Login

मागणी (भाग १० )अंतिम भाग

A father's wish for a marriage proposal for his beautiful daughter.


मागणी (भाग-१०) अंतिम
पूर्वसुत्र-


रमणीचं थर्ड ईयर सुरू झालं.
महीना -दोन महिने झाले असतील.
पुन्हा एक दिवस माधवराव दिघे घरी आले व तो स्थळाचा विषय निघाला.
आता तर बळवंतरावांकडे किंवा घरात कुठलंही कारण नव्हतं की दाखवण्याच्या कार्यक्रमाला विरोध व्हावा असं !
क्रमशः

कथा पुढे-


बळवंतरावांनी टिपण जुळतंय हे पाहिलं होतं व फोटोही त्यांना आवडला होता.
रमणीने जेव्हा फोटो पाहिला तेव्हा तिच्या नकळतही तिला वेगळाच चेहरा तिथे असलेला भास झाला होता, अन चेहर्‍यांवर हसू तरळलं होतं.
पण नेहमीच कल्पनाविलास प्रत्यक्षात उतरत नसतो, याचीही कल्पना होतीच.
सध्या बाबांच्या मनात जे आहे ते करणं भाग होतं.
मनात नसतानाही रमणी व भागीरथीबाई या कार्यक्रमासाठी तयार झाल्या कारण मागच्यावेळी या कार्यक्रमासाठीच तर घरात वादविवाद झाले होते. बळवंतरावांना पण रमणीला औपचारिक दाखवणं पसंत नव्हतं, पण योग असा होता.
"अगदी सहजच रहा बेटा तू , इतकी औपचारिकता नकोय. तुला हवं ते विचारू शकतेस, मुलाचे वडिल खूप आधुनिक विचारांचे आहेत. " माधवराव
मुद्दामच बळवंतरावांसमोर रमणीला म्हणाले.
दिवस व वेळ ठरली.
रमणी नावाप्रमाणेच अनुपम लावण्यवती होती. साधीशी सजली, नीटनेटकी वेणी
घातली तरी अप्रतिम दिसत होती. बळवंतराव तिला पाहून खुश झाले. गुलबक्षी रंगाच्या साडीत ती खूप उठून दिसत होती.
मुलाकडची मंडळी आली होती. मुलगा , आई-वडिल, व काका असे चौघेजण आले होते.
मुलगा फोटोत वाटला तसा राजबिंडा नव्हता तरीही व्यक्तिमत्त्व तर आकर्षक होतं.
रमणी जेव्हा सहजच येवून खुर्चीवर बसली, तो तर तिला थक्क होवून पाहतच राहिला. पण तो तिच्यावर भाळला आहे हे न दर्शवता त्यांने आईला इशारा केला व त्यांनी औपचारिक प्रश्न विचारले.
नाव -रमणी
शिक्षण टी.पी. कॉलेजात बी.कॉम शेवटच्या वर्षाला शिकते.
त्याने मनात पक्कं होकार देण्याचं ठरवलं.
रमणीला मनातून वाटत होतं की मुलालाही असेच प्रश्न विचारावेत किंवा त्याच्याशी बोलावं नाव आणि काय करता वगैरे .पण तिने हे सर्व टाळलं कारण हे दाखवणं प्रकरण तिला आवडलं नव्हतं .
ती गृहकार्यात किती पारंगत व दक्ष आहे हे त्यांनी आईकडून ऐकलं आणि निघताना मुलाचे वडील मि. देसाई म्हणाले "आमची एक मुलगी नागपूरला असते ती आणि मुलाची आत्या या दोघी एकदा पाहतील आणि मग आम्ही निर्णय कळवू."
दिघे मधेच म्हणाले "अहो होकारच म्हणाना, विचारायचं काय त्यात?तुमची बहीण किवा मुलगी काय रमणीला नकार थोडीच देणार!"
" तुमचा समज अगदी योग्य आहे पण एकदा त्यांना दाखवलेलं बरं!" मुलाचे वडील बोलले.
बळवंतरावांना आभाळ ठेंगणं झालं होतं.
पण शेवटी मनाच्या कोपऱ्यात हुरहुर वाटलीच मागणी न येता औपचारिक दाखवून लग्न ठरतंय याचं.
लग्न पक्कं झाल्याप्रमाणेच ते मनात समजत होते. यावेळी मुद्दामच राधा व मामीला बोलावलं नव्हतं .
दुसऱ्या दिवशी दुपारी वेंकटमामा अचानक आले होते. कोर्टाच्या कागदपत्रांसाठी. आल्या आल्या बातमी दिली की उपेंद्र नावाच्या ज्या मुलाने दाखवण्याच्या कार्यक्रमात मागे वेळ मागितला होता त्यांनीच राधाला घरी येवून मागणी घातली.
बळवंतरावांना आनंद झाला पण मनात गोष्ट सलत होती.
ते सांगू लागले , राधा थर्ड ईयरला कॉलेजकडून एक वादविवाद स्पर्धा जिंकली होती व त्याच्या बक्षिस समारंभासाठी मुलाचे वडिल आलेले होते . ते कलेक्टरांचे पी. ए. होते. तिचं धाडस व बोलणं पाहून त्यांनी घरी बोलणी केली व निर्णय कळवला. पुढे शिकवून वकीली करू देणार हे ही ठरलं होतं. सगळे आनंदले.
बळवंतरावांनी व भागीरथी बाईंनी कालच्या प्रसंगाबद्दल काहीच सांगितलं नाही.
नेमके संध्याकाळी चहाच्या वेळी माधवराव दिघे आले , थोडेसे उदासवाणे वाटले.
"बळवंत. . "
"बोल माधवा काय म्हणाली मंडळी? बरं झालं वेंकटराव आलेलेच आहेत. मूहुर्त कधीचा धरा म्हणताय?"

"कशाचा मुहुर्त? " वेंकटराव व दिघे एकदाच बोलले.
"काय झालं माधव, रमणीच्या साखरपुड्याचा म्हणतोय ? तू जाणार होतास ना तिकडे ?"
"हो मध्यस्ती म्हणून गेलो पण कसं सांगू तुला . . त्यांनी कळवलय की. . "
"पसंतीच ना आणखी काय?" बळवंत फुशारकीने बोलले.
" नाही ! त्यांनी नकार कळवला आहे."
" नकार कळवला? अरे गंमत करू नकोस, खरं सांग!"
" गंमत नाही बळवंत त्यांनी नापसंती कळवलीय. कर्तव्य नाही म्हणाले." माधवराव उदासीने.
बळवंतरावांचा चेहरा खाडकन पडला, डोळे विस्फारले , त्यांनी वरचा ओठ दाताने चावला . . त्यांचा उजवा हात डाव्या बाजूला छातीकडे गेला व एक कळ मेंदूपर्यंत आणि उभे राहिलेले बळवंतराव कोसळले.

भागीरथी बाई धावतच बाहेर आल्या.
"अहो , काय झालं ?"
प्रचंड घाम पाजळू लागला. दोघांनी मिळून त्यांना बेडरूम पर्यंत नेलं. रमणी ने पटकन कॉलनीत दोघा-तिघांना आवाज दिला. चित्राच्या भावाला डॉक्टरांकडे पाठवलं.
८०-९० च्या दशकात वैद्यकीय चिकित्सा तितकी अद्यावत नव्हती. सगळ्याच दवाखान्यात सोयी सुविधा नव्हत्या. पण फॅमिली डॉक्टर घरी यायचे.
रमणी च्या डोळ्यात अश्रु भरले होते, आई शेजारी बसून होत्या.
त्यानंतर डॉक्टर घरी आले.
धावपळ झाली, औषधं इंजेक्शन घरच्याघरी दिले गेले.
आराम करण्यासाठी सांगितले.
त्यानंतर ते बराच वेळ शुद्धीवर आले नाहीत.
रमणी या सर्वांसाठी स्वतःला दोषी मानत होती, कारण नसताना ती स्वतःला दोषी मानत होती.
इकडे माधवरावांना स्वतःबद्दल अपराधी भावना आली.
डॉक्टरांनी सांगितलं, "सध्या तरी जिवावरचा धोका टाळला तरी ही एक दोन दिवस ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावे लागेल. त्यांना दवाखान्यात हलवणे या क्षणी मला ठीक वाटत नाही. मी माझ्या एका असिस्टंट डॉक्टरला घरी पाठवतो, हवं तर मी दोन वेळा विजीट करून जातो. पाहुयात औषध गोळ्यांनी काय फरक पडतो."
संध्याकाळी केव्हातरी ते शुद्धीत आले पण ते बोलण्याच्या परिस्थिती मध्ये नव्हते.
सारखी रमणे रमणी रमणी माधवा आवाज देत होते.
"तुम्ही आराम करा, तुम्ही बरे व्हाल काही झालं नाही !" ती सारखे वडिलांचे हात हातात घेत होती.
औषधाच्या प्रभावामुळे शांतपणे गुंगीत होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं "त्यांची परिस्थिती तशी नाजूकच आहे त्यामुळे या क्षणी त्यांना धक्का लागेल असं कुठलंही वर्तन करू नका. बोलू नका. अजून बीपी कमी झाला नाही, अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप काळजी घ्या."

व्यंकटरावांनी माणूस पाठवल्यामुळे मामी आणि राधा पण रात्री पर्यंत पोहोचले होते.
रमणीला थोडासा धीर आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बळवंतराव थोडेसे बरे वाटत होते. टेकन लावून थोडंसं बसवलं होतं.
चहापाणी झालं आणि दारावरची बेल वाजली. रमणी घाईघाईने दार उघडण्यासाठी गेली. समोर पाहते तर अंगणामध्ये गेट जवळ तोच मुलगा उभा जो तिला पाहण्यासाठी आला होता.
" गुड मॉर्निंग मिस रमणी मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं."
"मि. सतीश देसाई , प्लीज तुम्ही इथून जा, माझ्या वडिलांचा जीव लटकावून तुमचं मन भरलं नाही की काय ? नकार कळवला आहे ना तुम्ही, तो कळला आहे!"
" हे पहा रमणी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ,माझी एक चूक झाली ती सुधारण्यासाठी मी आलोय!"
" याचा अर्थ काय समजायचा ?" रमणी चढलेल्या सुरात बोलली. तिचा गोरा चेहरा रागाने लाल झाला होता व डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता.
" मला नकार दिला याचा मला राग नाही पण तुम्हाला कल्पना तरी आहे का, कालची रात्र आम्ही सर्वांनी कशी काढलीय, माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. . ."
" अहो पण ऐका तर. . "
" तुमच्या एका निरोपा मुळे, कळालं ना!"
" दिघे काकांकडून हे कळालं म्हणूनच इकडे आलोय मी, याला सफाई समजा किंवा खुलासा समजा. तुम्हाला नकार कळवण्याचे कारण मला तुम्हाला सांगायचं आहे."
"मला ते आवश्यक वाटत नाही, तुम्ही जा!"
दारात उभ्या असलेल्या राधाने रमणीला शांत हो असा इशारा केला व त्या मुलालाही बोला असं खुणावलं.
" ऐकुन तरी घ्या. तुम्हाला पाहिल्यानंतर घरी परत आलो तेव्हा माझा एक मित्र भेटायला आला होता . .
"ते सोडा पण माझ्या बाबांना काही झालं तर तुम्ही जिम्मेदार असाल, अप्रत्यक्षपणे, त्यांना काही झालं तर . . . लक्षात येतय का तुमच्या ?" आणि ती रडायला लागली.
" प्लीज माझं ऐकून घ्या. मी काहीच केलं नाही. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व .त्या प्रसंगाबद्दल मी ते काय बोलू फ्रँकली स्पिकिंग मला तुम्ही खूप आवडलात पण जो मित्र मला भेटायला आला होता, त्याला तुमचं नाव सांगताच त्याने चेहरा खूप विचित्र केला आणि मला काय काय ,अन काही बाही सांगितलं त्यामुलीबद्दल. बीकॉम फायनल इयर टी.पी.कॉलेज . मिस रमणी किती . . म्हणजे चारित्र्या बद्दल पण व गुंडपणा वगैरे. .म्हणजे.
" तुमच्या त्या मित्राचे नाव कळेल का?"
" तो नाही का कॉलेजचा जुना जी. एस. अतुल."
"ओके अतुल कारंजकर !" आणि तिने राधाकडे पाहिलं. "म्हणूनच तर हे सगळं झालं"
" तुमच्या बाबतीत मी अशी कल्पनाही करू शकत नव्हतो. त्या विचित्र मनस्थितीत होतो मी , मग दिघे काकांजवळ बाबांनी नकार कळवला. पण आज दुपारी आणखी एक मित्र घरी आला होता. मी खूप उदास होतो. तुमचा विषय निघाला तेव्हा तो बोलला की अरे फायनल इयरला आणखी एक मिस रमणी आहे . एक रमणी सरदेशमुख व एक मिस रमाणी म्हणजे महेक रमाणी जी मागच्या वर्षीची सौंदर्य स्पर्धा विजेती. ती मुलगी खूप बिनधास्त व फ्री राहते आणि तिच्याबद्दल लोक काहीही बोलतात. मिस रमणी आहे ना सरदेशमुख पूर्ण कॉलेजातली सगळ्यात सुंदर आणि सालस मुलगी आहे. तिचं स्थळ तुला आला असेल तर डोळे बंद करून हो म्हण! तिच्या सौंदर्यावर भाळलेले कितीतरी लोक आमच्या कॉलेजमध्ये लांबून तिला पाहत असतात. तू नशीबवान आहेस लेका लगेच जाऊन कळव. माझा दुसरा मित्र तर तुम्हाला सरस्वतीचे रूपच मानतो."
" राहू देत. असू द्या आता. . तुम्हाला कळंलं ना !"
"मला एकच सांगायचं आहे, टी.पी. कॉलेजला, बीकॉम फायनल इयर ला एक रमणी व एक महक रमाणी आहे पण दोघींचही चरित्र पूर्णतः विरोधी आहे.
त्यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी खरच स्वतःला माफ करणार नाही पण तुम्ही मला माफ करा. तुमचे बाबा कसे आहेत? त्यांची प्रकृती तर मला पाहू द्या!"
" नाही नाही डॉक्टरांनी त्यांना कुठलाच धक्का देऊ नका असे सांगितले आहे, त्यामुळे मी तुम्हाला आत पाठवू शकत नाही .तुम्हाला नुसतं पाहिलं तरी हे त्यांचा रक्तदाब वाढेल. प्लिज तुम्ही निघा!"
तो मुलगा परतच होता तेव्हा गेट वरती एक पंचावन -साठीचे गृहस्थ घराकडे पहात होते.
ड्रेसिंग पॉश, चेहऱ्यावर हसू आणि एक प्रकारचा तेज.
ते आत आले.
केस पांढरे झालेले म्हणून नाही तर त्यांच्या वयाचा अंदाज कोणी लावू शकलं नसतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप रमणीवर पडली.
रमणीकडे पाहून स्मित दिलं व दारातल्या राधाकडे पाहून आपुलकीने प्रश्न विचारला," बेटा बळवंतराव इथेच राहतात ना!"
"पण आपलं काय काम होतं?" राधाने विचारलं.
" काम तर त्यांच्याशी होतं!" एवढं बोलून ते सौम्य आणि मिश्कील हसले.
"ते ठीक आहे काका पण ते अस्वस्थ आहेत. त्यांची तब्येत ठीक नाहीये आपण माझ्याकडे सांगा." रमणी आदराने बोलली.
" माझ्याशी न बोलण्या इतका आजारी आहे का तो ? पण त्याला कसं कळणार मी आलोय ते?"
इतक्यात भागीरथीबाई बाहेर आल्या, आणि त्या आलेल्यांना म्हणाल्या," तुम्ही शशिकांत भाऊजी का? किती वर्षानंतरभेट झालीय?"
" काय झाले बळवंतला? मला पण भेटणार नाही का?"
त्यांनी वरवर थोडंसं सांगून त्यांच्या तब्येतीचा अंदाज बघून तुम्हाला भेटवते, आत या असं सांगितलं.
आत आले ,बसले. पाणी घेतलं . मग रमणीला म्हणाले," बेटा मी श्रीकांत वैद्य, बळवंतचा जुना मित्र .तू चार-पाच वर्षांची असशील तेव्हा आमच्या घरी आली होतीस बाबांसोबत.
अगं तुझा आणि शैलेशचा एक फोटो सुद्धा आहे आमच्या अल्बम मध्ये."
रमणीला खरंच आठवेना. लहान असताना वडिलांसोबत खूप ठिकाणी फिरणं व्हायचं त्यामुळे नेमके कोण हे अजूनही आठवले नव्हते.
शैलेश नाव ऐकताच गालावर लाली आली, ती राधानं हेरली.
चहापाणी केलं आणि आईने विचारलं "शैलेश काय करतोय सध्या?"
" म्हणजे तुम्हाला माहित नाही? रमणी तू ही सांगितलं नाहीस घरी?"
" कशाबद्दल काका ?"
"शैलेश तुला अकाऊंटंसी शिकवतो ?"
"कायऽ?" आता धक्का झटका खाण्याची वेळ रमणीची होती.
" म्हणजे शैलेश वैद्य सर ?"
"हो तुमचे शैलेश वैद्य सर म्हणजे माझा मोठा मुलगा. दोन वर्षांपूर्वी तुमच्या कॉलेजला लेक्चरर म्हणून लागलाय. त्याच्याकडूनच तुझी स्तुती ऐकून मी बळवंतला भेटायला आलो. मला कल्पनाच नव्हती त्यामुळे. . .
"लहानपणी पाहिलंय मी , अग बाई हो का?" भागीरथी बाई खूपच आश्चर्यात.
व्यंकट मामा बाहेरच्या खोलीत आला आणि म्हणाला "रमणी आणि ताई त्यांना भाऊजी बोलवत आहेत."
"आता कसं वाटत आहे त्यांना ?"
"आता बरं वाटत आहे ,डॉक्टर येऊन गेले त्यांनी सांगितलं तब्येत आता आऊट ऑफ डेंजर आहे . "
शशिकांत वैद्य बरेच वेळचे अवघडून वाट पाहत बसलेले होते.
डॉक्टर परत गेल्यानंतर चेहर्‍यावरचा आनंद पाहून ते म्हणाले "आता तरी मी भेटू शकतो की नाही ?"
"या ना आत. अहो! पहा कोण आलंय?" मायलेकींनी प्रेमाने हळूच त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला.
माधवराव व व्यंकटराव तिथेच होते.
थोडसं बरं वाटत होतं.
शशिकांत वैद्य रूम मध्ये आले आणि बाबांचा चेहरा आनंदाने खुलला.
" काय रे शशिकांत ही पद्धत झाली का? विसरलास काय?"
" अरे विसरलास तर तूच ,मी तर उलट तुला भेटण्यासाठी वेळ काढून आलोय."
" माझ्या तब्येतीबद्दल तुला एक कळलं की काय?"
" अरे तुझी तब्येत ठीक करण्यासाठी आलोय एक बातमी सांगितली तर जागेवर उड्या मारशील." सगळे हसले.
इतक्यात रमणी म्हणाली," काका एक सांगायचं होतं. तुम्ही आता काहीच बोलू नका, फक्त ऐका."
" बोल बेटा!"
ती म्हणाली, "मला काही महत्वाचं बोलायचं आहे, पटत असेल तर घ्या नाही तर तुम्ही जो म्हणाल तो निर्णय मला मान्य आहे. पण बोलायचंच आहे. मी लहानपणापासून पाहत आहे मला मागणी यावी ही इच्छा, बाबा मुलाने सुंदर मुलीला मागणी घालावी , मुलगी सुंदर नसेल तर नाही.
म्हणजे मुलगी दिसायला साधारण असो की सुंदर पण तिला स्वत चं मत नाही. ती कुणाला तरी आवडली त्यातच तिने स्वतःची धन्यता मानायची.
आता शिक्षण झाल्यावर मला एक कळत आहे , लग्न हे केवळ दिसण्यावर टिकत नाहीत. ती माणसाचा स्वभाव, त्यांची वागणूक, त्यांचा एकमेकांशी व्यवहार, आदर व प्रेम यावरती टिकतात. त्यामुळे कुणीतरी मागणी घातली म्हणून हुरळून जाऊ नये अन कुणी तरी नापसंती दिली म्हणून इतकं लगेच बाबांसारखं नाराज होऊन जीवावर बेतेल इतका त्रास नाही करून घ्यायचा.. . !" व्यंकट मामाने अक्षरशः टाळ्या वाजवल्या.
" अगदी बरोबर बोलतेस रमणी हेच तर मी म्हणतोय, थोडासं सुधारणावादी व्हायला हवं ,या जुन्या गोष्टी किती दिवस चालणार?"

" आई ,बाबा, मामा , मामी व काका मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. शैलेश वैद्य जे आमच्या कॉलेजात अकाउंटन्सी शिकवतात ते जर शशिकांत काकांचे मुलगा असतील आणि त्यांचा विवाह झालेला नसेल तर मी रमणी बळवंतराव सरदेशमुख त्यांना लग्नाची मागणी घालते!" तिचा अविर्भाव पाहून सगळेच धक्क्यात!
"काय? अगं हे काय ?" भागीरथीबाई पटकन बोलल्या.
" आई सर खूप चांगले आहेत स्वभावाने आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी तेच याेग्य जीवनसाथी आहेत. शिकवताना समजावून सांगणं, त्यांचं धैर्य देणं ,मला खूप आवडतं. या सगळ्या गोष्टी मी घरी शेअर करु शकले नाही. बाबांची मागणीची अट होती आणि सर आवडतात हे सांगणं शक्य झालं नसतं ."ती थांबली.
आता मात्र शशिकांत वैद्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
त्यांनी रमणीला जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवला.
" बळवंत कसलं रत्न कन्यारत्न जन्मलय रे तुझ्या घरी ! वहिनी तुम्ही धन्य आहात. तुझी रमणी. . खरच!"
बळवंतरावांची छाती अभिमानाने फुलली. "माझी रमणी खरच हिरा आहे रे हिरा! तू कशासाठी आला होतास ? इतक्या वर्षांनी?"
"अरे मी पण तर माझ्या शैलेश साठी रमणीला मागणी घालण्यासाठी आलोय. पण हिने जुनी पद्धत मोडून काढली व मुलगीही मागणी घालू शकते हे दाखवून दिलं.
म्हणजे मागच्या आठवड्यात शैलेश घरी आला होता तेव्हा त्याने तिचा कॉलेजच्या एका कार्यक्रमातला फोटो मला दाखवला. नाव व पत्ता असं सगळं सांगितलं. चौकशीअंती कळाले की ती तुझी मुलगी आहे. तुझा हा हिरा माझ्या घरी देशील कारे बळवंत ?"
इतकं सुयोग्य स्थळ त्यात रमणी ने घातलेली मागणी व शशिकांतची मागणी या सर्वांनी जणू बळवंतरावांचा आजार कुठल्या कुठे छू मंतर झाला.
" तुझ्यासारखं सासरा आणि शैलेश सारखा जावई मला मिळणार असेल तर असले कितीही धक्के पचविन रे! खरंच देवाच्या मनात काय आहे ते आपल्याला कळत नाही मी उगाचच वाट पाहत राहीलो. रमणी, आज मला अभिमान वाटतो की तुला शिकवून खूप चांगलं काम केलं आहे ."
" तेच तर बळवंत, शिक्षण केवळ डिग्री देत नाही तर चांगल्या वाईटाची परख करण्याची बुद्धी पण देतं !" वैद्य बोलले.
"हो रे , हे मी आता मान्य करतो !"
" अहो वहिनी काहीतरी गोडधोड करा दोन गोड बातम्या. . बघा तुमच्या मुलीला मागणी आलीय आणि तुमच्या मुलीची मागणी आम्ही मान्यही केलीय."
एक मोठा हशा झाला आणि भागीरथीबाई, पद्मा मामी, सगळ्या म्हणाले "आज चांगला बेत होऊनच जाऊ द्या!"
रमणी सगळ्यांच्या पाया पडली.
आता पुन्हा दारावरची बेल वाजली. रमणी बाबांचा हात हातात घेऊन बसली होती.
त्यामुळे ती राधाला म्हणाली " बघ राधी कोण आलंय ?"
राधाने दार उघडलं. राज बिंडा तरुण मुलगा दारात उभा ," रमणी बळवंत सरदेशमुख येथेच राहतात ना ?"
ती म्हणाली "आपण कोण?"
" मी शैलेश वैद्य , बळवंत काकांना भेटण्यासाठी आलोय."
रमणी आतून ओरडली," कोण आहे गं राधे ?"
आणि राधा मिश्किलीनं म्हणाली " तुमचा मर्कंटाईल लॉ आणि अकाऊंटन्सी दारात उभी आहे, आत बोलवायचं का ?"
" बोलवायचं ना ! " बळवंतराव म्हणाले. यावर आत येणारा शैलेश आणि खोलित असलेली रमणी दोघंही लाजून चूर झाले.


इति शुभं भवतु!
समाप्त


लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २९.०४ .२०२२

0

🎭 Series Post

View all