Login

महापुरातील कुटुंब ३(अंतिम भाग)

जलद कथा
महापुरा तील कुटुंब ३

सगळेजण सकाळ होण्याची वाट बघत बसले. जणु आपल्या पापाची शिक्षा आपल्यालाच देव देत होता.

जसजशी सकाळ झाली, उजाडायला लागले. तसतसे सगळ्यांना अनेक शंका कुशंका नी घेरले. पाऊस थांबला होता. सगळी लोक हळूहळू खाली येऊ लागले. गावात पाय ठेवताच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अजुनही भरपूर पाणी होते. सगळीकडे नुसता चिखल झाला होता. प्रत्येक घरांमध्ये, दुकांनामध्ये पाणी शिरले होते. अनेक घराची पडझड झाली होती. विलास आणि त्याच कुटुंब स्वतः च्या घराजवळ पोहोचले तर सगळा संसार पाण्यात वाहून गेला होता. रजनीने तर मोठ्याने टाहो फोडला. विश्वास आणि वीणाच्या वह्या पुस्तकांचा लगदा झाला होता. कपडे, भांडी काहीच उरले नव्हते. रजनीने बघीतलेल्या स्वप्नांना सुरूंग लागला होता.

"अहो, आपल्या घराची ही अवस्था! कसं जगायचं आता? कसं उभं करायचं सगळं? आणि शेतीची काय अवस्था असेल?"

तेवढ्यात शेजारचा बाळू धावत आला.

"अरे, विलास आपली शेती..."

"काय झालं बाळू? आपली शेती ?"

"अरे, आपली सगळी शेती वाहून गेली. सगळीकडे नुसता पाणी आणि पाणीच आहे. नुसता चिखल आहे. पिके तर नष्ट झाली आहे. जनावरांचा खच पडला आहे."

विलासने डोक्यावर हात मारून घेतला.

"आणखी एक गोष्ट. विलास विमल आजी सापडली. दोन गल्ली पलीकडे ती एका झाडात अडकली आहे."

"म्हणजे ? आजी जिवंत....?

"नाही."

रजनी हताश झाली‌. तिला मोठ्ठा धक्का बसला.

"अहो, आता काय करायचं? अनेक प्रश्न
सगळ संपलं होतं. घर, संसार, शेती, स्वप्नं.... सगळ्यांचा चुराडा झाला होता. बोलायला शब्दच फुटेना. तेवढ्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सरकार कडून मदतीचा ओघ सुरू झाला होता. अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये निर्माण झाली होती. या पुरग्रस्त कुटुंबातील लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे आल्या. काही श्रीमंत लोक समोर आले. राज्यातील शिक्षकांचा, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मदतीसाठी देण्यात आला. त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना पुन्हा नव्याने जगण्यासाठी आवश्यक ती सामुग्री देण्यात आली. पुर्ण पाणी ओसरे पर्यंत काही दिवस त्यांची दुसरीकडे सोय करण्यात आली. त्यांच्या घरांची दुरुस्ती करण्यात आली. शेतीचा पंचनामा करून प्रत्येकाला एक ठराविक रक्कम देण्यात येईल. असे जाहीर करण्यात आले.

खरोखर जे लोक या महाप्रलयातून जातात त्यांच्या सहनशीलतेला सलाम. निसर्गाच्या प्रकोपापुढे माणूस शुन्य आहे. एका क्षणात उद्ध्वस्त करून जाते. म्हणून माणुसकीचा झरा सतत वाहू द्या. श्रीमंत -गरीब हा भेदभाव करू नका. वेळ वाईट असते. पण तारणारे अनेक हात पुढे येतात.