Login

मधुरीमा पर्व २ (भाग ३८)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ३८)


“तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी पण डॉक्टर आहे म्हटलं. इमर्जन्सी पेशंट आल्यावर आधी काय काय फॉर्मलिटीझ कराव्या लागतात ते मला चांगलंच माहितीये. डॉ. सौरभ इथले एम् एस आहेत ना? रोहित धावत त्यांच्या केबिनमध्ये जा आणि त्याला सांग मधुरा आलीये… चांगला मित्र आहे तो माझा… बघू मग कोणत्या फॉर्मलिटीज लागतात किंवा अजून काय.” मधुरा सिस्टरकडे बघत त्वेषाने म्हणाली. रोहित एम् एस च्या केबिनकडं धावला. डॉ. सौरभचं नाव ऐकताच तिथला स्टाफ निमूट कामाला लागला. त्यांनी रीमाला मॉनिटर लावलं. बीपी अतिशय कमी दाखवत होतं… आणि पल्सनं शून्याकडे जायचा रस्ता जवळ केला होता.


“रीमा…” मधुरा जोरात किंचाळली आणि…


“सिस्टर… इंजेक्शन… आय व्ही…” मधुरा रीमाला सी पी आर देत सिस्टर्सला ऑर्डर देत होती. तितक्यात रोहित आणि डॉ. सौरभ तिथं आले. अतिदक्षता विभागातले डॉक्टरही तिथं हजर झाले. त्यांनी रीमाच्या नाकातोंडात नळ्या टाकल्या आणि श्वसन बॅगेने तिला कृत्रिम श्वसन सुरू केले.


रीमाचं बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू झालं. रीमाला आय सी यू मध्ये दाखल करण्यात आलं. आय आय यू च्या बाहेर मधुरा, रोहित आणि अनिरुद्ध थांबले होते. मधुरा अगदी हतबल होऊन तिथल्या बेंचवर बसली होती.

रीमाला आय सी यू मध्ये स्टेबल करून सौरभ तिथं आला.


“मधुरा, स्टेबल आहे रीमा. तो योग्य निर्णय घेतलास म्हणून रीमा आज आपल्यात आहे.” सौरभ बाहेर आल्या आल्या मधुराला म्हणाला.


“थँक गॉड.” मधुराने देवासमोर हात जोडले आणि इतक्यावेळ कणखर दिसणारी मधुरा ढसाढसा रडायला लागली.


“ताई, हे घे. पाणी पी.” रोहित तिला समजावत म्हणाला. मधुरानं पाणी पिलं आणि तिला जरा बरं वाटलं.


“मधुरा, अगं काय हे? सगळं असं अचानक… पेपरमध्ये वाचलं मी रीमाबद्दल आणि तुला त्यादिवशी फोन केला. तू इंडियात यायला निघाली होतीस.” सौरभ


“सौरभ, नेमकं मॅटर काय झालंय ते मलाही माहीत नाही; पण एवढं मात्र नक्की की रीमा निर्दोष आहे.” मधुरा


“हो गं… आपली मैत्रीण असलं काही करण्यातली नाहीच आहे.” सौरभ तिला म्हणाला.


“सौरभ, रीमा कधी बरी होईल रे?” मधुरा


“तू सोबत आहेस ना तिच्या, मग रीमा नक्की बरी होणारच. मधुरा, तुझी इच्छा असेल तर तू रीमाला दुसऱ्या कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकते. म्हणजे हा सरकारी दवाखाना आहे म्हणून म्हटलं. तू दुसरा काही विचार करू नकोस.” सौरभ


“नाही रे सौरभ. तू इथं आहेस म्हटल्यावर मला टेन्शन नाही. आणि खरं सांगू आता माझा कुणावर विश्वासही राहिला नाही.” मधुरा सौरभसोबत बोलत होती. तेवढ्यात मधुकरराव, राधिकाताई आणि सुनीताताई तिथं पोहोचल्या. सुनीताताई मधुराच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागल्या.


“काकू, धीराची आहे आपली रीमा. यमदेवाला हरवून परत आलीये. आता आपण असं रडून तिचा आत्मविश्वास कमी करायचा नाही. हो ना?” मधुरा त्यांना समजावत होती. बऱ्याच वेळानंतर सुनीता ताई शांत झाल्या.


“रोहित तू सगळ्यांना घेऊन घरी जा. मी इथंच थांबते.” मधुरा रोहितला म्हणाली.


“मधु, एकदा रीमाला बघू दे ना.” सुनीताताई तिच्यासमोर हात जोडत म्हणाल्या.


“काकू, अहो हात काय जोडताय, चला आपण भेटून येऊ.” मधुरा त्यांना घेऊन आत गेली. आपल्या निपचित पडलेल्या लेकीला बघून सुनीताताईंना अजूनच रडायला आलं. त्यांनी आपला थरथरता हात रीमाच्या डोक्यावरून फिरवला आणि त्या लगेचच आय सी यूच्या बाहेर आल्या. मधुरा त्यांच्या मागेच आली.


“मधु, होईल ना गं रीमा ठीक?” मधुराच्या गळ्यात पडून त्या ओक्साबोक्षी रडायला लागल्या.


“काकू, आपण देवाजवळ प्रार्थना करू… आपली रीमा आपल्याला नक्की परत मिळेल.” मधुरानं बोलता बोलता आवंढा गिळला.


होईल ना रीमा ठीक? रीमा वरचे सगळे आरोप दूर होतील का? की रीमाच दोषी असेल?

बघूया पुढच्या भागात…


क्रमशः