Login

मधुरीमा पर्व २ (भाग ३४)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ३४)


“मधुराच्या आई, बघितलं का कोण आलंय ते…” मधुराकडं बघत मधुकररावांनी राधिकाताईंना आवाज दिला. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.


“मधु… थांब हो बेटा, अशीच थांब…” राधिकाताई आल्या पावली परत घरात गेल्या. भाकर तुकडा पाणी घेऊन परत बाहेर आल्या. आपल्या लेकीवरून त्यांनी भाकर तुकडा ओवाळला.


‘किती थकलेत आई बाबा ह्या दोन वर्षात…’ मधुरा स्वतःशीच पुटपुटली. तिघेजण एकमेकांच्या गळ्यात पडले आणि दोन वर्षातले सगळे दिवस अश्रूंच्या मार्गाने डोळ्यांतून बाहेर झिरपू लागले… सगळ्या भावना डोळ्यातूनच वाहत होत्या. मायेच्या त्या स्पर्शापुढं शब्दही गोठले होते.


“मधुरा ताई, चला फ्रेश व्हा. मी चहा करते. माझा स्वयंपाक आटोपत आलाय… तुम्ही निवांत बसून जेवा मग…” सुनंदाबाई मधुराला म्हणाल्या. मधुरानं अमेरिकेला जाण्यापूर्वी सुनंदाबाईंना राधिकाताई आणि मधुकररावांची केअर टेकर म्हणून ठेवलं होतं. सुनंदाबाई सकाळीच आठ वाजता येत आणि रात्री आठ वाजेपर्यंत थांबत. सकाळ संध्याकाळ, स्वयंपाक, चहापाणी, घरातलं सामान वगैरे आणनं त्याच करत.


मधुरा फ्रेश होऊन आली. सुनंदाबाईंनी छान आलं घालून चहा केला होता.


“व्वा! ह्याला म्हणतात चहा… नुसत्या चहाच्या सुगंधावरूनच माणूस फ्रेश होऊन जातो… तिकडच्या दुधाचा चहा असा होतच नाही…” मधुरा चहा घेत म्हणाली.


“पण आई, तुझ्या हातची चव कुठंच नाही.” मधुरा म्हणाली.


“उद्या सकाळी तुला माझ्या हातचा चहा देईल, झालं तर मग…” राधिकाताई म्हणाल्या.

घरातली आवराआवर करून सुनंदाबाई निघून गेल्या. मधुराही अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसली.


“बाबा…” मधुरा बोलता बोलता थांबली.


“बोल ना, काय झालं?” मधुकरराव


“रीमाचा इतक्यात काही फोन वगैरे?” मधुरा


“कुठं गं, तू अमेरिकेला गेल्यानंतर काही दिवस रीमा आठवड्यातून एकदा घरी चक्कर मारून जात होती. नंतर नंतर तिनं येणं बंद केलं आणि फोन करायला लागली… इतक्यात तर तेही नाही… मीच एकदा फोन केला तर म्हणाली की कामाचा खूप ताण आहे.” राधिकाताई सांगू लागल्या.


“अरविंद… अरविंदबद्दल बोलली का ती कधी?” मधुरा


“नाही गं, कधीच नाही… सुनीताताई एकदोनवेळा असं म्हणाल्या होत्या की रीमा थोडी डिस्टर्ब वाटतेय… पण असं वाटलं की तिच्या लग्नानंतर दोन भिन्न संस्कृती एकत्र आल्या आहेत तर जुळवून घेताना त्रास होणारच…” राधिकाताई


“मधुराच्या आई, आजच गप्पा करता का सगळ्या? पोर दमून आलीये, एवढ्या दूरचा प्रवास करून… झोपू द्या आता तिला… आपण सकाळी बोलू की…” मधुकरराव


“हो… मधु, आता तू आराम कर, मी ना तुझ्यासाठी दूध बनवून आणते… दूध पी म्हणजे शांत झोप लागेल.” राधिकाताई म्हणाल्या आणि स्वयंपाक घरात गेल्या. मधुराही त्यांच्या मागं गेली.


“आई, आज माझ्याजवळ झोपशील?” मधुरा


“हो… ती काय विचारायची गोष्ट आहे का? तू दूध घे तोपर्यंत मी तेल कोमट करते… केसांना लावून देते.” राधिकाताई तेल गरम करत होत्या. दोघीजणी मधुराच्या रूममध्ये झोपायला गेल्या…

राधिकाताईंची बोटं केसांतून फिरताच मधुराचे डोळे जड व्हायला लागले. तसंही रीमाच्या अटकेची बातमी समजल्यापासून तिच्या डोळ्याला डोळ्या लागला नव्हता; पण राधिकाताईंच्या कुशीत शिरताच तिला अगदी गाढ झोप लागली.

मधुराला जाग आली ती मोबाईलच्या वाजण्याने…


डोळे चोळतच तिने फोन उचलला. नितीनचा व्हीडिओ कॉल आलेला होता.


“सकाळ झाली ना तिकडं अजून?” नितीन


“झाली असेल ना, किती वाजले काय माहित…?” मधुरा आळस देत म्हणाली. तेवढ्यात कॉल वर निती दिसली.


“निती, झोपली नाही तू अजून… चला ब्रश करा आणि झोपा, डॅडाला त्रास नको देऊ हां…” मधुरा तिला म्हणाली.


“आई, तू परत कधी येणार आहेस?” निती


“लवकरच येते हां, इथं हॉस्पिटलच्या कामासाठी आलेय ना, ते झालं की लगेच येते.” मधुरा


“ठीक आहे… बाय…” निती लगेचच उठून पळून गेली.


“माहेरचा ग्लो दिसतोय हां चेहऱ्यावर.” नितीन मधुराला म्हणाला.


“कशाचा ग्लो रे…” मधुरा जांभई देत म्हणाली.


“ठीक आहे झोप तू.” नितीन


“नाही रे, आता उठते, आवरते आणि रीमाला भेटायला जाते… जेलरनं भेटू नाही दिलं तर तशी परमिशन वगैरे काढावी लागेल…” मधुरा


“ओके, बघ काय आहे ते. काळजी घे.” नितीननं बोलून कॉल बंद केला. मधुरा उठली आणि रीमाला भेटायला जायची तयारी करू लागली.