मधुरीमा पर्व २ (भाग ४२)
सुमनताईंचे शेवटचे सर्व विधी पार पडले. मधुरा आणि मधुकरराव परत जायला निघाले.
“मधुरा, येत जाशील ना गं ह्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला?” पुरुषोत्तमरावांचा कंठ दाटून आला होता.
“आता मी येणार नाहीये कारण मी तुम्हाला माझ्या सोबतच नेणार आहे.” मधुराच्या बोलण्याचं पुरुषोत्तमरावांना नवल वाटलं.
“म्हणजे?”
“म्हणजे पप्पा, तुम्ही, आई आणि बाबा आपण सगळे सोबत राहणार आहोत. आता तुम्हाला मी एकट मुळीच राहू देणार नाही.” मधुरा म्हणाली.
“पण..”
“पण वगैरे काही नाही पप्पा. मम्मी आजारी पडल्या होत्या तेव्हाच मी म्हटलं होतं पण मम्मींना हे घर, गाव सोडायचं नव्हतं. त्यांनी हट्ट धरला होता म्हणून इकडं राहू दिलं; पण आता नाही पप्पा.” मधुरा हट्टाला पेटली होती.
“बरं झालं सुमनचा हट्ट म्हणालीस. तिने सांगितलेली एक गोष्ट करायचीच राहिली. थांब, आलोच मी.” पुरुषोत्तमराव घरात गेले. हातात एक मोठा पितळी डब्बा घेऊन बाहेर आले.
“मधुरा, हे तुझ्या मम्मीचे दागिने. तिची इच्छा होती की हे दागिने तुला द्यावेत.” पुरुषोत्तमरावांनी तिच्या हातात तो डब्बा दिला.
“पप्पा, मी हे नाही घेऊ शकत. मम्मीचे हे दागिने डेझीला द्या. कुलपरंपरेनुसार हे सुनेला मिळायला हवेत ना.” मधुरा
“कुठली डेझी, कुठला रविश आणि कुठला रुद्र… आमचं कुणीच नाही. मुलांचे कर्तव्य, सुनेचे कर्तव्य तू ह्या घरची सून नसतानाही सगळं पूर्ण केलंस… सुमन नेहमी म्हणायची, मधुरा लेकच आहे…” पुरुषोत्तमराव
“लेक म्हणता ना, मग चला माझ्यासोबत.” मधुरा
“हे दागिने तू घेतले तरच येईल.” पुरुषोत्तमराव म्हणाले.
मधुराने दागिन्यांचा डब्बा घेतला. वाड्याला कुलूप लावलं आणि सगळेजण परतीच्या प्रवासाला निघाले.
दुपारच्यावेळी सगळे घरी पाहोचले. मधुरा लगेचच फ्रेश होऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघाली.
“आताच प्रवास करून आलीयेस, आराम तर कर थोडा.” सुनीताताई तिला म्हणाल्या.
“काकू, रीमाला भेटल्याशिवाय मला चैन पडायचा नाही. आणि रोहित तिकडेच असेल ना तीन दिवसांपासून, त्याला घरी पाठवते.” मधुरा म्हणाली आणि गाडीची चावी घेऊन लगेचच निघाली.
“राधिकाताई, किती चांगली आहे आपली मधुरा. आजकाल सख्खे सख्याला विचारत नाहीत. खरंच, पुरुषोत्तमरावांना इथं आणून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.” सुनीताताई राधिकाताईंना म्हणाल्या.
“एखादी मुलगी असती तर तिने ओळखही दाखवली नसती. कदाचित आमच्याच मुलीने आमची काळजी घेतली नसती. मधुकरराव, राधिकाताई… आता देवाजवळ एकच प्रार्थना आहे, मधुराचं हॉस्पिटल अगदी पहिल्यासारखं सुरू झालं पाहिजे. रीमावरचे सर्व आरोप दूर होऊन खरा आरोपी पकडल्या गेला पाहिजे.” पुरुषोत्तमराव म्हणाले. सगळ्यांनी देवाजवळ प्रार्थना केली.
मधुरा चौकातल्या सिग्नलवर थांबली होती. तिच्या गाडीच्या खिडकीच्या काचा उघड्या होत्या. तितक्यात एक भिकारी तिच्याजवळ आला.
“अल्ला के नामसे दे बाबा
पालिकाके गार्डनमे भेट रे बाबा.” भिकारी तिच्याजवळ येऊन म्हणाला. मधुराला त्याचं म्हणणं काहीच कळलं नाही. ती पर्समधून पैसे काढू लागली.
“मॅडम, दोन दिवस झाले तुम्हाला शोधत ह्या चौकावर भीक मागतोय. तुम्हीच म्हणाल्या ना की फोन वगैरे करू नको. पालिकेच्या गार्डनमध्ये भेटा. ज्याला शोधत होतो तो सापडला आहे. सगळं नीट सांगतो भेटलो की.” भिकारी एका दमात बोलला.
“सुरजभाई.” मधुराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. पण तो अगदी क्षणात गायब झाला होता. सिग्नलही सुटला होता. मागच्या गाड्या हॉर्न देत होत्या. मधुराने तिची गाडी तिथून काढली.
‘अरविंदचा शोध लागला… रीमा, तुझ्यावर लागलेले सगळे आरोप दूर होतील बघ…’ मधुरा आनंदातच तिथून निघाली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गाडी पार्क करून ती धावतच आय सी युकडे गेली. तिला वेटींग लॉबीमध्ये रोहित उभा दिसला.
“रोहित…” मधुराने आनंदात त्याला आवाज दिला. रोहितने मधुराला पाहिलं आणि तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागला.
“रोहित, काय झालं?” मधुरा
“मधुताई,... रीमाताई…” रोहित एवढंच बोलू शकला.
क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर