Login

माद्री - एक धगधगती कहाणी

पंडुपत्नी माद्री

मध्यान्हीच्या वेळी घनदाट वनातील कुटीसमोर निश्चल पडलेला स्वतःच्या पतीचा, महाराज पंडुचा देह आणि धाय मोकलून रडणाऱ्या माद्रीकडे पाहताच सर्व प्रकार कुंतीच्या लक्षात आला. हे असे सगळे घडले तर काय करायचे या चिंतेत तिने कित्येक रात्री घालवल्या होत्या आणि ते अघटित वास्तव रूपाने समोर पाहताच कुंतीला तीव्र दुःखाच्या उमाळ्या बरोबर स्वतःच्या जबाबदारीची जाणीवही झाली. माद्रीच्या जवळ बसत कुंतीने तिला अलगद जवळ घेतले. हस्तिनापूरच्या दोन अनभिषिक्त सम्राज्ञी पोरक्या झाल्या होत्या. कुंती माद्रीला म्हणाली, सखे माद्री, अशी तुटून जाऊ नकोस गं.. महाराजांनन्तर जास्त गरज आहे आपल्याला एकमेकींची! मुलांना आपल्या दोघींची. सावर स्वतःला, तुझ्या नकुल सहदेवासाठी तरी सावर!डोळ्यांना संततधार लागलेली माद्री यावर हताशपणे कुंतीला म्हणाली, तू माझी थोरली बहीणच! तसेच आपले नाते दृढ होत गेले, त्या लहान बहिणीच्या हक्काने एक सांगू आर्ये, मला जाऊदे...महाराजांबरोबर मला सहगमन करू दे..माझ्या मुलांना, आपल्या मुलांना सांभाळ..ती आता तुझीच मुले आहेत. त्यांना मोठेपणी कदाचित मी आठवणारही नाही इतकी माया तू करशीलच , पण त्यांना माझी कर्मकहाणी योग्य वेळ आली की नक्की सांग..किमान केवळ आपली आईच दोषी नाही हे त्यांना तरी कळू दे!
तुला आठवते आर्ये आपली पहिली भेट? राजदरबारात सवत म्हणून तू जेव्हा माझे स्वागत केलेस ना,तेव्हा माझ्यातली पूर्वीची अल्लड माद्री भानावर आली. जीवनच्या कधीही विचार न केलेल्या एका प्रवाहात आपण वाहून चाललो आहोत असेच वाटले क्षणभर.
त्या आधीची मी... स्वतःच्या सौन्दर्याची पूर्ण जाणीव असलेली, अभिमान असलेली एक हर्षदा होते..राजवाड्याच्या सुखासीन, गंधील जीवनाचा उपभोग घेणारी एक मुक्त मुग्ध नवयौवना होते. महाराज पडूंनी जेव्हा माझ्याशी विवाह केला तेव्हा फार मोहरले मी..माझ्या आयुष्याचे सार्थक झाले होते..हस्तिनापूरच्या विजयी सम्राटाची मी अर्धांगिनी होते..राज्ञी होते..कुरुकुलाची स्नुषा होते..या सुखांच्या हिंदोळ्यावर डोलतच मी हस्तिनापुरात प्रवेश केला..लोकांची कुजबुज कानावर पडलीच..,महाराज पंडुंनी मद्र देशाच्या राजकन्येशी माद्रीशी विवाह केला आहे..आणि माझ्या आनंदाच्या उधाण आलेल्या मनाला तेंव्हा जाणवलं की मी कोण? हस्तिनापूरची राज्ञी, महाराजांची राणी, कुरुकुळाची स्नुषा असा माझा उल्लेख नाहीच...मद्र देशाची माद्रीच राहिले आहे मी अजूनही...आणि तेवढयात राजवाड्याच्या प्रवेश द्वाराशी ओवाळलेस तू मला. महाराजांच्या शेजारची तुझी जागा घेतलेल्या माझ्या सौन्दर्यावर खिळलेले आणि स्वतःचे स्थान डळमळेल की काय असे भाव असणारे तुझे डोळे नि थरथरणारे हात अजून आठवतात...थोड्याच वेळात स्वतःला सावरून मला आत घेऊन गेलीस. कुरुकुळाची ज्येष्ठ स्नुषा म्हणून माझी व्यवस्था, मला हवे नको ते पाहिलेस त्याचेही स्मरण आहे मला! पण त्यातही मला वाचत होतीस, माझ्या मनाचा तळ शोधत होतीस तू आर्ये..माझी ताकद आजमावत होतीस आणि तुला अखेर तो शोध लागला...महाराजाना केवळ स्वतःच्या सौन्दर्याने भुरळ घालणारी मी आणि त्यांच्या महत्वाच्या निर्णयात सल्ला देणारी चर्चा करणारी, विचारशील तू आणि फक्त तूच आहेस हे जेव्हा तुला कळले तेव्हा या क्षणिक सौन्दर्यापेक्षा तूच वरचढ ठरशील हे लक्षात आल्याने आपल्यातले नातेच बदलले. मला पाठच्या बहिणीप्रमाणे जपलेस तू. माझ्या सगळ्या भाव भावना समजून घेतल्यास तूच...असे आपले आयुष्य व्यतीत होत असतानाच अचानकच आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हाही धीर दिलास तूच! महाराजांना मृगया करताना ऋषींनी दिलेला तो शाप...रतिक्रीडेस मुकावे लागण्याची आणि तसे घडल्यास मरण पत्करावे लागेल याची कल्पना आल्याने अवघ्या राज्यावर शोककळा पसरली....सर्वात अवघड होतं हे माझ्यासाठी... महाराजांना सर्वार्थाने आपलंसं करण्यासाठी जीव आसुसायचा माझा...तारुण्याचा भर, स्वतःचे सौन्दर्य , त्याचा उन्माद यांची भीति वाटू लागली होती मला. माझ्या मनात उचंबळणाऱ्या भावना राजांनी ओळखू नयेत म्हणून पराकोटीचे प्रयत्न करावे लागत मला. आणि त्यात त्यांनी राजत्याग करून वनात जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली....काय म्हणून राहणार होते मी हस्तिनापुरात? माझा प्राणसखा, जिवलग मला सोडून जात असताना कशी जगणार होते मी...त्याची खूण पोटात वाढेल एव्हढाही सहवास झाला नव्हता आमचा..किमान पतीमुख तरी दिसावे आणि किमान आयुष्याच्या अंता पर्यन्त सोबत राहावे म्हणून मीही तुम्हा दोघांबरोबर वनाची वाट धरली...तो पर्यंत असलेला माझा मखमली प्रवास आता काट्या कुट्यातून होणार होता... आयुष्याची उलटी बाजूच अनुभवत होते मी पण त्यातही हेच जाणवत राहिले की कितीही अवघड वाट असली तरी प्रियकरा बरोबर ती सोपीच वाटते....इथे वनात येऊन राहिल्यावर खूप कष्ट पडतील , मनातील महारांजांच्या सहवासाची ओढ कमी होईल असे वाटत होते पण झाले उलटेच...इथला भुरळ पाडणारा निसर्ग, वाहणारे झरे यामुळे जास्तच उल्लसित झालं मन...आता सतत बरोबर असूनही त्यांच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागले मी...त्यांचा संयम सुटू नये म्हणून घाबरंघुबरं होत असे मन...पण महाराजांच्या मनात त्या वेळी वेगळीच चिंता व्यापून राहिली होती..पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वंशाला दिवा हवा...तो कसा मिळणार? आर्ये कुंती, ज्या दिवशी तू तुला मिळालेला वर सांगितलास आणि पुत्र प्राप्तीची इच्छा बोलून दाखवलीस तेव्हा पहिल्यांदाच एक सूक्ष्म कळ उठली मनात...महाराज माझ्यात गुंतले असताना तुला कसे वाटले असेल, तू काय विचार करत असशील, कसे काढले असशील ते दिवस हे तेव्हा जाणवलं मला...तुला तीन पुत्र झाले, पुत्र प्राप्तीच्या वेळी तुझ्या शरीरात होणारे स्त्री सुलभ बदल, तुझं जागं होणारं मातृत्व, तुझी मुलं व त्यांचं, तुझं नि महाराजांचं नवं जग बघताना खरंच खूप यातना होत होत्या मला..हे सुख मी महाराजांना कधीच देऊ शकणार नाही याने तळमळत होता जीव...आणि मग न राहवून मी विचारलं महाराजांना...तुझ्या कडून त्या वराचा मलाही लाभ मिळावा म्हणून महाराजांनी तुला विनवलं... खूप धडधडत्या हृदयाने प्राण कानात आणून ऐकत होते मी तुझे शब्द... आर्ये, खूप मोठी ठरलीस तू तेव्हा.... स्वतःच्या हक्काचं काहीतरी लहान बहिणीला सहज देऊन टाकावं अशा ममत्वाने दिलास तू मला तो वर...त्यातही एकाच वेळी अश्विनी कुमारांना आवाहन करून मी जुळ्या मुलांना जन्म दिला...आर्ये, जगातील सर्वात मोठे सुख तू मला दिलेस...आणि तुझ्या माझ्यातली ती एक अदृश्य सवतीची रेखाही गळून पडली...तुझ्या माझ्या दोघींच्या मुलांनी वनात गोकुळ उभं राहिलं...स्वर्गीय सुखाचा तो काळ होता..कुरुवंशाचे सुपुत्र तुझ्या, महाराजांच्या छायेत घडत होते, लहानग्या नकुल सहदेवला सतत समजून घ्या, त्यांना बरोबर घेऊन चला, तुम्ही एकच आहात हे संस्कार आर्ये, तूच करत होतीस मुलांवर...ती आपली मुलंच होती...फक्त तुझी किंवा फक्त माझी नव्हतीच कधी...या सगळ्यात मन आश्वस्त झालं होतं, तारुण्य सुलभ सुखाच्या कल्पनांवर मातृत्वाने वरकडी केली होती...खूप सुखात होते कुंती मी...मद्र देशाची, सुखशय्येवर निजणारी ही राजकन्या वनात गवताच्या शय्येवरही सुखात होती गं... पण नियतीला माझं सुख बघवलं नाही बहुधा...
पण माद्री, असं कसं घडलं..कसा सुटला तुझा संयम? या संयमित जगण्याचे वचन घेतले होते मी तुझ्याकडून हस्तिनापुरातून निघताना...मग का आवर घातला नाहीस मनाला?
हुंदके देत माद्री म्हणाली, खरंच सांगते आर्ये, मी नेहमीप्रमाणे पाणी आणायला नि स्नानाला गेले होते झऱ्याकाठी...अचानक महाराज तेथे आले, मी निघाले होते तिथून...मी खूप विनवले, हे बरोबर नाही म्हणून सांगितले तरी त्यांच्या मनातील भावना परतवू नाही शकले ... इतक्या वर्षांचा वियोग आणि अधीर मन! मी फक्त त्यांना दोष देत नाही ... आधी नकार देणारे , विचारशक्ती शाबूत असणारे माझे मन कसे वाहवत गेले कळलेच नाही ... पण त्या सम्पूर्ण समर्पणाची सांगता झाली महाराजांच्या मृत्यूने...माझ्या या मिठीत त्यांच्या मुखकमलावर सुख विराजत असतानाच त्यांचा मृत्यू झाला ... दोष खरंतर ना त्यांचा एकट्याचा ना माझा! आत्मसंयमाची प्रखर वाट चालताना तपस्वी जनांची मनेही वाहत जातात, तर मी नि महाराज तसे सामान्यच नाही का? कुंती, तुझ्या समोर हे मांडते आहे कारण तूच एकटी मला समजून घेशील... ती ताकद नि विवेकबुद्धी आर्ये, केवळ तुझ्यात आहे...हे अवघे जग माझ्यामुळे महाराजांचा संयम सुटला असेच म्हणेल ... कशी सांगू मी किती प्रतिकार केला पण माझेही प्रेम होते त्यांच्यावर...तो प्रतिकार कधी सहकारात बदलला कळलंच नाही आणि कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती...पण ही आताची वेळ मात्र मला जाऊ द्यायची नाही...मुळात जरी त्यांचा संयम ढळला तरी त्यांच्या सहवासाला आसुसलेली मी त्यांच्या इतकीच दोषी आहेच ना...पण हे कितीही खरे असले तरी इतरे जनांकडून हे ऐकायची ताकद माझ्यात नाही, ती हिम्मत माझ्यात नाही...मला जाऊदे आर्ये...महाराजांच्या या पार्थिव देहाबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मला राहू दे. त्या धगधगत्या आगीत माझे अश्रू नि माझं पाप जळून खाक होऊ देत आर्ये...
असे बोलू नकोस माद्री, काही गोष्टी घडायच्या त्या घडतातच....आपण काही करू शकत नाही...आपण फक्त साक्षी असतो त्या क्षणांचे आणि आयुष्यभर त्यातून मिळणाऱ्या दुःखाचे वाटेकरी..दीर्घ उसासा टाकून कुंती म्हणाली.
तरीही आर्ये, कशी जगू मी? कसं तोंड देऊ जगाला? आणि माझ्या मुलांना तरी मी हे सगळे कसे सांगू? कोण चूक कोण बरोबर याची शहानिशा करायला आता वेळच नाही . मी महाराजांबरोबर सहगमन करणेच उचित ठरेल...तेच माझे प्रायश्चित्त.. कुरुकुलाच्या या पाचही सुपुत्रांना घेऊन तू हस्तिनापुरी जा...पाचांची आई तर तू आहेसच..प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईपेक्षा संस्कार करणारी आईच मोठी असते...आणि तसे संस्कार करण्याचा विवेक, संयम आणि संवेदनशीलता तुझ्यात आहे, माझ्यकडे नाही! माझ्यातील आई हरली आहे .
असे म्हणू नकोस माद्री...आईपण हे असं हरत नसतं..खरं तर ते निभावून न्यायचं असतं, आपल्या अस्तित्वाच्या सर्व शक्यता, आपले सर्व गुण, नीती आणि बुद्धिमत्ता यांचा वारसा असतो तो.. कितीही सम्पवू म्हटलं तरी आईपण संपत नाही, आईचं हृदय रीतं होत नाही...
तरीही आर्ये, हे आईपण निभावून न्यायला मी असमर्थ आहे...एक राजकन्या एका मोठ्या कुळाची स्नुषा, एका वीर राजाची पत्नी आणि त्याच वीराच्या मृत्यूला कारण ठरलेली अभगिनी यात सांगण्यासारखं , शिकवण्यासारखं आणि वारसा पुढे देण्यासारखं काहीच नाही. एका अर्थाने मी महाराजांबरोबर सहगमन करते ते योग्यच आहे. स्वतःच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली आई असण्यापेक्षा ती नसती तर बरं असं मुलांनाही वाटलं तर? मी नाही पचवू शकणार हे आर्ये. अशा आईपणा पेक्षा मरण बरं...एक मुलगी, सून, पत्नी, आई या सर्वच नात्यांमध्ये कमी पडले मी. उजळ माथ्याने कोणी माझ्याबद्दल कधी बोलणार नाही. ज्या पुत्रांच्या प्राप्तीसाठी झुरले त्यांनाच सोडून जायची वेळ आली आहे माझ्यावर! माझी आईपणाची सगळी कर्तव्य तुझ्या सुपूर्त करते आहे. एवढं दान मला दे. सांभाळ या मुलांना. आर्ये कुंती, सांगशील ना माझी व्यथा मुलांना? लोकांमधील, आपल्या परिवारातील माझी प्रतिमा , त्यांचे माझ्याबाबतीतील विचार मी कधीच बदलू शकणार नाही कदाचित पण माझ्या मुलांच्या नजरेत हे जे काही घडले ते वास्तव जसेच्या तसे आणशील? किमान माझी बाजू मांडशील त्यांच्यासमोर? माझी तळमळ कळू दे त्यांना एवढीच विनंती!
स्वतःचे मन मोकळे करून आणि समस्त कुरुवंशाची धुरा कुंतीच्या खांद्यावर देऊन पंडुच्या धगधगत्या चितेत माद्रीने प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने पंडूशी एकरूप झाली.