माहेरची मनी अंतिम भाग
मागील भागात आपण पाहिले तृप्ती मनीला घेऊन सासरी आली. आता पुढे काय होणार?
मनीला घेऊन तृप्ती खोलीत जायला निघाली.
" तृप्ती,तिच्यासाठी मी बेड ठेवला आहे." सरिकाताई म्हणाल्या.
"आई, अहो ती झोपत नाही माझ्याशिवाय." तृप्ती हसून म्हणाली.
"अग बाई हो का? मग ने आजच्या दिवस." सरिकाताई म्हणाल्या.
रवीच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. तरीही संयम दाखवून तो आत निघून गेला. पाठोपाठ तृप्ती गेली.
"किती सुंदर दिसतेस." असे म्हणून रवीने तृप्तीला जवळ ओढले.
"आई ग!" रवी किंचाळला. मनीने त्याच्या हातावर नक्षी काढली होती.
"आई ग!" रवी किंचाळला. मनीने त्याच्या हातावर नक्षी काढली होती.
" अग बाई! सांगायला विसरले. मला असे अचानक कोणी हात लावलेला तिला आवडत नाही."
रवीच्या कानातून रागाने धूर निघत होता. "मग हनिमून करायचा की नाही?" रवी कसेबसे बोलला.
तृप्ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. तिच्या नाजुक हाताने मलम लावत म्हणाली,"तसेही,उद्या पूजा होईपर्यंत तुम्हाला बाहेर झोपायचे आहे."
तिच्या हसण्यात रवी विरघळला. नवीन लग्नाची हीच जादू असते.
"हाय जिजू. मनीचा प्रसाद मिळाला का?" पार्थचा मॅसेज आला.
रवीने लगेच त्याला फोन लावला,"काय रे,आता ही मनी कशी आवरू."
पार्थ हसत म्हणाला,"वैतागु नका. उपाय मी सांगतो."
पुढे बराच वेळ बोलून रवीने हसून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रवीने कॅट फूड पाकीट उघडले. त्याबरोबर गारफील्ड धावत आला. मनी मात्र शेपूट ताणून बसून होती.
तेवढ्यात रवीने हळूच दोन बोंबील काढले. तशी मनी टुणकन उडी मारून जवळ आली. दोघांनी खाल्ले आणि एकमेकांकडे न पाहता निघून गेले. रवी फक्त हसला.
त्या दिवशी दिवसभर पूजेची गडबड चालू होती. संध्याकाळी रवीने मस्त क्रिमचे दूध एकाच भांड्यात ओतले.
"अरे,गारफील्ड नाही पिणार असे. त्याला नाही आवडत शेअर करायला." आई म्हणाली.
"मनी सुद्धा फिरकणार नाही. तिला पर्शियन बोके नाही आवडत. किती केस असतात त्यांना." तृप्ती उत्तरली.
त्याही दिवशी मनी दोघांच्या मध्ये झोपली आणि आपला नवरदेव एका कुशीवर तळमळत होता. दुसऱ्या दिवशी रवीने पहाटेच दूध एका भांड्यात ओतून ठेवले.
गारफील्ड जवळ आला. तेवढ्यात मनी तिकडून चकरा मारू लागली. शेवटी एकदाचे दुधाच्या मोहाने अहंकारावर मात केली. थोड्या वेळाने आपापल्या मिशा पुसत दोघे निघून गेले.
"पार्थ थोडी प्रगती आहे." रवीने माहिती पुरवली.
"बक अप जिजू. प्रयत्नांती हनिमून. लक्षात ठेवा." पार्थ हसत म्हणाला.
तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बोंबील तळण्याच्या वासाने सारिकाताईंना जाग आली.
"बाई!बाई! बाई! किती हा घाणेरडा वास. कोण तळत आहे बोंबील." बाहेर येत त्या पाहू लागल्या.
तोवर तृप्तीने दोन तळून झालेले बोंबील मनीच्या डिश मध्ये ठेवले. मनी जवळ जाऊन गर्फिल्फकडे पाहू लागली.
" नाही ह गारफील्ड. लोकल फूड नाही खायचे." सारिका ताई असे म्हणत होत्या तोवर त्याने आणि मनीने एकच तुकडा खायला सुरुवात केली.
"सारिका,मुलगा आणि बोका दोघेही सारखेच बरं." रवीचे बाबा हसून म्हणाले.
संध्याकाळी तृप्ती एकटीच खोलीत आली. "अहो,मनी दिसत नाहीय. कुठे गेली असेल? हरवली नसेल ना?"
रवीने तिला खिडकीजवळ नेले. बाहेरच्या झाडावर मनी आणि गारफील्ड शेपट्या गुंफून बसले होते आणि इकडे रवीच्या खोलीतला लाईट विझला होता.
कथा केवळ मनोरंजन हेतूने लिहिली आहे. तशीच वाचा आणि आनंद घ्या.
©® प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा