Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४०)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४०)


‘म्हणजे… रीमाला ह्यात फसवलं आहे… कुणी? अरविंदनी? पण का? अरविंदचा शोध घ्यायला हवा… पण कसा? ऑफ द रेकॉर्ड जाऊन हे काम करावं लागेल… पण कसं?’ मधुरा विचार करत होती. तेवढ्यात तिला एका व्यक्तीची आठवण झाली… आणि कितीतरी दिवसात तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली.


दुसरा दिवस उजाडला. रीमा अजून शुद्धीत आली नव्हती. तिच्या मेंदूला काही इजा झाली असेल का हे बघण्यासाठी अजून काही तपासण्या करण्यात आल्या. सुदैवाने त्याचे रिपोर्ट नॉर्मल होते. आता फक्त रीमा शुद्धीवर येण्याची वाट सगळेजण बघत होते.


“रोहित, ऐक. आज रात्री बाबांना इकडे बोलावं हॉस्पिटलमध्ये थांबायला.” मधुरा रोहितला म्हणाली.


“का गं ताई? त्यांना कशाला त्रास देतेय. मी एकटा थांबेल ना.” रोहित


“आपल्याला एका कामासाठी बाहेर जायचं आहे; पण लक्षात ठेव ह्याची खबर कुणालाच लागू द्यायची नाही. अगदी त्या समोरच्या पोलिसालाही. आणि बाबांनाही यातलं काही सांगू नकोस. मी तब्येत बरी नाही संध्याकाळीच घरी जाईल. रात्री बाबांना डब्बा घेऊन पाठवेल. तुम्ही दोघे इथं थांबा. रात्री तू फोनवर बोलत बोलत म्हणून बाहेर ये… मी तुला सांगते मग काय करायचं ते.” मधुरा हळूच त्याच्या कानात खुसपुसली.


दोघांनी ठरवल्याप्रमाणे मधुरा संध्याकाळी घरी निघून गेली. रीमाजवळ असलेल्या पोलिसाने ही अपडेट वरच्या ऑफिसरला कळवली. कुणाच्या मनात काहीच शंका उपस्थित झाली नाही.


ठरल्याप्रमाणे रोहितही रात्री फोनवर बोलत हॉस्पिटलच्या बाहेर आला. बरंच अंतर चालत गेल्यावर त्याला मधुरा एकेठिकाणी कार घेऊन उभी दिसली. तो कारमध्ये जाऊन बसला. मधुराने मागे वळून पाहिलं, आपल्या मागावर कुणी नाही हे पाहून ती तिथून निघाली.


“कुठं जातोय? आतातरी सांग ना.” रोहित तिला म्हणाला.


“थांब थोडं. कळेलच.” मधुरा गाडी चालवत निघाली. बऱ्याचवेळानंतर दोघे जुन्या पुलाखाली पोहोचले. त्यांनी तिथं गाडी पार्क केली आणि त्याला लागूनच असलेल्या वस्तीत ते दोघे शिरले. सगळीकडं अगदी सामसूम होतं. रस्त्यावर मोकाट कुत्री होती. त्यांना घाबरून मधुराने रोहितचा हात अगदी घट्ट पकडला.


“ताई, अगं कुठं फिरतोय आपण?” रोहित


“थांब थोडं. रस्त्यावर कुणी दिसलं तर आपण पत्ता विचारून घेऊ.” दोघे चालत चालत त्या वस्तीच्या बऱ्याच आतापर्यंत पोहोचले.


“रोहित, त्या घराच्या मागून बघ धूर येतोय… म्हणजे तिकडे कुणीतरी शेकोटी पेटवून बसण्याची शक्यता आहे.” मधुरा म्हणाली आणि दोघे त्या धुराच्या दिशेने निघाले. मधुराचा अंदाज बरोबर ठरला. वस्तीतली बरीचशी पुरुष मंडळी तिथं शेकोटीभोवती बसलेली होती.


“सुरजभाई…” मधुराने आवाज दिला तसा त्या टोळीतला एक माणूस उठून उभा राहिला.


“सुरजभाई, ओळखलं का?” मधुरा त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव टिपत म्हणाली.


“हो… मॅडम… तुम्ही? आणि इकडे?” सुरजभाईला आश्चर्य वाटलं.


“थोडं महत्वाचं बोलायचं होतं.” मधुरा आजूबाजूला बघत म्हणाली.


“मॅडम, हे काय मागंच आपलं घर आहे. चला घरी जाऊन बोलू.” सुरजभाई म्हणाला आणि तिघे त्याच्या घराच्या दिशेने निघाले.


“लक्षे, कोण आलंय बघितलंस काय? वाईच चहा ठेव जरा.” सुरजभाई दारातूनच ओरडला तशी त्याची बायको लक्ष्मी बाहेर आली.


“मॅडम, तुम्ही! बसा बसा… मी चहा घेऊन येतेच.” लक्ष्मी मधुराला बघून म्हणाली आणि परत घरात गेली.
सुरजभाई, मधुरा आणि रोहित तिघे खुर्चीवर बसले.


“सुरजभाई, हॉस्पिटलविषयी कळलं असेलच की?” मधुराने वेळ न दवडता विषयाला सुरुवात केली.


“हो कळलं की… तुमचा लै राग बी आलता… पण नंतर समजलं की तुम्ही आधीच दवाखाना सोडून गेलत्या. आमच्यापेक्षा बी भयानक निघाली तुमची मैत्रीण…” सुरजभाई


“तसं नाहीये सुरजभाई. मला गॅरंटी आहे की रीमा निर्दोष आहे. तिला फसवलं गेलंय ह्यात… आपल्याला त्याच संदर्भात एक काम करायचं आहे.” मधुराने बोलता बोलता पर्स उघडली. तेवढ्यात लक्ष्मी चहा घेऊन आली. मधुराने तिच्या हातातून चहाचा कप घेतला आणि ती पुढं बोलायला लागली.


“सुरजभाई, आपल्याला ह्याला शोधून काढायचं आहे.” मधुरा अरविंदचा फोटो त्याला देत म्हणाली.


“आताच आपले पंटर कामाला लावतो आणि सगळा गाव पिंजून काढतो की नाही बघा.” सुरजभाई फोटो बघत म्हणाला.


“इथं नाही शोधायचं.” मधुरा


“मग?” सुरजभाई


“कोलकात्याला किंवा त्या एरियात. आपण त्याला शोधतोय ही खबर कुणालाच नाही लागली पाहिजे, पोलिसांनाही… सुरजभाई, तुम्ही ह्याला शोधून द्या. तुम्ही म्हणाल ती रक्कम तुम्हाला देईल मी. बस… रीमा निर्दोष सुटली पाहिजे.” मधुरा त्याला म्हणाली.


“मॅडम, आधीच तुमचे एवढे उपकार आहेत आमच्यावर… तुम्हाला लागेल ती सगळी मदत करतो मी… नाही ह्या माणसाला तुमच्या पायाशी लोळण घालायला लावलं तर सुरजभाई नाव सांगणार नाही.” सुरजभाई मधुराला म्हणाला आणि मधुराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकला.


क्रमशः

© डॉ. किमया संतोष मुळावकर


(वाचकहो, भाग पोस्ट करायला उशीर झाल्यावर जशी प्रेमळ तक्राररुपी कमेंट करता तशी भाग पोस्ट केल्यावर एखादी कमेंट करत जा… बरं वाटतं.)

🎭 Series Post

View all