Login

नाती जिव्हाळ्याची - भाग ५

नाती जिव्हाळ्याची भाग ५
नाती जिव्हाळ्याची - भाग ५


रीतीनुसार बोलाचाली झाली. रेश्माला तिची माहिती विचारली, सगळी विचारपूस झाली. त्यानंतर सीता मुलाची चौकशी करण्यासाठी म्हणून मुलाला म्हणाली, “पावणं.. नावं काय हाय तुमचं? काय काम करता? लीला तायसबांनी तुमच्याइषयी सांगितलंय सगळं पण तरीबी परत तुमी तुमच्या तोंडानं सांगितलं तर बरंच हाय.”

स्वतः ची माहिती देत तो म्हणाला, “माझे नाव राजन. सध्या मी मुंबईतील एका खूप नावाजलेल्या कंपनीत जॉब करतो. शिवाय आमचं स्वतः च घर आहे मुंबईत.”

इतर सर्व विचारपूस झाली. चहा पोहेचा कार्यक्रम झाल्यावर पाहुणे परत जायला निघाले. दारात गाडी उभी होती . घराबाहेर आल्यावर गाडीजवळ जाताच दोन कुटुंबातील मध्यस्थी म्हणून लीला म्हणाली, “पावणं आता मुलगी पसंद हाय का नाय ते सांगा.म्हंजी‌ पुढंची जुळणी करता येईल.”

रेश्माला पाहताक्षणी राजनला ती खूप आवडली होती. त्याच्या आई वडिलांनाही पोरगी पसंद पडली होती. कुणालाही लगेच आवडेल इतकी सुंदर होती रेश्मा. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता ‘मुलगी पसंद आहे’ असा होकार पाहुण्यांनी लगेच कळवला.

मनात काहीसा विचार येताच राजनचे वडील लीला ला म्हणाले, “ हो पण एकदा मुलीला मुलगा पसंद आहे तेही विचारून घ्या. मुलाकडील मंडळींचा होकार असेल तर पुढची बोलणी करायला हरकत नाही.” असे म्हणून ते गाडीत बसले.

लीलला खूप आनंद झाला. पाहुणे गाडीत बसून निघून गेले अन् ती पटकन सीताच्या घरात गेली आणि म्हणाली, “आग पोरीच्या लगनाची तयारी चालू कर वरमाय. पावण्यांना पोरगी पास हाय!”

हे ऐकताच सीताचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण एकाएकी तिच्या चेहऱ्यावरील हास्य थांबले आणि ती लीला ला म्हणाली तायसाब.. आवं त्यांनी पोरगी तरी पसंद केलीय पण त् हुंड्याच काय सांगितलं नाय का?”

राजनच्या आईंने लीला ला आधीच सांगितलेले की आम्हाला फक्त देखणी म्हणजे आमच्या राजनला शोभेल अशी मुलगी हवीय. बाकी हुंडा घेणे देणे या प्रथेला ही खतपाणी घालणार नाही. त्यामुळे लीला सीता ला म्हणाली, “आग तू त्याची काळजी नको करु. त्यांनी मला आधीच सांगितलं हाय की आम्हाला फक्त पोरगी हवी हुंडा बिंडा काय बी नको.”

लीलाचे हे बोलणे ऐकून सीताला हायसे वाटू लागले. मुलीचे लग्न लावून दिले की खूप मोठी जबाबदारी पार पडेल हीच भावना तिच्या मनात होती.

दोन्हीकडून लग्नासाठी होकार येताच रेश्मा आणि राजनच्या लग्नाची तयारी चालू झाली. राजनच्या घरी आर्थिक अडचणीचा प्रश्नच नव्हता. आर्थिक अडचण होती ती फक्त रेशमाच्या घरी.राजनच्या घरचे सर्वजण सुशिक्षित होते त्यामुळे एकही रुपया हुंडा घेणार नव्हते तरीही लग्न म्हटले की इतर खूप काही गोष्ठी असतात अन् त्यासाठी खर्चही करावा लागतो. त्याचे मात्र सीताला खूप टेन्शन येऊ लागले.

बहिणीचे लग्न ठरले म्हणून सुधीरला आणि सुजयलाही खूप आनंद झाला. पण सीता खूप नाराज वाटत होती ती कसला तरी विचार करतेय हे सुधीरच्या नजरेतून सुटले नाही त्यामुळे तो आईजवळ जात म्हणाला, “आई.. का ग इतकी शांत आहेस? कसला विचार करतेस एवढा?”

नाराजीच्या स्वरातच सीता म्हणाली बाळा.. आर रेश्मा चं लगीन ठरलंय याचा लय माझी लय आनंद झालाय र. पण आता या लग्नासाठी पैशाचं काय करायचं ते डोकं चालना!”

आईला धीर देण्यासाठी सुधीर म्हणाला, “होईल ग काही तरी सोय, तू अशी विचार करत नको बसू.”

बराच विचार करू करून शेवटी तिला एक मार्ग सापडला. ती सुधीरला म्हणाली, “हे बघ बाळा.. तू मला घरखर्च साठी काही पैसे दिलेले त्यातील थोडे थोडे करून मी शिल्लक ठेवलेले होते. अजून थोडे सावकाराकडून कर्ज घेऊ तेव्हा कुठे लग्नाचा खर्च पेलता येईल.”

सुधीरला ही कल्पना पटली त्यामुळे तोही तयार झाला. तो म्हणाला, “हो चालेल.. मी हळूहळू त्यांचे कर्ज फेडेन पण रेशमाचे लग्न चांगले पार पडले पाहिजे.”

सीता आणि सुधीर सावकाराकडे गेले आणि त्याला लग्नासाठी कर्ज मागितले. तेव्हा सावकार म्हणाला, “मी कर्ज देईन पण ते फेडणार कसं? एकटा सुधीर एवढे कर्ज कसे फेडू शकेल. त्याला काय जास्त पगार तरी आहे का?

सावकाराला शब्द देत सीता म्हणाली, “सावकार.. तुमी त्याची काळजी करू नका. मी बी तुमचं कर्ज फेडायला सुधीरला मदत करीन. हवं तर तुमच्या रानात किंवा घरात पडंल ती काम करायची माझी तयारी हाय.”

शेवटी सावकार कर्ज द्यायला तयार झाला. हाती पैसे मिळाल्यामुळे रेश्मा आणि राजनचे लग्न आनंदाने लावून देण्यात आले. आपल्या ऐपतीप्रमाणे सुधीरने अन् सीताने सर्व रीतिभाती पाळत राजनच्या घरी रेश्माची पाठवणी केली. आमच्या मुलीला सुखात ठेवाल असे आश्वासन राजनकडून घेतले.

रेश्मा सासरी गेल्यामुळे घर कसं रिकामं रिकामं वाटत होतं. सीताला तिची कमतरता जाणवत होती पण सुधीर आपल्या आईची समजूत काढायचा. सुजय बारावीच्या पुढील शिक्षणासाठी शहरात गेलेला, रेश्मा लग्न करून सासरी गेली त्यामुळे आता घरात फक्त सीता अन् सुधीर दोघेच राहिले. सुरुवातीचे काही दिवस त्यांना रेश्मावाचून करामत नव्हते पण आता सवय करून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू ते दोघेही आपापल्या कामात व्यस्त होऊ लागले. अंगावर कर्जचा बोजा होता तो फेडेने गरजेचे होते. —----------

क्रमशः

सुधीर आणि सीता कर्ज फेडू शकतील का? सुजय काय करेल? ते पाहूया पुढील भागात.

—----
©®. सौ. वनिता गणेश शिंदे