महापुरातील कुटुंब २
रजनी सामान बांधायला लागते. पण तिच्या मनात काहुर दाटला होता. अशातच मुलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
"रजनी चल लवकर आवर."
"आई - बाबा आता कसं करायचं ? "
"अरे, विश्वास घाबरून कसं चालेल? आपण लवकरच गेस्ट हाऊसवर पोहूच."
"अहो, या गाई वासरांच ..." रजनीच्या डोळ्यात आसवांचा पूर आला होता."
"काही काळजी करू नको. तू वीणाचा हात पकड. मी कासरा सोडतो. गाई , वासरू आणि विश्वास यांना मी सांभाळतो."
बाहेर जरा लवकरच अंधारून आल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात त्यांचे घर गळू लागले. त्यांच्या अंगणात पाणी येण्यास सुरुवात झाली होती. कसेबसे ते घरातून बाहेर पडले. तोपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी आले. त्यांच्या प्रमाणे सगळ्यांची तीच अवस्था झाली होती.
"आजी, ओ आजी बाहेर या लवकर."
"आता तुझं मध्येच काय?"
"अहो, त्या विमल आजी एकट्याच आहेत ना! म्हणून काळजी वाटते."
"आले ग पोरी."
आजी कशाबशा बाहेर आल्या. सगळेजण एकमेकांच्या सोबतीने पाण्यातून वाट काढून लागले. मागे वळून एकदा तिने तिच्या घराकडे बघीतले. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि आजीच्या घराची भिंत कोसळली. एवढ्या पावसातही आजीच्या चेहऱ्यावरचे भाव लपले नाही. खूप दुःखी मनाने थोडे थोडे अंतर कापत ते डोंगरावर चढतच होते की अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच गडबडीत रजनीच्या हातात असलेला आजीचा हात सुटला आणि काही कळायच्या आताच आजी पाण्यात वाहून गेल्या . एकीकडे घर आणि दुसरीकडे माया करणाऱ्या आजी. त्यांना असं वाहतांना बघून रजनी अस्वस्थ झाली.
तेवढ्यात विश्वास जोरात ओरडला "कपिला, नंदिनी.."
पण पाण्याच्या जोरादार प्रवाहात आणि लोकांच्या ढकलाढकलीत सगळ अघटित घडत होते. एकावर एक दुःखाचा डोंगर कोसळत होता. विलासच नाही तर गावातील अनेक लोकांना हा फटका बसला होता. पण स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. कसेबसे ते गेस्ट हाऊसवर पोहोचले. रजनी, विलास आणि त्यांची मुले रडायला लागले. सतत कोसळणारा मुसळधार पाऊस बघून सगळे हवालदिल झाले. कुडकुडत्या अंगाने ते बसून होते. लोकांचे फार हाल झाले होते. अनेक लहान मुले, म्हातारे कोतारे, त्यात बाळंतीण असलेल्या दोन तीन महिला सुध्दा होत्या. काही ठिकाणी तर अजुनही घरात लोक अडकली होती. ती मदतीसाठी वाट बघत होती.
"लई वर्षांनंतर असा पाऊस कोसळत आहे बगा!"
"हो ना! जणुकाही आभाळच फाटलं! "आर बाबा, हा पंचम काळ हाय! कलियुग हाय! आपल्या हातानेच आपलं नुसकान होतंय बगा!"
मुलांच्या कानावर चर्चा पडत होत्या. आणखी अंधार पडला. पावसाने अजून जोर धरला होता. रात्र जणु वैऱ्याची वाटत होती. कोणाशीही संपर्क होत नव्हता. अंधारातल्या काळोखात एक प्रंचड राक्षस सगळ्यांना गिळंकृत करतो की काय असे वाटत होते . वीज कडाडल्या नंतर पडणाऱ्या प्रकाशात गावातील भीषण वास्तव दिसत होते. ते पाहून सगळ्यांच्या काळजात धस्स होत होते. लहान मुले घाबरून आई वडीलांना बिलगत होते. म्हातारी बाया बापडे देवाचे नामस्मरण करत होते. कोणी भुकेपोटी रडत होते. तर कोणी भितीपोटी... सगळ कस वाईट घडत होतं. सुख समृद्धी आणि समाधानाने नांदणाऱ्या या गावात फार विपरीत घडल होतं. ज्यांच्या जवळ कंदील होते त्यांनी ते पेटवले. गेस्ट हाऊसच्या मालकाने सगळ्यांची जेवायची सोय केली. रात्रभर पाऊस कोसळत होता. महाप्रलय आले होते. विलासची गाय आणि वासरू तर गेलच होतं. आता आणखी सकाळी काय बघायला मिळते ते बघू या. असे म्हणत एकमेकांना दिलासा देत सकाळ होण्याची वाट बघत बसले.
©® अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा