Login

माफी मागणार नाही !  भाग १

खोटा आळ घेतल्यावर माफी मागायला प्रियाने नकार दिला.


माफी मागणार नाही !  भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर


" तू माझ्या आई - वडिलांची माफी मागणार आहेस की नाही ? " मयूर रागाने ओरडत प्रियाला विचारत होता.

" अजिबात नाही. जी चूक, जो गुन्हा मी केलाच नाही त्यासाठी मी माफी मागणार नाही. " कधी काही न बोलता घर - दार दोन्ही ठिकाणी राबणारी प्रिया आज ठामपणे म्हणाली.

" मग या घरातून चालत व्हायचं. निघ लगेच. " मयूर रागाने म्हणाला.

" ठीक आहे जाते. एवढं करून या घरात मला किंमत नसेल तर एकत्र राहून तरी काय उपयोग आहे. मला वाटलं आज ना उद्या समजून घेतील. पण समजून घेणं तर दूरच, उलट मलाच चुकीचं ठरवताय ? तुमच्या आई - वडिलांची मी चूक नसताना माफी मागायची आणि त्यांनी माझ्या आई - वडिलांचा उद्धार करायचा ? नाहीच जमणार. खूप प्रयत्न केला मी जुळवून घ्यायचा पण....जाते मी आणि या पुढे परत या घरात येणार नाही म्हणजे नाही. " प्रिया रागाने सर्व बोलून आपल्या रूम मध्ये जाऊन आपल सामान बॅगेमध्ये भरू लागली.

" जाऊ दे. बघू किती दिवस हिचे आई- वडील ठेवून घेतात ? " सपनाबाई फणकार्याने म्हणाल्या. मयूर अजूनही रागात होता. प्रिया आपली बॅग घेऊन बाहेर आली आणि बाहेर जाता जाता परत एकदा डोळे भरून घराकडे पाहिलं आणि तडक बाहेर पडली.

मयूर आणि प्रियाचा प्रेमाविवाह. प्रिया आणि मयुरच्या घरून खूप विरोध झाला पण दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे दोन्ही घरी लग्न मान्य करून घेतलं. प्रिया खूप स्वप्न आणि मयुरच प्रेम घेऊन या घरात आली. तिने सर्वांच मन जिंकण्याचा खूप प्रयत्न केला तरीही सपनाबाई आणि मनोजरावांनी प्रियाला त्रास देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

प्रिया सकाळी सर्व आवरून ऑफिसला निघाली की सपनाबाई " माझ्या भजनी मंडळ मधल्या बायका येत आहेत. त्यांच्यासाठी चहा- नाष्टा बनव. "

" मला ही भाजी नाही आवडत दुसरी बनव. "
"ऑफिसमधून लवकर येत जा आम्हांला भूक लागते. "एक ना अनेक गोष्टीचा त्रास आता प्रियाला सुरु झाला होता. ती मयूरला काही सांगायला गेली की तो म्हणायचा," एवढा विरोध करत होते दोघेही, आता त्यांनी आपल्या लग्नाला होकार दिला त्यामुळे तेवढं तर तू त्यांच्यासाठी करूच शकते. "
मनापासून सर्वांसाठी करण वेगळं आणि उपकार केले असं म्हणत त्रास देणं वेगळं. तरी ती सहन करत होती. आज ना उद्या ते मनापासून स्वीकारतील अशी आशा होती प्रियाला.

इकडे मात्र सपनाबाई आणि मनोजरावांनी मात्र मयुरचे कान भरायला सुरुवात केली.
" बघ किती उशीर करते घरी यायला, म्हणजे मी सर्व करून ठेवायचा आणि ती आयती येऊन ताटावर बसणार. यासाठीच माझ्या पसंतीची सून बघत होते पण नाही. "
" अजून तिला आपल्याकडच्या पद्धतीने जेवणं बनवता येत नाही. "
" गावी कोणाच्या पायासुद्धा नाही पडली. "

सारख्या सारख्या तक्रारी ऐकून आता मयूरला प्रिया चुकीची वाटत होती. आई - बाबांनी आपल मन दुःखावलं जाऊ नये म्हणून लग्नाला होकार दिला. आणि प्रिया त्याचं आई वडिलांना नीट बघत नाहीये. याच गोष्टीवरून त्यांच्यात खटके उडू लागले. मयूरला आई वडील बरोबर वाटू लागले.
आता मयूर अश्या मनस्थितीत होता जिथे आई वडील बोलतील तेच बरोबर. बाकी प्रियाच बोलणं सुद्धा ऐकून घ्यायचा नाही.

आज सुद्धा तेच झालं. संध्याकाळी प्रिया आली, तश्या सपनाबाई तिच्यावर बरसु लागल्या, " खरं सांग माझा हार चोरून तुझ्या माहेरच्यांना दिलास ना ? "

प्रिया हा आरोप ऐकून आवाक राहिली.
" काहीही काय बोलताय सासूबाई, आता तुमच्या समोर आले ना मी घरी ? " प्रिया चिडून बोलली. माहेर मध्ये घेतल्यामुळे आज प्रिया बिथरली होती. शब्दाला शब्द वाढत गेला. आणि हे सुरू असतानाच मयूर आला. त्याने फक्त प्रियाचा आवाज ऐकला आणि प्रियाला बोलू लागला, " प्रिया या आवाजात माझ्या आईशी बोलायचं नाही. "

" आवाज ? अरे तुझ्या आईला पाण्यातच बघते ती. माझा हार सकाळी टेबलवर ठेवला होता, प्रिया ऑफिसला गेली त्यानंतर दिसला नाही. त्याबद्दल तिला विचारलं तर भांडण सुरु केल तिने. " सपनाबाई डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या.

"तू माझ्या आई - वडिलांची माफी मागणार आहेस की नाही ? " मयूर प्रियाच काहीही न ऐकता प्रियाला माफी मागायला सांगत होता. पण प्रियाची सहनशीलता आता संपली होती ; म्हणून तिने माफी मागायला सरळ नकार दिला आणि आपल सामान घेऊन निघून गेली.

सपनाबाई आणि मनोजरावांना जे हवं होत ते झालंच होत. त्यामुळे ते आता निश्चित होते. मयूरणे पुन्हा प्रियाला फोन देखील केला नाही.

इकडे सपनाबाई आणि मनोजरावांनी आपल्या नात्यात श्रीमंत मुली शोधायला सुरुवात केली. या गोष्टीला दोन महिने झाले होते. मयूरला प्रियाची खूप आठवन यायची पण ती आपल्या आई वडिलांशी वाईट वागली हे आठवून तो पुन्हा चिडायचा.

एकदा मयूर तब्बेत बरी वाटत नसल्यामुळे लवकर घरी आला. घरी कोणाला त्रास होऊ नये म्हणून बेल न वाजवता आपल्याकडे असलेल्या किल्लीने दरवाजा उघडला. हॉल मध्ये सपनाबाई आणि मनोजराव जे बोलत होते ते ऐकून मयुरचे पाय जागीच थिजले.