माहेराहून काय आणलं?-1

मराठी कथा
"मिनुकडे जाताय तर जातांना छानपैकी फळं आणि खाऊ घेऊन जा..दरवेळी नेतात तसं, रिकाम्या हाताने जायला मला तरी नाही आवडत बरं.."

सासूबाई सुनेसमोर मुद्दाम आबांना सांगत होत्या. त्यांच्या बोलण्याचा रोख न समजण्याइतपत रेखा भोळी नव्हती.

रेखा एक सुशिक्षित आणि कर्तबगार स्त्री होती. घर आणि नोकरी दोन्ही व्यवस्थित सांभाळत असे. तिचा भाऊ तिच्याच शहरात असल्याने त्याचं बऱ्याचदा येणं व्हायचं. भावाचा मोठा बिझनेस असल्याने तो घाईगडबडीतच यायचा आणि लगेच जायचा.

कालच तो येऊन गेलेला तेव्हाचा प्रसंग रेखाला आठवला,

"दादा काय रे? इतका दमलेला का दिसतोय?"

"कामाची धावपळ, दुसरं काय.."

"तब्येतीकडे पण लक्ष देत जा दादा.."

"हो गं पण हा व्याप असा आहे ना की थोडंही दुर्लक्ष करून चालणार नाही..बरं ते जाऊदे, साक्षी कुठेय? तिच्यासाठी खाऊ आणायचा राहिला बघ.."

"असुदेत, दरवेळी आणायलाच हवा असं काही नाही..तू आलास हेच खुप आहे.."

तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या, त्यांना पाहून दादा म्हणाला,

"आत्या काय चाललंय? तब्येत बरी आहे ना?"

"हो, मी अगदी ठणठणीत.. रेखा चहा दिलास की नाही त्याला?"

"आत्या चहा नको, मी चहा बंद केलाय."

सासूबाईंचं लक्ष सतत त्याच्या बॅगेकडे जायचं, शेवटी न राहवून त्यांनी विचारलं,

"बॅगेत काय आहे एवढं?"

"मटेरियल आहे त्यात, एका ठिकाणी पोचवायचं आहे..त्याचीच गडबड चालू आहे.."

"अच्छा...मला वाटलं आमच्या साक्षीसाठी आणलंय काहीतरी.."

हे ऐकून रेखाला तर राग आलाच, पण भावलाही वाईट वाटलं. कामाच्या व्यापात त्याला खरंच जमत नसे आणि त्यात रेखाच्या सासूबाई असं बोलल्यावर त्याला फारच गिल्टी वाटत होतं..

"दरवेळी कशाला खाऊ? बाहेरचं खायची सवय नकोच मुलांना.."

रेखाने सावरून घेतलं, सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र सगळं काही सांगून जात होते..

क्रमशः

🎭 Series Post

View all