Login

माहेरपण भावजयचे भाग 3(माहेरवाशीण)

कथा नणंद भावजयच्या नात्याची


मे महिन्यात मुलांच्या सुट्टीत पंधरा दिवसांची सुट्टी काढून आलेली सत्या रोज काही ना काही बोलून शीतलला दुखवत होती. आठ दिवस होऊन गेले होते शीतल कामाला जायच्या आधी नाश्ता, स्वयंपाक, कपडे अशी सगळी कामे करून जात होती आणि वरची छोटी मोठी काम सुमन ताई नंतर करत. संध्याकाळी मात्र शीतलला कधी उशीर होणार असेल तर ती घरी फोन करून सांगायची आणि नेमकीच तिला क्लायंट सोबत अर्जंट मीटिंग लागली तस तिने घरी सुमन ताईंना फोन करून कळवल आणि विवेकला ही सांगितल.

सत्या आणि सुमन ताई दोघींनी मिळून छान हसत खेळत स्वयंपाक बनवला. आठ वाजता शितलची मीटिंग संपली तस लगेच फोन करून तिने विवेकला घ्यायला बोलावलं. घरी ताई रागावली आहे का म्हणून तिने विवेकला विचारलं तर त्याने घरात छान वातावरण आहे अस सांगितल आणि ताई चिडली नाही आहे अस बोलला. शीतलला फार बर वाटल ते ऐकून.

शीतल येईपर्यंत साडे आठ पावणे नऊ झाले होते. मुलही जेवायला बसली होती.

"या या.. महाराणी आल्या ग आई! औक्षणाच ताट तरी घेऊन ये. सत्या टोमणे मारत बोलत होती.

"काय चाललय सत्या? आठ दिवसांपासून बघते आहे मी! पण शीतल शांत रहायला सांगते म्हणून मी काही बोलले नाही. कसला राग आहे ग तुला तिच्यावर. हेच ना की तुझ्या नंदेच्या मुलीशी विवेकच लग्न झालं नाही. अग बर झालं नाही झालं ते. माझ्या लेकाच आयुष्य खराब करून ठेवलं असतं आणि हे..जे तू माहेरपण करायला येतेस ना आठ पंधरा दिवस रहायला तर ते ही येता आल नसत. मी हे का बोलतेय हे माझ्यापेक्षा जास्त चांगल तुला ठाऊक आहे सत्या. अनाथ म्हणतेस तिला पण हे बोलण्याआधी तुझी आई पण अनाथ होती हे मात्र तू विसरलीस. अपघातात माझे आई बाबा गेले आणि मी माझ्या काकांकडे मोठी झाले. माझ्यासारख्या अनाथ बाईच्या पोटी जन्म घेतलास तेंव्हा नाही तुला काही वाटल. अग बाप गेला तुमचा तेंव्हा त्याच्या पाठीवर मी तुम्हाला वाढवलं बिना बापाची पोर तुम्ही..सगळी दुनिया तुम्हाला अनाथ म्हणून हिणवत होती तेंव्हा आई - बाप दोन्ही बनून काळजी घेतली तुमची आणि तू अनाथांच्या गोष्टी करतेस.
वाह ग वाह!! आज दोन वर्ष झाली ती पोरगी तुझ्याशी जुळवून घ्यायला बघते आहे आणि तू मात्र तिला प्रत्येकवेळी घालून पाडून बोलतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला. आज त्या चाळीतून इथे या आलिशान फ्लॅट मध्ये आलो कुणामुळे आलो? हीच्यामुळे आलो. चार चाकी गाडी, दागदागिने, एवढी हौस मौज करतेस ना ती तिच्या जिवावर करतेस. याआधी तुझ्या आईने किंवा तुझ्या भावाने तुझी एवढी हौस केलेली आठवते तरी आहे का? इकडे येऊन मोठं मोठ्या ऑर्डर देतेस पण कधी आई नाहीतर भावाला काय आवडत ते घेऊन यावस वाटत का ग तुला आणि अनाथ म्हणे तिला. याद राख सत्या पुन्हा तिला अनाथ बोलशील तर.. माझी लेक आहे ती मी आहे तिची आई समजल..

"सत्या...बरोबर बोलतेय आई.. आणि आई हीच गोष्ट तुम्ही याआधी करायला हवी होती. अग किती कलेने घेते ती तुझ्या पण तू मात्र नेहमीच तिला शून्यात मोजत आलीस. विवेकला त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी वचन दिलं होत. सत्याला मी समजवेन करेल ती पण शितलचा स्वीकार पण दोन वर्षे इतकं समजावुन पण तू मात्र आहेस तशीच आहेस.
कामातून सुटून मुलांना भेटायला आलेले सत्याचे यजमान बोलले .

सत्या काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली.

काय करेल सत्या? शीतलला स्वीकारेल का?
क्रमशः
@श्रावणी लोखंडे

0

🎭 Series Post

View all