मधुरीमा (भाग २२
मैत्रिणी आणि बहिणींच्या घोळक्यात नववधूच्या वेशात मधुरा मामांच्यासमोर येऊन उभी राहिली.
"किती लवकर मोठी झालीस गं बाळा, आज तुझं लग्न... लहानपणी डोक्यावर टॉवेल घेऊन नवरी नवरी खेळायची... अगदी काल परवापर्यंत राधिकाताईसोबत येत होती ना घरी... चॉकलेटसाठी रडायला लागली की कसा माझा हात धरून माझ्यासोबत दुकानावर यायची." मामा मधुराच्या डोक्यावर हात फिरवत बोलले. बोलताना आवाज अगदी कातर झाला होता.
"हो, अन् आता मामाचाच हात धरून चॉकलेट हिरो जवळ जाणार आहे." रीमा डोळे मिचकावत बोलली तसं सगळेच हसायला लागले. मामासोबत मधुरा लग्नवेदीकडे जायला निघाली. पाहते तर काय ! गुलाबांच्या फुलांच्या पायघड्या तिच्या रुमपासून लग्नवेदीपर्यंत!
"बाबा पण ना!" मधुराच्या डोळ्यात पाणी आलं. तिची नजर बाबांना शोधत होती. आलेल्या आप्तेष्टांसोबत बोलताना मधुकरराव दिसले. त्यांचं लक्षही मधुराकडे गेलं. नववधूच्या वेशात मधुराला बघून त्यांचाही उर भरून आला.
लग्नावेदीर रुद्र उभा होता, त्याचं लक्ष मधुराकडे गेलं. मधुरा.... जणू सौन्दर्याची खाण! हिरवाकंच शालू त्यावर नाजूक सोनेरी नक्षीकाम केलेलं, हातात हिरवा चुडा अन् त्यात मध्ये मध्ये डोकावणाऱ्या सोनेरी बांगड्या, मेहेंदीचा रंगही मस्त लाल चुटुक, काळे टपोरे बोलके डोळे, डाळिंबी ओठ, चाफेकळी नाक, लाजून अजून लाल झालेले गुलाबी गोबरे गाल... साजेसा मेकअप, मुंडावळ्या अन् तिच्या सौन्दर्यात भर घालणारे सोन्याचे दागिने... जणू महालक्ष्मीचंच रूप! मधुरा लग्नवेदीवर उभी राहिली, अंतरपाटाच्या पलीकडे रुद्र उभा होता. त्यानंतर मंगलाष्टके झाली. भटजींनी तदैव लग्नम् म्हणणं सुरू केलं अन् बाहेर कोणीतरी फटाक्यांची लड लावली, बँड वाल्याने बँड वाजवला. अंतरपाट दूर झाले आणि रुद्रने मधुराला वरमाला घातली. मधुराची नजर खालीच होती. मधुरा रुद्रला वरमाला घालणार तेवढ्यात रुद्रच्या बाजूला एकच गडबड गोंधळ सुरू झाला.
"आता मी वरमाला घालताना जर कोणी रुद्रला वर उचललं ना तर त्याला खाली ठेवेपर्यंत मी काही वरमाला घालणार नाही." मधुरा मनातल्या मनात स्वतःशीच बोलली अन् तिने वरमाला घालायसाठी मान वर करून बघितलं. पाहते तर काय! रुद्र आधीच थोडं वाकून, मान खाली घालून तिच्या समोर मोठ्या अदबीने उभा होता. ओठांवर आलेलं गोड हसू दाबत मधुरानेही मोठ्या अदबीने त्याला वरमाला घातली. त्यानंतर सुलग्न आणि फोटोग्राफीचा कार्यक्रम पार पडला. नवदाम्पत्याचा जोडा अगदी लक्ष्मी- नारायणाचा जोडा दिसत होता.
सप्तपदी आणि कन्यादानासाठी मधुराने सुंदर लाल रंगाची नऊवारी नेसली होती, त्यावर जांभळ्या रंगाचा शेला घेतला होता. केसांचा अंबाडा , त्यावर नाजूकसा चुडामणि आणि सुंदर गजरा माळला होता. रुद्रने जांभळ्या रंगाचे धोतर आणि पांढरा कुर्ता अन् त्यावर टोपी असा पेहराव केला होता. सप्तपदीवेळी भटजीबुआ दोघांना एकेका मंत्राचा अर्थ सांगत होते. मधुरा अगदी मन लावून सगळं ऐकत होती. कन्यादानासाठी मधुकरराव, राधिकताईंना भटजींनी मधुराच्या बाजूला बसवलं. हातावर पडणाऱ्या पाण्यासोबत डोळ्यातलं पाणीही विधीमध्ये सहभागी झालं होतं.
"ज्यांचं मन मोठं असतं ना, देव त्यांनाच कन्या देतो. नशीबवान आहात तुम्ही, मधुरा तुमची मुलगी आहे." सुमनताई राधिकाताईंचा हात हातात घेऊन बोलल्या. राधिकाताईंचा उर भरून आला, त्यांनी सुमनताईंना मिठी मारली.
त्यानंतर विहिण पंगतीचा कार्यक्रम पार पडला. नवदाम्पत्याला सगळे जण उखाणा घ्यायला लावत होते. मधुरा आणि रुद्रने मस्त उखाणे घेतले. रुद्र बिचारा सगळ्या मेहुण्यांमध्ये फसला होता, सगळ्याजणी मिळून त्याला गोड गोड पदार्थ खाऊ घालत होत्या. गोड खाऊनच त्याचे पोट आज भरले होते. पानसुपारी घेऊन सगळे एकमेकांशी बोलण्यात गुंग होते. रीमा, आभा, प्रथमेश आणि सौरभ निरोप घ्यायला म्हणून मधुराजवळ आले. रुद्रसोबतही चौघांचे ट्युनिंग मस्त जुळले होते. गप्पा बऱ्याच रंगात आल्या होत्या. इतक्यात सुमनताई तिथे आल्या.
"मधुरा, चला बेटा, निघावं लागेल आता. पुढे घरी जाऊन अजून गृहप्रवेश करायचाय. गृहप्रवेशाला उशीर होईल नाहीतर. तुला हवं असेल तर दुसरी साडी नेसून घे. नऊवारीत तुला अवघडल्यासारखे होईल म्हणून म्हटलं. थोडा दुरचाच आहे ना प्रवास." सुमनताई.
मधुराने मोठ्या अदबीने हो म्हटलं पण तिच्या पोटात जणू एकदम गोळाच आला. "कदाचित हाच तो क्षण होता, त्यासाठीच लग्न नव्हतं करायचं... आपलं... सगळं असं सोडून नव्हतं जायचं..." विचारांचं काहूर मधुराच्या डोक्यात सुरू झालं होतं. सौरभ आणि प्रथमेश तिचा निरोप घेऊन निघाले होते. आभा आणि रीमा मधुराच्या रूमपर्यंत तिच्यासोबत आल्या होत्या.
"मधु, चल आम्ही पण निघतो आता. आई पण पोहोचेल आता स्टेशनवर. रात्री आई आणि मी मुंबईला जातोय. परवा मी जर्मनीला जाईल वापस." रीमा.
"अगं मग काकूंनाही इकडे का नाही बोलावलं तू? सगळ्यांची भेट झाली असती ना." मधुरा.
"इकडेच येणार होती ती, पण तिची ट्रेन सहा तास लेट झाली. सकाळी दहा वाजता पोहोचायची, ते ती आत्ता पोहोचतेय." रीमा.
"मग तू वापस कधी येशील जर्मनीवरून?" मधुरा.
"फेलोशिप संपेल माझी या पाच-सहा महिन्यात. नंतर एक सर्टिफिकेट कोर्स आहे तिकडे तीन महिन्यांचा. तो करायचा इच्छा आहे माझी. अजून आईसोबत नाही बोलले मी. व्हिसा पण एक्सटेंड होतो का ते बघावं लागेल. बघू. तो कोर्स नाही केला तर सहा महिन्यात वापस, नाही तर अजून तीन महिने वाढतील." रीमा.
"बरं.. लवकर ये.. आणि आली की भेट नक्की... आभा तू पण...भेटत जाऊ आपण शक्य होईल तेव्हा.." मधुरा, आभा आणि रीमा तिघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. इतक्यात मधुराची मावशी तिला बोलवायला आली. रीमा आणि आभा तिथून निघाल्या. तिघींनीही पावणावलेल्या डोळ्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. मधुरा छानशी साडी नेसून मावशीसोबत बाहेर आली. बाहेर आल्या आल्या तिची नजर राधिकाताई आणि मधुकररावांना शोधत होती. क्षणभरापूर्वी सगळं आपलसं वाटणार आता एकदम अनोळखी वाटत होतं. जत्रेमध्ये हरवलेल्या लेकरसारखी तिची अवस्था झाली होती, अगदीच सैरभैर. "आई... बाबा..." मनातल्या मनात आवाज देत भिरभिरणाऱ्या नजरेने ती शोधत होती. ते दोघे एका व्यक्तीसोबत बोलताना मधुराला दिसले आणि मधुरा पळतच जाऊन आई बाबांच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली, माय-बाप-लेक तिघेही अगदी हमसून हमसून रडत होते. भावनांची ही अवस्था कोणी शब्दात मांडायचा प्रयत्न केला असता तर त्याचे शब्दही थिटे पडले असते.
राधिकाताई, मधुकरराव मधुराला घेऊन बाहेर आले. फुला-फुलांनी सजवलेल्या कारसमोर रुद्र, सुमनताई आणि पुरुषोत्तमराव उभे होते.
"आमचं हृदय तुमच्या स्वाधीन केलंय. त्याची काळजी नक्कीच घ्याल तुम्ही." रुद्रच्या हातात मधुराचा हात देत मधुकरराव बोलले.
"तो तर ती घेईलच. आज वचन देतो आम्ही दोघे तुम्हा दोघांना. तुमच्या प्रेमाची सर कदाचित येणार नाही पण मधुरा आमची मुलगीच बनून येईल घरात. एक माय-बाप म्हणून आम्ही दोघेही मधुरासोबत नेहमीच राहू अगदी तिच्या प्रत्येक निर्णयात. कदाचित यासाठीच देवानं आमच्या पदरात मुलगी नाही घातली." पुरुषोत्तमराव मशुकररावांचा हात हातात घेऊन बोलले. मधुकररावांच्या चेहऱ्यावरची काळजीची लकेर थोडी कमी झाली.
पाठराखण म्हणून आत्या मधुराच्या सोबत आली होती. आयुषाच्या या नवीन वळणावर, या नवीन प्रवासात रुद्रचा हात हातात घेऊन फुला-फुलांच्या सजलेल्या गाडीतून मधुरा निघाली होती. आई-बाबा दिसेनासे होईपर्यंत मागे वळून बघत होती....
कसा असेल हा नवा प्रवास? रुद्र देईल का मधुराला साथ? या लक्ष्मी-नारायणाच्या जोड्याला कोणाची नजर तर नाही लागणार? जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मधुरीमा'.
क्रमशः
फोटो- गुगलवरून साभार
ही कथा वाचण्यासाठी सबस्क्रिबशनची आवश्यकता नाही.
(या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव आहेत. )
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा