मधुरीमा पर्व २ (भाग ३७)
तिघेजण चालत विझीटिंग रूममध्ये गेले. एका पारदर्शक काचेच्या एका बाजूला ते उभे होते. त्या काचेला खालच्या बाजूने थोडी जागा होती. त्या बाजूला एक खुर्ची आणि ह्या बाजूला एक खुर्ची अशी बसायची व्यवस्था होती. मधुरा सैरभैर नजरेने इकडंतिकडं बघू लागली. एका लेडी कौन्स्टेबलसोबत तिला रीमा येताना दिसली. रीमाची अवस्था अगदी न बघण्यासारखी झाली होती. रीमाला पाहिल्या पाहिल्या मधुराला तिला मिठी मारावी वाटली… पण रीमा आणि मधुराच्या मध्ये होती एक भिंत… काचेची…
लेडी कौंस्टेबलने रीमा खुर्चीत बसवले आणि त्या खुर्चीच्या हँडलला हातकडी लावली.
“रीमा…” डोळ्यातलं पाणी अडवत मधुराने तिला आवाज दिला. रीमाने तिच्याकडं पाहिलंही नाही. मधुराला अजूनच गलबलून आलं.
“रीमा, मी आलेय ना… बघ इकडं. काय झालं होतं मला सांगशील का?” मधुरा तिच्यासोबत संवाद साधायचा प्रयत्न करत होती. पण रीमा शुन्यात नजर लावून बसली होती.
“रीमा, काही तर बोल गं.” मधुरा तिला आर्जवे करत होती.
“ताई, सांग ना काहीतरी… हे बघ, तुझी बेस्ट फ्रेंड आलीये तुला भेटायला. तिला तरी सांग सगळं.” रोहितही कापऱ्या आवाजात तिला म्हणाला. रीमामध्ये मात्र तसूभरही फरक पडला नाही. मधुरा रीमाला आवाज देत होती; पण रीमा काहीच रिस्पॉन्स करत नव्हती. मधुरा तिला बोलकं करायचा प्रयत्न करत होती आणि अचानक रीमा खुर्चीतून खाली कोसळली.
“रीमा…” मधुराच्या आवाजाने बाहेर थांबलेला जेलरही आत आला. आजूबाजूला असलेले पोलीस तिथे गोळा झाले.
“जेलरसाहेब… मला आत जाऊ द्या… बघू द्या तिला काय झालं ते.” मधुरा जेलरला म्हणाली.
“सॉरी मॅडम, मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. त्याची परवानगी तुम्हाला नाहीये.” जेलर
“हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि माझ्यासमोर एखाद्या व्यक्तीला काही होऊ देणं माझ्या तत्वात बसत नाही. मला आत जाऊ द्या नाहीतर हलगर्जीपणाची केस मी तुमच्यावर टाकेल.” मधुरा त्वेषाने म्हणाली. जेलरने तिला आत जाऊ दिले. मधुराने रीमाची नाडी तपासली. तिच्या पर्समध्ये इमर्जन्सी किट होतंच. तिने रीमाचा बीपी पाहिला, ग्लुकोमिटरवर शुगर पाहिली.
“रोहित, बीपी लो आहे… शुगर लो आहे. बहुदा खूप दिवसांत हिने काही खाल्लंच नाहीये. रीमाला ताबडतोब दवाखान्यात न्यावं लागणार आहे.” मधुरा घाईघाईने म्हणाली.
“हे बघा मॅडम, तुमच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला इथे येऊन कैद्याला तपासू दिलं. आता दवाखान्यात नेण्याची प्रोसेस असते. ती आमची आम्हाला करू द्या.” जेलर म्हणाला. मधुराने आशेने वकिलांकडे पाहिले.
“त्यांना त्यांची प्रोसेस करू द्या.” वकील म्हणाले.
“जे काही करायचं ते लवकर करा. हिच्या जीवाला धोका आहे. प्लिज…. लवकर करा.” मधुराने जेलरसमोर हात जोडले. जेलरने पुढच्या प्रक्रिया केल्या आणि रीमाला ऍम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आलं. ऍम्ब्युलन्स सरकारी दवाखान्याच्या दिशेने निघाली.
मधुरा, रोहित आणि अनिरुद्ध ऍम्ब्युलन्सच्या मागेच निघाले.
सरकारी दवाखान्याच्या आपत्कालीन विभागासमोर ऍम्ब्युलन्स थांबली. तोपर्यंत मधुरा आणि रोहितने स्ट्रेचर आणून ठेवले. रीमाला ऍम्ब्युलन्समधून बाहेरच्या स्ट्रेचरवर काढण्यात आलं. मधुरा तीची नाडी बघत होती. नाडी अगदीच मंद लागत होती.
“रोहित, चल पटकन… काहीही होऊ शकतं.” मधुरा रोहितला म्हणाली आणि स्वतःच स्ट्रेचर ढकलायला लागली. रोहितने आणि मधुराने मिळून धावतच स्ट्रेचर आपत्कालीन विभागात नेलं.
“कोण आहे ऑन ड्युटी डॉक्टर? पेशंटची पल्स ड्रॉप आहे, बीपी आणि शुगर लो आहे…” मधुरा तिथल्या सिस्टरला उद्देशून म्हणाली.
“ओ मॅडम, कैदी दिसतेय ही बाई. पोलिसांचा फॉर्म वगैरे आणला का? तिकडं खिडकीवर जाऊन फॉर्म भरा. पोलीस केस आहे तर त्याची पेशंट ऍडमिट करायची परवानगी आना. एवढं सगळं करा मग बघू काय करायचं ते.” ती सिस्टर निष्काळजीपणे म्हणाली.
“तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी पण डॉक्टर आहे म्हटलं. इमर्जन्सी पेशंट आल्यावर आधी काय काय फॉर्मलिटीझ कराव्या लागतात ते मला चांगलंच माहितीये. डॉ. सौरभ इथले एम् एस आहेत ना? रोहित धावत त्यांच्या केबिनमध्ये जा आणि त्याला सांग मधुरा आलीये… चांगला मित्र आहे तो माझा… बघू मग कोणत्या फॉर्मलिटीज लागतात किंवा अजून काय.” मधुरा सिस्टरकडे बघत त्वेषाने म्हणाली. रोहित एम् एस च्या केबिनकडं धावला. डॉ. सौरभचं नाव ऐकताच तिथला स्टाफ निमूट कामाला लागला. त्यांनी रीमाला मॉनिटर लावलं. बीपी अतिशय कमी दाखवत होतं… आणि पल्सनं शून्याकडे जायचा रस्ता जवळ केला होता.
“रीमा…” मधुरा जोरात किंचाळली आणि…
क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा