Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४४)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४४)


“आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की डॉ. रीमा ह्यांच्यावर गर्भलिंग परिक्षण, बेकायदेशीर गर्भपात आणि मानवी अवयव तस्करीचे गंभीर आरोप आहेत.” टीव्हीवरच्या पत्रकाराचे हे बोल ऐकले आणि पुरुषोत्तमराव ताडकन उठून उभे राहिले. तितक्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी मोबाईलवर पाहिलं एक अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता.


‘आजकाल सतत अनोळखी नंबरवरून फोन येत राहतो… कोण असेल? कदाचित…’ पुरुषोत्तमरावांच्या डोक्यात प्रश्नांचे नवीन जाळे विणले जात होते.


‘कदाचित, रविश असेल का तो? पण रविश भारतातल्या नंबरवरून का फोन करेल? सुमन गेल्याचं कळवलं तर त्यानं साधा श्रद्धांजलीचा मेसेजही नाही पाठवला. मरू देत त्याला; पण हा पत्रकार काय म्हणत होता… मानवी अवयव तस्करी… मधुराच्या वेळी हेच आरोप होते… दोघांचं काही कनेक्शन तर नसेल ना? अनोळखी नंबरवरून आलेला कॉल उचलून बघावा का?’ पुरुषोत्तमराव विचार करत होते.


“पुरुषोत्तमराव, अहो असे उभे राहून काय विचार करताय?” मधुकरराव म्हणाले तसे ते भानावर आले.

“काही नाही… रीमा लवकर सुटली पाहिजे. इथं जवळ एक मंदीर आहे ना, तिथं जाऊन येतो… कदाचित डोक्यातलं वादळ शांत होईल.” पुरुषोत्तमराव म्हणाले आणि लगेचच घराबाहेर पडले.


दुसऱ्यादिवशी रीमाला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. आणि तिच्याभोवती पोलिसांचा पहारा अजूनच वाढला. मधुरा आणि रीमा काही बोलू शकत नव्हत्या.

मधले दोन चार दिवस अगदी ताणतणावात गेले. पुरुषोत्तमरावही कसल्याशा विवंचनेत होते. मधुराही टेन्शनमध्ये होती. अमेरिकेत फोन करून राहून राहून ती नितीची चौकशी करत होती. नितीनला मधुरा खूप टेन्शनमध्ये वाटली. मधुकररावांसोबत बोलून त्याने भारतात परत यायचा निर्णय घेतला. अर्थात त्याने हे मधुराला सांगितले नव्हते.


एकदिवस मधुरा अनिरुद्धच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेली.


“अनिरुद्ध, एक काम होऊ शकेल का?” मधुरा म्हणाली.


“हो, बोल ना.” अनिरुद्ध म्हणाला. ह्याकाळात दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. दोघे अहो जाहो वरून एकेरी बोलण्यावर आले होते. मधुराने तिचा भूतकाळ, तिची केस त्याला सांगितली होती. त्यामुळं अनिरुद्धच्या मनात रीमाप्रती अजूनच आदर वाढला होता.


“हे बघ, मी सौरभकडून रीमाला सध्याचा डिस्चार्ज न करण्याची परवानगी घेतलीये. कारण ती परत तुरुंगात गेली तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आपल्या केसची हिअरिंग परवा आहे ना, तोपर्यंत मी काही पुरावे आणते ते फक्त लगेच्या लगेच कोर्टात सादर करण्याची परवानगी काहीही करून तू मिळव… खूप मोठं रॅकेट आहे हे, त्या लोकांना कोणत्याच गोष्टींची पूर्वसूचना मिळता कामा नये.” मधुरा


“असं कसं होईल मधुरा? कुणाची साक्ष वगैरे अशी घेता येत नाही. आधी कोर्टाला नोटीस द्यावी लागते, विरुद्ध पार्टीला नोटीस द्यावी लागते.” अनिरुद्ध


“काहीही कर अनिरुद्ध… प्लिज… हा लास्ट चान्स आहे असं समज.” मधुरा एव्हढं बोलली आणि तिथून बाहेर पडली.


रात्री मधुरा सुरजभाईच्या घरी गेली.


“सुरजभाई, परवापर्यंत सांभाळायचं ह्याला.” बेशुद्ध अरविंदच्या समोर उभी राहून मधुरा बोलत होती.


“मॅडम, काळजी नका करू. मी बघतो ह्यांच्याकडं चांगलंच.” सुरजभाई म्हणाला.


“भाई, अजून एक मदत कराल?” मधुरा


“आता भाई म्हटलं ना, मग बहिणीला मदत करणारच…” सुरजभाई


“आता माझ्यासोबत चला. एक महत्वाचं काम आहे.” मधुरा म्हणाली.

“चला लगेच निघुया.” सुरजभाई


“पण तुम्ही माझ्यासोबत आले आणि ह्याने पळून जायचा प्रयत्न केला तर?” मधुरा


“अहो मॅडम, टेन्शन नाही घ्यायचं… आपली फुलन देवी आहे की… चांगला हिसका दाखवेल त्याला.” सुरजभाई


“फुलनदेवी?”


“म्हणजे आपली लक्ष्मी हो… गुंडासोबत राहून तीही गुंडगिरी शिकलीच की!” सुरजभाई

“सुरजभाई, तुम्ही पण ना… चला आता… जे काम करतोय ना ते अगदी सांभाळून करायचं आहे बरं का.” मधुरा म्हणाली आणि दोघे तिथून निघाले.


मधुरा रात्री बऱ्याच उशिरा घरी पोहोचली. घरातले सगळे झोपलेले होते. मधुराने तिचा लॅपटॉप काढला आणि काहीतरी काम करत बसली. पहाटे तिचा डोळा लागला. सकाळी मधुराला जाग आली ती बेलच्या आवाजाने.


‘आई, उघडेल दार…’ स्वतःशीच पुटपुटत मधुरा कड बदलून झोपली.


“आई…” मधुराला आवाज आला.


‘निती, आय मिस यू बच्चा… खूप आठवण येते गं तुझी… एवढी आठवण येते की तुझी हाकही ऐकू येते. लवकरच भेटेन तुला.’ मधुरा स्वतःशीच बोलली.


“आई…” असं ओरडत निती मधुराला येऊन बिलगली.

मधुराने डोळे उघडून पाहिले. तिच्या मिठीत निती आणि समोर नितीन उभा होता. मधुराच्या डोळ्यात पाणी आलं.


“आम्ही आलेलं आवडलं नाही वाटतं?” नितीन तिला चिडवत म्हणाला.


“खूप आवडलं… नितीन ह्या सगळ्या गोष्टीत तुझी साथ हवीच होती… खरं सांगू, मी आतून एकटी होते, कुठंतरी तुला शोधत होते. बरं झालं तू आलास… थँक्स… आता लढायला अजून बळ मिळालं.” मधुरा म्हणाली. तिघांनी एकमेकांना मिठी मारली… आणि डोळ्यातल्या पाण्याला त्याची वाट दाखवून दिली..

क्रमशः