Login

मधुरीमा पर्व २ (भाग ३९)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ३९)


“ताई, तू घरी जा. मी थांबतो इकडे. रात्री तसंही फार काही काम पडायचं नाही इथे.” रोहित मधुराला म्हणाला. मधुकरराव, राधिकाताई आणि सुनिताताई तिघांना घरी सोडून तो परत हॉस्पिटलमध्ये आला होता.


“नको, मी इथंच थांबते. अरे इमर्जन्सी कधीही येऊ शकते आणि सकाळी पाहिलं ना तू काय वेळ आली होती ते.” मधुरा त्याला म्हणाली. रोहित तिच्याजवळ बसला होता.


“रोहित, हवं तर तू घरी जा. सुनीता काकू खूप खचून गेल्या आहेत. त्यांना तुझा आधार वाटेल.” मधुरा त्याला म्हणाली.


“राधिकाकाकूंनी आईला तुमच्या घरीच ठेऊन घेतलं आहे. त्यामुळं आईची काळजी नाही. मी पण इथंच थांबतो.” रोहित म्हणाला. दोघे आय सी यू च्या बाहेरच्या पॅसेजमध्ये एका बाकड्यावर बसले होते. रीमा कैदी होती त्यामुळे तिथे एक पोलिसही हजर होता.


‘काय झालं असेल नेमकं? पण हा अरविंद कुठं आहे? कुणीच त्याच्याबद्दल का काही बोलत नाहीये? काय करायला हवं?’ मधुराच्या डोक्यात प्रश्नांचा ससेमिरा सुरू होता. त्यातच बसल्या बसल्या तिला झोप लागली.


पहाटेच एका बाईच्या आर्त किंचाळण्याने तिला जाग आली. त्या बाईचा आवाज ऐकून ती घाबरून गेली होती. आय सी यू मधला एक पेशंट दगावला होता. त्यामुळे पहाटेच सगळीकडे हल्लकल्लोळ सुरू होता. स्वतः डॉक्टर असूनही मधुराला आता ह्या गोष्टींची भीती वाटायला लागली होती. डॉक्टरांचा सकाळचा राऊंड झाला होता. रीमाची तब्येत स्टेबल होती; पण अजून ती शुद्धीत आली नव्हती.


दुपारची वेळ होती. पेशंटच्या नातेवाईकांची वर्दळही जरा कमी झाली होती.


‘अनिरुद्धला भेटायला हवं का पुन्हा? अरविंदबद्दल त्याला काही माहीत आहे की नाही.” मधुरा विचार करत होती. तितक्यात अनिरुद्ध तिथं आला.


“वकीलसाहेब… मी तुम्हाला भेटायचा विचार करत होते.” मधुरा


“कशी आहे मॅडमची तब्येत?” अनिरुद्ध


“खराब नाही झाली हेच गमक म्हणावं लागेल.” मधुरा बोलता बोलता थांबली.


“अनिरुद्ध… एक विचारायचं होतं.” मधुरा


“बोला ना… केसबद्दल काही सुगावा मिळतोय का त्यासाठीच इथं आलोय मी. तुम्ही म्हणत असाल तर आपण कॅन्टीनमध्ये जाऊन बोलूया इथं पोलीस वगैरे आहेत म्हणून म्हटलं” अनिरुद्ध


“नको, इथेच बोलू. समोर पोलीस असले तरी त्यांना कुठं कळतंय की आपण काय बोलतो ते. आणि कुणी पाळत ठेवूनही असलं तरी आपण दुसरीकडे जाऊन बोललो तर त्यांना शंका येईल. आणि त्याही पेक्षा रीमा सोबत कोणतीही इमर्जन्सी कधीही येऊ शकते… त्यामुळं सध्या तरी इथेच बोलूया.” मधुरा


“ते पण आहे.” अनिरुद्ध


“अनिरुद्ध मी म्हणत होते की अरविंद… म्हणजे रीमाचे मिस्टर… ते कुठं आहेत? ज्या प्रकारे रीमावर आरोप आहेत त्यानुसार त्यांनाही अटक व्हायला हवी होती ना?” मधुरा


“अरविंद ह्यांनी राजीनामा दिला होता. हे बघा हे डिटेल्स. आणि रीमाचे पती म्हणून त्यांना चौकशीसाठी बोलावलं देखील पण त्यांचा काही पत्ता नाहीये. त्यांच्या जुन्या पत्त्यानुसार कोलकाता पोलीसकडून आम्ही त्यांची माहिती मागवली आहे.” अनिरुद्ध मधुराला फाईलमधले कागदपत्रं तिला दाखवत म्हणाला.


“काय… अरे ही तारीख म्हणजे मी ज्या तारखेला रीमाला सगळे अधिकार सोपवले होते तीच तारीख… पण त्याने राजीनामा दिला ही गोष्ट मला कशी माहीत नाही!” मधुराला आश्चर्य वाटलं.


“सगळी कागदपत्रे हेच दाखवत आहेत. आणि ज्या केस समोर आल्यात, त्यावरून रीमावर आरोप लागले त्या सगळ्या तारखा ह्या तारखेनंतरच्याच आहेत. हे बघा.” अरविंद म्हणाला. मधुरा कागदपत्र बघत होती. तितक्यात अनिरुद्धचा फोन वाजला. तो फोनवर बोलत बाहेर गेला.


‘म्हणजे… रीमाला ह्यात फसवलं आहे… कुणी? अरविंदनी? पण का? अरविंदचा शोध घ्यायला हवा… पण कसा? ऑफ द रेकॉर्ड जाऊन हे काम करावं लागेल… पण कसं?’ मधुरा विचार करत होती. तेवढ्यात तिला एका व्यक्तीची आठवण झाली… आणि कितीतरी दिवसात तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली.


कोण असेल ती व्यक्ती? बघूया पुढच्या भागात…

(अंदाज आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.)


क्रमशः