मधुरीमा (पर्व-२) भाग-१
मुसळधार पाऊस पडत होता. समोरचं नीटसं दिसतही नव्हतं. भरदिवसा अंधारून आलं होतं. सकाळचे साडे अकराच वाजले होते… पण वेळ संध्याकाळ झाल्यासारखी वाटत होती. खरंतर निवांत बसून, वाफाळलेला चहा घेत किंवा गरमागरम कॉफीचा मग हातात घेऊन कोसळणाऱ्या पावसाकडे बघत मनमुराद आनंद लुटण्यासारखं वातवरण होतं; पण न्यायालय मात्र त्याला अपवाद होतं…
एवढ्या पावसातही आपापल्या केसचा निकाल ऐकण्यासाठी, न्याय मागण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी जो तो न्यायालयात हजर होता. पावसामुळे न्यायालयाच्या व्हरांड्यात माणसांच्या गर्दीचा पूर आला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती, चिंता, दुःख काहीना काही तरी होतंच.
तेवढ्यात न्यायालयाच्या परिसरात पोलिसांची गाडी येऊन थांबली. सर्वांचं लक्ष त्या गाडीकडे गेलं. इतक्यावेळ पावसात भिजू नये म्हणून गर्दीत दडी मारून बसलेले पत्रकार पटापट बाहेर आले. आता त्यांना पावसाची तमा नव्हती, हवी होती ती ब्रेकिंग न्यूज…!
सगळ्या पत्रकार लोकांनी, टी. व्ही. रिपोर्टरस् लोकांनी आपापले कॅमेरे पुढे करून पोलिसांच्या गाडीला वेढा घातला. गाडीतल्या पोलिसांपैकी काही पोलीस खाली उतरले, त्यांनी गर्दीला थोडं बाजूला केलं. सगळ्यांचं लक्ष गाडीच्या मागच्या दिशेला होतं. गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीच्या काचेतून काही दिसतंय का ते टिपण्यासाठी सगळे पुन्हा गर्दी करू लागले… पोलिसांनी पुन्हा वर्दीचा धाक दाखवला आणि गर्दी थोडी बाजूला केली. एका हवालदाराने गाडीच्या मागच्या दरवाज्याला लावलेल्या कडीचं कुलूप त्याच्याजवळच्या चावीने उघडलं. त्या गाडीतून आधी दोन महिला काऊंन्स्टेबल उतरल्या आणि त्यांच्यामागे उतरली \"ती\"….
\"ती\" गाडीतून उतरली तशी एवढ्या पावसात वीजा चमकाव्या तसे कॅमेरांचे फ्लॅश लाईट चमकत होते. जो तो आपल्याला परीने \"तिला\" कॅमेरात कैद करू बघत होता. \"ती\"... मध्यम उंची, उजळ गव्हाळ रंग… जेलमध्ये सर्व स्त्री कैद्यांना मिळते तशी पांढरी साडी घातलेली… खांद्यापर्यंतचे स्टेप कट कापलेले केस मागे एका रबरात कसेतरी बांधलेले… ती… काळ्या वर्तुळांनी वेढलेल्या, मोठ्या टपोऱ्या डोळ्यांची… त्या डोळ्यात एक शुष्कता… शुष्कता तिच्या डोळ्यात न जानो किती दिवसांपासून ठाण मांडून बसलेली… तिचा चेहरा अगदीच निर्विकार… कोणत्याच प्रकारच्या भावनेचा कोणताही लवलेश त्यावर अगदी शोधूनही सापडत नव्हता…
प्रश्नांचा भडीमार करून पत्रकार लोक आपापलं काम अगदी चोख करत होते. ती मात्र कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता अगदी स्तब्ध उभी होती. पावसाचा जोर वाढतच होता. तिने मान वर करून आकाशाकडे बघायचा वेडा प्रयत्न केला. या कोसळणाऱ्या सरी तरी तिच्या डोळ्यातली शुष्कता घालवतील असं क्षणभरासाठी तिला वाटून गेलं… पण डोळे शुष्क ते शुष्कच!
पोलिस वाट मोकळी करत तिला न्यायालयात नेत होते. तीसुद्धा खाली मान घालून निमूटपणे पोलिसांच्या मागे जात होती. सोबतच्या महिला पोलीस काऊंन्स्टेबलने डोक्यावर छत्री धरली होती; पण तरी ती बरीच भिजली होती. चालता चालता तिचं लक्ष तिने घातलेल्या पांढऱ्या साडीवर गेलं… पांढऱ्या शुभ्र साडीवर चिखलाचे शिंतोडे उडाले होते…
"आयुष्यही असंच झालंय नाही का…? कसं होतं ना… या साडीसारखंच आयुष्यही अगदी निर्मळ… कोणत्याच प्रकारचा बट्टा नाही… पण… पण…." तिच्या डोक्यात विचारांचा पाऊस अगदीच कोसळत होता. ती सैरभैर होऊन इकडे तिकडे बघत होती… सगळीकडे गर्दी… आणि या गर्दीत ती एकटी…
तिने डोळे मिटले… डोळ्यांसमोर आलेला अंधार आणि त्यात बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज… तिच्या अंगावर सर्रकन् काटा उभा करून गेला… तेवढ्यात तिच्या गालावर एक जोरदार चपराक बसली… त्यामुळे ती भानावर आली…
"का ग ए सटवे….! तुला लाज कशी वाटली नाही गं? अगं देवाचं दुसरं रूप म्हणून आम्ही तुमच्यासारख्या डॉक्टर लोकांकडे बघतो… आणि तू…. तू तर त्या देवरूपालाच काळिमा फसलास… कुठं फेडशील हे सगळं… तुझ्यामुळे माझी तरणी ताठी पोर गेली… देव तुला शिक्षा देईल… तू ही एकटीच पडशील… लै लोकांचे शाप घेतलेस तू… तुझं काहीच चांगलं होणार नाही…" गर्दीतून समोर एक बाई तिच्याकडे बघत अगदी उद्विग्नपणे बोलत होती. त्या बाईच्या चपराकीमुळे का होईना तिच्या शुष्क डोळ्यांत अश्रूंचे दोन थेंब आले होते… तरी ती तशीच उभी होती… स्तब्ध…
"ओ बाई… बाजूला व्हा… कोर्ट ठरवेल काय शिक्षा द्यायची ते…" पोलिसांनी त्या बाईला बाजूला केलं.
पत्रकारांचा गराडा मागे पुढे होताच… पुन्हा त्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती… एक एक प्रश्न तिच्या हृदयाचे हजारो तुकडे करत होता… ते तुकडे पावसाच्या थेंबासारखे इतस्ततः विखुरले जात होते…
"कोणता तुकडा उचलावा आणि तो कशाला जोडावा…? कसं सांगावं लोकांना…? आणि काय सांगावं…? कोणी विश्वास ठेवेल का माझ्यावर…? आणि का ठेवेल…?" तिच्या डोक्यात पुन्हा विचारांच्या वीजा चमकत होत्या.
"ए… चल ना पटापट… सारखं आपलं दोन पावलं चालली की थांबतेय…" एक महिला काऊंन्स्टेबल तिच्या अंगावर खेकसली आणि तिचा हात धरून तिला अक्षरशः ओढत नेऊ लागली. तितक्यात तिला त्या गर्दीत एक कातर स्वर ऐकू आला… त्या आवाजात ममता होती… त्या आवाजात काळजी होती… त्या आवाजात एकवटलेली हिम्मत होती… तिने मागे वळून पाहिले…
"रीमा…." सुनिताताईंचा आवाज तिने गर्दीतही बरोबर ओळखला होता. सुनिताताईंच्या बाजूला तिचा भाऊ रोहित उभा होता. खरंतर हे सगळं सोडून धावत जावं आणि आईच्या कुशीत शिरून मनसोक्त रडावं असं रीमाला वाटून गेलं; पण पुन्हा तिला वाटून गेलं, "कदाचित आईनेही आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर…?" ती पुन्हा स्तब्ध उभी झाली.
"रीमाताई, तू काळजी करू नको… आपण शहरातल्या नामवंत वकिलांकडे तुझी केस दिलीये…" रोहित आणि सुनिताताई बोलत बोलत पुढे आले.
"रीमा, अगं अरविंद कुठे आहेत? रीमा, अगं सगळं नीट होतं… चार दिवसांपूर्वी फोनवर बोलली तर तू घाईत होतीस कसल्यातरी…मग असं अचानक काय झालं? आणि हे टी. व्ही. वर, न्यूज पेपरमध्ये… हे असलं काय छापून आलंय बेटा…? मला माहितीये तू निर्दोष आहेस… " सुनिताताई अगतिकपणे विचारत होत्या.
"चला पटापटा… केसचा नंबर येईल आता… ओ बाई… तुम्ही इथेच वकिली करता का? काय झालं, काय नाही ते वकील विचारून घेतील ना…" पोलीस अधिकारी जबर आवाजात बोलले. महिला काउंस्टेबल रीमाला आत नेत होत्या. रीमा मागे वळून बघत होती… मागे सुनिताताई होत्या… रोहित होता… आणि होता तिचा भूतकाळ…
क्रमशः
(प्रिय वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,
मधुरीमा वर भरभरून प्रेम केलंत… त्यासाठी परत एकदा तुमचे खूप खूप आभार!
मागच्या पर्वात आपण मधुरीमा ची मैत्री, त्यांचा संघर्ष पाहिला होता… एका सुंदरश्या गोड वळणावर आपण थांबलो होतो… पण आयुष्य हे थांबण्यासाठी नसतंच मुळी… आयुष्याचा प्रवास सुखकर नक्कीच नसतो… अडचणींवर मात करून जेव्हा आपण थोडं विसावतो किंवा तसा विचार करतो ना, बरोबर तेव्हाच अजून नवनवीन अडचणी तयार होतात… नवनवीन संघर्ष जन्माला येतात… असंच काहीसं घडलं मधुरा आणि रीमाच्या बाबतीत… रीमा कैदी का झाली होती? असा कोणता गुन्हा केला होता तिने? आणि तिची जिवलग सखी मधुरा कुठे होती? काय झालं होतं नेमकं? ही मैत्री टिकेल ना या अडचणींपुढे… जाणून घेण्यासाठी वाचत रहा मधुरीमा पर्व २.)
मधुरीमा वर भरभरून प्रेम केलंत… त्यासाठी परत एकदा तुमचे खूप खूप आभार!
मागच्या पर्वात आपण मधुरीमा ची मैत्री, त्यांचा संघर्ष पाहिला होता… एका सुंदरश्या गोड वळणावर आपण थांबलो होतो… पण आयुष्य हे थांबण्यासाठी नसतंच मुळी… आयुष्याचा प्रवास सुखकर नक्कीच नसतो… अडचणींवर मात करून जेव्हा आपण थोडं विसावतो किंवा तसा विचार करतो ना, बरोबर तेव्हाच अजून नवनवीन अडचणी तयार होतात… नवनवीन संघर्ष जन्माला येतात… असंच काहीसं घडलं मधुरा आणि रीमाच्या बाबतीत… रीमा कैदी का झाली होती? असा कोणता गुन्हा केला होता तिने? आणि तिची जिवलग सखी मधुरा कुठे होती? काय झालं होतं नेमकं? ही मैत्री टिकेल ना या अडचणींपुढे… जाणून घेण्यासाठी वाचत रहा मधुरीमा पर्व २.)
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा