महत्वाकांक्षी प्रणाली

संबंधसेतू - प्रणाली शिंदे


संबंधसेतू - प्रणाली शिंदे

ईराच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ मध्ये भाग घेतला. अतिशय धाकधूक होती मनामध्ये की स्पर्धेच्या वेगवेगळ्या फेऱ्या होणार होत्या त्यात आपण हे जे लिखाणाचे शिवधनुष्य उचलले आहे ते पेलवू शकू ना ? जमेल ना मला जे काम मी हाती घेतले आहे ते ? असे अनेक प्रश्न मनामध्ये उपस्थित झाले होते.

प्रत्येकाच्या नावाची चिट्ठी टाकून ग्रुप बनवले गेले. आमचा ग्रुप क्रमांक ५ - टीम महेश.

आपल्या ग्रुपमध्ये कोण असेल ? ती लोकं आपल्याशी नीट बोलतील ना ? असे अनेक विचार मनात होते. माझ्या ग्रुपमधील लोकांची एकाचीही तोंडओळख नाही पण आमच्या ग्रुपमधील तीन - चार लोकांचे साहित्य माझ्या वाचनात आले होते. त्यामुळे सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे, सौ. राखी भांडेकर , सौ. उज्वला राहणे यांची नावे परिचित होती.

ग्रुप जसा तयार झाला तशी प्रत्येकाने आपली ओळख सांगितली. सुरुवातीला एकमेकांशी थोडे मोजके बोलणे होत असे पण नंतर मात्र सगळे सुसाट सुटले. एकमेकांची मस्करी, मेसेजवर गप्पाटप्पा सुरू झाल्या आणि आमच्या ग्रुपमध्ये आमच्यात एक छान बॉंडिंग तयार झाले.

आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि टास्क आहे \" संबंधसेतू \" लिहिणे. आमचे कॅप्टन श्री. महेश सर यांनी सेतूसाठी आमच्या जोड्या जुळवल्या आणि \" सेतू बांधा रे ईरावरी \" अशी आम्हाला त्यांच्या सेनेला त्यांनी साद घातली आणि आम्ही त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहोत.

तर मी आमच्या ग्रुपमधील सगळ्यांत वयाने लहान अशी मुलगी \" प्रणाली शिंदे \" हिच्याबद्दल लिहिणार आहे.

प्रणाली माझ्या लेकीपेक्षा देखील वयाने लहान असल्याने तिच्याबद्दल खूपचं सॉफ्टकॉर्नर वाटला. प्रणाली मला माझ्या लेकीसारखीचं वाटली. सगळ्यांच्यात वयाने लहान असल्याने प्रणाली सुरुवातीला ग्रुपमध्ये खुलली नव्हती पण आता ग्रुपमधील संवादात ती भाग घेऊ लागली आहे.

प्रणाली लहान असताना अतिशय मस्तीखोर मुलगी होती. तिच्या आयुष्यात असे प्रसंग आले की त्यातून तिने स्वतःला घडवले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ती जगणे शिकत गेली. चांगले वाईट अनुभव घेऊन जीवनाशी लढायला ती परिपक्व झाली.

लहानपणापासूनचं ती ध्येयवादी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने तिचे शिक्षण नोकरी करून पूर्ण केले. आज ती लहान मुलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देते. लहान मुलांमध्ये ती रमते. ती अतिशय लाघवी तसेच हळवी देखील आहे.

स्वतःला घडवताना ती त्यात स्वतःचे समाधान देखील शोधते यावरून दिसून येते की लहान वयात ती किती विकसित झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रणालीने लेखणीला जवळ केले आणि तिने तिचे मन, तिची मते तिच्या साहित्यातून व्यक्त केली. लेखणीने प्रणालीला आत्मविश्वास दिला. प्रणालीला आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडते.

अशा महत्वाकांक्षी प्रणालीसाठी माझे देवाकडे एकचं मागणे असेल की, प्रणालीला तिच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत भरघोस यश प्राप्त होऊदे. तिला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो. तिला सुखसमाधान मिळो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.

सौ. नेहा उजाळे
ठाणे