मधुरीमा पर्व २ (भाग ३५)
आतापर्यंत आपण पाहिलं की रीमाला अटक झाल्याची बातमी कळताच मधुरा भारतात येऊन पोहोचली.
नितीनसोबत बोलून मधुरा बाहेर आली. राधिकाताई आणि मधुकरराव बाहेर अंगणात खुर्चीवर बसून चहा घेत होते.
“मधु, उठलीस! ते जेट लॅग का काय म्हणतात तसला काही त्रास होतोय का तुला?” राधिकाताई
“नाही गं, तसं काही नाही… थोडं डोकं जड वाटतंय. बाकी काही नाही.” मधुरा
“तू बस इथं. मी चहा आणते. सुनंदाबाईंना पोहे करायला लावलेत नाश्त्याला. जेवायलाही तुझ्या आवडीचा बेत आहे.” राधिकाताई बोलत तिथून उठल्या आणि घरात जाऊ लागल्या.
“आई, बस गं तू… मी करून आणते चहा.” मधुरा म्हणाली.
“थांब गं… मीच आणते. पुन्हा तो परदेशात निघून जाशील आणि मनाला रुखरुख वाटत राहील… काल तुला माझ्या हातचा चहा घ्यायचा होता ना. बस तू, आलेच मी.” राधिकाताई घरात गेल्या. मधुरा मधुकररावांजवळ बसली.
“बाबा, पप्पांचा काही फोन वगैरे?” मधुरा
“हो गं… माझं बोलणं झालं होतं मध्यन्तरी… सुमनताईंची तब्येत बरीच नाजूक झालीये आता… रविशही विचारत नाही त्यांना. एक मुलगा असूनही विचारत नाही आणि दुसरा तर…. म्हातारपणी हे असलं दुःख झेपत नाही ना.” मधुकरराव
“परत जाण्यापूर्वी भेटून येईल एकदा.” मधुरा म्हणाली.
“कोणाला भेटायला जातेय आता?” राधिकाताई चहा घेऊन आल्या.
“अगं आई, मला आवाज द्यायचा ना… बस इथं.” मधुरा हातातला कप घेत म्हणाली.
“सुमनताईंना भेटायला जायचं म्हणतेय मधुरा.” मधुकरराव
“हो का? मी म्हणत होती की आपण सगळेच जाऊया. तसंही आता घरात राहून कंटाळून गेलेय गं.” राधिकाताई
“हो जाऊ… पण आधी हे मॅटर सोल्व होऊ दे… बाबा, मला एक सांगा, माझ्या नावाने काही नोटीस वगैरे आली नाही का? तसं पाहिलं तर ‘मधुरीमा’वर केस झालीये, टाळं लागलं तर मलाही त्याची विचारणा व्हायला हवी होती ना!” मधुरा
“हो ना… आम्हालाही वाटलं तुला बोलावतील चौकशीसाठी पण तसं काही झालं नाही.” मधुकरराव
“कमालच आहे… म्हणजे मी राजीनामा दिला त्यानंतर सगळं झालंय… पण नेमकं काय झालं असेल? जे आरोप रीमावर लागलेत, असं काही करण्यातली रीमा नक्कीच नाहीये… कुणीतरी खूप डोकं लावून केलंय असं वाटत नाही का? बाबा, मला एक सांगा, रीमा कधी काही बोलली का हो? अरविंदचा काही संपर्क? रीमाला अटक झालीये पण ह्यात अरविंद कुठंच प्रकाशझोतात नाहीये… तो कुठं गेला असेल मग?” मधुरा
“मधु, खरं सांगू का… तू मधुरीमातुन तुझे हक्क काढून घेतलेस मग आम्ही पण त्यात लक्ष देणं सोडलं. रीमा बघत होती सगळं. असं वाटलं उगीचच आपण काय लुडबुड करावी… आम्ही तिला फोन वगैरेसुध्दा केला नाही. तू गेल्यानंतर ती एक दोनवेळा भेटून गेली पण तेव्हा काही वाटलं नाही असं…” मधुकरराव म्हणाले.
“मग काय झालं असेल?” मधुरा विचारात पडली.
“तू तिला भेटायला जाणार नाही का?” राधिकाताई
“हो जाणार आहे. रोहित तिला भेटायला जायची परवानगी घेऊन येतोय. गरज असो किंवा नसो आधीच परवानगी घेऊन घेते आणि मग जाते. उगीचच वेळ वाया घालत नाही…” मधुरा म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला.
“हे बघ, रोहितचाच फोन आलाय..” राधिकाताईंकडे बघत मधुरा म्हणाली आणि फोन उचलून बोलत तिथून उठली.
पाच मिनिटांत मधुरा परत तिथं आली.
“आई, दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत जाऊ आम्ही तिकडे… रीमासाठी डब्बा देशील का गं?” मधुरा
“हो गं… देशील का म्हणजे काय? भरली वांगी केली आहेत, तिलाही आवडतात ना… घेऊन जा टिफिन.” राधिकाताई म्हणाल्या. मधुरा तिच्या तयारीला लागली.
‘किती दिवसांनी रीमाला भेटणार मी… पण ह्या अशा अवस्थेत भेटावं लागेल असा विचारही नव्हता केला कधी… कशी असेल रीमा? काय झालं असेल नेमकं?’ मधुराच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं.
तिनं तयारी केली. कारची चावी घेतली आणि सरळ निघाली…. सेन्ट्रल जेलच्या दिशेने
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा