Login

माधव उवाच... भाग ४

प्रेरणादायी
माधव उवाच... भाग ४


"काय गं? अशी का चेहरा फुगवून चंदन उगाळत आहेस? मनातला राग त्या चंदनात उतरतोय बघ. अशा चंदनाचा टिळा तू माझ्या मस्तकावर लावणार आहेस का ज्यात भक्ती नसून तुझ्या मनातला रागच उतरला आहे?" हे ऐकून चंदन उगाळत असलेली ती थबकली.

"खरंच की रे माधवा! माझ्या लक्षातच आले नाही. थांब, आता हे चंदन मी दुसऱ्या वाटीत काढून घेते. तुमच्यासाठी पुन्हा दुसरे चंदन उगाळते." असे म्हणत ती सहाणेवरील चंदन वाटीत काढू लागली.

तिने ते चंदन काढून झाल्यावर सहाण पाण्याने स्वच्छ केली व पुन्हा दुसरे चंदन उगाळले. त्यानंतर तिने देवपूजा केली. रोजचे स्तोत्र पठण झाल्यावरही ती गप्प गप्पच आहे हे पाहून माधव म्हणाला,

"आता तरी बोल. मनातल्या मनात धुमसत बसू नकोस." हे ऐकून ती खुदकन हसली.

"तू म्हणालास म्हणूनच सांगतेय हो. पुन्हा म्हणू नकोस ही सारखीच तक्रारी करत असते." हे ऐकून माधव गालातल्या गालात हसला. ते पाहून ती म्हणाली,

"बघ, हसलास की नाही? मी नाही सांगणार जा तुला इथून पुढे काहीच." तिने गाल फुगवलेले पाहून माधव म्हणाला,

"अगं मी तुला नाही हसलो. इतकावेळ तू ती गोष्ट मनात खदखदत असतानाही ओठांवर येऊ दिली नाहीस म्हणून तुझ्या संयमाला दाद देण्यासाठी हसलो मी."

"बरं बरं. शब्दांचे खेळ करण्यात तुझा हात कोण धरणार? मला सांग प्रत्येकाला आपलेच म्हणणे बरोबर का वाटते?"

"साहजिकच आहे, आपण चूकूच शकत नाही असेच सर्वांना वाटत असते."

" प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असला तरी प्रत्येकवेळी तसेच असेल असे नाही ना! सासुबाईंच्या काळात त्या सगळी कामे स्वतः करायच्या. फक्त फरशीला बाई होती त्यांच्याकडे. आता माझा जाॅब हा असा. त्याला वेळेचे लिमिट नाही. माझी सकाळी खूप तारांबळ उडते. त्यामुळे स्वयंपाकाला बाई लावली मी या महिन्यात. माझे प्रमोशन झाले आहे हे तुला माहीतच आहे."

"बरं, बोल पुढे मी ऐकतोय."

"परवा त्या ट्रीप वरून आल्या. त्या नसतानाच मी बाई लावली होती. त्या कुरकुर करतील याची खात्री होती, म्हटले एकदा लावली की काही बोलणार नाहीत."

"मग काय झाले?" मानवाने विचारले.

"अरे जेवताना प्रत्येक पदार्थाला नावे ठेवतायत त्या. ही भाजीच जास्त शिजली, आमटीत मीठच कमी आहे, पोळ्या वातड झाल्या, एक ना दोन. बरं हे ऐकून बाकीचे पण मग शोधक नजरेने जेवणाकडे पाहू लागले आहेत."

"हं." माधवाने फक्त हुंकार दिला.

"एकटीने सगळ्या लढाया लढायच्या, घरात बाहेर लक्ष ठेवायचे हे सोपे आहे का? बरं ऑफीसमध्येही जबाबदारीचे काम असते. त्यात अजिबात चालढकल चालत नाही. मग थोडासा मदतीचा हात घेतला तर या म्हणतायत, आता बाईच्या हातचे खाऊ घालणार आहेस का सगळ्यांना?" तिचे हे बोलणे ऐकून माधव म्हणाला,

"झाले तुझे सगळे सांगून? आता ऐक."

"तुझ्या जागी तू बरोबर आहेस असे तुला वाटतेय ना?"
तिने होकारार्थी मान हलवली.

"सासुबाईंना त्या त्यांच्या जागी योग्य आहेत असे वाटतेय. हा कळीचा मुद्दा आहे ना?"

"हो रे."रडवेल्या स्वरात ती म्हणाली.

"आधी सुरुवात त्यांच्यापासून करूया. ही देव्हाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती आहे."

" हो, माझ्या लग्नात आईने ती दिली आहे."

"त्या मूर्तीच्या हातात पळी आहे. त्या पळीला चीर पडू देत नाहीत. चीर पडली तर त्या मूर्तीचे विसर्जन करून दुसरी मूर्ती स्थापन करतात. हे माहीत आहे का तुला?" माधवाने विचारले.

"हो. आईकडे एकदा बदलली होती."

"आपण जे अन्न खातो त्यामुळे आपले पोषण होते. फक्त एवढेच नव्हे, तर ते अन्न शिजवताना तुमच्या मनात काय विचार सुरू आहेत ते त्या अन्नात उतरतात. तू गोंदवल्याला नेहमी जातेस, आल्यावर तिथे घेतलेल्या महाप्रसादाबाबत काय बोलतेस?"

"अरे माधवा, खूपच स्वादिष्ट असतो. तिथला फक्त आमटी भात जरी खाल्ला तरी तृप्तता जाणवते." ती म्हणाली. आत्ताही ती चव तिच्या जीभेवर जाणवली तिला.

"तो स्वयंपाक बनवताना तिथे देवाचे नाव, अभंग, स्तोत्रे म्हणत सात्विक वातावरणात स्वयंपाक बनवला जातो. त्यामुळे त्याची चव अमृतासमान भासते. आता ही तुझी जी बाई आहे तिला सतरा कामे आवरायची असतात. कसेतरी धावतपळत यायचे, अन् काम उरकून जायचे. त्यावेळी तिच्या मनात घरचे किंवा इतर जे विचार सुरू असतील ते तुला थोडेच कळतात? यासाठी घरच्या गृहिणीनेच प्रसन्न चित्ताने अन्न शिजवावे या तुझ्या सासुबाईंच्या मताशी मी सहमत आहे." माधवाचे हे बोलणे ऐकून क्षणभर ती शांत बसली. तिला ते पटले नव्हते अशातला भाग नव्हता.

"पण माझे काय? मी कसे हॅंडल करू सगळे? मला जमत नाही म्हणून मी हा पर्याय शोधला होता ना?" ती म्हणाली.

"भाज्या निवडणे, लसूण सोलणे, दळण, निवडणे टिपणे यासाठी तू बेशक बाईची मदत घे. स्वयंपाक बनवण्याचे काम मात्र तू कर. हा सात्विकतेचा विचार ही एकवेळ बाजूला ठेव, पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण ज्या अन्नावर होते त्याबाबत आपण जागरूक असणे आवश्यक नाही का? याचा विचार कर."

"बरोबर आहे, करते आता मॅनेज." ती म्हणाली.

"आणि सासुबाईंवरचा रागही दूर कर. जुनी जाणती माणसे अनुभवाने समृद्ध असतात म्हणून सांगत असतात."

"येस...माधवा धन्यवाद पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल." माधव हळूच हसला हे पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू आले.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.