Login

मागणी (भाग-५)

A father's worry about the daughter's marriage proposal.

मागणी (भाग -)


लेखिका - ©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी



पूर्वसुत्र-


मग तिला आठवलं की बाबांनी सांगितलं होतं की येताना पायी नाही तर ऑटोरिक्षा ने ये म्हणून !
त्यामुळे ती लगबगीनं कॉलेज मधून निघाली.
गेटमधून बाहेर पडणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे.


कथा पुढे- (भाग -)

ती लगबगीनं कॉलेज येथून निघाली गेटमधून बाहेर पडणार इतक्या तिच्या लक्षात आलं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, तिने वळून पाहिलं तर तिच्याच कॉलेजातला एक मुलगा तिच्या मागे उभा होता.
तो तिलाच पहात होता.

" नमस्ते . . " तो म्हणाला

ती काहीच बोलली नाही व अॉटो साठी पाहू लागली.
" एक्सक्युज मी ,मिस रमणी!"
" तुम्हाला माझं नाव कसं कळालं?" ती काळजीतच पडली.
"ते महत्वाचं नाहिय ,पाच मिनट वेळ द्या ना"

" सॉरी पण आज मी घाईत आहे. . आणि नाही . . नाही बोलू शकत तुमच्याशी!"

"अहो मिस रमणी , लवकर का जाताय आज घरी ? "

"तुम्हाला काय त्याच्याशी. .?. तुम्ही प्लीज जा इथून!"
तिला काळजी होती की कोणी पाहिलं आणि घरी कळालं तर काय म्हणून..

" असं नाही बोलायचं मिस , तुमच्याकडे माझं काम होतं , म्हणूनच सकाळपासून तुम्हाला शोधतोय."

" हे पहा मिस्टर, तुमचं काम करायला मला वेळ नाही . . अन इंटरेस्ट पण नाही." ती टाळत होती व तो जायला तैयार नव्हता.
तिला समोर ऑटोरिक्षा पण दिसत नव्हती.
" मिस रमणी ऐकून तरी घ्या, असं झटकून देऊ नका . . "

" ठीक आहे , बोला . . लवकर"

" अॅक्चुअली मागच्यावर्षीपासून आपल्या कॉलेजमध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट सुरू झाली आहे तर ताराचंद पटेल कॉलेजात सौंदर्यस्पर्धेत निवडली जाणारी मुलगी "मिस जेपी कॉलेज!" या नावाने ब्युटीक्वीन म्हणून ओळखली जाईल. . "
" तर?"

"तर तुम्ही आमच्या ग्रुपकडून या स्पर्धेत भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे ."
" काऽय . . तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही . आणि मला या सगळ्यात खरंच इंट्रेस्ट नाहीय . माफ करा ."

" हे मिस, ऐकून तर घ्या. तुम्हाला काहीच करायचं नाहीय. देवाने इतकं सुंदर रूप दिलंय . परंतु तुमच्या या वागण्याने, त्या सौंदर्याला तो मान मिळणार नाही. तुमच्या सौंदर्याला दाद मिळावी एवढीच आमच्या ग्रुपची इच्छा!"
" हे, पहा मिस्टर. . .
"अतुल. . मिस्टर अतुल कारंजकर , तुमच्या कॉलेजचा जी. एस. !" तो मंद स्मित करत म्हणाला. त्याला वाटलं की त्याचं नाव किंवा पद ऐकून तिचा पावित्रा बदलेल.
"तुम्ही कुणीही असा पण वायफळ बोलण्यासाठी माझ्याकडे खरच वेळ नाही. मला उशीर होतोय ." ती लगबगीने निघाली.
" तुम्हाला आता वेळ नसेल तर. . आपण उद्या भेटूयात पण लक्षात ठेवा माझं नावातून अतुल आहे अतुल कारंजकर !"

रमणी लगबगीने पुढे निघाली आणि समोरून रिक्षा दिसली.

तिला बोलण्यात इंटरेस्ट नाही पाहून तो मुलगा तिथेच थांबला.

रमणीने ऑटो रिक्षाला बोलावलं आणि बसून निघून गेली.

घरी पोहोचली तोपर्यंतच ती त्या अतुलच्या म्हणण्याचा विचार करत होती. म्हणजे मी सगळ्यांशी एवढी तुटक वागते तरीही तो बोलायला कसा काय आला असेल?
या सगळ्यात मला पडायचं नाही हे ठरलेलंच आहे. . त्याला नाव कसं कळालं ? आणि त्याचा ग्रुप म्हणजे कोण ?
बाबांना कळालं तर माझ्याबद्दल किती काळजी करतील.
मला नाही पडायचं या सगळ्यात, असा विचार ठाम करत स्वतःला समजावलं.

घरी आली व फ्रेश होऊन आईला मदत करू लागली. घरातली तयारी जोरात चालली होती.
आईने ठेवणीतले विणकामाचे पडदे वगैरे काढून लावले होते.
बेडशीट व लोडची खोळ बदलण्याचं काम तिला सांगितलं होतं.
ते काम आटपलं व म्हणाली-
"का गं आई , काही कार्यक्रम आहे का ? काही बोलली नाहिस मला सकाळी?"
"सांगूयात असं म्हटलं पण रात्री निरोप आला नव्हता ,त्यामुळे नक्की नव्हतं. ."
"अगं पण आहे काय ? आणि राधा व मामी येणार होते ना ?"
" येणारेत काय? अगं आलेत.
बघ ना, आतल्या खोलीत आहेत दोघी.
" आई हसत म्हणाली.
"आणि मामा?"
"मामा आणि तुझे बाबा इथे जवळच गेलेत काहीतरी आणायला. "

"अगं पण कार्यक्रम काय. . ?"

"रमणी काम टाकून गप्पा नको मारू बरं. खुर्चीवर चढ अन तो माळ्यावरचा डबा काढून दे, त्यात त्या भारीच्या प्लेटस आहेत. . हळूच काढ."
रमणीने दुर्लक्ष केलं व आधी आतल्या खोलीत गेली. पाहते तर राधा आणि मामी दोघीही, खोलीत दागिने आणि साडी बद्दल चर्चा चालल्या होत्या.
रुममध्ये जाताच राधा रमणीच्या गळ्यात पडली. " कशीयेस गं रमे?"
"मी मस्त. . तू बोल ना राधे. . कॉलेज काय म्हणतंय ?"
"कॉलेज काय म्हणणार हे मधेच असं. . "
"काय मामी बरीयस ना अचानक येणं केलंत काय विशेष?" पाया पडत रमणी बोलली.
"तुम्हा पोरीचं महत्वाचं काम . . या वयात दुसरं काय विशेष? दाखवण्याचा कार्यक्रम आहे?"
"म्हणजे कोण ? कुणासाठी?"
रमणीला जणु झटकाच लागला.

" रमणी एवढं काय? आईने सांगितलं नाही का ? बघ बरं यातली एक साडी कुठली निवडताय , त्या ब्लाऊजला एक टाच मारून देते तात्पुरती. मी आलेच भागीताईना विचारून " मामी बाहेर गेली.
हे काय नवी असं वाटलं तिला . .
"पण राधे कार्यक्रम!"
" अगं इथलंच तुमच्या शहरातलं स्थळ आहे. . मला बघायला येतायत. . तर मी जाहिरातच करायची स्वतःची. . !"

" अगं असं काय बोलणं ? तुला नकोय तर सांग ना तसं? रमणीने राधाला जवळ घेतलं.
"आहे का कुणी ऐका म्हणाल्याने एेकणारं. . बाबांना किती इच्छा आहे मला पुढे शिकवायची व एल एल बी करवायची . . पण आईचं एकच. . लग्न लग्न!"
" म्हणजे तुला लग्न नकोय की हे स्थळ पसंत नाहीय?"

"स्थळ चांगलंच आहे म्हणे. बाबा तर सरकारी नोकरी पाहुनच भुलले. आईला तो मुलाचा फोटो आवडला. पण रमे, मला हे दाखवणं पसंत नाही. . अगं काहीतरीच वाटतं ते . . मी माझ्या मावसबहिणीच्या कार्यक्रमाला गेले होते ना मागच्यावर्षी .. . मला नाही आवडलं."

" ठीक आहे. मग थांब मी आलेच?" रमणी पटकन आईला विचारण्यासाठी गेली.

" आई तुला मसहित होतं ना हे कार्यक्रमाचं. . राधीला पहायला येणार मग तू काहिच का बोलली नाहीस."

"नाही गं रमणी , रात्रीपर्यंत तिकडचा आज नक्की येण्याचा निरोप आला नव्हता , त्यामुळे हे म्हणाले की नको सांगूया रमणीला , वेळेवर सांगू!"

" म्हणजे सकाळी ठरलं नक्की. शिवाय आता या वयात पहावंच लागतं. . तुझ्या मनात पुन्हा तोच विचार नको म्हणून टाळलं असेल ताईंनी. . " मामी गंमतीने म्हणल्याप्रमाणे म्हणाली पण सूर काही वेगळाच.
"तसं नाही गं पद्मा , तयारी आपल्यालाच करायचीय ना म्हणून म्हटलं वेळेवर सांगूया."
रमणीची आई ठेवणीतल्या प्लेट ,ग्लास व कप पुसत म्हणाली.

"हे सर्व तर . यांना करण्याची गरजच नाही. . रमणीला काय मागणी येणार हे नक्की. . बळवंत दादा म्हणतात ना नेहमी. चला आमच्या राधीचं आज जमलं म्हणजे बरं होईल बाई !"
" जमेल हो जमेल. किती नीटस व रेखीव आहे राधा. सहज होकार येईल बघ!"
भागीरथी बाई म्हणाल्या व कामात लागल्या.
रमणीने हवी ती मदत केली. पण डोक्यात कधी ते राधाचं वाक्य, कधी मामीचं वाक्य तर लगेच पटकन . . अतुल कारंजकरांचा प्रस्ताव . . असं काही घुमत होतं.

म्हणजे लग्न योग्य की शिक्षण? करीयर योग्य की आपली आवड? उद्या मला जर असं कुणी बघायला आलं तर. . कसं वाटेल मला?
मी काय प्रदर्शनाची वस्तु आहे का?. . मी का. . सगळ्याच मुली ? त्या मानाने अपर्णा , सारिका व अन्य मैत्रिणीं किती स्पष्ट आहेत विचाराने. . मग मलाच का स्वतःचं मत नाही. मलाही कळतं पण बाब जे म्हणतील तेच करायचं असं ठरलेलंच आहे.
पण बाबांनी किमान मागणीची अट ठेवलीय ते बरं आहे नाहीतर असेच स्थळ सांगून व पहायला बोलावून कार्यक्रम झाले असते.
सगळ्या विचारांने ती आपल्याच धुंदीत होती.
यंत्रवत कामे झाली. रमणीच्या आईची सुंदरशी अबोली रंगाची नाजूक डिजाईनची साडी राधाने नेसली. अबोली व मोगऱ्याचा गजरा माळला. गळ्यात एक नाजूक दागिना. राधा कजरच छान दिसत होती अगदी लोभस. रमणीशी गप्पा मारून थोडी मोकळी झाली होती व खुश दिसत होती.
पद्मामामी व भागीरथी बाईही छान पण साधारण पणे तयार झाल्या. त्या सर्वांना पाहून रमणीने विचारले की
"आई मी तयार होते पण काय घालू ? ड्रेस घालू की साडी नेसू?"
ती घरातल्या परकर ओढणीवरतीच होती. लांबसडक वेणीचा( अडचण नको म्हणून ) अंबाडा बांधलेला.
आई ने समजावलं की "असू दे . तुझं काही काम नाही त्यामुळे तयार व्हायची गरज नाही. तू राधेसोबत खोलीतच बस , आम्ही बोलावलं की तिला बाहेर पाठव."
रमणीला हे पटलं नाही पण पर्यायच नव्हता.


क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक १०.०४ .२२

0

🎭 Series Post

View all