Login

माधव उवाच... भाग २

प्रेरणादायी
माधव उवाच...

श्रीमान योगी

©® सौ. हेमा पाटील.

"अशी माणसं आजच्या कलियुगात ही असतात का रे माधवा?"
विचारात गढलेल्या तिने देवपूजा करताना माधवाला विचारले.

"अशी म्हणजे कशी गं?" माधवाला पक्के माहीत होते तिला काय म्हणायचे होते ते... पण तिच्याच तोंडून त्याला ऐकायचे होते.

"अशी म्हणजे इतरांसाठी झटणारी, त्यांना निरपेक्ष भावनेने मदत करणारी, सगळे करून सवरून स्वतःला अलिप्त ठेवणारी."

"अच्छा! अशी कुणी व्यक्ती आली आहे वाटतं तुझ्या संपर्कात? म्हणून आज हा प्रश्न विचारला आहेस."

"हो, मी संभ्रमात पडले आहे. आजच्या या युगात दुसऱ्यासाठी थोडेसे जरी काही केले आणि त्याला आपण धन्यवाद म्हणालो नाही तर समोरच्याला राग येतो. साधे लिफ्टचेच उदाहरण घे ना! शेवटी येणारी व्यक्ती गर्दी झाली असेल तर लिफ्टच्या बटनांजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीला आपल्याला कितव्या मजल्यावर जायचे आहे ते सांगते व ती व्यक्ती बटन दाबते.

तिथपर्यंत जाता येत नाही म्हणून त्या व्यक्तीने बटन दाबायला सांगितलेले असते, पण जर ती व्यक्ती बटन दाबणाऱ्या व्यक्तीला थॅंक्यू म्हणाली नाही तर तिच्याकडे अशा पद्धतीने कटाक्ष टाकला जातो की, किती मॅनर्सलेस व्यक्ती आहे ही." हे ऐकून माधवाला हसू आले. ©® सौ. हेमा पाटील.

त्याला हसताना पाहून ती म्हणाली,
"यात हसण्यासारखे काय आहे?"

"तू मला आता या भूतलावरचे मॅनर्स शिकवणार आहेस का? मला याची गरज नाही कारण मला लिफ्टचा वापर करण्याची आवश्यकता भासतच नाही." हे माधवाचे बोलणे ऐकून ती म्हणाली,

"घे, घे, अजून घे माझी फिरकी. तुला पण सकाळपासून कोण भेटले नसेल ना!"

"मग नेमकं काय ते बोल ना! नमनालाच घडाभर तेल घालून झाले."

"काही माणसं मदत करतात,समाजसेवा करतात, पण त्याची खूप जाहिरात करतात. तोच त्यांचा हेतू असतो. काही माणसे मात्र अगदी निरपेक्षपणे मदत करत असतात. त्यांच्या मदत करण्याची ते कुणाला दखल सुध्दा घेऊ देत नाहीत. इतकेच काय सगळे स्वतः करून कार्यावर आपली छाप कशी पडणार नाही याची पूरेपूर काळजी घेतात. अशा माणसांबद्दल बोलतेय मी‌." ती म्हणाली.

"होय, अशीही माणसं असतात, त्यांच्यामुळेच या कलियुगाचा तोल सांभाळला जातो. ती भलेही आपल्या कामातच देव शोधतात, पण अशा माणसांसोबत मी कायम असतो. त्यांनी मला हाक मारली नाही, माझे नामस्मरण केले नाही तरीही मी त्यांच्यासोबत असतो, कारण त्यांचे उत्तम कर्म." माधव गंभीर होऊन म्हणाला.

"माधवा, तुझे म्हणणे मलाही पटले. तोंडात अखंड नामस्मरण असून हातून कर्म जर वाईट केले तर ते नामस्मरण काय उपयोगाचे? चाळणीत पाणी भरण्यासारखे आहे ते."

" आता कसं बोललीस! ती लिफ्टमध्ये बटन दाबायला सांगणारी व्यक्ती तोंडाने जरी धन्यवाद म्हणाली नाही, तरी मनातल्या मनात तिने आभार मानलेले असतात, आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभार मानावे अशी अपेक्षा कशासाठी करावी? आपल्या हातून जर काही सेवा घडली तर त्याचे फळ आपल्याला मिळतेच."

"म्हणूनच सत्कर्मे करून नामानिराळी राहणारी व्यक्ती मला योग्याहून कमी वाटत नाही." ती म्हणाली.

"आज तुझ्या तोंडून पहिल्यांदाच योग्य उपमा ऐकली मी. योगीच असतात अशी माणसे. केलेल्या सत्कर्मापासून अलिप्त राहणारी...! हातून जेवढे शक्य होईल तेवढी इतरांना मदत करणारी. पृथ्वीवर देव कुठे असेल तर अशा व्यक्तींच्या सानिध्यात असतो."

"माधवा! खूप छान विश्लेषण केलेस रे! नशीबवान आहे मी, जे अशा व्यक्तींच्या संपर्कात आहे."

"नुसतीच संपर्कात राहू नकोस. त्यांच्याकडून घेता घेता एक दिवस त्यांचे हात घे."

" माधवा..."

©® सौ. हेमा पाटील.

नमस्कार वाचकहो, माधव उवाच... ही मालिका सुरू करत आहे. जमेल तसे पोस्ट करत जाईन. वाचकांनी वाचून नक्की रिप्लाय द्यावा ही विनंती.
0

🎭 Series Post

View all