Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४३)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४३)


‘अरविंदचा शोध लागला… रीमा, तुझ्यावर लागलेले सगळे आरोप दूर होतील बघ…’ मधुरा आनंदातच तिथून निघाली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गाडी पार्क करून ती धावतच आय सी युकडे गेली. तिला वेटींग लॉबीमध्ये रोहित उभा दिसला.


“रोहित…” मधुराने आनंदात त्याला आवाज दिला. रोहितने मधुराला पाहिलं आणि तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागला.


“रोहित, काय झालं?” मधुरा


“मधुताई,... रीमाताई…” रोहित एवढंच बोलू शकला.


“रोहित, काय झालं… सांग तर…” मधुरा रोहितला विचारत होती पण रोहित मात्र रडतच होता.


“रीमा ठीक आहे ना? रोहित सांग काय झालं ते.” मधुराच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते.


“ताई, रीमाताई शुद्धीवर आलीये… मी जस्ट तिला भेटून आलोय… थँक्स ताई… आज तुझ्यामुळे माझी ताई माझ्यासोबत आहे.” रोहित म्हणाला.


“काय! मी आलेच रीमाला भेटून.” मधुरा धावतच आय सी यू मध्ये गेली. बेडवर डोळे उघडून बसलेली रीमा बघून तिला रडू फुटलं.


“रीमा…” मधुरा तिच्या गळ्यात पडली. दोघींच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.


“का वाचवलंस मला? मधु, माझ्यावर जे आरोप आहेत त्यातून माझी सुटका नाही होऊ शकत… फसलेय मी ह्या दलदलीत.” रीमा तिला म्हणाली. दोघी अजून एकमेकींच्या मिठीतच होत्या.


“तू फसली नाहीस रीमा, तुला फसवलं गेलंय… आणि तू कशी फसली हे मी सगळ्या जगासमोर आणेल. तू फक्त जे जे घडलं ते सगळं कोर्टात सांग… आता इथं काहीच बोलू नको.” मधुरा तिला थोडं दूर करत म्हणाली. तोपर्यंत सौरभ तिथं आला.


“सौऱ्या, तू इथं?” रीमला आश्चर्य वाटलं.


“एम् एस पदावर ट्रान्स्फर होऊन आलो. मी इकडे आलो आणि नेमकी तेव्हा तुझी न्यूज आली.” सौरभ म्हणाला आणि रीमाचा चेहरा पडला.


“वेट वेट वेट… मी काही तू आरोपी आहेस असं म्हणत नाहीये. तू निर्दोष आहेस ह्याची गॅरंटी मलाही आहे. काळजी करू नको. सगळं नीट होणार आहे.” सौरभ म्हणाला. तितक्यात आय सी यूचे डॉक्टर तिथं आले. सौरभ त्यांच्याशी बोलायला बाजूला गेला.


“रीमा, खरंच सगळं नीट होणार आहे. मी आहे ना सोबत.” मधुरा तिचा हात हातात घेत बोलली. तोपर्यंत सुनीताताई, राधिकाताई, मधुकरराव आणि पुरुषोत्तमराव तिथं पोहोचले. रीमाला शुद्धीवर आलेलं बघून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते.


“एक गुड न्यूज आहे. रीमाला उद्या स्पेशल रूममध्ये शिफ्ट करतोय. आताच रीमाच्या डॉक्टरांनी सांगितलं.” सौरभ येऊन म्हणाला.


“स्पेशल रूममध्ये शिफ्ट करतोय ह्याचा अर्थ असा नाही की रीमा पूर्ण बरी झालीये. आपल्या अजून तिची काळजी घ्यावी लागणार आहे.” सौरभ म्हणाला आणि तिथून जायला निघाला. मधुराही त्याच्यासोबत बोलत बाहेर आली. दोघे बोलत बोलत त्याच्या केबिनपर्यंत येऊन पोहोचले.


“सौरभ, थँक्स.” मधुरा


“थँक्स कशाला? आपल्या मैत्रीसाठी एवढं करूच शकतो की.” सौरभ म्हणाला. त्याचा निरोप घेऊन मधुरा सरळ हॉस्पिटलच्या बाहेर आली. तिने रिक्षा ठरवली आणि पालिकेच्या गार्डनमध्ये जाऊन पोहोचली. तिकीट खिडकीवरून तिने तिकीट काढले आणि आत गेली. गार्डनमध्ये फिरत फिरत मधुरा एका बाकड्यावर जाऊन बसली. समोर बरीचशी मुलं खेळत होती. आजूबाजूला त्यांचे आईवडील बसले होते.

तेवढ्यात एक बुरख्यातली बाई तिथे येऊन बसली.


‘कुठं असेल हा सुरजभाई?’ मधुरा मनातल्या मनात म्हणाली.


“रूप बदलून, नाव बदलून दडून बसला होता तो… सगळं बंगाल पिंजून काढला; पण मासा गळाला लागलाच. घरी कैद करून ठेवलंय माझ्या. रोज त्याला गुंगीचं औषध देतोय. काळजी करू नका. त्याच्या रक्तात ह्या औषधांचे नमुने सापडणार नाहीत. हा बघा त्याचा फोटो.” त्या बुरख्यात सुरजभाई होता. त्याने हातातला मोबाईल मधुराच्या बाजूला ठेवला. मधुराने निरखून पाहिले. तो अरविंदच होता.

“आहे तसंच सांभाळून ठेवा. डायरेक्ट कोर्टात उभं करू. कधी ते मी सांगते.” मधुरा तिथून उठली आणि तडक चालत निघाली. गार्डन बाहेर आली आणि रिक्षा करून हॉस्पिटलमध्ये पोहोचली.


रीमाला भेटून मधुकरराव, राधिकाताई, सुनीताताई आणि पुरुषोत्तमराव परत घरी आले. मधुकररावांनी टी व्ही सुरू केला. टी व्ही वर रीमा शुद्धीत आल्याची बातमी झळकत होती.

“आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की डॉ. रीमा ह्यांच्यावर गर्भलिंग परिक्षण, बेकायदेशीर गर्भपात आणि मानवी अवयव तस्करीचे गंभीर आरोप आहेत.” टीव्हीवरच्या पत्रकाराचे हे बोल ऐकले आणि पुरुषोत्तमराव ताडकन उठून उभे राहिले. तितक्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी मोबाईलवर पाहिलं एक अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता.


‘आजकाल सतत अनोळखी नंबरवरून फोन येत राहतो… कोण असेल? कदाचित…’ पुरुषोत्तमरावांच्या डोक्यात प्रश्नांचे नवीन जाळे विणले जात होते.


क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर


(कशी वाटतेय कथा? उत्कंठावर्धक होतेय की नाही? कमेंट करून नक्की सांगा)