Login

मधुरीमा पर्व २ (भाग ३३)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ३३)

मधुराने पावर ऑफ ऍटोर्नीचे कागदपत्र रीमाच्या स्वाधीन केले.

“उद्या सकाळी येऊन ऑफिशियली माझे पेशंट तुला सोपवणार… दुपारी गावी जाईल, मम्मी पप्पांची भेट घेईल… शुक्रवारी पहाटे मुंबईत पोहोचेल… सासूबाईंची भेट घेऊन रविवारी आम्ही निघू.” मधुरा म्हणाली.


“मधू…” रीमा तिथून उठली आणि तिने मधुराला कडकडून मिठी मारली… अश्रूंच्या श्रावण धारेत दोघी मैत्रिणी अगदी चिंब भिजल्या.


बघता बघता रविवारचा दिवस उजाडला आणि मधुराचं विमान न्यूयॉर्कच्या दिशेनं झेपावलं.


*****************************************


“लेडीज अँड जेंटलमन वी विल बी लँडिंग शॉर्टली. थॅंक्यु फॉर फ्लाईंग विथ अस. वी होप टू सी यु सुन…” विमानात झालेल्या अनाऊन्समेंटमुळं मधुरा भानावर आली. हा दोन वर्षांचा काळ आठवताना जवळपास अठरा तासांचा विमान प्रवास कसा संपला हे मधुराला कळलंही नाही. मधुरा खिडकीच्या बाहेर बघू लागली. डोळे दिपवणाऱ्या मुंबईतल्या उंचच उंच इमारती वरून अगदी छोट्या छोट्या दिसत होत्या. आपल्या देशाचा, मायभूमीचा स्पर्श अगदी तिला नजरेनंही जाणवत होता. तिच्या डोळ्यातुन नकळत अश्रू ओघळू लागले.


मधुरानं तिच्या खुर्चीची पेटी बांधली. आणि थोड्याच वेळात सकाळी आठच्या दरम्यान विमान मुंबई विमानतळावर उतरलं. मधुरा विमानातून खाली उतरली. विमानाच्या बाजूलाच उभ्या असलेल्या बसमध्ये सगळे प्रवासी चढले. बस विमानतळाच्या टर्मिनलच्या दिशेनं गेली. तिथं उतरल्या उतरल्या मधुराचे हात आपसूकच जमिनीकडे वळले. आपल्या मातीला स्पर्श करण्याचा मोह तिला आवरला नाही.

लगेज, इमिग्रेशन वगैरे सगळ्या प्रोसेस पार करून जवळपास अडीच तासाने मधुरा विमानतळाबाहेर पडली. त्याआधी ती विमानतळावरच फ्रेश झाली. गावी जाण्यासाठी तिनं विमानतळावरूनच डायरेक्ट टॅक्सी बुक केली होती. मधुरा टॅक्सीत बसली. नितीनला फोन लावायला तिनं पर्समधून मोबाईल बाहेर काढला. नितीनचा फोन लागत नव्हता म्हणून मग तिनं त्याला मुंबईला पोहोचल्याचा मेसेज केला.


“दादा, मुंबई बाहेर पडल्यावर एखादं चांगलं हॉटेल किंवा ढाबा बघून गाडी थांबवाल.” मधुरानं ड्रायव्हरला सांगितलं. त्यानंही होकार भरला. मधुरा खिडकीच्या बाहेर बघू लागली.


‘नेमकं काय मॅटर झालं असेल? जे कानावर पडलंय, बातम्यांमध्ये वाचलं ऐकलं तसं काही करणाऱ्यातली रीमा नाहीये. मग कुणी फसवलं का रीमाला? अरविंद कुठंय? त्याच्या नावाचा कुठंच उल्लेख नाहीये? काय घोळ आहे नेमका?’ मधुरा रीमाचा विचार करत होती.

तेवढ्यात ड्रायव्हरनं एका ढाब्यावर गाडी थांबवली. मधुरानं चहा आणि नाश्ता घेतला. पोटात अन्न पडल्यावर तिला जरा बरं वाटू लागलं. तिथं बसल्या बसल्या तिनं एक वर्तमानपत्र चाळलं. तिची नजर रीमाच्या बातमीलाच शोधत होती आणि तिला ती बातमी दिसलीच.

‘कालच रीमाच्या केसची सुनावणी होती. कोर्टानं पंधरा दिवसानंतरची तारीख दिलीये... जलदगती कोर्टानं न्यायनिवाडा व्हावा अशी मागणी होतेय…’ वर्तमानपत्र वाचून ती मनाशीच बोलत होती.

‘म्हणजे पंधरा दिवस आहेत माझ्याकडं… पण खरं कारण कळल्याशिवास मी तरी काय करणार… मला रीमाला लवकरात लवकर भेटून सगळं जाणून घ्यावं लागेल… ह्या सगळ्यात रीमा निर्दोष आहे, एवढं मात्र नक्की.’ गाडीत बसल्यावर मधुराच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरू झालं होतं.


संध्याकाळ झाली. मधुराची टॅक्सी तिच्या घरासमोर थांबली. मधुरा टॅक्सीतुन खाली उतरली. स्वतःचं टॅक्सीतलं सामान तिनं काढलं आणि फाटक उघडून ती आत आली. नेहमीप्रमाणे तुळशी वृंदावनात दिवा तेवत होता. धूप अगरबत्तीचा मंद सुगंध सगळीकडं दरवळला होता. तो सगळा सुगंध स्वतःत साठवून घ्यावा असं मधुराला क्षणभर वाटून गेलं. तितक्यात फाटक उघडल्याचा आवाज आला म्हणून मधुकरराव बाहेर आले.


“मधुराच्या आई, बघितलं का कोण आलंय ते…” मधुराकडं बघत मधुकररावांनी राधिकाताईंना आवाज दिला. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.


“मधु… थांब हो बेटा, अशीच थांब…” राधिकाताई आल्या पावली परत घरात गेल्या. भाकर तुकडा पाणी घेऊन परत बाहेर आल्या. आपल्या लेकीवरून त्यांनी भाकर तुकडा ओवाळला.


‘किती थकलेत आई बाबा ह्या दोन वर्षात…’ मधुरा स्वतःशीच पुटपुटली. तिघेजण एकमेकांच्या गळ्यात पडले आणि दोन वर्षातले सगळे दिवस अश्रूंच्या मार्गाने डोळ्यांतून बाहेर झिरपू लागले…


क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर

🎭 Series Post

View all