Login

मागणी ( भाग -१)

A beautiful girl's story.

(काळजाच्या तुकड्याला आलेली गोड मागणी!)

मागणी (भाग -१)


लेखिका- स्वाती बालूरकर सखी



बळवंतरावांना स्वतच्या मुलीबद्दल फारच अभिमान होता ! तो अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर दिसायचा सुद्धा.


अंगणात तिला खेळताना पाहून त्यांना खूप आनंद होत होता.


दहा बारा मुलींच्या घोळक्यातही ती किती उठून दिसत होती.

त्या मुलांचं बागडणं , पकडा पकडी खेळणं , खोटं - खोटं रुसणं , टाळ्या वाजवणं हा सगळा खेळ पहात खुर्चीवर बळवंतराव बसलेले होते.


सगळ्या मुला-मुलींमध्ये गोरीपान तरतरीत नक्षत्रासारखी त्यांची मुलगी उठून दिसत होती.


इतक्यात त्यांच्या पत्नी भागीरथी अंगणात आल्या. "बसा हो थोडा वेळ. .!" बळवंतराव जोर टाकून म्हणाले.

"अहो बसायला वेळ कुठे ? वाती करायच्या आहेत, भाजी निसायाची आहे . दिवे लागणीची वेळ झालीय "


"एखादे काम कराना इथे बसून, काय हरकत आहे !"


"म्हणजे इथे बसून ?" त्यांना अवघडल्यासारखे झाले.

" करा ना कामे सावकाश , बसा आणि

बघा मुलगी किती छान खेळत आहे."


नवर्‍याचा प्रेमळ आग्रह पाहून भागीरथी बाई आत गेल्या आणि त्या आपलं काम घेऊन येऊन अंगणातल्या ओट्यावर बसल्या.

बळवंतराव हळूच म्हणाले " हाच दिवस पाहण्यासाठी तर किती वर्ष तरसलो आपण नाही , आणि आई तर नातवंडाची इच्छा मनात घेऊनच जग सोडून गेली."

त्यांनी थंड निश्वास सोडला.


हा विषय निघाला आणि भागीरथी बाईंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.


हे अगदी खरं होतं, लग्नानंतर 11 वर्षानंतर त्यांना हे कन्यारत्न प्राप्त झालं होतं.


पहिल्या दोन वेळा पाचव्या आणि सातव्या महिन्यातच निराशा पदरी आली होती.

तिसऱ्यांदा मुलगा किंवा मुलगी एक अपत्य सुखरूप होऊ दे म्हणून नवस केला पण दैव रुसलेलंच होतं जणु.

यावेळी मुलगा झाला पण तो जन्मल्यावर रडलाच नाही, म्हणजे मृतच जन्माला आला असं.

त्याचं दुःख पचवून पुन्हा तीन वर्षानंतर देवाने हे दान पदरी टाकलं होतं.

यावेळी ही मुलगी जन्मास आली आणि कुटुंबात एकच आनंद!


भागीरथी बाई दिसायला तशा रूपाने सर्वसाधारणच पण निमगोरा वर्ण आणि बळवंतराव मात्र नाकी डोळी नीटस परंतु सावळे.

परंतु जेव्हा त्यांना हे कन्यारत्न प्राप्त झालं तेव्हा मात्र सर्वांनी आश्चर्याने तोंडामध्ये बोटे घातली.

कारण त्यांची मुलगी अक्षरशः मैद्याचा गोळा म्हणावी इतकी गोरी आणि डोळे तर घारे नाही पण निळसर झाक असलेले, अतिशय सुंदर. . पाण्यात मासळ्या पोहाव्या तसे पाणीदार!


तिचे डोळे सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचे.


बळवंत रावांचा खरंच विश्वास बसला नाही त्या क्षणी वाटलं की त्यांची आई जणू पुन्हा त्यांच्या पोटी आली.

मुळात त्यांची आई कोकणस्थ आणि वडील देशस्थ होते. पूर्ण कुटुंबात आई एवढं देखणं कुणीच नव्हतं .

परंतु योग असा की बळवंतराव आणि त्यांचे भाऊ दोघेही रंगाने वडिलांवर गेले होते . त्यामुळे ते सावळेच होते .

एखादी मुलगी आईसारखे झाली असती तर किती छान असं त्यांच्या वडिलांना नेहमी वाटत राहायचं. पण दैवयोग.


बळवंतरावांचे लग्न झाल्यावर ४ वर्षातच क्षुल्लक आजाराने वडील गेले.

वडिलांनी सुना पाहिल्या पण नातवंडाचं तोंड पाहू शकले नाहीत.

आई समोर मोठ्या भावाला मुलगा झाला पण बळवंत रावांना नशिबाने निराश केलं होतं.

आणि आई गेल्यानंतर दोन वर्षातच हे कन्यारत्न जन्मास आले.

तर महत्वाचं असं की नाकी डोळी वडिलांसारखी असली तरीही तिच्यामध्ये बळवंत रावांच्या आईची म्हणजे तिच्या आजीची पूरेपूर झलक होती.


त्यांना तिचं नाव ठेवताना काय ठेवावं असा प्रश्न पडला होता.

कुठल्या तरी अप्सरेच्या नावावरती ठेवावं असं म्हणत होते सगळे परंतु रंभा , ऊर्वशी किंवा मेनका सगळ्या अप्सरा सौंदर्य वती असल्या तरी शापितच असतात . . !

त्यामुळे नको बुवा म्हणून कितीतरी दिवस पती पत्नी तिच्यासाठी नाव शोधत होते.


तिसऱ्या महिन्यात धूमधडाक्यात तिचं नाव ठेवलं, बारसं केलं आणि रमणी हे नाव त्यांच्या या कुटुंबात व कॉलनीत प्रसिद्ध झालं.


रमणी खरंच खूप सुंदर होती, तिला पाहणारा रमूनच जायचा.

अशी ही रमणी हळूहळू रांगायला लागली मग चालायला लागली.

बळवंतराव तिला इतकं जपायचे की तिच्या पायाला मातीही लागु नये असं त्यांना नेहमी वाटायचं.

थोडीशी कुठे पडली किंवा घसरली तरीही तिची कातडी लालबुंद होऊन जायची.


एरवी स्वभावाने कडक वाटणारे बळवंतराव रमणीच्या बाबतीत मात्र अगदी शरणागता सारखे राहायचे. तिचे खूप लाड करायचे.

पाहणारा प्रत्येक माणूस त्यांना म्हणायचा \"ही मुलगी ज्याच्या घरी जाईल त्याचं नशीब उजळेल.\"


\"तिच्या नशिबात कोण राजकुमार आहे कोणास ठाऊक ?\"

\"दिवा घेवून शोधलं तरीही तुमच्या रमणी सारखी पोर मिळायची नाही!\"

\" हुंडा देणं सोडा बळवंतराव, हुंडा देवून तुमच्या रमणीला करून घेतील हो लोक!\"


अशा या सततच्या मिळणार्‍या प्रतिक्रियांनी बळवंतरावांच्या मनातला एक कोपरा अहंकाराने भरलेला होता.


स्वतःच्या नशीबावर अहंकार आणि मुलीवर तर होताच.


"माझ्या मुलीसारखी रूपवती मुलगी पंचक्रोशीत नाही आणि आणि तिला मागणी घालण्यासाठी माझ्या दारी सुयोग्य व धनाढ्य तरुण मुलांची रांग लागेल!"

हेच स्वप्न मनाशी व उराशी बाळगून बळवंतराव तिला वाढवत होते.


मुलगा काय आणि मुलगी काय ?

त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होती. असलेले पैसे कुणावर खर्च करणार ?

त्यामुळे हीचं लग्न इतक्या थाटामाटाने करावं की लोकांनी वर्षानुवर्षे नाव घ्यावं किंवा या लग्नाचं उदाहरण द्यावं असं एक स्वप्न ते मनाशी बाळगून होते.

मी जावई असा निवडेल की तोच मला माझा मुलगा राहील . . मग त्यावेळी ही मुलगा, मुलगी किंवा संपत्तीचा वारिस वगैरे खंत मनात राहणार नाही असंही मनात पक्कं ठरवलेलं होतं.

आणि माझी मुलगी ज्या घरी जाईल तिथे लक्ष्मी पाणी भरेल, सगळे तिच्या मागे पुढे करतील ही खात्री देखील होती नशीबावर.

कारण रमणी जन्मल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच मजबूत झाली होती.

अशी ही रूपवती रमणी शाळेत जाऊ लागली तेव्हा बळवंतराव बेचैन व्हायला लागले.

तिला शाळेत सोडून परत यायचं हा विचार सहन व्हायचा नाही . . तिला शाळेत सोडून परत निघण्याची इच्छा त्यांना व्हायची नाही. पण तिला सोडल्यानंतर ती पूर्ण पणे दिसेनाशी झाल्यावर ते पुढे निघून जायचे.

तिला आणायला मात्र भागीरथीबाई जायच्या. त्यांना मुलीवर खूप माया होती. आईच ती. . माया असणारच पण असा अहंकार किंवा अतिरेक नव्हता.


अशा या लाडक्या मुलीला पहातच आज निवांत बसलेले होते बळवंतराव.

कितीतरी वेळ भागीरथी बाई आणि बळवंतराव रमणीच्या लहाणपणीच्या आठवणी काढीत बसले होते. तिचं रुसणं अन खेळणं . तिला थोडावेळही वडिल नाही दिसले की तिचं बेचैन होणं . . !

"एक सांगतो भागी तुम्हाला. . मला तर वाटतं की रमणीला नजरेसमोरून दूर करूच नय़े. . अशीच तिला समोर वावरताना पाहत रहावी. . !"

" काहीतरीच बोलता बाई तुम्ही. . सुरी सोन्याची झाली म्हणुन काय गळ्याला लावणार का तुम्ही?. . परक्याचं धन ते. . असं थोडीच ठेवता येतं. . अन लग्न न करता मुलगी घरात ठेवलं तर जग काय म्हणेल?"

" तुम्ही पण अगदी कुठल्या कुठे नेता विषय. . ! मी तिचं लग्न करायचं नाही असं कुठे म्हणालो. . आई आहात तर बापाच्याही थोड्या भावना समजून घ्या ना! मला असं वाटतय की तिला समोर वावरताना पहात रहावं. . म्हणजे. . तिच्यासाठी स्थळ असं शोधावं की ती सुखी राहिल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर राहिल."


" असं म्हणताय होय. . मी आपलं काहीतरीच. . !" त्या पदर तोंडावर झाकत खळखळून हसल्या.


"मी जशी काळजी घेतो ना तिची. . तशीच सासरच्या मंडळींनी घ्यायला हवी. . तिला थोडाही त्रास झालेला मला चालणार नाही." ते निक्षुन बोलले.

" बाई गं. . मी म्हणते हे अतीच झालं तुमचं. पोरीची जात आहे , दिल्या घरी सावरून अन सांभाळून घ्यावं लागणार तिला. संसार काय असा अधरच होतो की काय?" भागीरथी बाईंना आता मुलीपेक्षा जास्त नवर्‍याचीच काळजी वाटायला लागली होती.

यावर काय बोलावं ते सुचेचना  त्यांना!


क्रमशः 

©® स्वाती  बालूरकर देशपांडे,  सखी



0

🎭 Series Post

View all