Login

मधुरीमा पर्व २ (भाग ३०)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ३०)


नाईट शिफ्ट संपवून मधुरा घरी जायला निघाली. तिच्या डोक्यात रात्री कांचननं सांगितलेली गोष्ट फिरत होती. तिनं कार थांबवली.


‘करू का फोन? साडे आठ वाजले म्हणजे खूप लवकर फोन केला असं तर नाही ना वाटणार?’ विचारातच तिनं एक नंबर डायल केला.

“ठीक आहे मी तासाभरात पोहोचतेच हॉस्पिटलमध्ये. तुम्ही पण या तेव्हाच. काही डिस्काउंट वगैरे मिळेल का?” मधुरा बोलत होती.

“मॅडम तसे आमच्या प्रॉडक्टचे प्लॅन असतात. तुम्हाला तर माहीतच आहे आमची सर्व्हीस. मी तुम्हाला सगळं योग्य किमतीमध्ये देईल. एकूण खर्च किती आहे ते मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर सांगेल.” समोरचा माणूस म्हणाला.

“ठीक आहे, तुम्ही या.” मधुरा म्हणाली आणि घरी जायला निघाली. थोड्यावेळात मधुरा घरी पोहोचली. राधिकाताई अंगणात एका झाडाची कटिंग करत होत्या तर मधुकरराव झाडांना पाणी घालत होते.

“मधु आलीस आलीस होय!” राधिकाताई तिच्याकडं बघत म्हणाल्या.

“हो आणि लवकरच परत जाणार आहे हॉस्पिटलमध्ये.”मधुरा म्हणाली

“ठीक आहे. तू फ्रेश होऊन ये. मी तोपर्यंत नाश्ता बनवते.” राधिकाताई घरात गेल्या मधुरा आणि मधुकरराव त्यांच्या मागं गेले. तेवढ्यात मधुकर रावांचा फोन वाजला

“बाबा कुणाचा फोन होता?” मधुरा म्हणाली.

“नितीच्या स्कूलबसच्या ड्रायव्हरचा फोन होता.तो आज येणार नाही म्हणे.” मधुकरराव

“अच्छा. असं करते मी तिला हॉस्पिटलमध्ये जाताना शाळेत सोडते. तिला घ्यायला मात्र तुम्ही जा.” मधुरा म्हणाली. तिनं स्वतःची आणि नितीची तयारी केली आणि हॉस्पिटलमध्ये जाता जाता नितीला शाळेत सोडलं.

मधुरा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर रिसेप्शनवर वेगळीच गडबड सुरू होती. मधुरानं बोलवलेल्या माणसासोबत अरविंद अरविंद वाद घालत होता

“काय झालं, कुणी काही सांगू शकेल का?” मधुरा दोघांच्यामध्ये पडली

“तर न सांगायला काय झालं? आल्या मोठ्या मॅडम! कुणी सांगितलं ह्याला सगळीकडं सीसीटीव्ही लावायला? आम्ही पण काम करतो ह्या हॉस्पिटलमध्ये. आम्हाला विचारावं वाटलं नाही तुला.”अरविंद चिडला होता

“कुणी सांगितलं म्हणजे? मी सांगितलं. काय प्रॉब्लेम आहे त्यात?” मधुरा म्हणाली.

“काय प्रॉब्लेम आहे म्हणजे! तुला लावायचे तिथं सीसीटीव्ही लाव ल; पण माझ्या चेंबर मध्ये आणि ओटीमध्ये सीसीटीव्ही लावलेला मला चालणार नाही.” अरविंद खूपच चिडलेला होता


“का? काही स्पेसिफिक कारण आहे का?” मधुरा


“मधु, अरविंद… पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आहेत इथं. प्लिज आपण आत जाऊन बोलूया का?” रीमा म्हणाली. अरविंद आणि मधुरा दोघं तिच्या मागं गेले.

“सांग आता, काय प्रॉब्लेम आहे?” मधुरा म्हणाली.


“काय प्रॉब्लेम आहे म्हणजे! प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही?” अरविंद म्हणाला

“सीसीटीव्ही लावल्यानं कोणती प्रायव्हसी डिस्टर्ब होणार आहे?” मधुर म्हणाली


“अगं पण पेशंटला तपासतो, तेव्हा ती गोष्ट अशी रेकॉर्ड करणार का तू?” अरविंद मोठ्या आवाजात म्हणाला.

“पेशंट तपासतो तर एक्झॅक्ट त्याच्यावर थोडी सीसीटी लागणार आहे! आपल्या रूममध्ये राहणार आहे
कोण आलं गेलं, कुणी वस्तू घेतली, आपल्याला सगळं कळेल ना.” मधुरा


“हे बघ मथुरा, तुला लावायचा आहे कॅमेरा तर तुझ्या चेंबरमध्ये एक नाही पाच सीसीटीव्ही लाव, मला प्रॉब्लेम नाही; पण माझ्या चेंबरमध्ये मला सीसीटीव्ही पाहिजे नाही… आणि ओटीमध्येसुध्दा.” अरविंद


“चेंबरचं समजू शकते; पण ओटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे?” मधुरा


“अरे कुणीतरी सांगा हिला समजावून ऑपरेशन करताना आपल्याला काय काय कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागतात हे आपल्या इतकं कुणाला समजू शकत नाही. तू तिथंच सीसीटीव्ही लावशील एखाद्या पेशंटचा काही कमी जास्त झालं आणि नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेज मागून त्यावर काही धिंगाणा घातला तर?” अरविंद नसत्या शंकाकुशंका काढत होता.


“आपण चुकीचं काही केलं नाही तर आपल्याला घाबरून जायची गरजच नाही.” मधुरा म्हणाली

“पण मला काय वाटतं मधुरा; ठीक आहे ना आपण ओटीमध्ये सीसीटीव्ही नाही लावू. तुला वाटत असेल तर हॉस्पिटलमध्ये बाकी ठिकाणी लावू.” रीमा मधला मार्ग काढत होती.

“हे बघ रीमा, ओटी मध्ये जरसीसीटीव्ही लागला तर मी या हॉस्पिटलमध्ये काम करणार नाही. तसाही तुझ्या या मैत्रिणीचा पहिलेपासूनच माझ्यावर विश्वास नाही आणि आता तुझा हि नसेल तर आपला रस्ता आपण मोकळा करू.” अरविंद चिडला होता

“हे बघ, तू कुठली गोष्ट कुठल्या कुठं नेतो आहेस. असं काही नाहीये मी तुझं चेंबर आणि ओटी सोडून बाकी ठिकाणी सीसीटीव्ही लावायला लावते.” मधुरा नाईलाजानं म्हणाली. अरविंद आणि रीमा त्यांच्या त्यांच्या चेंबरमध्ये गेले.


‘चेंबरमध्ये सीसीटीव्ही लावायचा म्हटलं तर किती चिडला हा… म्हणजे कांचननं सांगितलेली गोष्ट संपूर्णपणे खरी आहे? काय करू? रीमासोबत बोलु का? रीमा त्याच्यासोबत खरं खोटं करेल? आणि हे सगळं प्रकरण चिघळत गेलं तर?’ मधुराच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं. तरी तिनं सीसीटीव्हीवाल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही लावायला लावले.


दिवस पुढे सरकत होते अरविंद हॉस्पिटलमधल्या प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवत, प्रत्येक गोष्टीत हेकेखोरी करत होता. मधुराच्या कोणत्याच गोष्टीत अरविंद सहमती द्यायचा नाही. रीमा काही म्हणायला गेली तर दोघांत पराकोटीचे वाद उभे राहत होते. रीमाही सगळ्या गोष्टींना कंटाळली होती. कुठंच समजुतीचा मार्ग निघत नव्हता. हॉस्पिटलमधलं वातावरण विचित्र होत चाललं होतं.

इकडं मधुरा आणि नितीनचं मात्र अगदी व्यवस्थित सुरू होतं. शनिवार रविवार नितीन मधुराला आणि नितीला भेटायला येत होता. मधुराच्या आयुष्यातले ते दोन दिवस अगदी हसत खेळत जात होते. मधुरीमा मध्ये मात्र मधुरा प्रत्येक दिवस जणू मोजून काढत होती.

असंच एका शनिवारी नितीन मधुराला भेटायला आला होता. मधुरा, नितीन, मधुकरराव आणि राधिकाताई चौघे रात्री गप्पा मारत बसले होते.

“मला तुम्हाला सगळ्यांना एक बातमी सांगायची आहे.” नितीन म्हणाला

“का रे काय झालं!” मधुराला आश्चर्य वाटलं.

“मधुरा तुला आठवतं तू मुंबईत असताना अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीतून मला दोन वर्षासाठी सायकॉलॉजी विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून बोलावलं होतं, आता त्यांचा परत मेल आलाय आणि ह्यावेळी मी त्यांना होकार कळवला.” नितीन म्हणाला.

“म्हणजे आता तुम्ही अमेरिकेत जाणार.” मधुकरराव म्हणाले.


‘म्हणजे आता परत मधु एकटी राहणार.’ राधिकाताईंच्या चेहऱ्यावर लेकीबद्दल चिंता स्पष्ट दिसत होती.

क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर