Login

माधव उवाच... भाग ३

प्रेरणादायी

माधव उवाच... भाग ३


©® हेमा पाटील.


"माधवा, काल काय झालं माहीत आहे का?"

"तू सांगितलेस तर कळेल ना मला? तसे काल खूप काही झाले होते. तुझी भाकरी करपली होती. दूध उतू जाता जाता वाचले होते. छोटू पडला, त्याचे ढोपर फुटले होते."

"अरे, हे नाही रे माधवा. इथे बसल्या बसल्या सगळे पाहतोस ना ? काल काय गंमत झाली माहीत आहे का? मी संध्याकाळी भाजी आणायला गेले होते. तोच रे तो नेहमीचा कोपऱ्यावरचा भाजीवाला नाही का, त्याच्याकडेच गेले होते. बघ, कोबी घेतला, घेवड्याच्या शेंगा घेतल्या. वांगी पण घेतली. शेवटी मिरच्या पण घेतल्या दहा रूपयांच्या."

"बरं, आज सकाळी कोबीची भाजी बनवली होतीस. आत्ता वांगे बनवलेस. पुढे काय?" माधवाने तिने पटापट बोलावे म्हणून ही दोन नावे सांगून पण टाकली.

"ते नाही सांगत रे...तर माझ्या शेजारी एक माणूस उभा होता. त्याचा भाजीचा हिशोब मी पण तिथेच उभी होते म्हणून मी मनातल्या मनात केला होता. दोनशे तीस रूपये होत होते. भाजीवाल्याने दोनशे वीसच मागितले.

दहा रूपये कमी मागितले आहेत हे त्या माणसाच्या लक्षात आले आहे हे मला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजले, पण त्या माणसाने हिशोबाप्रमाणे पैसे दिले नाहीत."

"वा व्वा! तू आता फेस रिडींग पण शिकलीस वाटतं!"

"हो, मग! अनुभवाने माणसे चेहऱ्यावरून वाचता येतात. त्याच्या चेहऱ्यावर मी हे पण वाचले, हा भाजीवाला तर नेहमी मापात फसवतो, मग आज मी दहा रूपये कमी दिले तर काय झाले?"

"छान! मग पुढे काय झाले?"

"तो माणूस दोनशे वीस रूपये देऊन निघून गेला. मी मिरच्या घेतलेल्या भाजीवाल्याच्या लक्षात नव्हते. मी आपले स्वतःहून आणखी दहा रूपये दिले व तिथून निघून आले. "

"हं." माधवाने नुसताच हुंकार दिला.

"कशी माणसं असतात ना? दहा रूपये बुडवले त्यांनी."

"पैसे कधीच बुडत नसतात. या नाही, पुढच्या जन्मी तर परतफेड करावीच लागते. सूक्ष्मातिसूक्ष्म वस्तूंपासून त्याची सुरवात होते. ते दहा रूपये न देऊन त्याने पुढच्या कुठल्यातरी जन्मात पुन्हा भाजीवाल्याशी संबंध जोडून ठेवला."

"म्हणजे काय रे माधवा? मी सांगतेय तोपर्यंत तू त्या माणसाच्या पुढच्या जन्मापर्यंत जाऊन पोहोचलास." ती म्हणाली.

"अगं, त्याने पैसे दिले नाहीत, बरोबर? मग हे भाजीवाल्याचे पैसे त्याच्याकडे कर्जाऊ राहीले. आता पुढच्या एखाद्या जन्मात त्याला ते फेडावे लागतील. इहलोकातील देण्याघेण्याचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय या येरझारांमधून सुटका नाही."

"काय सांगतोस माधवा! मग आता तेवढ्यासाठी त्या माणसाला परत जन्मावे लागेल?"

"हो‌, या चक्रातून कुणालाही सूट नाही. फक्त पैशाचाच नाही, कर्माचे पण हिशोब चुकते करायचे असतात. यासाठीच अकर्म कर्म करा असे मी गीतेत सांगितले आहे."

"हो, मी करते बाबा रोज रात्री ही प्रार्थना. आज दिवसभरात माझ्या हातून जी काही बरेवाईट कर्मे घडली असतील, ती सगळी केशवाच्या चरणी अर्पण."

"शाब्बास! यामुळे हातून वाईट कर्म घडू नये ही विवेकबुध्दी जागृत राहते, कारण वाईट कर्म भगवंताच्या चरणी कसे अर्पण करायचे ही बोच लागते मनाला. सगळेच तुझ्यासारखे नाहीत ना!" माधव हसत म्हणाला.

"त्यांच्याशी कुठे माधव बोलतो? मग सुधारणा कशी होईल?" तिने आपले घोडे पुढे दामटले.

"माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा साधा सरळ हिशोब आहे, पण माणसे बदललीत आता. स्वतःच्या स्वार्था साठी अगदी काहीही करतात. तशीच ती पैसे बुडवणारी व्यक्ती, ते त्याचे कर्म त्याच्यासोबत असणार आता कायमच. म्हणून माणसाने नेहमी विचारपूर्वक वागावे. आपल्या कृतीने संचिताचा डोंगर उभा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जेवढे शक्य आहे तेवढे हा डोक्यावर असलेला डोंगर कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. राहता राहिला प्रश्न मी बोलण्याचा. स्वतःच्या आत डोकावून पाहिले तर मी त्याच्या आतच आहे."

" आज तर तू थेट गीतेतच घेऊन गेलास बोलता बोलता. तुझ्यापाशी ज्ञानाचे भांडार आहे, विवेकाचा लगाम आहे." ती म्हणाली.

"नुसते माधवा, माधवा तोंडाने करता, त्याने दिलेले ज्ञान कोण विचारात घेतो!"

"मी आहे ना तुझी एकनिष्ठ भक्त! मी सगळे ऐकेन आणि तसेच वागायचा नक्की प्रयत्न करेन." यावर माधव तिच्याकडे पाहून गोड हसला.

क्रमशः ©® हेमा पाटील.

हे सदर आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.