नाती जिव्हाळ्याची - भाग - ४
“सीताऽऽऽ आगं ए सीता…आगं तुला काय तरी इचारायच हाय.” सीताची शेजारीण लीला बाहेरून आवाज देत घरात आली.
सीता भांडी घासत बसली होती लीलाचा आवाज ऐकून म्हणाली, “काय व तायसाब.. मला काय इचारायच हाय बरं तुमाला?”
“आगं.. तुज्या रेश्माचं लगीन करणार हायस न्हवं, आन त्यासाठी पोरगा बी हुडकतीस आसं ऐकलं मी.” सीताच्या मनातील गोष्ट काढून घेण्यासाठी लीला तिला म्हणाली.
“आवं, व्हय की वं तायसाब..आता रेश्मा लग्नाच्या मापाची झालीय आन फुढ शाळा बी शिकाय मागंना. घरात ठीवून घेण्यापरिस लगीन करून देती म्हंजी ती तिज्या सासरी रुळून जाईल. तिजं तिजं आयुष्य मार्गी लागलं.” लेकीच्या भविष्याचा विचार करून सीता बोलत होती.
जे बोलायला आलेली ते सांगत लीला म्हणाली, “व्हय.. तुजं बराबर हाय. म्हणूनच मी तिज्यासाठी एका पोराचं स्थळ सांगाया आलीय. जोडा आगदी लक्ष्मी नारायणावाणी दिसंल बघ. तू व्हय म्हणालीस तर पाहुण्यांना बोलावून घेता येईल.”
“खरंच हाय का वं चांगलं स्थळ.? काय करतूय पोरगा?
मुलाकडील माहिती अगदीसांगण्यासाठी अगदी तोंडभरून स्तुती करत लीला म्हणाली, “आगं.. पोरगं लय भारी हाय, लय शिकलंय आन् चांगल्या पगाराची नोकरी करतूय मंबईला. घरचं बी लय चांगलं हाय त्येच्या. सोताच घर हाय मंबईत.”
“व्हय काय! स्थळ तर चांगलं वाटतंय गं. पर त्यास्नी गावाकडची पोरं पसंद पडलं का?” उगीच मनात शंका आल्यायामुळे सीता ने लीलाला विचारले.
मुलाकडची बाजू मांडत लीला म्हणाली, “आगं सीता.. त्यास्नी बी गावाकडचीच पोरं पायजे हाय गं. त्येंची कसलीच अपेक्षा नाय. फकस्त पोरगी दिसायला देखणी पायजे बास. ही एकच अपेक्षा हाय, आन् आपली रेश्मा किती देखणी हाय! लगीच पास करत्याल ती लोकं.”
आता मात्र सीताला मोह आवरला नाही. त्यामुळे तिने लीलाला म्हणाली, “आसं असंल तर मग काय हरकत नाय. एकादा दिस ठरवून बोलवूया इकडं, पोरगी बघायला.. पावण्यास्नी.”
सिताचा होकार ऐकून लिलाला सुध्दा बरं वाटलं. ती म्हणाली, “मी उद्यालाच तिकडं टेलीफोनवरनं फोन करती आणि सांगती मग इकडं यायला.”
“व्हय व्हय, चालतय की.” असं म्हणत सीताने लीलाला चहा ठेवायला पातेले हात घेतले. आणि म्हणाली, ताय साब… बसा वाईच खाली, च्या ठीवती तुमास्नी. घोटभर चा प्या मग जा.”
“आगं नगं नगं.. आता च्या आन् कशाला! सारखा च्या पियात्यात व्हय. परत भूक लागत नाय.” चहा पिण्याचे टाळण्यासाठी लीला जायला निघू लागली.
तरीही हाताला धरून खाली बसवत सीताने लीलाला चहा घेण्यासाठी मनवलेच. सिताच्या शब्दाला मान देत लीला खाली बसली. सिताने लगेच चुलीवर दोन कप चहा ठेवला. बोलता बोलता चहाला रटरट उखळी आली. गवती चहा टाकून सिताने लीलासाठी फक्कड चहा बनवला. दोन कप भरले. आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघीजणी चहा पिऊ लागल्या.
चहा पिल्यावर लीला जायला निघाली तेव्हा सीता तिला म्हणाली, “ बरं का तायसाब.. मी काय म्हणती, स्थळ जर खरंच चांगलं असलं तर लवकरच घ्या बोलावून. आणि एक सांगती त्यांना आधीच सांगा की हुडा बिंदा काय मिळायचा न्हाय म्हणावं. तितकी ताकद नाय आपली. आमची बाजू किती पडकी हाय ती तुमास्नी समद ठाव हाय. त्त्येच्यामुळं समद आधीच त्यांना कल्पना द्या.”
“आगं बाई.. तू अजिबात काळजी नगं करु गं. मी समद यवस्थित करीन.” लीलाच्या अशा बोलण्यामुळे सीताला थोडं हायंस वाटू लागलं.
चौकटीत उभे राहून लीला सीतासोबत बोलत होतो.”बरं चल जाती मी आता. आन उद्याच फोन करती तिकडं. बघू कधी येतो म्हणत्यात.”
तिला निरोप देत सीता म्हणाली, ‘व्हय चालतंय की. फोन कर आन मलाबी सांग काय म्हणाले, कधी येणार हायंत ते.”
“व्हय सांगती.. उद्या सांच्याला त्यांचा निरोप घिऊनच येती मग.” म्हणत लीला तिच्या घरी निघून जाते.
“व्हय सांगती.. उद्या सांच्याला त्यांचा निरोप घिऊनच येती मग.” म्हणत लीला तिच्या घरी निघून जाते.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लीला पाहुण्यांचा निरोप घेऊन आली. “पावणं इकडं येतो बोल्यात गं सीता.”
“कधी येणार म्हणालं ते?” सीताने उत्सुकतेने विचारले.
लीला म्हणाली, “पाच तारखेला म्हंजी येत्या मंगळवारी येतो म्हणालं.”
“व्हय काय! चालतंय की मग, कवा बी येऊं दे. आपण तयारीत र्हायाचं.” सीता आपली तयारी दर्शवत बोलत होती.
पाच तारखेचा दिवस उजाडला. पाहुणे येणार म्हणू. सीता ची गडबड चालू होती. बहिणीला पाहुणे बघायला येणार म्हणून त्या दिवशी सुधीर घरीच राहिलेला.
दुपारी पाहुणे आले. नवरा मुलगा त्याचे आई वडील आणि बहीण असे चारजण आले होते. दिसायला खूप देखणा, कुरळे केस, गोरागोमटा, घारे डोळे, उंचपुरा असा मुलगा होता तो. रेश्माचा आणि त्याचा जोडा अगदी मेड फॉर इच ऑदर असाच वाटणारा होता.
मुलीला समोर बसवले अन् मूलाच्या आई वडिलांनी काही प्रश्न विचारायला चालू केले. धाडसी स्वभावाची रेश्मा न घाबरता सगळी उत्तरं पटापट देत होती. पण अचानक मुलाने तिला काहीतरी विचारले तेव्हा रेश्माची नि त्याची नजरानजर झाली तसे दोघेही काही वेळ एकमेकांच्या नजरेत हरवून पण स्वतः ला सावरत रेश्माने तिला विचारलेली सगळी माहिती सांगितली.
—-------
—-------
क्रमशः
रेश्मा आणि राजन यांचे लग्न होईल का?
सीता आणि सुधीर रेश्माचे लग्न निर्विघ्नपणे पार पडू शकतील का? ते पाहूया पुढील भागात.
—---
©® सौ. वनिता गणेश शिंदे