Login

माधव उवाच... भाग ५

प्रेरणादायी
माधव उवाच... भाग ५

©® सौ. हेमा पाटील.


"माधवा, आजच्या प्रश्नाचे उत्तर मला अगदी व्यवस्थित हवे आहे बरं का! तुझा मिश्कीलपणा आज जरा दूरच ठेव हं."
तिने देवघरात खाली बसकण घालताक्षणी माधवाला सांगितले.

"अगं हो हो. क्षणभर माझ्यासमोर विसावा तरी घे, मग तुझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू कर. मी तर इथेच आहे."

"तू आहेसच रे, पण मला आज गहन प्रश्न पडलाय, त्याचे काय?" ती म्हणाली.

"मग तुझ्या या प्रश्नामुळे तू आज देवांना कोरडेच ठेवणार आहेस? स्नान घालणार नाहीस की काय?"

"माधवा... घालणार आहे, सगळे करणार आहे. फक्त आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे म्हणजे मी शांतचित्ताने देवपूजा करेन." ती म्हणाली.

"बोल बोल. आज तुझे चित्त थाऱ्यावर नाही असे दिसतेय."

"काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, खरे ना? म्हणजे यश हवे असेल तर आळस त्यागावा लागतो. पद हवे असेल वेळ द्यावा लागतो. नाते हवे असेल व तर भावना जपाव्या लागतात."

"हो, बरोबर आहे. यात तर मला कुठला प्रश्न जाणवला नाही."

"नाते जपायचे असेल तर काहीतरी द्यावे लागते, तरीही कुठे थांबायचे याची जाणीव असली पाहिजे?" तिने मनातील घालमेल बोलून दाखवली.

"हो. बरोबर आहे. कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यासाठी काही तरी अर्पण करावे लागते. आई व्हायचे असेल, बाळाच्या तोंडून आई ही हाक ऐकायची असेल तर बाळाला नऊ महिने पोटात वागवावे लागते. उत्तम सून व्हायचे असेल तर घरात सर्वांशी समन्वय साधावा लागतो. उत्तम पत्नी व्हायचे असेल तर पूर्ण समर्पण हवे. मैत्री जपायची असेल तर एकमेकांना वेळ द्यावा लागतो. तुला यापैकी काय अभिप्रेत आहे?" माधवाने थेट प्रश्न विचारला.

"मला उत्तम सून व्हायचे आहे, पण त्यासोबतच मला माझा ही व्यक्तीमत्व विकास घडवायचा आहे. घरातील प्रत्येकाच्या मी सोबत आहे हा माझा नेहमीच प्रयत्न असतो, पण याला मर्यादा येत आहेत. प्रत्येक वेळी मी त्यांच्यासोबत असणे शक्य नाही होत मला. मग यातून माझी चिडचिड होतेय.

आता सासूबाई पडल्या परवा, पाय दुखावलाय. मी त्यांच्यासोबत रात्री दवाखान्यात थांबतेय, दिवसभर घरातील सगळे आटपतेय. दिवसा घरातील दुसरे कुणीतरी त्यांच्याजवळ आलटून पालटून थांबते. त्यांनी माझ्याच नावाचा घोषा लावलाय. तिलाच माझ्याजवळ थांबूदेत म्हणून. आता दोन्ही ठिकाणी मी एकटीच कशी पुरी पडणार? बरं वैदूला घरातले बघायला लावले असते, पण नेमके तिचे काॅलेजमध्ये सबमिशन सुरू आहे. तुला तर माहीतच आहे, या इंजिनिअर मुलांचे सबमिशन म्हणजे काय असते! ती जेवणासाठी सुध्दा उठत नाहीय, तर बाकीचे कुठे तिला सांगू?"

"तू तुला शक्य आहे तेवढेच करू शकतेस. तुला कुठे सहस्त्र हस्त आहेत राजा सहस्त्रार्जुनासारखे? प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आपण ऊर फाटेस्तवर धावायचे म्हटले तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होणारच! माणूस मनाच्या उमेदीच्या सहाय्याने अशक्य ते शक्य करू शकतो, तरीही या देहाच्या मर्यादा आहेत."

" सासुबाईंना काय वाटेल या विचाराने माझे मन आतल्या आत कुढतेय. त्यांची इच्छा आहे, त्यातून त्यांना माझ्याबद्दल असलेल्या आपुलकीची, विश्वासाची जाणीव होतेय. तो विश्वास, ती आपुलकी कमी होऊ नये असे मला वाटतेय, पण माझे शरीर साथ देत नाही रे. एवढी धापवळ करत सगळे मॅनेज करणे मला शक्य नाही म्हणून माझी चिडचिड होतेय. त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास, आपुलकी यामुळे कमी होईल असा विचार मनात येतो आणि मी स्वतःला हेल्पलेस समजतेय. इतकी वर्षे मी प्रयत्नपूर्वक जपलेले नाते कुठेतरी उसवेल का असा विचार मनात येतो."

"तू तुझे शंभर टक्के योगदान देत आहेस, मग हा प्रश्न तुला का पडावा? तुझ्या मनात त्यांच्याबद्दल तीच आपुलकी, प्रेम शाबूत आहे ना? मग झाले तर! त्यांना काय वाटेल किंवा त्यांनी काय विचार करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मला वाटत नाही, एवढ्या एका गोष्टीवरून त्यांचे तुझ्याबद्दलचे मत बदलेल. अन् जर तसे झाले तर तू एक गोष्ट ध्यानात ठेव."

" काय रे माधवा?" तिने आतुरतेने विचारले.

"आपण आपले कर्तव्य करायचे आणि बाजूला व्हायचे. कर्तव्य करताना आपण अजिबात कुचराई केली नाही याकडे लक्ष द्यायचे फक्त, त्यानंतर समोरची व्यक्ती त्याकडे कसे पाहते हा त्या व्यक्तीचा दृष्टीकोन! त्याचा आपण त्रास करून घ्यायचा नाही. तुला जे शक्यच नाही त्याचा विचार करून तू मनाला आणखी त्रास देत आहेस. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. सगळीकडेच आपण पुरे पडू शकत नाही ही वस्तुस्थिती स्वीकार."

"बघ, तुझ्याशी बोलले की मनाला स्वस्थता लाभते. माधवा, यासाठीच तू माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण आहेस."

"बरं, आज आम्हाला स्नान मिळणार आहे की फक्त कोरड्या शब्दांचाच अभिषेक घालणार आहेस?" माधवाने मिश्कीलपणे विचारले.

"माधवा, शब्द कोरडे नसतात, त्यासोबत भावना जोडलेल्या असतात." ती म्हणाली.

"हो, हे मात्र सत्य! मात्र त्या भावनेच्या भरात वाहवत जाऊ नये हे मात्र आपण जपले पाहिजे."

"चल, तुझ्याशी बोलणे आवरते घेतले पाहिजे. कामे वाट बघतायत. चला स्नानाला तयार व्हा." असे म्हणत तिने घंघाळात एका एका देवांच्या मूर्तीला स्नान घातले सुरू केले.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सदर मालिका आवडली तर जरूर कमेंट्स द्वारे सांगावे ही विनंती.

0

🎭 Series Post

View all