Login

मधुरीमा पर्व २ (भाग ४८ अंतिम)

कथा मैत्रीची
मधुरीमा पर्व २ (भाग ४८ अंतिम)

“तो काय सांगणार? त्याचा कर्ता करविता, त्याच्या ह्या धंद्यातला मास्टरमाइंड तर हा आहे…” दरवाज्यातून एक आवाज आला. सगळ्यांनी दरवाज्याकडे पाहिलं. मधुराला मात्र खूप मोठा धक्का बसला.

“रुद्र…” मधुराच्या तोंडून पुसट निघालं. समोर पुरुषोत्तमराव रुद्रला पकडून उभे होते. सोबत इन्स्पेक्टर मंगेशही होता.


“जजसाहेब, हा काय सिनेमा सुरू आहे की एखादं नाटक… अशा वेळेवर एन्टर्या होत आहेत आणि तुम्हीही परवानगी देत आहात.” विरोधी पक्ष वकील


“तुम्ही तुमचं काम करा. माझं काम करायला मी समर्थ आहे.” जजसाहेब त्यांना म्हणाले.


“जे काही बोलायचं आहे ते इथं समोर येऊन बोला.” जजसाहेब पुरुषोत्तमरावांना म्हणाले.


“जजसाहेब, दिल्लीतली मानवी अवयव तस्करी केस तुम्ही ऐकली असेल. त्या केसमध्ये माझा मुलगा रुद्र पकडल्या गेला होता. ती केस आपल्या सर्वांसमोर आहेच. रुद्रला त्याची शिक्षा मिळाल्यावर तो तुरुंगात होता. आम्ही तर त्याला भेटणं वगैरे सगळं सोडून दिलं होतं. काही दिवसांनी त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असं आम्हाला जेलरने कळवलं होतं पण आम्ही त्याची काही ट्रीटमेंट वगैरे केली नाही. तसाही असा मुलगा जगवून काय करायचं होतं. काही महिन्यांनी त्याने आत्महत्या केल्याचं आम्हाला कळलं. आम्ही त्याचे अंतिम संस्कार त्यांनाच करायला लावले.


इतके वर्ष आम्ही आमचा मुलगा मेला आहे असंच समजत होतो; पण सुमनला म्हणजे माझ्या पत्नीला कॅन्सर निदान झाल्यापासून एक अनोळखी नंबरवरून मला सतत कॉल येत होते. मी त्याकडं दुर्लक्ष केलं. खरंतर सुमनची अशी परिस्थिती नव्हती की मी तिला सोडून काही करू शकेल. सुमनला देवाज्ञा झाली. नंतरही हे कॉल सुरूच होते. दरम्यान रीमाची केस उभी राहिली. रीमा वरचे आरोप तेच होते जे आरोप रुद्रवर लागले होते.

मी इन्स्पेक्टर मंगेशला ही गोष्ट सांगितली. त्याने मला कॉल उचलायला लावला आणि फोन टॅप केला. त्यावरून आम्ही रुद्रला पकडलं.” पुरुषोत्तमराव म्हणाले.


“का? का केलंस रुद्र असं?” मधुरा चिडून म्हणाली. रुद्र विक्षिप्त हसायला लागला.


“तुलाच फसवायचं होतं ह्यात… एकदा आमच्या हातातून सटकली होतीस… शेखर… माझा भाऊ… तुझ्यामुळे मेला… आमचं सगळं सुरळीत सुरू होतं… रुद्रने दिल्ली आणि मी बंगाल कव्हर केलं होतं. दुबईला आम्ही ऑर्गन सप्लाय करायचो. पण तू माझ्या भावाला पकडून दिलंस. शेखरमुळं मी वाचलो, त्याने पोलिसांना बंगालमध्ये असं काही सुरू आहे ह्याची खबर लागू दिली नाही.

आणि योगायोग बघ, तुझी मैत्रीण माझ्या प्रेमात पडली होती. मध्यंतरी मी तिचा पिच्छा सोडला होता कारण आमचं काम आम्हाला पुढं न्यायचं होतं; पण तू आलीस ना भीक मागत… माझ्या मैत्रिणीसोबत लग्न कर म्हणून… मग आम्ही प्लॅन बनवला. रुद्रला जेलमधून सोडवून घेतलं. त्यानं आत्महत्या केली असं सगळ्या जगासमोर आणलं. आमचं ठरलं होतं, अवयव तस्करी मध्ये ह्या रीमाला फसवायचं आणि तुला पागल म्हणून पागल खान्यात भरती करायचं… म्हणूनच रुद्र तुझ्या मागावर यायचा… आठवतो काळा कोट, काळी बाईक, काळं हेल्मेट… तो रुद्रच होता…


तुमच्या दोघींचंही आयुष्य आम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं. किती वर्षांपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो. माझी आई, माझ्या बहिणीचा मुलगा वगैरे सगळं काही बनावट होतं. जिला मी आई म्हणून आणलं होतं तिला तिचे पैसे नियमित देत होतो पण तिलाही हाव सुटली पैशाची… जास्तच फडफड करायला लागली होती… मान मुरडुन टाकली सालीची…” अरविंद विचित्र हसत म्हणाला.


“मधुरा, तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्यतून उठलो… मला तुलाही तुझ्या आयुष्यातुन उठवायचं होतं… तुझा बदला घ्यायचा होता. तुझ्या मागावर होतो तेव्हाच कळलं माझ्या आईला कॅन्सर झालाय… शेवटचं बघायचं होतं तिला पण तू एवढं विष पेरून ठेवलं होतं की माझे आईवडील माझ्यापासून दूर झाले.” रुद्र म्हणाला.


“विष तिने नाही पेरलं, तू समाजात विष पेरलंस… अरे माणूस म्हणून जगता आलं नाही तुला… डॉक्टर झाला होतास ना… लोकं देवाचं दुसरं रूप मानतात डॉक्टरला तू तर सैतान निघालास. बरं झालं सुमन गेली. कमीत कमी तुझं हे असं जिवंत असून पुन्हा तेच दुष्कर्म करणं तिच्या डोळ्यासमोर नाही आलं.” पुरुषोत्तमराव म्हणाले.


“पण गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी गोष्टी मागे सोडतोच… तुम्हीही सोडल्या… म्हणूनच पकडल्या गेलात… आता न्यायालय तुम्हाला शिक्षा देईलच.” अनिरुद्ध म्हणाला.


“ही अशी समाजाला लागलेली कीड… ह्या किडीला शिक्षा द्यायची नसते तर ही कीड दिसली की लगेच चिरडून टाकायची असते…” पुरुषोत्तमराव त्वेषाने म्हणाले. त्यांनी मंगेशच्या खिशातून बंदूक काढली. एक गोळी रुद्रला मारली… आणि एक अरविंदला… दोघांच्याही डोक्यात गोळी लागली आणि दोघे धाडकन जमिनीवर कोसळले आणि पुरुषोत्तमरावही खाली कोसळले. सगळीकडे गदारोळ सुरू झाला. पोलिसांनी जजसाहेबांना कव्हर करत कोर्ट रूमचा दरवाजा बंद केला; जेणेकरून कुणी बाहेर पडू नये.


मधुरा धावतच पुरुषोत्तमरावांजवळ गेली. तिने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं.


“माफ कर मधुरा… पहिल्यांदाच मी हे काम केलं असतं तर आज परत तुझ्यावर ही वेळ आली नसती. आता तुला कुणीच त्रास देणार नाही. मधुरा, पुढच्या जन्मात माझी मुलगी म्हणून जन्माला येशील ना गं…?”


“पप्पा, काही झालं नाहीये तुम्हाला… आपण दवाखान्यात जातोय, नितीन ऍम्ब्युलन्स बोलव.” मधुरा रडत बोलत होती.


“मधुरा, इथला प्रवास संपला आता…ती बघ, सुमन बोलावतेय मला…” पुरुषोत्तमराव बोलले आणि त्यांनी मधुराच्या मांडीवरच देहत्याग केला.


“पप्पा….” मधुराच्या आर्त किंकाळीने सगळीकडे एक भयाण शांतता पसरली.


“सगळं असं नाट्यमयरित्या घडून आलं आहे की खरंतर बोलणं अवघड आहे. आतापर्यंत जे जे पुरावे सादर करण्यात आले, त्याचप्रमाणे अरविंद आणि रुद्र ह्यांनी केलेले गुन्हे त्यांनी मान्य केले. यावरून डॉ. रीमा ह्या निर्दोष आहेत हे लक्षात येतं. हे कोर्ट, रीमा ह्यांची निर्दोष मुक्तता करते तसेच त्यांचं हॉस्पिटल मधुरीमा त्यांना पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देते. तसेच दिल्लीतली केस आणि ही केस ह्यामध्ये असलेल्या पोलिसांना कर्तव्य नीट न बाजवण्याबद्दल नोटीस देते आणि गरज असल्यास त्यांच्यावर केस करण्याचे आदेश हे कोर्ट देते. द केस इस क्लोज.” जजसाहेबांनी निकाल दिला आणि ते उठून गेले. पोलिसांनी अरविंद आणि रुद्रची बॉडी ताब्यात घेतली. पुरुषोत्तमरावांची बॉडीही पोस्टमार्टेम करण्यासाठी पाठवली.


मधुरा धावत जाऊन रीमाच्या गळ्यात पडली. दोघीजणी खूप रडल्या.


“रीमा, पप्पांनी दरवेळी साथ दिली गं… आणि आज तर…” मधुरा रडतच होती.


“मधु, ह्या देवमाणसाच्या पोटी हा हैवाण कसा जन्माला आला असेल गं? मागं वळून बघतेय तर सगळं कसं घडत गेलं काहीच कळत नाहीये. मी चुकले गं, नको त्या माणसावर विश्वास ठेवला.” रीमा


“रीमा… ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. जे व्हायचं होतं ते घडून गेलं.” मधुरा


“मधु, दोनदा जीवनदान दिलंस गं… त्यादिवशी आणि आता…” रीमा


“तू पण माझ्यासाठी काय कमी केलंस का? तुझ्यामुळे मी आहे.” मधुरा


“आणि तुझ्यामुळे मी… मधु, ज्या दिवशी मला अटक झाली ना मी तेव्हाच ठरवलं होतं की आत्महत्या करेन… लोकांसमोर उभं राहायची लाज वाटत होती मला. आताही मी कशी जाऊ दुनियेसमोर, लोकं परत विश्वास ठेवतील का गं माझ्यावर?” रीमा


“का नाही ठेवणार? चल, ह्या दुनियेला दाखवून देऊ… मैत्री म्हणजे काय असते ते… सत्याचा विजय कसा असतो ते.” रीमाचा हात धरून मधुरा तिला बाहेर घेऊन आली. दोघीजणी हातात हात घेऊन चालत निघाल्या. पत्रकार दोघींना प्रश्न विचारत होते; पण त्या कुणासोबतच बोलत नव्हत्या.


“अहो, कुठं चालल्या ह्या दोघी… तुम्ही थांबवा तर त्यांना…” राधिकाताई मधुकररावांना म्हणाल्या.


“जाऊ दे… मधुरीमा मध्ये चालल्या त्या… त्यांनी उभ्या केलेल्या स्वप्नाला ग्रहण लागलं होतं… आज ते ग्रहण सुटलं… त्या दोघींचा श्वास आहे मधुरीमा… त्यांना आता मोकळा श्वास घेऊ दे…” मधुकरराव म्हणाले. सगळेजण त्यांच्या मागे चालत गेले.


दोघीजणी हॉस्पिटलजवळ पोहोचल्या.


“मधु, आता परत काही वादळ तर येणार नाही ना?” रीमा


“नाही रीमा… आता आपण…आणि आपलं मधुरीमा…” मधुरा म्हणाली.


“मधु आता कोणतेच चढ उतार नको.” रीमा


“अरे चढ उतार म्हणजेच आयुष्य नाही का? ईसीजीमध्ये सरळ रेषा आली की आपण म्हणतोच की आयुष्य संपलं… म्हणूनच चढ उतार हवेतच की, संघर्षही हवेतच.” मधुरा


“खरंय मधु, तू म्हणतेस तसंच… प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्षाची एक कथा असते… हा आपला संघर्ष आणि ही आपली ही कथा… मधुरीमा….” दोघीजणी हॉस्पिटलच्या इमारतीकडे अभिमानाने बघत होत्या… दोघीजणी परत तेच स्वप्न बघत होत्या… परत तेच स्वप्न जगत होत्या… एम् बी बी एस च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पकडलेला मैत्रीचा हात आज इथवर साथ देत आला होता… डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून तरळुन गेला होता… आता एकच स्वप्न होतं… एकच ध्यास होता… प्रत्येक क्षण खुणावत होता… जगण्याची नवी उमेद देत होता… ‘मधुरीमा’


पूर्णविराम!

© डॉ. किमया संतोष मुळावकर


(प्रिय वाचक,
सप्रेम नमस्कार… अंतिम हा शब्द खूप त्रासदायक असतो नाही का? मधुरीमा पर्व एक लिहिलं तेव्हाच वाटलं की कथा तर पूर्ण केली पण काहीतरी सुटलं… काही प्रश्न तसेच राहिले…. आणि म्हणूनच पर्व 2 लिहायला घेतलं. पर्व 2 खूप गॅपनी येत गेलं तरी तुमच्या प्रेमळ कमेंट्स, कधी धमकीवजा कमेंट्स लिहायला प्रेरणा देत होत्या.
‘मॅडम पुढचा भाग लवकर पोस्ट करा…’ ह्या गोष्टीला मी खूप मिस करणार आता. आज शेवटचा भाग पोस्ट केला… कथा पूर्ण झाल्याचं समाधान तर आहेच पण एक रीतेपणही जाणवतंय. तुम्ही जसे वाचताना कथेत गुंतलेले असता तसेच किंवा त्यापेक्षा कणभर जास्त आम्ही लेखक त्या कथेत गुंतलेलो असतो. म्हणूनच अंतिम भाग लिहिताना त्रास होतो. खरंतर कथा संपूच नये असं वाटतं; पण कुठंतरी थांबायला हवं. उगीचच कथा ओढून ताणून लिहिण्यात काही अर्थ नसतो, नाही का?

कथा कशी वाटली आजतरी सगळ्यांनी नक्की सांगा. वाचणारे 300-400 जण असतात आणि कमेंट्स फक्त 3-4 येतात… आज शेवटच्या भागावर तरी कमेंट्सचा पाऊस पडू द्या. कथेबद्दल, लेखनाबद्दल नक्की अभिप्राय द्या.

काही नव्या वाचकांना काही गोष्टीचे क्लु मिळाले नसतील त्यासाठी पर्व 1 नक्की वाचा. मधुरीमावर भरभरून प्रेम केलंत त्यासाठी खूप खूप आभार!
लवकरच भेटू नव्या कथेसोबत…)