Login

माहेरचा अपमान- भाग 1

सुचिताच्या माहेरच्यांना दिली जाणारी वाईट वागणूक सुचिताला त्रास देत होती
माहेरची माणसं येणार म्हणून आज सुचिता खूप खुश होती. शहरात आपली मुलगी दिली आहे याचं समाधान तिच्या आई वडिलांना नेहमी वाटायचं. सूचिताचा जन्म खेडेगावात झाला असला तरी शिक्षणासाठी ती कायम बाहेर शहरात राहिली होती. तिच्या मैत्रिणीही शहरातल्या, त्यामुळे आधुनिकता आणि शहरातलं वातावरण अंगीकारायला तिला जड गेलं नव्हतं.

सूचिताचं शिक्षण आणि तिची चांगली नोकरी या जमेच्या बाजू बघून तिचं लग्न ओमशी झालं. ओमच्या घरच्यांना आपले व्याही शहरातलेच असावे अशी अपेक्षा होती. ओमच्या आई आणि बहिणीला- स्वातीला तर हे स्थळ मुळीच पसंत नव्हतं, पण ओमला सुचिता मनात भरली होती त्यामुळे त्याने आपला हट्ट कायम धरला. विशेष म्हणजे ती ओळखीतली निघाली, ओमच्या बहिणीची- स्वातीची नणंद आणि सुचिता शहरात शिकायला एकत्रच, एकाच होस्टेलवर होत्या.

साखरपुडा, लग्न सगळं थाटामाटात झालं पण ओमच्या घरचे सुचिताच्या माहेरच्या लोकांशी जरा तुटकच असायची, नजरेत एकंदरीत तुच्छपणा होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी सुचिताचे आई वडील सुचिताला भेटायला येणार होते. सुचिताने तिच्या सासरी सांगितलं आणि म्हणाली,

"सासूबाई, आई बाबा येणार आहेत..जेवायला काय मेनू ठरवायचा?"

"मेनू?"

सासूबाईंनी डोळे विस्फारत तिच्याकडे पाहिलं.

"हो म्हणजे भाजी कुठली करु, गोडाचं काय बनवू.."

"बनव तुला आवडेल ते"

सासरच्यांना तिच्या आई वडिलांच्या येण्यात काही रस नव्हता हे सुचिताला कळून चुकलं. सुचिताने नाराज मनाने सगळं बनवलं, घर आवरलं. त्यात नणंदबाई- स्वातीताई घरी येऊन बसल्या. सुचिताने त्यांनाही सांगितलं,

"स्वातीताई, आज आई बाबा येणारेत माझे.."

"बरं.. मग??"

नणंदबाईंनी असं उत्तर दिलं की ओमला राग आला,

"अगं ताई असं काय बोलतेय? पाहुणे येणारेत म्हटल्यावर तिने फक्त सांगितलं तसं.."

"मला काय बोलतोस? तिच्या माहेरचे येणारेत ना, मग तुला का एवढा पुळका?"

"पुळका? अगं घरात कोणीही येणार असलं तर आपण थोडीफार तयारी करतोच ना?"

बहीण भावांचा वाद नको उगाच म्हणून सुचिताने विषय बदलून त्यांचं मन दुसरीकडे वळवलं. नणंदबाईंना- स्वातीताईंना भूक लागली तसं त्यांनी ताट वाढून घेतलं आणि tv समोर बसून जेवू लागल्या. सोबतच सासूबाईंनीही ताट घेतलं आणि त्याही तिच्याशेजारी येऊन बसल्या.

सुचिताला हे सगळं बघून खुप वाईट वाटलं. तिला वाटलेलं आपले आईवडील येतील, सगळे सोबत जेवायला बसतील..पण कसलं काय..आई वडिलांनी उगाच गैरसमज करून घ्यायला नको याच टेन्शनमध्ये ती असताना दारात तिचे आई वडील आले. सासूबाई आणि नणंदबाईनी tv वरून नजरच हटवली नाही, ओमने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आत घेतलं. पाहुणे आले तरी नणंदबाई आणि सासूबाई tv समोरून उठल्या नाहीत, त्यांच्यासमोरच जेवण सुरू ठेवलं.. ओमने शेवटी त्यांना खुणावलं तेव्हा रागारागाने त्या ताट घेऊन आत गेल्या.

सुचिताच्या सासूबाई काही बोलत नाही बघून आईने स्वतःहून बोलायला सुरुवात केली,

"ताई सगळं ठीक ना?"

"हो, आता बरंच म्हणायचं..बरं मी जरा पडते, दुपारच्या गोळ्या असतात मला.."

असं म्हणत सासूबाई सरळ खोलीत गेल्या आणि दार लावून झोपून घेतलं. नणंदबाईंनीही तेच केलं. हे सगळं बघून सुचिताचे आईवडील घाबरले,

"सुचिता या असं का वागताय? काही झालंय का?"

"नाही गं आई, शहरात सगळे असेच राहतात. प्रत्येकाला आपली प्रायव्हसी हवी असते, गावसारखं पाहुण्यांसोबत बोलत बसायला कुणाला वेळ राहत नाही इथे.."

मुलीच्या बोलण्याला खरं मानून आईवडील निर्धास्त झाले. ओमने मात्र त्यांची चांगलीच खातीरदारी केली त्यामुळे ते समाधानी झाले आणि आनंदाने घरी परत गेले.

झाल्या प्रकाराने सुचिता खूप दुखावली होती, विचारात असतानाच तिला मनीषाचा फोन आला,

"हाय सुचिता मॅडम, काय मग...माझ्या वहिनीची वहिनी... श्या, कसंतरी वाटतंय, सुचिताच बरं.. अगं रूम शेयर केलेली आपण, आणि आता नात्यात आलो म्हणून हाक बदलायची? नको.."

"हम्म..."

हुंदका गिळत सुचिता म्हणाली,

"काहीतरी झालंय.. मला सांग..सगळं शेयर करायचीस ना तू माझ्याशी??"

नात्यात असल्याने मनीषाला सांगावं की नको तिला प्रश्न पडला, पण सर्वात आधी ती जिवलग मैत्रीण होती त्यामुळे तिच्यापासून काही लपवलं गेलं नाही
सुचिताने मनिषाला सगळं सांगितलं, हे ऐकून मनीषा म्हणाली,

"तुला आठवतं? कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगा त्रास देत होता, तेव्हा तू स्वतः धोका पत्करून त्याच्याशी भांडलीस..मला वाटतं त्याची परतफेड करायची वेळ आता आली आहे.."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all