महाकालेश्वर मंदिराची अमरगाथा

विविध रहस्यमय घटनांचे कथन करणारे अद्भूत मंदिर
"महाकालेश्वर मंदिराची अमरगाथा."


भारतीय देवभक्त महादेवाला खूप मानतात. त्यांची पूजा आणि आराधना करण्यात शिवभक्त तल्लीन होतात. महाकालेश्वर मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाभारतात तसेच कालिदाससारख्या महान कवींनी रचलेल्या ग्रंथात या मंदिराचे सुंदर वर्णन आढळते. भव्य आणि दक्षिणाभिमुख तसेच स्वयंनिर्मित आणि अत्यंत पुण्यमय असलेल्या महाकालेश्वर महादेवाला प्रचंड महत्त्व आहे. क्षिप्रा नदीकाठी वसलेले आणि मध्यप्रदेशातील उज्जैन येथे हे मंदिर स्थित आहे. अशी मान्यता आहे की, केवळ इथल्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेताच मोक्ष प्राप्त होतो. महाकवी कालिदास यांनी मेघदूतात उज्जयिनीची चर्चा करताना या मंदिराची सुंदर स्तुती केली आहे.

महाकालेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध आणि शंकर देवाचे पावन असेच शक्तिपीठ आहे. शक्तिपीठे म्हणजे असे मंदिर की, जिथे असे मानले जाते की, जेव्हा भगवान शिव हे देवी सतीचे मृतदेह घेऊन जात होते, तेव्हा तिच्या शरीराचे अवयव येथे पडले होते, ज्यामुळे येथे शक्तीची स्थापना झाली होती. ५१ शक्तिपीठांपैकी प्रत्येकामध्ये शक्ती आणि कालभैरवाची तीर्थे भारतात आहेत.

'मंदिराचा इतिहास'

इसवी सन १२३५ मध्ये इल्तुत्मिशने या प्राचीन मंदिराचा नाश केल्यानंतर, येथे राहणाऱ्या सर्व शासकांनी या मंदिराच्या जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे मंदिराचे सध्याचे स्वरूप विलोभनीय दिसत आहे. हे मंदिर दरवर्षी सिंहस्थापूर्वी सजवले जाते.

इतिहासात इ.स. ११०७ ते १७२८ या काळात उज्जैनवर यवनांचे राज्य होते. त्याच्या कारकिर्दीत, अवंतीमध्ये सुमारे ४५०० वर्षांपासून स्थापित हिंदूंच्या प्राचीन धार्मिक परंपरा नष्ट करण्याचा सपाटा लावला होता, परंतु १६९० मध्ये मराठ्यांनी माळवा प्रदेशावर हल्ला केला आणि २९ नोव्हेंबर १७२८ रोजी माळवा प्रदेशात मराठा राज्यकर्त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर उज्जैनचे हरवलेले वैभव परत मिळाले होते आणि १७३१ ते १८०९ पर्यंत हे शहर माळव्याची राजधानीच राहिले.

मराठ्यांच्या कारकिर्दीत येथे दोन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. एक म्हणजे महाकालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी व ज्योतिर्लिंगाची पुनर्स्थापना आणि दुसरे म्हणजे सिंहस्थ उत्सव स्नानाची स्थापना, हे महान कार्य त्यांनी केले होते. पुढे राजा भोजने यांनी मंदिराचा विस्तार त्यांच्या राज्यात केला.


'मंदिराची रचना'

मंदिर हे भिंतीत वसलेले आहे. एका जिन्याच्या साहाय्याने गर्भगृहात जाण्याचा मार्ग आहे. याच्या वरतीच आणखी एका गाभाऱ्यात ओंकारेश्वर ह्या शिवलिंगाची स्थापना आहे. मंदिराचे क्षेत्रफळ १०.७७ × १०.७७ चौरस मीटर आणि उंची २८.७१ मीटर आहे. ह्या मंदिराला एकूण पाच मजले आहेत तर त्यापैकी एक मजला हा तळघरात आहे.

'मंदिराच्या नावामागील रहस्यमय गोष्टी'

या मंदिराच्या नावामागे अनेक रहस्ये जोडलेली आहेत. राक्षसाचा त्रास जेव्हा वाढला तेव्हा महाकालच्या शिवलिंगाचे दर्शन झाले असे म्हणतात. त्यावेळी दैत्यासाठी भगवान शिव कालच्या रूपात आले होते. मग उज्जैनच्या लोकांनी महाकालला तिथेच राहण्यास सांगितले आणि तो तिथेच स्थापित झाला. अशा स्थितीत कालखंडाच्या शेवटपर्यंत शिवलिंग येथेच राहील, म्हणून 'महाकालेश्वर' हे नाव पडले. याशिवाय 'काल' चा अर्थ हा मृत्यू आणि वेळेचा काळ असे दोन्ही. पूर्वी अशाही नोंदी करण्यात आल्या आहेत; ज्याच्या माहितीनुसार असे समजते की, प्राचीन काळी संपूर्ण जगाचा त्यावेळेचा काळ येथूनच ठरवला जात होता, म्हणूनच याला ' महा कालेश्वर असे नाव पडले.

महाकाल नावाचे अजून एक रहस्य असे की, वास्तविक महाकालच्या शिवलिंगाचे दर्शन स्थानिक भाविकांना तेव्हा झाले होते ,जेव्हा त्रिपुरा राक्षसाचा वध करावा लागला होता. भगवान शिव त्या राक्षसाचा काळ म्हणून आले होते आणि त्याच वेळी अवंती नगरीतील (आताचे उज्जैन) रहिवाशांच्या विनंतीवरून येथे महाकालाची स्थापना करण्यात आली होती. ते शेवटपर्यंत इथेच राहतील, म्हणूनच त्यांना महाकाल म्हंटले गेले.


'मंदिरावरील आक्रमणे आणि पुनर्बांधणी'

महाशिवरात्री, श्रावण महिन्यात आणि दर सोमवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराला लागूनच एक छोटासा जलस्रोत आहे, त्याला ‘कोटीतीर्थ’ असे संबोधले जाते. असे मानले जाते की, इल्तुतमिशने मंदिर पाडले तेव्हा त्याने या कोटीतीर्थात शिवलिंग टाकले होते. नंतर त्याची पुनर्स्थापना झाली. १९६८ च्या सिंहस्थ महापर्वापूर्वी मुख्य दरवाजाचे विस्तारीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. याशिवाय स्थलांतरासाठी आणखी एक द्वारही बांधण्यात आले. पण अभ्यागतांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन १९८० मध्ये सिंहस्थापूर्वी बिर्ला औद्योगिक समूहातर्फे एक भव्य सभागृह बांधण्यात आले. महाकालेश्वर मंदिराच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

अलीकडेच, ह्या राऊळाच्या ११८ शिखरांना तब्बल १६ किलो सोन्याने लेप करून त्याचा सौंदर्यात भर पाडण्यात आली आहे. शिवाय आता मंदिरात आधुनिकतेचा वापर करून प्रत्यक्ष जे भाविक तिथे येवून दानधर्म करू शकत नाहीत त्यांच्या दानासाठी इंटरनेट सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.


'महाकालेश्वराचे मंदिराचे अनोखे रूप'

महाकालेश्वराचे मंदिर, त्याचे शिखर आकाशात उगवते, आकाशाविरुद्ध भव्य दर्शनी भाग, त्याच्या भव्यतेसह आदिम विस्मय आणि आदर जागृत करतो. आधुनिक व्यवसायांच्या व्यस्त दिनचर्येमध्येही महाकाल शहर आणि तेथील लोकांच्या जीवनावर वर्चस्व गाजवते आणि भूतकाळातील परंपरांशी एक अतूट दुवा प्रदान करते.

देवी सतीचे कोपर जळून पडले होते म्हणूनच इथे देवीच्या मूर्तीच्या ऐवजी त्यांच्या कोपराची पूजा केली जाते.


'भस्म आरतीचे रहस्यमय आख्यायिका'

भस्म आरतीशी एक रहस्य जोडलेले आहे. प्राचीन काळी राजा चंद्रसेन हा शिवाचा महान उपासक मानला जात असे. एके दिवशी राजाच्या मुखातून मंत्रोच्चार ऐकून एक शेतकऱ्याचा मुलगाही त्याच्यासोबत पूजा करायला गेला, पण सैनिकांनी त्याला निरोप दिला. यानंतर तो जंगलाजवळ गेला आणि पूजा करू लागला आणि तेथे त्याला समजले की, शत्रू राजा उज्जैनवर हल्ला करणार आहे. अशा स्थितीत त्यांनी प्रार्थने दरम्यान पुजाऱ्याला ही गोष्ट सांगितली. हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली आणि त्यावेळेस प्रतिस्पर्धी राक्षस दुषणासह उज्जैनवर हल्ला करत होते.

दुषणाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की, तो कोणाला दिसणार नाही. त्यावेळी संपूर्ण जनता भगवान महादेवाच्या पूजेत मग्न झाली होती. तेव्हा आपल्या भक्तांची हाक ऐकून महाकाल धरती दुभंगून प्रकट झाले आणि त्यांनी दुषणाचा वध केला. मग त्याच्या राखेने स्वत:ला सजवले. तेव्हापासून ‘भस्म आरती’ ही परंपरा बनली. जो आजतागायत अवितरत चालू आहे.

'हरसिद्धीबाबत माहिती'

पार्वती मातेने एका राक्षसाचा भगवान शंकराच्या सांगण्यावरून वध केला म्हणून त्यांना ‘हरसिद्धी’ असेही म्हणतात आणि त्यामुळेच पार्वती मातेचे मंदिरही इथे पाहण्याचे भाग्य सर्व भक्तांना लाभते.


'महाकालेश्वराचे मंदिराचे आधुनिक माहात्म्य'

महाकालेश्वराचे मंदिर ह्याला आध्यात्मिक आणि धार्मिक बांधवांचे श्रद्धास्थान म्हणतात. भक्त आशेने येथे येतात आणि प्रसन्न मनाने सर्व महादेवावर सोपवून चिंतामुक्त होतात. भारत देशाला अर्थार्जन देण्याचे कार्यही हे मंदिर विदेशी नागरिकांना तीर्थक्षेत्रासोबतच ‘पर्यटन स्थळ’ म्हणून करत आहे. भारताची विविधता आणि मंदिराचे थक्क करणारे अद्भुत असे शिल्पकाम तसेच अनेक आक्रमण होऊनही नव्याने तटस्थ राहून आणि त्याच्या माहितीचा ठेवा पिढ्यान् पिढ्या देण्याचे कार्य हे महाकालेश्वराचे मंदिर अखंडपणे त्याच्या अस्तित्त्वातून करत आहे.

माहितीचा संदर्भ:- गुगल आणि महाकालेश्वराचे मंदिराची अधिकृत वेबसाईट.

लेखन:- ©विद्या कुंभार.