कथा- मागणी ( भाग -२)
पूर्वसुत्र-
" बाई गं. . मी म्हणते हे अतीच झालं तुमचं. पोरीची जात आहे , दिल्या घरी सावरून अन सांभाळून घ्यावं लागणार तिला. संसार काय असा अधरच होतो की काय?" भागीरथी बाईंना आता मुलीपेक्षा जास्त नवर्याचीच काळजी वाटायला लागली होती.
यावर काय बोलावं असं सुचेचना त्यांना!
क्रमशः
मागणी ( भाग -२)
कथा पुढे -
" माझी लेक काय दुसर्या सामान्य मुलींसारखी वाटली की काय. . दुःख सोसायला?"
" अहो पण मी दुःख म्हणालेच नाही . . मी कष्ट म्हणालेय. .. कष्ट , मेहनत कशात नाही सांगा बरं. . उद्याला शिकेल , कॉलेजात जाईल परीक्षा देईल तर ते काय बिना कष्टाचं थोडीच होतं? स्वयंपाक पाणी. . एक असतं का ?"
" काहीही बोलू नका , एक तर तिला खूप जास्त शिकवायचं नाहिय मला कारण ती बाहेर अशी कॉलेजात जाईल तर . . .नाही नाही नकोच ते! पण चाणाक्ष आहे पोर. . थोडं शिकू देत. . दहावी खूप झाली. तेवढं शिक्षण तर हवंच. . लग्नाची घाई तर आपल्याकडून नाहीच करणार. ."
" मग एक करा. . आता पासून . . पाहून, सांगून ठेवा जावयासाठी. . आता तर चौथीची परीक्षा दिलीय तिने. . . . मग घाई होणार नाही. . आणि मग वेळेत चांगला जावई मिळेल . . नाही ?"
"अ्ऽ हो. . सांगून ठेवा काय म्हणताय ? आज बोललात पुन्हा हे असं बोलू नकात. मला म्हणताय. . पोरीचा बाप अन मुलांच्या वडिलांना विचारा वगैरे. . ते . काय?""
" असं काय बोलले हो मी ? अशी रीतच असते. आपली लेक लाडकी असली तरीही पोरीचे आई- बाप म्हणून सगळी तयारी ठेवावीच लागेल आपल्याला. जग रहाटीच आहे ती!" भागीरथी बाईंना कळेचना की नवर्याच्या मनात नेमकं काय आहे.
" तुम्हाला सांगतो भागी , मी कुणाच्या दारात जाणार नाही. रमणीच्या लग्नासाठी मुलांचे आई- वडिल खेट्या घालतील आपल्या घरी. . . मी नाही कुणाला सांगणार, बोलणार. .पहालच तुम्ही !"
"पण तरीही . . आपली पोर म्हणून तरी थोडा. ." त्यांना काळजीच वाटली.
"अहो आताच तर चकमता हिरा आहे माझी लेक. मोठी होईल, वयात येईल तर काय पहायचं. .! तेव्हा पाहीनच मी, हेच बोलाल का नाही हे सगळं? की वेगळं काही " ते टाळी देवून मोठ्यांदा हसले.
त्यांचं हे वाटणं खोटं नव्हतंच.
रमणी खरच सगळ्या बाबतीत हुशार होतीच.
आणि मुलगी कितीही सुंदर किंवा हुशार असली तरीही तिला घरकाम आलंच पाहिजे या स्वभावामुळे भागीरथी बाई कधीच तिचे आगावू लाड करायच्या नाहीत.
या सगळ्याच्या विचारात एक गोष्ट विपरीतच होती की या रूपगर्वितेला स्वतःच्या रूपाचं काही म्हणजे काहीच मोठेपण नव्हतं. तिला त्यात तिचं काही मोठेपण आहे असं वाटायचंच नाही.
याउलट तिला वडिलांच्या \"त्या\" अभिमानाची व मोठेपणाची भीती वाटायची. पण त्यांच्यासमोर तिचं काहीच चालायचं नाही.
सगळ्यात सुरेख गोष्ट ही होती की समजूतदार पणामुळे ती आईला सतत मदत करायची आणि हळू हळू काम शिकल्याने घरातल्या सगळ्या कामात तरबेज झाली होती.
रूपवती असूनही ती नम्रता व कामात तरबेज असणं या सगळ्या गोष्टींमुळे बळवंतराव सरदेशमुख यांच्या मनात अहंकाराची एक- एक झालर वाढत गेली.
*********
एकदा रमणीचे वेंकटमामा म्हणजे बळवंतरावांचे मेहुणे काहीतरी कामानिमित्त घरी आले होते सपत्निक.
रमणी स्वयंपाकघरात कप बशा विसळत होती.
पद्मामामी रमणीला निरखून पहात म्हणाली, "तुम्ही काहीही म्हणा भागीताई पण तुम्ही खूप नशीबवान आहात. देवाने मूर्तिमंत सौंदर्य तुमच्या घरात पाठवलंय. "
"असं काही नाही गं . . तुझी राधा पण किती नीटस आहे. दोघी बरोबरीच्याच ना काय सहा महिन्यांचा फरक असेल. "
" ताई, पहाना ही पोर जर देवाने माझ्याघरी आणि एक मुलगा तुमच्या घरी दिला असता तर आनंदाने मी तिला तुमची सून म्हणून दिली असती . . इतकं सुयोग्य स्थळ कुठे मिळालं असतं. .!"
पद्माच्या बोलण्याचं भागीरथीला आश्चर्य वाटलं. म्हणजे मुलगी सुस्वभावी असणं व तिने सासरी सुखी राहणं एवढंच महत्चाचं ना एका मुलीच्या आईसाठी.
मग ही काय . . आमच्या घरी सून द्यायच्या गोष्टी करते.
पद्माच्या बोलण्याचं भागीरथीला आश्चर्य वाटलं. म्हणजे मुलगी सुस्वभावी असणं व तिने सासरी सुखी राहणं एवढंच महत्चाचं ना एका मुलीच्या आईसाठी.
मग ही काय . . आमच्या घरी सून द्यायच्या गोष्टी करते.
"म्हणूनच देवाने तिला सरळ आमच्याच घरी पाठवलीय तिला. . तू इकडेच देणार होतीस ना शेवटी. . म्हणून . . हो की नाही पद्मा !" त्या मुक्त हसल्या.
मामीला राहून राहून आश्चर्य वाटायचं की ती स्वतः दिसायला इतकी नीटस असून तिची मुलगी राधा स्वभावाने गोड असली तरीही रूपाने साधारणच होती.
आणि दिसायला साधारण असणार्या नंनंदेची मुलगी इतकी अप्सरेगत कशी?
खरच हे तर दैवी कोडं आहे. . म्हणजे अपत्य कसं निपजावं हे आपण नाही ठरवू शकत.
राधा आणि रमणी एकत्र खेळायच्या तेव्हा पद्मामामी सारखी रमणीला पहात असायची.
किती गोड पोरगी जन्माला आलीय, त्यात पुन्हा ती एकुलती एक. . !
येणार्या जावयाचा तर मानच वेगळा असेल. आणि तो नशीबवान कोण असेल बुवा. . असं वाटून जायचं.
"मग काय वेंकटराव. . यावेळी किती दिवसाचा मुक्काम? रहा की निवांत. . नेहमीच घाई असते तुम्हाला. " बळवंतराव ओसरीत बसून मेहुण्याशी गप्पा टप्पा करत होते.
"रहायला काय भावजी पण . . तिकडे रजा नसते ना कोर्टात. . काहीतरी कामं अडकलेलेच असतात. इथे थोडं कोर्टाचं काम आहे. दोन दिवस राहणं पडेल म्हणून हिला व राधाला घेवूनच आलो होतो. "
" ते बरं केलंत पण वेळ काढला असता तर कुठेतरी देवदर्शनाला वगैरे जाऊन आलो असतो. "
बळवंतरावांनी सहज इच्छा व्यक्त केली.
बळवंतरावांनी सहज इच्छा व्यक्त केली.
" पुढच्या वेळी नक्की जाऊयात. यावेळी आग्रह करू नकात. . थांबू शकणार नाही." वेंकटराव विनंतीच करू लागले.
" बरं राहिलं. . पुढच्या वेळी मात्र नक्की!" बळवंतराव सहजच हसले.
"बरं भावजी , पुढं रमणीला काय शिकवायचं म्हणताय. . ? म्हणजे कॉलेज ?"
"अहो अजून लहान आहेत पोरी. . वेळ आहे की शिक्षणाला. . राधा काय आणि रमणी काय. . दहावी तर होऊ द्यात मग बघू!"
"तुम्हाला तशी चिंता नाही भावजी. . म्हणजे ना पसंतीची ना खर्चाची. मला तर स्थळं पाहून तिचं जमेपर्यंत काळजीच आहे. पाहता पाहता मोठ्या होतात पोरी. . मग लग्नाचा खर्च , हुंडा आणि शिक्षण. . सगळंच कुठं होणार. . आमच्याकडून. शिवाय मुलाचं शिक्षण आहेच. . " तो चिंतातूर स्वरात बोलला.
तिकडून पद्मा ऐकत होती.
" फार विचार करता बुवा तुम्ही. . आम्ही आहोत ना. . ते कशासाठी?. . मनात काही शंका ठेवू नका. दहावी तर होऊद्या पोरींची. . मग बघू!"
बळवंतराव पाठीवर थोपटून हे म्हणाले आणि वेंकट ला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
तिकडं भागीरथी बाईंचा ऊर भरून आला. नवर्याच्या उदारपणापोटी व भावाच्या मायेपोटी.
****************
बळवंतरावांचे मित्र मंडळ ही मोठेच होते.
एकदा असेच ५-६ जण बागेत गप्पा मारत बसले होते तेव्हा साखरे म्हणाले . . " काही म्हणा पण बळवंतरावांना आपल्या मुलीचा, रमणीचा फार अभिमान आहे बुवा. . इतका तर कुठल्या बापाला आपल्या मुलांचा पण नसतो !आम्ही तर रमणी च्या जन्मापासून पाहतो आहोतच!"
त्याचवेळेला रायकर म्हणाले "अहो त्यांची काय चूक आहे ? का नसावा अभिमान. . सांगा ना , का नसावा? गोरीपान, नाकी डोळी सुंदर, नक्षत्रा सारखी आहे रमणी! रूप सुंदर, घरकामात निपुण, चिपळूणच्या आजीचं तेज आहे चेहर्यांवर, सुगरण, आज्ञाधारक आणि प्रत्येक बाबतीत वाखाणण्याजोगी. . !"
" अहो पुरे पुरे. . तुम्ही तर त्यांच्यापेक्षा जास्त सांगताय. . . .! पटलं आम्हाला !"
साखरेंना ते रूचलं नाही पण टाळी देवून हसण्यावारी नेलं.
साखरेंना ते रूचलं नाही पण टाळी देवून हसण्यावारी नेलं.
मग विषय जनरल चर्चेकडे वळला जसे आजकालची लग्न, मग त्याचा खर्च, मुलीसाठी दिला जाणारा हुंडा, हुंडाबळी, मुलींची शिक्षणं, बाहेरचं वातावरण , आणि मग राजकारण. . मग निवडणुका.
सगळ्या विषयात भाग घेणारे बळवंतराव आज बरेच शांत होते.
यातल्या कुठल्या विषयावर मत मांडावं असं वाटलं.
मुलीच्या लग्नाविषयी ते काय बोलणार ?
कारण रमणी आता सातवीत आली होती. .!
आणि बाकीचे विषय त्यांना रूचणारे नव्हतेच!
किंवा त्याचा अनुभव ही नव्हता.
किंवा त्याचा अनुभव ही नव्हता.
त्यांच्या सौंदर्यवती मुलीमुळे, स्थळ शोधणे, हुंडा देणे किंवा लग्नाचा खर्च . . शिक्षण हे काहिच मुद्दे त्यांना बोलण्यासारखे नव्हते.
असे प्रसंग कुठे ना कुठे येत रहायचे. . कधी बळवंतराव मनसोक्त बोलायचे तर कधी गप्पच रहायचे.
बळवंतराव तसे निश्चिंतच होते.
रमणीची तशी चिंता त्यांना नव्हती. पण तरीही तिच्या काळजीनं कधी -कधी झोप यायची नाही.
प्रेमाचं दुसरं नाव काळजी असतं.
जास्त चांगल्या गोष्टींची माणसाला जास्त काळजी लागून राहते.
इतकी लावण्यवती , इतकी रेखीव आणि गुणी मुलगी कुठल्या घरात जाईल?
पुन्हा त्यांना वाटायचं की माझ्या राजकन्येगत असलेल्या रमणीला . . म्हणजे मला तिच्यासाठी स्थळ शोधाची गरज पडणार नाही.
छप्पन्न स्थळ नाहीतर एखादा राजकुमार येईल की चपला घासित. . घरापर्यंत !
अशा द्विधा मनस्थितीत बळवंतराव होते. सांगू शकायचे नाही व मनात ठेवू शकायचे नाहित .
दिवस कसे पाखरागत उडून जातात. .
२-३ वर्षे सर्रकन निघून गेली आणि रमणी आता दहावीला आली होती.
क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे, सखी
दिनांक २६.०३ .२०२२
