्रहाचा मान राखून होकार दिला. त्या क्षणी जुन्या आठवणी अनपेक्षितपणे उकरून काढल्याने पहिल्यांदाच सगळं दुःख, वेदना व्यक्त करण्यासाठी ती तिच्या मित्राजवळ रडली तर त्याचा वेगळाच अर्थ काढला गेला. तुझी आई आणि तुझा सासरा चारित्र्यहीन नाहीत. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. तसंही ते केवळ मित्र आहेत पण तू बाजार केलास त्यांच्या पवित्र नात्याचा..." रागीट कटाक्षाने पाहून मंजिरीने परत राग व्यक्त केला.

"आत्तू... मी..." साक्षी रडायला लागली.

"माझी नको तुझ्या आईची माफी माग. तिला आजपर्यंत बरंच दुखवलंस तू, हीच योग्य वेळ आहे केलेल्या चुका दुरुस्त करण्याची." मंजिरी म्हणाली.

साक्षीने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात मंजिरीचा फोन वाजला. कल्पेशचा कॉल आला होता. पलिकडून जे ऐकलं त्याने ती सुन्नच झाली. साक्षी विचारत होती पण मंजिरी बोलत नव्हती काहीच म्हणून तिने फोन स्वतःच्या कानाला लावला. कल्पेशने तिला अनिताला हृदयविकाराचा झटका आल्याने भरती केले असल्याचे सांगितले. तिलाही एक क्षण अंधारी आली पण स्वतःला सावरत दोघीही इस्पितळात गेल्या. तिथे अजिंक्य आणि कल्पेश त्यांचीच वाट पाहत होते. कल्पेशने एव्हाना अजिंक्यलाही इत्थंभूत माहिती दिली होती. साक्षीला तिथे पाहून त्यांनाही कळले की साक्षीलाही मंजिरीकडून सगळा भूतकाळ कळला आहे म्हणून कोणी काहीच बोलले नाही.

काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की अनिताला शुद्ध आली आहे. कदाचित लेकीच्या ओढीने जाग आली असावी. इकडे डॉक्टरांचे शब्द ऐकताच साक्षी पळतच त्या खोलीत गेली. लागोपाठ मंजिरी, कल्पेश आणि अजिंक्य आत गेले.

"आई, मी चुकले. मला माफ कर. मी..." पुढे काही बोलताच आले नाही तिला. लगेच आईच्या कुशीत शिरून तिने हंबरडा फोडला.

पहिल्यांदा त्या मायलेकी एकमेकींपुढे अशा व्यक्त होत होत्या. साक्षीने ज्या क्षणी अनिताला 'आई' म्हटले तेव्हाच तिला खात्री पटली की तिचा भूतकाळ तिच्या लेकीला कळला आहे म्हणून काही न बोलता थरथरत्या हाताने लेकीला थोपटून सावरत होती.

थोड्या वेळाने वातावरण शांत झाल्यावर अनिताने अजिंक्यला जवळ बोलवले आणि साक्षीचा हात अजिंक्यच्या हातात देत म्हणाली, "सुखी राहा."

ते दोघे रडतच किंचित हसले. तेवढ्यात अनिता मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. मशीनवर झळकणाऱ्या हृदयाच्या रेषा खाली वर होत होत्या. पळत डॉक्टर आत आले. ते त्यांच्या परीने प्रयत्न करणार त्याआधीच मशीनवर सरळ रेष झळकली आणि सगळे सुन्न झाले; कारण अनिताने अखेरचा श्वास घेतला होता.

थोडक्यात नियतीने बराच अन्याय लिहिला होता अनिताच्या प्रारब्धात म्हणून कदाचित ती अन्याय सहन करूनही दोषीच ठरली आयुष्यभर पण शेवटच्या क्षणी तिच्या लेकीने तिला 'आई' म्हणून स्वीकारले यातच ती संतुष्ट झाली, तिच्या जन्माचे चीज झाले, असे वाटून तिने मृत्यूला आलिंगन दिले.

पुढे काही तास साक्षी बराच आक्रोश व्यक्त करत राहिली. अजिंक्यने तिला सावरले. कल्पेश आणि मंजिरी सुद्धा आपल्या मैत्रिणीचा लढा आता इथेच संपला हे उमजून रडत होते.

कालांतराने अंत्यविधी पार पडली. सुतकाचे एक वर्ष पाळून पुढील वर्षी परत मुहूर्त निवडून साक्षी आणि अजिंक्यने लग्न केले. दोघेही आपल्या संसारात आनंदी होते, त्यांनी त्यांच्या संसाराची बाग चांगली फुलवली होती.

काही वर्षांनंतर साक्षीने स्वयंसेवी संस्था स्थापन करून स्त्रियांच्या अन्यायावर आवाज उठवायला सुरुवात केली. अनेक स्त्रियांना, मुलींना स्वयंसेवी संस्थेमार्फत मदत करून स्वावलंबी केले होते. सामाजिक क्षेत्रात बरेच लोकहितार्थ कार्य पार पाडले तिने पण कितीही समाजकार्य केले तरी स्वतःच्या आईवर झालेला अन्याय ती ओळखू शकली नाही, ही खंत मात्र आजन्म तिच्या मनात राहिली; परंतु त्याच पोकळीचा विचार करून नैराश्याला न कवटाळता समाजात इतर कोणीही 'अनिता'सारखे आयुष्य जगू नये म्हणून ती निरंतर प्रयत्न करत राहिली.

समाप्त.
............
©®
सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0

🎭 Series Post

View all