Login

माहेरची साडी

एका रागावलेल्या बापाची आणि मायेला आसुलेल्या मुलीची लाघवी कथा. प्रियाली जरी बापाच्या मायेला दुरावली असली तरी कणखरपणा आणि आत्मविश्वास ह्याने परिपूर्ण आहे. तिला तिच्या मामा-मामीची साथ आहे. आयुष्यात यशस्वी होत असताना एका वळणावर तिच्या वडिलांवर ओढवलेला प्रसंग कसा बाप मुलीला एकत्र आणतो हे कथेत वाचण्यासारखं आहे.

#माहेरची साडी#

#सामाजिक#

प्रियाली धावतच रिजल्ट घेऊन घरी येते. ती डॉक्टरेटची परीक्षा पास झालेली.


"मामी..मामी...हे बघ काय?" प्रियाली मामीला मागून मिठी मारत म्हणते


"हे आणि काय ग?" मामीने प्रियालीच्या हातातला कागद फक्त पाहिला. इंग्लिशमध्ये लिहिलं असल्याने त्यांना काही वाचता आलं नाही


"अग मामी हा माझा रिझल्ट..तुझी प्रियू डॉक्टरेटची परीक्षा फर्स्ट क्लासने पास होऊन डॉक्टर झालीये" प्रियाली आनंदाने म्हणाली तसं मामीचे डोळे भरून आले. त्यांनी लगेचच तिच्या चेहऱ्यावरून कडाकडा बोटं मोडली


"अरे व्वा अभिनंदन" मामा घरात येतं म्हणाले. तशी प्रियालीने त्यांनाही मिठी मारली.


"तुझ्या बाबांनाही दाखवायला हवा ना तुझा रिझल्ट" मामी म्हणाली तसा प्रियालीचा चेहरा पडला


"मामी पण..ते मला त्यांची मुलगीही मानत नाही मग" प्रिया हळव्या स्वरात म्हणाली


"ते काही असो पण आपण त्यांना तू डॉक्टर झालीयेस हे सांगायलाच हवं. उमा ताईंच (प्रियालीची आई) स्वप्न होत त्यांच्या मुलीने डॉक्टर व्हावं आणि आज तू त्यांच स्वप्न पूर्ण केलंस मग एवढी छान बातमी त्यांना आणि भाऊजींना सांगायला नको का..!" मामी प्रियालीला समजावते


तशी प्रियालीने "हो" मध्ये मान हलवली


दुपारची जेवणं होऊन दोघींनी आवराआवर केली आणि संध्याकाळी प्रियालीच्या घरी म्हणजेच तिच्या बाबांच्या घरी जायला निघाले. प्रियाली तिच्या मामाकडे राहत होती.


******

प्रियाली आणि मामी प्रियालीच्या घरी पोहचतात. दार उघडच असतं. संध्याकाळ असल्याने घरात थोडासा अंधार झालेला असतो. लहान आवाजात जुन्या गाण्याचा आवाज येतं असतो. प्रियाली आत येऊन बघते. तर तिचे बाबा आरामखुर्चीत बसून रेडिओवर जुनी गाणी ऐकत असतात. तशी ती पुन्हा बाहेर जाऊन दार ठोठावते. तसं प्रियालीचे बाबा (अनंत राव) "कोण आलं" बघायला डोळ्यांवर चष्मा चढवतात आणि बघतात. प्रियालीला बघून त्यांच्या कपाळावर आठ्या जमा होतात.

"तुझी हिंमत कशी झाली ईथे यायची?" अनंत राव रागातच विचारतात


"कसे आहात बाबा?" प्रियाली धीर करत विचारते


"तू येईपर्यंत ठिक होतो" अनंत राव तिरकस बोलतात


"बाबा आज माझा रिझल्ट लागला, हे बघा मी डॉक्टर झाले." प्रियालीने अनंत रावांना रिझल्ट दाखवला पण ते न बघताच तिथून आत जाऊ लागले


"बाबा काय झाल..का असे वागता तुम्ही माझ्याशी.. काय बिघडवलंय मी तुमचं..हेच ना की मी ह्या जगात आली आणि तुमची बायको म्हणजेच माझी आई हे जग सोडून तुम्हांला आणि मला कायमची सोडून गेली. पण बाबा ह्यात माझी काय चूक..तुम्हांला लहान मुलांची हौस होती, तुम्हांला बाबा व्हायच होत म्हणून तिने स्वतःच्या जीवावर उदार होऊन..." प्रियाली बोलतच असते की,


"जर मला माहिती असतं मी बाप होण्यासाठी मला माझ्या बायकोला गमवायच असेल तर मी कधीच तिला असं करू दिल नसतं. आयुष्यभर निपुत्रीक राहिलो असतो मी..पण तू ह्या जगात आलीस आणि माझी उमा..." अनंतरावांचा आवाज हळवा होतो


"प्रियू.." मामी तिला खुणावतात. तशी ती पेढ्यांचा बॉक्स घेऊन अनंत रावांजवळ येते. त्यांच्या हातावर पेढा ठेवून त्यांच्या पाया पडायला जाते, पण ते लगेचच मागे होतात तशी ती एक नजर मामीकडे बघते मामी एका फोटोकडे इशारा करते..


तशी प्रियाली एका फोटोजवळ येते. त्या फोटोला चंदनाचा हार घातलेला असतो आणि दिवा लावून अगरबत्ती लावलेली असते. ती पेढ्यांचा बॉक्स त्या फोटोसमोर ठेवते.


"आई तुझी प्रियू आज डॉक्टर झालीये, हा बघ माझा रिझल्ट मी फर्स्ट क्लासने पास झालीये" प्रियू डोळ्यांत पाणी आणि ओठांवर हसू आणत बोलते


"आई मला माहितीय खरंतर बाबांना खूप आनंद झालाय पण त्यांचा माझ्यावर राग आहे ना, मला हेही माहितीय त्यांच माझ्यावर खूप प्रेम आहे पण आई त्यांच माझ्यापेक्षा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून ते माझ्याशी असे वागतात पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ते माझ्याशी नक्की बोलतील आणि मला प्रेमाने जवळून घेऊन माझ्या डोक्यावरून मायेने हात सुद्धा फिरवतील" प्रियाली आत्मविश्वासाने बोलते


"हा अतिविश्वास मनातून काढून टाक मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही" अनंत राव तिच्याकडे बघतं रागाने बोलतात तसं टचकन तिच्या डोळ्यांत पाणी येतं. ती तशीच रडत घराबाहेर पडते.


******

"प्रियू बाळा बास किती रडशील शांत हो" मामी  शांतपणे तिला समजावत असतात. घरी आल्यापासून प्रियाली आपल्या रूममध्ये बेडवर पडून रडत असते

"मामी का ग बाबा आमचा एवढा दुसवास करतात. मी जन्मल्यानंतर लगेच आई जाणे ह्यात माझी काय चूक..मामी आज आमचा रिझल्ट लागला. सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या मुलांबद्दल अभिमान आणि कौतुक होत आणि माझ्या घरी मात्र..मामी मला बाकी कसलीच अपेक्षा नाहिए ग फक्त एकदा..एकदा...बाबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवावा आणि मला मायेने, प्रेमाने जवळ घ्यावं पण मला माहितीय ते शक्य नाहिए.." प्रियाली खिन्नपणे म्हणते. प्रियाली जशी जन्मली तशी तिची आई हे जग सोडून गेली आणि अनंत रावांनी हिच्यामुळेच माझी बायको गेली हा समज मनात करून घेतला आणि तेव्हापासून तिच्याशी बोलणं बंद केलं. त्यांनी तान्ह्या प्रियालीला हातात सुद्धा घेतलं नाही. तेव्हापासून ती तिच्या मामा-मामी कडेच राहत होती


"बस कर..चल जेवायला तुझ्या आवडीची बासुंदी बनवलीये" मामी तशी प्रियाली त्यांच्याकडे बघू लागते


"मला माहिती होत. माझी प्रियू नक्कीच डॉक्टर होणार आणि उमा ताईंनी तुझ्यासाठी पाहिलेलं स्वप्न तू नक्कीच पूर्ण करणार" मामी बोलतात तसं प्रियाली त्यांना मिठी मारून रडू लागते. मामीला मूल नसल्याने त्यांनी प्रियालीला त्यांची मुलगी मानल होत. थोडावेळ रडून झाल्यावर दोघीजणी जेवायला जातात


*******

असेच दिवस जात असतात..प्रियाली आधी एका हॉस्पिटलमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून काम करत असते त्याचं दरम्यान तिची ओळख तिचा सिनियर असलेल्या डॉक्टर पियुषशी होते. साधारण दोन-तीन वर्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर ती तिचं स्वतःच क्लिनिक उभारते. त्यातही पियुष तिची मदत करतो.

अशातच एक दिवस पियुष तिला प्रपोज करतो तसं ती त्याला घरी येऊन आधी मामा मामीला भेट असं सांगते. तसा तो घरी येऊन मामा मामींना भेटतो. त्यावेळी मामा अनंत रावांनाही बोलावतात पण ते येतं नाहीत. प्रियाली सुद्धा मामा मामीना घेऊन पियुषच्या घरी त्याचं घर बघायला घेऊन जाते. लग्न ठरलं. प्रियाली आणि पियुषने लग्न अगदी साध्या पद्धतीने करायच ठरवलं होत.


सगळं काही अलबेल असताना एक दिवस अचानक अनंत रावांचा ऍक्सिडेंट होतो आणि त्यांच्या डोक्याला मार लागतो. शेजारचे फोन करून मामाला कळवतात. त्यांच खूप रक्त जात. रात्र खूप झाली असल्याने प्रियाली अनंत रावांना तिच्याच क्लिनिकमध्ये घेऊन जाते आणि त्यांच्यावर उपचार करते. रक्त खूप गेल्याने त्यांना रक्त चढवाव लागणार होत. पण त्यांचा रक्तगट आता तिच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध नव्हता म्हणून प्रियालीने तिचा रक्त गट तपासून पाहिला तर तिचा रक्तगट अनंत रावांच्या रक्ताशी मिळताजुळता होता, म्हणून मग तिचं स्वतः रक्त द्यायचं ठरवते.


"प्रिया पण तुझ्या बाबांना कळलं तर तूच त्यांना रक्त दिलंय ते" पियुष


"कळलं तर कळूदे..काय करतील फार फार तर मला ओरडतील, माझ्यावर चिडतील पण माझ्यासाठी आता त्यांचा जीव वाचणं अधिक महत्वाच आहे" प्रियाली म्हणते आणि पियुषला बाकीची तयारी करायला सांगून बेडवर झोपते तसं तो तिला सलाईन लावतो आणि तिचं रक्त एका बाटलीत साठवून अनंत रावांना चढवतो


साधारण अर्ध्या तासाने अनंत रावांना शुध्द येते.


आधीच धावपळ आणि त्यात अंगातल रक्त गेल्याने प्रियालीला थोडा अशक्तपणा आलेला. म्हणून ती तिथेच बेडवर पडून राहते.


अनंत रावांनी पियुषला पहिल्यांदा पाहील असल्याने आणि प्रियालीच्या क्लिनिक उदघाटनाला आले नसल्याने त्यांना कळतच नाही ते त्यांच्या लेकीच्याच क्लिनिकमध्ये आहेत. प्रियालीच क्लिनिक असल्याने त्यांची चांगली खातिरदारी करण्यात आली.


*******

दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात येतो तसे ते पुन्हा आपल्या घरी जातात आणि काही दिवसांनी प्रियालीच्या लग्नाची तयारी सुरू झाली

"विजय हे काय ऐकतोय मी..माझ्यावर उपचार त्या  मुलीच्या क्लिनिकमध्ये झाले का बाकीचे हॉस्पिटल काय ओस पडलेले का..की तिच्या क्लिनिकची गरज पडली.." अनंत राव रागारागाने म्हणाले..त्यांना शेजाऱ्यांकडून कळलेलं.. त्यांचा आवाज ऐकून रूममध्ये असलेली प्रियाली पण बाहेर येते


"हे बघा भाऊजी" विजय म्हणतच असतो की,


"काय बघू आणि काय ऐकू..तूही माझ्याशी असा  वागलास विजय. बरोबर तुझी लाडाची भाची ना खूप प्रेम उतू जात तिच्यावर तुझं" अनंत राव बोलले आणि जाऊ लागले


"हो जात प्रेम माझं ओतू तिच्यावर आणि का जाऊ नये आणि हो लेक आहे ती माझी..भाची नाही आणि तिच्या क्लिनिकमध्ये न्हेल म्हणून तुमच्यावर लवकर उपचार सुरू झाले आणि तुमची चांगली खातिरदारी करण्यात आली. तुम्ही तर नेहमी पाण्यात पाहील तिला. कधीच लाड नाही किंवा प्रेमाचे बोल नाही. आज आपल्या प्रियूच अख्ख्या गावात एक नामवंत डॉक्टर म्हणून कौतुक होतंय. लांबून लांबून लोकं येतात फक्त तिच्याकडून उपचार घेण्यासाठी का तर तिच्या हाताला चांगला गुण आहे. तिच्या हाताला चांगला गुण आहे ह्याची प्रचिती तुम्हांला एव्हाना आलीच असेल. दोन दिवसांनी तिचं लग्न आहे जमलं तर या लग्नाला" विजय म्हणतो तसं अनंत राव एक नजर प्रियालीकडे बघतात आणि निघून जातात


लग्न दोन दिवसांवर आलेलं. साध्या पद्धतीने करायच म्हटलं तरी लग्नाचे विधी होणार असतात. त्यामुळे सगळे त्या तयारीत व्यस्त असतात.


******

आज प्रियालीच लग्न होत पण प्रियाली मात्र साध्या कपड्यात बसली होती

तेवढ्यात, मामी रूममध्ये येतात


"अग प्रियू तू अजून तयार नाही झालीस? पाहुणे मंडळी यायची वेळ झाली" त्या तिला काळजीने विचारतात


तसं प्रियालीच्या डोळ्यांत पाणी येतं


"मामी प्रत्येक मुलीची ईच्छा असते. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात मिरवाव, तिचं कन्यादान कराव पण माझ्या नशिबी हेही सुखं नाहिए. बाबा असतानाही माझं कन्यादान ते करू शकतं नाही" प्रियाली खिन्नपणे म्हणते


"असं कसं मी आहे ना माझ्या भाचीच कन्यादान करायला" प्रियालीचे मामा आत येतं म्हणतात


"तिचं कन्यादान करायला तिचा बाप जिवंत आहे अजून.." एक आवाज तिथे घुमतो तसे सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात. दारात अनंत राव उभे असतात. ते एक बॉक्स घेऊन आत येतात..


"माझ्या लेकीचं कन्यादान मीच करणार" अनंत राव प्रियालीकडे बघतं म्हणतात


"बाबा.." प्रियाली जाऊन त्यांच्या मिठीत शिरते आणि रडू लागते


"मला माफ कर पोरी. उमाच्या जाण्याला मी तुला जबाबदार धरलं आणि सगळ्या सुखावर पाणी फिरवल. काल रात्री ती माझ्या स्वप्नात आलेली आणि म्हणाली झाल गेलं सगळं विसरून जा आणि प्रियालीला माफ करा. तुमचाच अंश आहे ती. अजून कितीवेळ राग धरून बसणार. काल विजय म्हणाला त्यावरुन मला सत्यता पटली. सगळीकडे तुझ्या डॉक्टर होण्याचच कौतुक आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे" अनंत राव डोळ्यांत पाणी आणून आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणतात


तशी प्रियाली त्यांना मिठी मारते ते मिठी घट्ट करतात


बाप लेकीचा झालेला मिलाप दोघं मामा मामी भरल्या डोळ्यांनी पाहत होते


"चला तयारीला लागा भटजी बुवा आणि जावईबापु आले असतील आणि हो हा तुझ्या आईचा आमच्या लग्नातला शालू तिच्या आईने दिलेला..हाच नेस" अनंत राव म्हणतात तशी प्रियाली "हो" मध्ये मान हलवते. तिची मामी तिला तयार करायला घेऊन जाते


थोड्यावेळाने, प्रियाली बाहेर येते. तिच्या आईची "माहेरची साडी" नेसून प्रियाली लग्नाला उभी राहते.


"कन्यादानाच्या विधीसाठी वधूच्या माता-पित्याने यावे" भटजी बोलतात तसे अनंत राव आणि मामा एकदमच पुढे होतात पण कसलीतरी जाणीव होऊन मामा मागे होतात


"थांब विजय..प्रियाली जेवढी माझी लेक आहे तेवढीच रादर त्यापेक्षा जास्त ती तुझी लेक आहे. जेव्हा मी तिला झिडकारल तेव्हा तू तिला आसरा देऊन स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलंस मग एकप्रकारे तूही तिचा पिताच झालास ना" अनंत राव म्हणतात तसं विजय भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघतो. प्रियालीसुद्धा "हो" मध्ये मान हलवते. तसं अनंत राव आणि मामा मामी भरल्या डोळ्यांनी आणि आनंदाने प्रियालीच कन्यादान करतात. तसं समोर लावलेल्या फोटोतून उमा ताई समाधानाने हसल्याचा भास अनंत रावांना होतो.


समाप्त_

दि. १३/१०/२०२२

©_✍नम्रता जांभवडेकर 


0