मधुरीमा पर्व २ (भाग ३६)
‘किती दिवसांनी रीमाला भेटणार मी… पण ह्या अशा अवस्थेत भेटावं लागेल असा विचारही नव्हता केला कधी… कशी असेल रीमा? काय झालं असेल नेमकं?’ मधुराच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं.
तिनं तयारी केली. कारची चावी घेतली आणि सरळ निघाली…. सेन्ट्रल जेलच्या दिशेने…
मधुरा सेन्ट्रल जेलच्या आवारात पोहोचली. गेटजवळच रोहित आणि रीमाचे वकील उभे होते.
“मधुराताई, हे ऍडव्होकेट अनिरुद्ध… रीमा ताईची केस हेच बघत आहेत…” रोहितने ओळख करून दिली.
“नमस्कार सर!” मधुरा वकिलांना म्हणाली.
“ग्लॅड् टू मीट यू! आता तरी रीमा मॅडम काही प्रश्नांची उत्तरं देतील अशी आशा करायला हरकत नाही.” अनिरुद्ध
“म्हणजे?” मधुराला आश्चर्य वाटलं.
“ताई, रीमा ताई काहीच बोलत नाहीये गं… काय झालं? कसं झालं? कशाची म्हणून उत्तरं देत नाहीये… शून्यात नजर लावून बसलेली असते.” रोहित म्हणाला. बोलत बोलत तिघे आत आले. वकील पुढच्या प्रक्रिया करण्यात व्यस्त झाले. तोपर्यंत रीमा आणि रोहित बाहेर थांबले होते.
“रोहित, अरविंद कुठं आहे?” मधुरा रोहितला म्हणाली.
“ताई, रीमाताईला अटक होण्याच्या दोन तीन दिवसांपूर्वीच ते कोलकात्याला गेले होते. त्यांच्या आईला नेऊन सोडायचे होते आणि तिथल्या शेतीचे काही व्यवहार करायचे होते असं म्हणाले… ताईला अटक झाल्यापासून मी त्यांना फोन करतोय पण त्यांचा फोनच लागत नाहीये.” रोहित
“काय! अरे मग तू पोलिसांत मिसिंग कंपलेंट वगैरे करायची असती ना.” मधुरा
“सगळ्या गोष्टी अशा अनपेक्षितपणे घडत गेल्या ना की कळलंच नाही काय करायला हवं ते. आता करूया का कंपलेंट?” रोहित
“आता? नको… राहू दे… वकील सांगतील आपल्याला काय करायचं ते.” मधुरा रोहितला म्हणाली.
‘अरविंद गायब आहे, म्हणजे… कदाचित अरविंदनं रीमाला फसवलं, असं तर नसेल ना? आणि जर तसं नसेल तर मग अरविंद का समोर येत नाहीये? मला वाटतं ह्याचा शोध मलाच लावावा लागेल… काय करता येईल? पोलीसात तक्रार द्यावी का? की स्वतःच शोधून काढू त्याला? पण शोधू तरी कसं?’ मधुरा स्वतःच्याच विचारात हरवली होती. तेवढ्यात अनिरुद्ध तिथं आला.
“चला, दहा मिनिटांत आपण रीमा मॅडमला भेटायला जाऊ.” अनिरुद्ध
“दहा मिनिटांनी का?” मधुरा
“त्यांच्या काही प्रोसिजर असतात… आणि तसेही कैदी तुरुंगात ठेवलेले असतात ना… त्यांना तिथून इकडं विझीटिंग रूममध्ये आणायला तेव्हढा वेळ लागतो ना.” अनिरुद्ध
“ठीक आहे.” मधुरा तिथं बाजूला असलेल्या बाकड्यावर बसली आणि आजूबाजूला बघू लागली.
‘तुरुंग… मग तो कुठला का असेना… तुरुंग तो तुरुंगच… सगळे तुरुंग सारखेच… आठवतं मला, मी दिल्लीला रुद्रला भेटायला गेले होते, तोही तुरुंग असाच होता… भकास… रुक्ष… कैद्यांना इथं राहिलं की जगण्याची उमेदच वाटू नये म्हणून असं असेल का तुरुंग? कधी कधी आपल्या मानाचाही असाच तुरुंग होऊन बसतो… मनात आलेले रुक्ष विचार काही केल्या त्यातून सुटायला बघत नाहीत… पण बरेचदा वाटतं काही विचार तुरुंगातच डांबून ठेवायला हवेत… मनावर त्यांचं वर्चस्व नकोच… नको ते विचार मनावर हावी झाले तर नको त्या गोष्टी होतात…. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ही…’ मधुरा स्वतःच्याच विचार तंद्रीत होती.
“ताई, चल जाऊ या.” रोहितच्या आवाजाने ती भानावर आली. रोहितचा आवाज तिला कापरा वाटला. तिनं त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं.
“रोहित… अरे…” मधुरा
“खरं सांगू ताई, रीमाताईसमोर जाण्याची हिम्मतच होत नाही गं… कसं सावरावं तिला हेच कळत नाही.” रोहितनं आवंढा गिळला.
“हिंमत हरवून चालणार नाही… मी आलेय ना, चल… आपण भेटू तिला… सगळं नीट होईल … आपण आशावाद सोडायचा नाही.” मधुरा त्याला समजावत होती; पण काहीसं उसनं अवसान आणूनच.
तिघेजण चालत विझीटिंग रूममध्ये गेले. एका पारदर्शक काचेच्या एका बाजूला ते उभे होते. त्या काचेला खालच्या बाजूने थोडी जागा होती. त्या बाजूला एक खुर्ची आणि ह्या बाजूला एक खुर्ची अशी बसायची व्यवस्था होती. मधुरा सैरभैर नजरेने इकडंतिकडं बघू लागली. एका लेडी कौन्स्टेबलसोबत तिला रीमा येताना दिसली. रीमाची अवस्था अगदी न बघण्यासारखी झाली होती. रीमाला पाहिल्या पाहिल्या मधुराला तिला मिठी मारावी वाटली… पण रीमा आणि मधुराच्या मध्ये होती एक भिंत… काचेची…
दोन मैत्रिणीत तयार झालेली ही भिंत मधुरा भेदू शकेल का?
बघूया पुढच्या भागात
क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर