मधुरीमा पर्व २ (भाग ४७ )
“जजसाहेब, हॉस्पिटलमध्ये असलेले सगळे सी सी टी व्ही खराब झालेले होते. त्यापेक्षा असं म्हणूया की अरविंदने ते जाणीवपूर्वक खराब केले होते. मी डॉ. मधुरा ह्यांना इथे बोलावण्याची विनंती करतो.” दिलेला पेनड्राइव्ह लावेपर्यंत अनिरुद्ध बोलू लागला. जजसाहेबांनी त्याला परवानगी दिली. मधुरा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली.
“कमाल आहे की नाही जजसाहेब. मधुरीमा ह्या हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा ह्या सगळ्या प्रकारपासून एवढ्या दूर राहिल्या. आणि विशेष म्हणजे त्या हॉस्पिटलचा एक भाग असताना पोलिसांनी त्यांची साधी चौकशीही करू नये, ह्यावरूनच पोलिसांचा कारभार लक्षात येतोय.” अनिरुद्ध म्हणाला.
“तर डॉ. मधुरा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही का लावला होता?” अनिरुद्ध
“सर, बऱ्याचदिवसांपासून एक माणूस माझ्या मागावर होता. त्यासंबंधी मी पोलिसात तक्रारही केली होती. स्वतःची सेफ्टी, हॉस्पिटलची सेफ्टी म्हणून मी सी सी टी व्ही लावून घेतले होते. अरविंदचा ह्या गोष्टीला विरोध होता. त्याने त्याच्या चेंबरमध्येही कॅमेरे लावू दिले नव्हते. पण अरविंद ह्या गोष्टीला विरोध का करतोय हेच मला कळत नव्हतं. अरविंदच्या चारित्र्याबद्दल मला बऱ्याचवेळा ऐकायला येत होतं. एक दिवस मात्र माझी नाईट ड्युटी असताना मुद्दामच ठरवून ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या ठिकाणी कुणाची नजर पडणार नाही पण सगळी ओ. टी. कव्हर होईल अशा ठिकाणी कॅमेरा लावून घेतला. मला शंका होती की अरविंद एखाद्या पेशंटसोबत चुकीचे पाऊल टाकेल आणि ओ. टी. हा हॉस्पिटलमधला असा भाग असतो की तिथं कुणाची वर्दळ नसते. खरंतर मला रीमाला हे दाखवून द्यायचं होतं की अरविंद चारित्र्यवान नाहीये. म्हणून मी तो कॅमेरा बसवला. असाच एक कॅमेरा त्याच्या चेंबरमध्ये बसवला. त्याचा ऍक्सेस माझ्या लॅपटॉपमध्ये घेतला होता. हे दोन कॅमेरे मी अरविंदच्या नकळत लावले होते म्हणून ते खराब होण्यापासून वाचले.
त्यानंतर माझं अमेरिकेला जायचं ठरलं आणि मी लॅपटॉप इथेच ठेवून अमेरिकेत निघून गेले. ह्या पेनड्राईव्हमध्ये त्याचेच फुटेज आहेत.” मधुरा म्हणाली. पेनड्राइव्हवरच्या फुटेजमध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं की रात्रीच्या वेळी होणाऱ्या सिझरमध्ये रीमा सिझरला उभी राहिली की अरविंद तिला काहीतरी टोचायचा. ती बेशुद्ध झाली की अरविंद रुग्णांचे अवयव काढून घेत होता. सगळेजण ते फुटेज बघून आश्चर्यचकीत झाले.
“अरविंदवर संशय यायचं काही स्पेसिफिक कारण?” अनिरुद्ध
“त्याने राजीनामा दिल्याची तारीख… मी ज्यादिवशी अमेरिकेत गेले ती तीच तारीख होती आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रीमाला अटक होण्यापूर्वीपासून तो गायब होता. पोलिसात जाऊन ह्या गोष्टीचा छडा लागणार नाही ह्याची मला गॅरंटी होती. म्हणून मी सुरजभाईची मदत घेतली. अरविंद आणि रीमा जिथे राहत होते त्या घरात काही पुरावे मिळतात का म्हणून मी आणि सुरजभाई गेलो होतो. तेव्हा घरातल्या काही फरश्या ढिल्ल्या झाल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही त्या फरशा काढल्या तर तिथे पुरून ठेवलेली रोकड, दागिने आणि काही हत्यारे सापडली.” मधुरा म्हणाली आणि सुरजभाईने पैशाच्या बॅग कोर्टात जजसाहेब समोर ठेवल्या.
“सर हे सगळं काम करताना मी रेकॉर्डिंगही केलेलं आहे. ह्या पेनड्राईव्ह मध्ये सगळं आहे.” मधुरा म्हणाली. तिने जजसाहेबांना एक पेन ड्राईव्ह दिला.
“जजसाहेब, आता ह्यांनी जे स्टाफ साक्षीदार म्हणून उभे केले तेही सर्व खोटे आहेत. खऱ्या कांचनची साक्ष सर्वांसमोर सादर करायची परवानगी देण्यात यावी.” अनिरुद्ध म्हणाला त्यावर विरोधी वकिलांनी गोंधळ घातला पण कोर्टाने साक्ष द्यायला कांचनला बोलवले. सुरजभाई सोबत आलेली कांचन भीत भीत उभी राहिली. अनिरुद्धने तिला विचारलं आणि कांचन बोलू लागली.
“जजसाहेब, मधुरा मॅडम अमेरिकेला गेल्यानंतर अरविंद सर आम्हाला ओ.टी.मध्ये थांबू द्यायचे नाही. ते त्यांचा स्टाफ घेऊनच सिझरला यायचे. रीमा मॅडमला त्यांनी सांगितलं होतं की नवीन इंटर्नशिपचे विद्यार्थी आहेत. म्हणून रीमा मॅडमनी त्यांना परवानगी दिली होती. ते दिवसरात्र हॉस्पिटलमध्येच असायचे. रीमा मॅडमला ह्याबद्दल काही सांगितलं तर सर आम्हाला नोकरीवरून काढून टाकायची धमकी देत होते म्हणून आम्ही कुणीच बोलत नव्हतो.” कांचन म्हणाली. अनिरुद्धने तिला जागेवर बसवलं. आणि तो रीमाकडे वळला.
“डॉ. रीमा, कांचननी सांगितलं ते खरं आहे?” अनिरुद्ध
“हो जजसाहेब… खरंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही इंटर्नशिप करणारे विद्यार्थी ठेवत नव्हतो; पण अरविंद म्हणाला की हे त्याचे कोलकात्याचे विद्यार्थी आहेत. तो तिकडे प्राध्यापक म्हणूनही काम करत होता आणि त्यांची अरविंदच्याच हाताखाली काम करायची इच्छा होती. मी पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊ दिलं. ते तिघंही हॉस्पिटलमध्ये रोजच यायचे अगदी नाईट ड्युटीही करायचे. ओ टी मध्ये असले की सगळे स्क्रब असतात. सगळांच्या चेहऱ्यावर मास्क टॉपी असतेच… त्यामुळे ओ टीमध्ये माझा स्टाफ नाही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही.” रीमा म्हणाली. अनिरुद्धने जजसाहेबांना अरविंदला परत प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली.
“तर डॉ. अरविंद आता तुमचं सगळं भांडं फुटलं आहे. सगळ्यागोष्टी समोर आल्या आहेत तर तुमच्यासोबत सामील असलेल्या लोकांची नावं सांगा आणि तुम्ही एवढं खालच्या दर्जाचं काम का केलं हेसुद्धा सांगा.” अनिरुद्ध बोलत होता.
“तो काय सांगणार? त्याचा कर्ता करविता, त्याच्या ह्या धंद्यातला मास्टरमाइंड तर हा आहे…” दरवाज्यातून एक आवाज आला. सगळ्यांनी दरवाज्याकडे पाहिलं. मधुराला मात्र खूप मोठा धक्का बसला.
(कोण असेल ती व्यक्ती? बघू तुम्हाला ओळखू येतं का? सलग भाग पोस्ट करतेय पण कुणी काही रिस्पॉन्स देत नाहीये, आता मात्र कमेंट्स आल्याशिवाय पुढचा भाग पोस्ट करणार नाही बरं का!)
क्रमशः
© डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा