Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४६)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४६)


“जजसाहेब, ही कांचन नाहीये.” आरोपीसमोर असलेल्या पिंजऱ्यात कांचन येऊन उभी राहताच तिला बघून रीमा ओरडली.


“हो, जजसाहेब, रीमा बरोबर बोलतेय ही कांचन नाहीये.” वकिलांच्या मागे बसलेली मधुराही उठून उभी राहिली आणि म्हणाली. न्यायालयात एकच गोंधळ उडाला. जजसाहेबांनी सगळ्यांना शांत बसायची सूचना दिल्या आणि वकिलांना पुढे बोलायला लावले.


“तर कांचन, तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती वर्षांपासून काम करता?” वकील


“चार वर्ष.” कांचन

“पण डॉ. रीमा म्हणतात तुम्ही कांचन नाहीये. ठीक आहे आता तुम्ही ह्या सगळ्यांची नावं सांगा.” वकील म्हणाले आणि त्यांनी मधुरा, मधुकरराव, राधिकाताई, सुनीताताई, नितीन ह्यांच्याकडे बोट दाखवले. कांचनने सगळ्यांना ओळखलं. विरोधी वकिलांनी तिचे सगळे कागदपत्रे, मधुरीमाचं जॉइनिंग लेटर वगैरे कोर्टाला सादर केले.


“अशी फोटो दाखवून कुणाचीही ओळख करता येते. ही कांचन नाहीये.” रीमा म्हणाली.


“वकिलांना त्यांचं काम करू द्या.” जजसाहेब म्हणाले आणि रीमा शांत झाली. विरोधी पक्षाच्या वकिलांनी कांचनला प्रश्न विचारले आणि तिने उत्तरं दिले. जजसाहेब नोंदी घेऊ लागले.


“अनिरुद्ध तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा.” जजसाहेब म्हणाले. अनिरुद्धने त्यावर नकार भरला. विरोधीपक्ष वकिलांनी अजून असे तोतया साक्षीदार उभे केले. सगळे रीमाविरुद्ध बोलून गेले. रीमा दोषी आहे की काय असं सगळयांना क्षणभर वाटून गेलं.


“जजसाहेब, तुमच्यासमोर काही पुरावे आणि साक्षीदार उभे करण्याची परवानगी द्यावी.” अनिरुद्ध


“हे चुकीचे आहे जजसाहेब. ह्यांनी आधी कोणतीच पूर्वसूचना कोर्टाला दिली नाही किंवा विरोशी पक्षाला दिली नाही. असं परवानगी न घेता साक्षीदार कसा काय उभा केला ह्यांनी. हे कोर्टच आहे ना की एखाद्या हिंदी सिनेमाचा सेट किंवा एखादी कथा…” विरोधी पक्ष वकील म्हणाले आणि पुन्हा कोर्टात गदारोळ सुरू झाला.


“माफ करा जजसाहेब; पण मी पूर्व परवानगी घेतली असती तर मुख्य आरोपीच फरार झाला असता. मला वाटतं हे न्यायालय न्याय देण्यासाठी आहे. आणि विरोधी पक्षाने का घाबरायचे? त्यांच्या मते आमचा अशील गुन्हेगार आहे तर होऊ दे की कितीही लोकांच्या साक्ष. जजसाहेब, स्पेशल केस म्हणून आपण मला ही परवानगी द्याल अशी आशा आहे.” अनिरुद्ध म्हणाला. जजसाहेबांनी त्याला परवानगी दिली.


सुरजभाई अरविंदला घेऊन तिथं आला. अरविंदला रीमा समोरच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. त्याला समोर बघून तिथे हजर असलेल्या सगळ्या लोकांत कुजबुज सुरू झाली. अरविंदला समोर बघताच रीमाचे डोळे रागाने लालबुंद झाले, रागाने तिने तिच्या मुठी गच्च आवळल्या.


“जजसाहेब, हे आहेत डॉ. अरविंद. रीमा ह्यांचे पती. रीमा ह्यांना अटक होण्याआधीपासूनच हे गायब होते. हे गायब असल्याची तक्रार इथल्या पोलीस ठाण्यात रीमा ह्यांना अटक झाली तेव्हाच नोंदवली गेली आहे. हे त्या तक्रारीचे कागदपत्र. ह्यात असंही स्पष्ट लिहिलं गेलं आहे की पश्चिम बंगालमध्ये अरविंद ह्यांचे घर आहे, तिथेही त्यांचा शोध घेण्यात यावा.” अनिरुद्धने जजसाहेबांना कागदपत्रे दाखवली. त्यात अरविंदचे ओळखपत्र वगैरेसुद्धा होते.


“माझ्या अशील, रीमा ह्यांच्या आई, सुनिताताई नवलकर ह्यांनी की कम्प्लेंट नोंदवली आहे. ह्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. ती का झाली नाही ह्याचे पोलीस आपल्याला देतील.” अनिरुद्ध


“ह्या तक्रारीवर योग्य कारवाई का झाली नाही ह्याचे सविस्तर कारण कोर्टाला सादर करण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत.” जजसाहेब


“धन्यवाद जजसाहेब. माझे वकिलमित्र फार मोठ्या गुर्मीत म्हणाले की अरविंद ह्यांनी मानवी अवयव तस्करी केली ह्याचे काय पुरावे आहेत. जजसाहेब आता मला ते पुरावे सादर करण्याची परवानगी द्यावी.” अनिरुद्ध


“ऑब्जेक्शन जजसाहेब, असे पुरावे हे सादर करणार आहेत अशी कोणतीच पूर्वसुचना ह्यांनी दिली नाही.” विरोधी वकील चिडून म्हणाले.


“कारण तुम्ही त्या पुराव्यासोबतही छेडछाड केली असती. जजसाहेब, मी आधीही विनंती केली होती आणि परत विनंती करतो की मला पुरावा सादर करू द्या.” अनिरुद्ध म्हणाला आणि जजसाहेबांनी परवानगी दिली.


“जजसाहेब, आपल्या इथल्या ह्या एल सी डी वर हे सगळ्यांना दाखवण्यात यावं एवढी विनंती.” अनिरुद्ध म्हणाला आणि त्याने जजसाहेबांना एक पेनड्राईव्ह दिला. जजसाहेबांनी तो पेनड्राईव्ह लावायला लावला. पेनड्राइव्हवर आता नेमकं काय सुरू होते ह्याकडे सर्वांचे डोळे लागले होते. सगळांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.


क्रमशः