Login

मागणी (भाग -९)

A father's dream to get a marriage proposal for his beautiful daughter.


पुर्व सुत्र
बाऽबाऽ !" रमणी रागाने जोरात ओरडली.
" बाबा मी पुन्हा सांगते हे सगळं होणार नाही. तुम्ही काहीतरी तयारी करू नका. मला प्लीज माफ करा. . . बाबा पण हा निर्णय लादू नका. . माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाबा . . . लग्न म्हणजे गंमत नाही. तुम्ही सिरियसली विचार का नाही करत. किमान लग्न केव्हा करायचं हा निर्णय तर मला घेऊ द्या?" आता ती रडून कळवळून बोलत होती.
क्रमशः
कथा पुढे-
" समजलो समजलो ! इतकी धिटाई आणि मलाच उपदेश ! अहो , आमची मुलगी सालस ,सोज्वळ म्हणत होतो ना. . . सगळे व्यर्थ! मला सांग आजकाल कानावर येतंय तसं कॉलेजात आहे की काय कुणी? भानगड वगैरे असेल तर ते पण सांगून टाक. मग मी तुझ्यासाठी स्थळ पाहण्याचे प्रयत्नच थांबवतो !" रागाच्या भरात काय बोलतोय हे कळत नव्हते त्यांना.
"अहो बाबाऽ. . . काहीही काय बोलताय तुम्ही. . ? इतक्या खालच्या थराचा विचार का करता लगेच. . . मला फक्त शिक्षण पूर्ण करायचे एवढेच म्हणाले मी. परवापासून माझ्या सेकंड ईयरच्या परीक्षा सुरू आहेत आणि अभ्यास कसा झाला विचारण्याऐवजी तुम्ही दाखवायचा कार्यक्रम ठरवताय . . बाबा मला ना तुमची. . . ?" आणि बोलताना तिनं डावा हात टेबलावर आदळला.
" म्हण ना, थांबलीस का? की मला तुमची लाज वाटते, तेवढेच आता शिल्लक राहिले आहे. बुरसटलेल्या विचारांची अन बाबांची लाज वाटतीय!"
भागीरथी बाई आणि रमणीला त्यांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. त्यांची तब्येत सहा महिन्यांपासून ठीक नव्हती. रक्तदाबाचा त्रास होत होता .
का कुणास ठाऊक , बळवंतराव यादरम्यान विक्षिप्त वागत होते .
त्यांना साऱ्यांचीच चीड येत होती.
या क्षणी मात्र ते कुठेही कमी पडू इच्छित नव्हते. त्यांना संतापाने थोडं थांबलेलं पाहिलं, त्यांना खुर्चीवर आग्रहाने बसवलं व रमणी पडत्या आवाजात बोलू लागली.
" बाबा, या क्षणी तुम्ही रागात आहात म्हणून तुम्हाला सगळं सहज बोललेलं पण बोचत आहे. पण बाबा शांततेने विचार करा . इतकी वर्षे मागण्यांविषयी बोलणारे तुम्ही. हवं तेवढं बोलण्याचं स्वातंत्र्य तुम्ही मला दिलं. बाबा अन्यायाचा प्रतिकार करणं तुम्हीच शिकवलत मला, सगळे चांगले संस्कार तुम्ही केलेत. मग आज तुम्ही एक तर्फी निर्णय घेऊन हुकुमशाही दाखवत आहात. . मग मला कसं सहन होईल? बाबा, समजून घ्या ,मी आता चौथी पाचवीला नाही राहिले. नेहमीसारखं तुम्ही मित्रत्वाने बोला. . . माझं मत घ्या. घाई करू नका.
बाबा , मला शिकू द्या."
बळवंतरावांच्या चेहर्‍यांवरचे भाव बदलत होते पण ते काहिच बोलले नाहीत. भागीरथी बाई येवून त्यांच्या खुर्चीच्या बाजूला उभ्या राहिल्या.
" अजून एक बाबा. . नाहीतरी त्या मुलाला नोकरी नाहीय. . . मग त्या बापाच्या इस्टेटीचा मला काय अभिमान राहणार. दुसरी मुलं काय पळून गेलीत की काय? की पुन्हा स्थळ मिळणार नाही? परीक्षा होवू द्या ना बाबा माझी. . प्लीज!" तिने हात जोडले.
रमणी फारच जीव तोडून बोलत होती.
त्यांच्या निर्णयाला चूक ठरवलेलं मात्र त्यांना खपलं नाही.
"पोरी जीभ इतकी लांब झाली का तुझी?" त्यांच्या डोळ्यात आता रागाने रक्त उतरलं होतं .
" बाबाऽ . . बाबाऽ झालय तरी काय तुम्हाला? कुणीतरी मोहिनी घातल्यागत बोलताहात!"
रमणी वडिलांचं हे रूप पाहून हैरान झाली.
"आता गोड बोलून पहा पण उपयोग नाही. पुढच्या पोरी आता बापावर उलटून पडू लागल्यात आणि तुम्ही कधी तर आमची बाजू घेणारच नाहीत भागी? तुम्ही दोघीनीही विरोध करायचं ठरवलं असेल तर एक लक्षात ठेवा. . बळवंतराव सरदेशमुख आहे ,वाकणार्‍यातला नाही मी !
रमणी, तुला वाटत असेल ना की नाहीतरी बापाचं हृदय कमकुमवत आहे टोचण्या देऊन बोललं म्हणजे मरेल अटॅक ने ! मग मी मेल्यावर खुशाल लग्न कर तुझ्या आवडत्या मुलाशी ,नाहितर पळून जा !"
ते रागाने थरथर कापत होते. भागीरथी बाई पाठीवरून हात फिरवून त्यांना शांत करत होत्या.
"बाबा! नाही बाबा . . प्लीज. . . असं नाहीय बाबा " रमणी ओक्सा बोक्शी रडू लागली.
हे तिच्या सहन करण्यापलीकडचं होतं. ती बाबांजवळ गेली समजावण्यासाठी पण आईने डोळ्याने इशारा केला की सध्या इथून जा.
रमणी बाहेर बैठकीत येवून बसली , स्तब्ध झालेली. बाबांचं हे रूप तिला नवीनच होतं. कजाग बापांच्या भूमिकेत ती स्वतःच्या बाबांची कल्पनाही करू शकत नव्हती.
नेहमीच हळूवार बोलणार्‍या बाबांची वाक्य आठवत होती आणि अाता आतमधे बोलणार्‍या बाबांची वाक्यं . . सगळं आठवून ती रडायला लागली.
इतक्यात भागीरथीबाई तिथे आल्या तर ती त्यांना बिलगुन रडायला लागली.
"आई काय झालंय गं बाबांना?"
" मनावर घेवू नको गं रमणी. वैतागलेत ते बहुतेक आणि मी समजावते ना त्यांना. आणि एक लक्षात ठेव त्यांचा मूळ स्वभाव असा नाहीय गं. . ते रक्त दाबाचा काय त्रास सुरू झालाय आणि मागे ह्रदयाची काय तक्रार झालेली सहा महिन्यांपूर्वी त्यामुळे कदाचित!"
" आई पुन्हा नॉर्मल बोलतील ना ते माझ्याशी. . कारण ते कधीच असं बोल ले नाहीत गं माझ्याशी!" ती रडतच होती.
" रमणी मी काय म्हणते, मी माधव भाऊजींनाच समजावते आज म्हणजे हे दाखवायचं प्रकरण महिनाभर तरी पुढे जाईल. तू शांतपणे अभ्यास कर आणि परवापासूनचे पेपर नीट दे. हे सगळं झालेलं स्वप्न समजून विसरून जा."
त्यांनी लाडाने समजावलं. रमणी डोळे पुसून तोंड धुवायला आत गेली. खोलीत बळवंतराव शांत झोपलेले होते. त्यांना पाहून भागीरथी ला काळजीच वाटायला लागली.
स्वतःच्या मागणीच्या अहंकारापाई नक्कीच काहीतरी संकट ओढवेल असं त्यांना राहून राहून वाटायचं.
भागीरथी विचार करायला लागल्या, \"आमची मुलगी सुंदर आहे इतकंच ना की जगात कुणीच एवढं सुंदर नाही असं तर नाही. हा इतका अभिमान कशाचा?शिवाय कसली दैवी अप्सरा असली तरीही तिला लग्न आणि संसार चुकलाय का? मग शेवटी परक्याचं धनच आपण सांभाळतो आहोत. ती दिल्याघरी जाणारच! मग लग्न कशा पद्धतीने ठरणार यावर काहीही आधारित नाही. किती मुलं- मुली हल्ली प्रेमविवाह करतायत, घरी सांगतही नाहीत. मग आपली रमणी एवढी साधी व सरळ राहते पण शिकतीय तर तिचं पण काहीतरी मत असेलच ना. यांनी ऐकायला हवं.\"
मग त्यांनी माधवराव दिघेंशी काय बोलायचं त्याची योजना आखली.
ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी- माधवरावांनी निरोप दिला की\" मुलाचे वडिल कामानिमित्त परदेशी चाललेत त्यामुळे स्थळाविषयी तूर्तास स्थगिती देवूयात व पुढच्या महिन्यात त्यांचा निरोप आल्यावर पुढची प्रक्रिया सुरू करूयात.\"
विषय तिथेच थांबला . रमणीच्या बी. कॉम .द्वितीय वर्षाच्या परीक्षा शांततेत झाल्या. पेपर खूप छान गेले.
घरात सगळं काही पूर्वीसारखं झालं. बळवंतरावांना स्वतःची चूक उमगली होती आणि रमणीलाही स्वतःची!
दीड दोन वर्षे राधा मामी व मामा आलेलव नव्हते.
मागच्या प्रसंगानंतर पद्मामामीने येणंच टाळलं होतं. वेंकटमामा आले होते एक दोनदा पण अशी धावती भेटच .

भागीरथी बाईंनी सुट्टयात काही दिवस त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले.

यावेळी रमणी व भागीरथी मामाकडे गेल्यामुळे वातावरण थोडं मोकळं झालं. यावेळी मात्र राधाचं आणि रमणीचं खूप असं गुळपीठ चालू होतं. कितीतरी होतं जे एकमेकींना सांगायचं राहून गेलं होतं.
तिथे मात्र रमणीच्या लक्षात आलं की मामीचा स्वभाव कितीही कटकटीचा असो पण मामाच्या खंबीर आधारामुळेच राधा बी. ए. करताना, सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होती आणि तिच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता. म्हणजे केव्हा लग्न करायचं व कुणाशी करायचं हे ही तीच ठरवणार होती. तो अगोदरचा न्यूनगंड निघून गेला होता. कॉलेजमधे ती प्रसिद्धही झाली होती. तिच्या सावळ्या असण्याने सुद्धा तिच्या व्यक्तिमत्त्वात एक झळाळी आली होती.
असंच काहीसं राधा रमणीलाही सांगत होती की "तू आता खूप कॉन्फिडेन्ट वाटते आहेस. हेच महत्वाचं आहे. २० वर्षाच्या वयाला निर्णय सुद्धा घेता येवू नये म्हणजे काय? तू आता जास्त सुंदर दिसतीयस कारण तू स्पष्टपणे बोलायल शिकलीस व तुला कळतंय की तुला काय हवंय?"
"हो गं राधे पण . . ते मागणीचं काय खूळ त्यांच्या डोक्यात बसलंय कोण जाणे?" रमणी बोलत होती मग तिने तो घडलेला प्रसंग इत्थंभूत सांगितला.
"बाप रे ! रमणी खूप अवघड आहे गं हे सगळं! म्हणजे तुझं सौंदर्य एवढ्यासाठीच आहे की कुणाला तरी तू आवडावीस व तुझ्या बाबांनी धूमधडाक्यात तुझं लग्न लावून द्यावं. . . तुला तो आवडतो की नाही याचं काहीच नाही का गं?"
आता मात्र रमणी विचारात पडली. "राधे अगदी वकील होण्याच्या मार्गावर आहेस गं! कसा मुद्दा पकडतेस बरोबर. मला पण तो आवडणं जरूरी आहे ना गं राधे. . पण मला आवडलं कुणी तर तो बाबांना आवडेल का?"
"अय्या काय सांगतेस? म्हणजे कुणीतरी आहे !"
" असं काही नाही. . सहजच विचारत होते. अगं मी मान वर करून बोलतंही नाही कुणाशी तरी बाबा म्हणाले की कुणाचा हात धरून पळून जाशील. याला काय अर्थ आहे सांग बरं ! "
अशाच गप्पा होय राहिल्या.

दहा दिवसांनंतर त्या दोघी जणी परत निघाल्या.

येताना राधा म्हणत होती , "रमणी मर्केंटाईल लॉ चांगला समजून घे गं आणि अकाउंटंसीचा अभ्यास चालू ठेव ,स्पेशली कॉर्पोरेट अंकाउंटस नीट समजून घे." रमणी हो हो म्हणत होती पण चेहरा लाजून गुलाबी झाला होता. मनातून कसलेतरी तरंग प्रवाहित होत होते जणु. पण हे पद्मा किंवा भागीरथी च्या लक्षात आले नाही.
"तू पण पी.जी. केल्याशिवाय शिक्षण थांबवू नकोस. हवं तेवढं शिक. मामाचा सपोर्ट आहेच!" आता हे म्हणताना राधा लाजत होती.
"बस झाल्या अभ्यासाच्या गप्पा आता निघूयात . बसला उशीर होतोय ." भागीरथी बाई म्हणाल्या.
दोघी परत आल्या. घरात वातावरण अगदी नॉर्मल झालं.
रमणीचं थर्ड ईयर सुरू झालं.
महीना -दोन महिने झाले असतील.
पुन्हा एक दिवस माधवराव दिघे घरी आले व तो स्थळाचा विषय निघाला.
आता तर बळवंतरावांकडे किंवा घरात कुठलंही कारण नव्हतं की दाखवण्याच्या कार्यक्रमाला विरोध व्हावा असं !
क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक २६.०४ .२०२२

0

🎭 Series Post

View all