Login

मागणी ( भाग -३)

A Fathers wait for his daughers marriage proposal.
मागणी (भाग -)


घरात अभ्यासावर कुणीही भर न दिल्याने. .हळू हळू रमणीचा अभ्यासातला चाणाक्षपणा बोथट झाला. नियमित शाळेला जाणे हे मात्र ती करायची व दिलेला बेताचा अभ्यास रोज करायची. रोज शाळेत जाऊन सरासरी ५०%-६०% मार्क मिळवायची. त्याकाळी हे मार्कसुद्धा हुशार विद्यार्थ्यांचे मार्क गणले जायचे.

यात रमणी समाधानी , शिक्षक समाधानी व आईवडिलांना देखील फर्स्ट क्लासच्या जवळ म्हणजे चांगलेच मार्क झाले.

ती आता अभ्यासात मध्यमच होती तरी बळवंतरावांना काही विशेष नव्हतं त्यांचं. आता त्यांना पुढचे वेध लागले होते .

अभ्यासातली हुशारी काय कोळून प्यायची आहे का . . ?

मुलीला पुढे फक्त रूप आणि लाटणं कामी येणार आहे . . असं त्यांचं ठाम मत झालं होतं .

मात्र या दोन गोष्टीत दैव रमणीवर प्रसन्न आहे , त्यामुळे काळजी नाही.

आताही शांत , संयमी रमणीकडे पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं पण मनात एक कळ उठायची. . आता वयात आलीय तर कसं घर मिळेल ?

रमणी दहावीला आली. मोठी झाली तशी अजूनच तेज आलं चेहर्‍यांवर.

या तरूण वयात साध्या सावळ्या मुलीही आकर्षक दिसू लागतात मग रमणी तर मुळातच सुंदर बाला. . अजूनच रेखीव व तेजस्वी दिसायला लागली.

दहावीची परीक्षा झाली.
निकाल आला.

बेतानेच पण ६० % मार्कांवर रमणी दहावी झाली.

काहीही कष्ट न घेता किंवा शाळेचा ताण न देता- घेता ही रमणीला मिळालेले हे मार्क्स तर बळवंतरावांसाठी आणखी एक अभिमानाची झालरच जणु!

त्यावेळी ट्युशन किंवा क्लासेसचं फॅड आलं नव्हतं तेव्हा आपल्या स्वकष्टावर मिळालेले मार्क म्हणजे समाधानाची पावती!

रमणीला फार काही शिकवण्याची त्यांची इच्छा नव्हती. पण काही बाबतीत जगरहाटी पाळावी लागते.

फार जास्त शिकवायचं नाही असं ठरलं तरीही. . योग्य वरसंशोधन करेपर्यंत वाट पाहणं भाग होतं.

तिला पुष्कळ डॉक्टर , वकील करायचं नसलं तरीही दहावी झाल्यावर ते घरातही बसवू शकत नव्हते.

तिच्या सगळ्या मैत्रिणी कॉलेजात अॅडमिशन घेवून येवू लागल्या. भेटायला येवून विचारू लागल्या.

शिवाय बळवंतरावांचं मित्रमंडळ होतंच , पुढे काय करवताय मग तिला ? अशी चर्चा करायला.

मग त्यांनी तिला तिच्या मर्जीनेच कॉलेजात प्रवेश दिला.

२-४ दिवस माहिती घेण्यासाठी ती मैत्रिणीं सोबत कॉलेजात गेली.

पण तिला खूप दडपण आलं .

शाळेचे वातावरण वेगळं! कॉलेजचे वातावरण वेगळं!

शाळेत कसं शिस्त व छोटा ग्रुप होता , सुरक्षित आणि चांगलं वाटायचं. . पण तर कॉलेजात सगळेच मोकळं!
कुठे कुठे काय आहे व कुणी कुठेही चाललंय. . हे सगळं पाहून ती चक्रावून गेली.

हा असा इतका मोकळेपणा तिने कधी अनुभवलेला नव्हता.
तिच्या मैत्रिणी त्या मानाने खूप मोकळ्या वातावरणात मोठ्या झाल्या होत्या.

त्यांच्या भरवशावर तिने कॉलेजात ऍडमिशन घेतली आणि विषय सुद्धा निवडले .

त्यातल्या काही मुली थोड्या एज्युकॅटेड फॅमिली मधल्या होत्या, त्यांचे राहणीमान -त्यांचा मोकळेपणा, त्यांचे विचार तिला खूप वेगळे वाटायला लागले.
म्हणजे आता या शाळेतल्या मैत्रिणी सगळ्याच सोबत नव्हत्या. त्या वेगळ्या ठिकाणी गेल्या होत्या. काहीनी वेगळ्या शाखा निवडल्या होत्या.

अन काही कॉलनीतल्या मुली शिवाय काही मैत्रिणींच्या मैत्रिणी सुद्धा सोबत होत्या .

त्यांचे राहणीमान, त्यांचं बोलणं ,त्यांच्यातला आत्मविश्वास. . सगळं पाहून तिला खूप आश्चर्य वाटायला लागलं.

पण तिने इतक्या आत्मविश्वासाने कधीच स्वतःचे निर्णय घेतले नव्हते .

प्रत्येक वेळी आई आणि बाबा जे म्हणतील तसंच वागायचं , अशी आज्ञाधारी मुलगी होती ती.

आता आपल्याच मनाने कॉलेजला जायचं,हवे ते कपडे घालायचे. आपल्याच मनाने क्लासेस करायचे, केव्हा यायचं केव्हा जायचं. . . अशी मुभा सुद्धा असते हे तिला माहीतच नव्हतं.

तिचं असं मोठ्या कॉलेजला जाणं म्हणजे बळवंतराव यांच्या मनावर एक प्रकारचं दडपण होतं.
बळवंत रावांनी भागीरथी बाईं ना सूचना द्यायच्या आणि त्या सगळ्यां त्यांनी रमणी ला सांगायच्या.

" बघ बरं, तुझ्या बाबांना खूप काळजी आहे. उगीचच कोणाशी ,अनोळखी लोकांशी बोलू नको, जास्त मैत्री करू नकोस. . आपण भलं आपलं काम भलं! कॉलेजात गेलं की फारच स्वैर वागायला लागतात मुलं मुली! तू मात्र काळजी घे बरं का रमणे! आपल्या घरी हे सगळं चालणार नाही." एक ना अनेक अशा सूचना !

मग आठवड्याने पुन्हा - " तुझ्या मैत्रिणी असू देत गं , पण मुलांशी वगैरे कोणाशी बोलू नको बरं. . तुझ्या बाबांना ते आवडायचं नाही . . त्यामुळे जपूनच!" भागीरथी बाईंना ही सूचना देणं आवडायचं नाही पण नवर्‍याच्या धाकापोटी करावं लागायचं.

ह्या सगळ्या सूचनांमुळे रमणीला कॉलेजात जाण्याचच दडपण येऊ लागलं.

रमणी दबावातच कॉलेजात जाऊ लागली. नाका समोर चालत जाणे, फक्त कॉलेज एके कॉलेज आणि परत घरी यायचं याच पट्टीवर चालू लागली.

मग हळू हळू रमणी मैत्रिणीं सोबत कॉलेजात जाऊ लागली . कधी त्या पायी जायच्या तर कधी रिक्षाने.

पण एक होतं की ती कितीही मोठ्या घोळक्यामध्ये क्लासला चालली तरीही तिच्याकडे कुणाचाही पटकन लक्ष जायचं. . आणि ती त्या सगळ्यात उठून दिसायची.

कॉलेजात नवीन फ्रेशर मुलगी येते आणि सुंदर मुलींकडे बघायला काही लागत नाही त्यामुळे मुलेही लांबून तिला पाहत असायची.

पण ती इतकी साधी, सरळ होती की तिच्याजवळ जाऊन बोलण्याची हिंमत कुणी केली नाही. शिवाय ती कधीच एकटी फिरायची नाही.

3- 4 मैत्रिणीं तरी सोबतच नेहमी असायच्या.
तिच्यासमोर आपली लायकी नाही असा विचार करूनही मुले धजावायची नाहित.

हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की बाकीच्या मुली वेगवेगळ्या हेअर स्टाईल करतात, छान तयार होऊन येतात. पण ही आपली लांब केसांची एक सैल वेणी घालून यायची. . कधीतरी गजराही माळायची.

तिच्या मैत्रिणीं व अन्य कॉमर्सच्या व सायन्सच्या काही मुली पुष्कळदा फ्रॉक , टॉप- स्कर्ट ,मिडीज घालतात .
काही पंजाबी ड्रेस घालतात व बऱ्याच जणी मॅक्सी वगैरे घालायच्या.
रमणी चा आवडता ड्रेस म्हणजे परकर ओढणी, कधी मॅक्सी आणि लंबा टॉप तर कधीकधी ती छान साड्या नेसून कॉलेजला जायची.

तिच्या मराठीच्या मॅडम म्हणायच्या" रमणी, तुला पाहिलं की जुन्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातल्या कोणत्यातरी हिरोईन ला बघते की काय असं वाटतं. . किती साधेपणा सहजपणा आणि दैवी सौंदर्य . . नावाप्रमाणेच मराठी कवितेतील रमणी आहेस तू!"

" चला मॅडम तुमचं काहीतरीच!" तिला कुणी स्तुती केली तरीही दडपण यायला लागायचं.

प्रत्येक वेळी हेच डोक्यात असायचं की बाबांना हे आवडणार नाही , त्यांना काय वाटेल ?

तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार तिने तिच्या बाबांना दिलेला होता.




एक दिवस ती कॉलेजातून परतली.

नेहमीप्रमाणेच मोकळ्या अंगणात बळवंतरावांच्या मित्रांची बैठक चालली होती.

शेजारचे जोशी, कणेकर, खर्डेकर, देशपांडे आणि राणे बसलेले होते.

" तुम्ही काहीही म्हणा बळवंतराव तुमची रमणी आहे मोठी गुणी. . नाव चित्रासारखं आणि आहे पण नक्षत्रासारखीच !" जिशी काका तपकीर ओढीत म्हणाले.

" हो . . आम्ही हेच. . नेहमी हेच म्हणतो घरी. कालच आमच्या सौ म्हणत होत्या की रमणी पहा ना केवढी निखरलीय आता . . कॉलेजातून परतल्यावर रोजच दृष्ट काढावी लागत असेल तिच्या आईला." कणेकरांचा दुजोरा.

" अहो खरच! इतर मुलींसारखे नखरे नाहीत आणि उगाच वाचाळपणा नाही. भारीच सालस आहे तुमची रमणी !" राणे उगीचच घरात नजर घुसवीत बोलले.

या सगळ्या वाक्यांनी बळवंतरावांची छाती आधी वीतभर फुलली. . मग अभीमानाची लाली चढली होती आणि आता कृतकृत्य झाल्यागत वाटले.

" अहो देवाची कृपा. . दुसरं काय? आमच्या आईचंच प्रतिबिंब देवून रत्न टाकलाय झोळीत. . पुढे पाहूयात मग रत्नपारखी कसा मिळतो ते?"

पाण्यात खडा टाकावा तसा अंदाज घेण्यासाठी बळवंतराव बोलले.

" आहो रमणीची काळजीच सोडा हो तुम्ही! तुम्हाला त्रासच नाही रत्नपारखी शोधण्याचा . . आम्ही पाहू की ! पण मी म्हणतो रस्त्याने खालमानेने चालले तरीही लोक वळून वळून पाहतात तुमच्या रमणी ला . . मग?
एखादा राजकुमार नक्कीच स्वतः येईल घरापर्यंत!" खर्डेकर यांच्या बोलण्यावर बळवंतराव सात मजली हसले.

कारण हेच स्वप्न उराशी घेऊन त्यांनी रमणीला वाढवलं होतं.

मलाही माहित आहे , रमणी साठी केक मागण्या येतील पण या मागणीतून मला सर्वोत्तम वर निवडणं मोठं कठीण होईल . . . तूर्तास मी तिच्या कार्याचा विचार करीत नाही!
आता अकरावीला आहे ,बारावी झाल्यावर तिला 18 वर्षे पूर्ण होतील. मी वाट पाहतोय फक्त एका मागणीची! जो तिच्या साठी सुयोग्य वर असेल. . कसं काय बरोबर आहे ना? जोशी , राणे ?"

" बळवंतराव इतक्या वर्षापासूनची आपली मैत्री तुम्ही कधी गैर बोलतच नाहीत अहो काळ्या दगडावरची रेघ आहेत तुमचे बोल! तुमच्या लेकीसाठी राजकुमार तुमच्या दारात येणार आणि तुम्हाला शोधण्याची गरजच पडणार नाही. . !" जोशींनी देशपांडेना टाळी दिली व कणेकरांनी बळवंतरावांशी हात मिळवला.

" इस बात पर एक शरबत हो जाए!" कजर्डेकर हळूच बोलले.

"का नाही ! आपलंच घर आहे. तुम्ही खुश तर आम्ही खुश!. . " बळवंतरावांचे मुख कमल चमकत होतं. . अलौकिक आनंदाने!

" अहो ऐकलत का ? रमणी बेटा?"

" काय बाबा ?"

"हे बघ मस्त सरबत बनवून आण बर आमच्या सगळ्यांसाठी . . अगदी तुझ्यासारखं गोड ! तुझी काका मंडळी खुश होऊ देत!"

खाल मानेनेच ती लाजली.

पण वडिलांचा बोलण्यातला हा अहंकार तिला चुभत होता, याबद्दल काहीही बोलण्याचा हक्क ही तिला नव्हता.
ती स्वयंपाक घराकडे वळली कारण लहानपणापासून ऐकत होती की स्वयंपाक घरच भावी आयुष्यातलं तिचं कार्यक्षेत्र किंवा कुरूक्षेत्र होतं.

क्रमशः

©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक ०२.०४. २०२२
0

🎭 Series Post

View all