Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४५)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४५)


“न्यायाधीश महोदय, केस अगदी क्लीअर आहे. ह्यावर आता अजून उहापोह न करता कैद्याला त्याची शिक्षा देण्यात यावी.” विरुद्ध पक्षाचे वकील बोलत होते. रीमाच्या केसची तारीख होती. कोर्टात मधुरा, मधुकरराव, राधिकाताई, सुनीताताई, रोहित, नितीन आणि निती सगळे उपस्थित होते. रीमा एक प्रसिद्ध डॉक्टर होती त्यामुळे कोर्टाबाहेरही पत्रकार केसचा निकाल काय लागतो ह्यासाठी उभे होते. कोर्ट रूममध्येही भरपूर गर्दी होती. आरोपीच्या पिंजऱ्यात रीमा उभी होती.


“ऑब्जेक्शन न्यायाधीश महोदय, आपली न्यायव्यवस्था गुन्हेगारालाही त्याची बाजू मांडण्याची पूर्ण परवानगी देते. रीमा ह्यांची बाजू आपण ऐकलीच नाहीये. आधीच्या हिअरिंगला त्यांनी काही उत्तरं दिली नाही ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी गुन्हा काबुल केला आहे. आपली परवानगी असेल तर मी रीमा ह्यांना प्रश्न विचारू इच्छितो.” अनिरुद्ध


“परवानगी आहे.” न्यायाधीश महोदय म्हणाले.


“तर डॉक्टर रीमा, मी जास्त प्रश्न विचारणार नाही… एकच प्रश्न विचारतो… तुमची बाजू तुम्ही सविस्तर सांगा.” अनिरुद्ध म्हणाला आणि रीमा बोलायला लागली.


“माझं लग्न झालं आणि अरविंदने आमचं हॉस्पिटल जॉईन केलं. जॉईन झाल्यापासूनच त्याच्यात आणि मधुरामध्ये वाद होत होते. आम्ही दोघीही ह्या गोष्टीला टाळू बघत होतो. नंतर आमच्या स्टाफकडून अरविंद बद्दल नको त्या गोष्टी ऐकायला आल्या. आई होऊ न शकणाऱ्या, सुंदर स्त्री रुग्णांना तो तपासायला खूप वेळ लावायचा. त्यावेळी इतर कोणता स्टाफ त्याच्या सोबत असलेला त्याला आवडायचं नाही. आमच्या काही स्टाफने त्याला स्त्री रुग्णासोबत नको त्या अवस्थेतही पाहिलं होतं. मधुरा होती तेव्हा तिने ह्याविरुद्ध अरविंदला जाब विचारू केलं; पण माझ्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाची पट्टी चढवलेली होती. मी ह्या गोष्टींकडे कानाडोळा केला.


खरंतर घर, त्यातल्या त्यात माझं इंटरकास्ट मॅरेज त्यामुळं सासरकडच्या परंपरा जपता जपता माझी तारांबळ उडायला लागली होती. घरी सासूबाईंचे एवढे नियम असायचे आणि त्यांच्या तब्येतीचेही सतत काही ना काही इश्यू असायचे त्यात मी पुरती अडकून गेले होते.


मधुराने सगळं माझ्या नावावर केल्यावर मात्र अरविंदचं वागणं बदललं. तो अतिशय प्रेमाने, काळजीने वागायला लागला माझ्यासोबत. रात्री पेशंट आला की आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला लागलो. पण अचानक माझी तब्येत बिघडायला लागली. एरव्ही दहा दहा सीझर करणारी मी एका सिझरसाठी पूर्णवेळ उभी राहू शकत नव्हते. बरेचदा मी चक्कर येऊन पडायला लागले. अरविंद म्हणत होता की अतिकामामुळे असं होतंय. पण तो सगळा अरविंदचा प्लॅन होता जजसाहेब. सीझर करताना मी बेशुद्ध पडले की तो पेशंटचे अवयव काढून घ्यायला लागला.

त्यांच्यामुळे एक पेशंट सिरीयस झाली होती. त्याचवेळी त्याला अर्जंट गावी जायचं असं तो म्हणाला. मी त्याला म्हटलं की असं पेशंट सोडून तू जाऊ नकोस; पण त्याने ऐकलं नाही. मला म्हणाला की कोणत्याही परिस्थितीत पेशंटला डिस्चार्ज देऊ नको. त्या पेशंटचे नातेवाईक तिला जबरदस्ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि अरविंद हा सगळा कारभार समोर आला. नेमकं हे सगळं व्हायच्या वेळी तो त्याच्या आईला सोडायला म्हणून गावाला निघून गेला तेव्हापासून तो गायब आहे.” रीमा एका दमात बोलून गेली.


“वा! डॉक्टर रीमा डॉक्टरसोबतच उत्तम लेखिकाही आहेत हे आजच कळलं. किती सुंदर रित्या त्यांनी ही कहाणी आपल्या सर्वांसमोर मांडली आहे.” विरुद्ध पक्षाचे वकील म्हणाले. त्यावर रीमा काहीच बोलली नाही.


“न्यायाधीश महोदय, मी आरोपीला काही प्रश्न विचारू इच्छितो.” विरोधी पक्षाचे वकील म्हणाले.


“परवानगी आहे.” न्यायाधीश महोदय


“तर रीमा तुम्ही असं म्हणालात की तुमच्या मैत्रिणीचं आणि अरविंदचं सुरुवातीपासूनच पटत नव्हतं.” वकील


“हो.” रीमा म्हणाली. वकील त्यावर अजून प्रश्न विचारत होते. रीमा अगदी न घाबरता व्यवस्थित उत्तरं देत होती. दोघांमध्ये जणू जुगलबंदी रंगली होती.

“ठीक आहे, एक वेळ आपण मान्य करू की पेशंटचे ऑपरेशन सुरू असताना… म्हणजे बघा… तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक ऑपरेशनवेळी तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुमच्या पतीने पेशंटचे अवयव काढून घेतले. तर ह्या गोष्टीला काही तरी पुरावा असायला हवा. न्यायाधीश महोदय, हे हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज आहेत. आणि बऱ्याचदिवसापासून किंवा असं म्हणूया बऱ्याच महिन्यांपासून ते बंद पडलेले आहेत. आणि समजा आपण असं समजू की त्यांनी अवयव तस्करी केली तर मग ही गोष्ट तुमच्या स्टाफलापण माहीत असावी. एखाद्या व्यक्तीचे अवयव काढले तर ते दुसरीकडे पोहोचवले पण असतील ना. मग तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहीत असेल ना की कुणी अनोळखी व्यक्ती आलीये, काही गाड्या हॉस्पिटलच्या आवारात आल्या आहेत वगैरे.” वकील म्हणाले आणि त्यांनी न्यायाधीश महोदयांसमोर पुरावे सादर केले. न्यायाधीश महोदय ते फुटेज बघत होते.


“न्यायाधीश महोदय, मला हॉस्पिटलच्या स्टाफची साक्ष घेण्याची परवानगी देण्यात यावी.” विरोधी वकील म्हणाले.


“हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कांचन ह्या स्टाफनर्सला बोलवण्यात यावं.” वकील म्हणाले आणि कांचनचं नाव मोठ्याने घेतल्या गेलं. कांचन आरोपीसमोर असलेल्या पिंजऱ्यात येऊन उभी राहिली.