Login

माहेरपण भावजयचे भाग 4 अंतिम (माहेरवाशीण)

कथा नणंद भावजयच्या नात्याची



"जावई..माफ करा मला! पण आज सत्याने जरा अतीच केलं..म्हणून बोलले आणि ते किमया बद्दल.. म्हणजे ताईंनी चांगलेच संस्कार केले आहेत तिच्यावर पण.."सुमन ताई थोड्या ओशाळल्या.

"आई, अहो माफी नका मागू. ताईने मुलीवर कसे संस्कार केलेत हे मला चांगलच ठाऊक आहे. विवेकसाठी किमया योग्य आहे अस नेहमी सत्याला वाटायचं पण खर सांगू आई.. मला आपल्या विवेकसाठी किमया आधीपासूनच नको होती आणि त्यामुळे आमच्यात बरेचदा वाद सुद्धा झालेत. असो.. आता यावर आपण अजून चर्चा नको करत बसायला. शीतल जे झालं ते सोडून दे आणि चल मी पटकन फ्रेश होतो माझ्यासाठी गरम गरम तुझ्या हातचं छान काहीतरी खायला बनव. सत्याच्या हातचं खाऊन कंटाळा आलाय.

शीतल डोळ्यातलं पाणी पुसत आतमध्ये गेली आणि पटकन फ्रेश होऊन मटर पनिरची भाजी बनवायची तयारी करू लागली.
इकडे विवेक सत्याला मनवायला तिच्या खोलीत गेला तर ती हमसून हमसून रडत होती म्हणून आत न जाता तो मागे फिरला.

रात्री नवऱ्याच्या बोलावण्याने सत्या जेवायला आली. जेवायची औपचारिकता करून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेली. किचन मधली आवरा आवर करुन शितल पण तिच्या खोलीत गेली. सगळेच शांत होते कोणीच कुणाशी फार काही बोलल नाही प्रत्येकाला आपण चुकीचे असच वाटत होत.

दुसऱ्या दिवशी सगळे उठण्याआधीच सत्या तिच्या घरी निघून गेली. रविवार असल्याने सगळेच नऊ नंतर उठले होते कारण रात्री लवकर झोपूनही प्रत्येकजण विचार करत बराच उशीर जागा होता.

सत्याने तिच्या नवऱ्याच्या फोनवर मॅसेज करून ठेवला होता. सगळे उठले की सगळ आवरून झाल्यावर त्यांना आपल्या घरी घेऊन या असा.
सत्याचा मॅसेज यजमानांनी सुमन ताईंना सांगितला तसे सगळेच टेन्शन मधे आले पण विचारात वेळ वाया न घालवता सगळे पटापट आवरून निघाले.

सत्याच्या दारासमोर गाडी थांबली. कुठला सण नाही काही नाही पण दारासमोर फुलांची छान रांगोळी काढली होती. उंबरठयावर पणत्या लावल्या होत्या. दारावर फुलांच तोरण लावल होत आणि घरात शिंपडलेल्या अत्तराचा सुगंध अगदी बाहेर पर्यंत येत होता.

गाडीचा आवाज आला तशी सत्या बाहेर आली. हातात औक्षणाचं तबक होत चांदीच्या छोट्या तांब्यात पाणी आणि छोट्या वाटीत भाकर तुकडा होता. मोरपिशी रंगाची काठाची साडी नेसून,नाकात नथ आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळलेली सत्या दारात आरतीच ताट घेऊन उभी होती. हे सगळ काय चाललय कुणालाच समजेना. सत्याने नवऱ्याला खूण केली तसा तो पुढे येऊन शीतल आणि विवेकला पुढे घेऊन आला.

सत्याने दोघांच्या पायावर पाणी घातले, त्यांना हळदी कुंकू लावून दोघांवरुन भाकर तुकडा ओवाळून टाकला. हे सगळ बघून शीतलचे डोळे पाणावले.

"या.. आत या." सत्या

"सत्या.. अग काय हे? अचानक सकाळी निघून काय आलीस आणि मग इकडे बोलावून घेतलस आणि आता हे सगळ!" सुमन ताई

"हो अग ताई.. हे सगळ काय अचानक?" विवेक

"कुठल्या तोंडाने बोलू? शीतल माफ कर ग मला. मी चुकले माझा अहंकार दुखावला गेला होता म्हणून मी अशी वागत होते. मी निवडलेल्या मुलीशी विवेकच लग्न झालं नाही म्हणून तुझ्यावर राग धरून बसले. तुला एवढी बोलले. चुकले मी शीतल.. माफ कर मला. " सत्या शितलचा हात हातात घेत बोलत होती.
आई.. खरच ग..मी विसरले! बाबा गेल्यानंतर रक्ताच पाणी करून तू आम्हाला वाढवलस आम्हाला चांगल शिक्षण दिलंस आणि मी.. मी मात्र शिकून सवरून अशिक्षितच राहिले. आज तू सुखाचे चार दिवस बघते आहेस ते शितलमुळे हे मला कधी समजलच नाही. विवेक सोबत ती ही बाहेर जॉब करून घर सांभाळते हे कधी मी पाहिलच नाही. वयाने लहान असूनही शीतलने सगळ समजून घेतल आणि मी मात्र असमंजस राहिले.
अहो..तुमची पण माफी मागते मी. इतक्यावेळा समजावून सुद्धा मी कधीच समजून नाही घेतल. तुमच्याशी वाद घालत राहिले. माफ करा मला. विवेक तुला तर काय बोलू.. मी वाईट वागत असूनही कधीच तू मला उलट उत्तर दिलं नाहीस. सगळ्यांनी माफ करा मला." सत्या खाली मान घालून हुंदके देऊन रडत होती.

"वन्स.. अहो बस झालं! नका वाईट वाटून घेऊ. झालं गेलं गंगेला मिळालं. हो की नाही विवेक." शीतल

"हो,अगदी बरोबर सत्याचे यजमान बोलले. आणि आई आज जावई म्हणून काही मागतो आहे द्याल अशी अपेक्षा करतो."

"अहो जावई.. हात काय जोडताय पाप लागेल हो मला! आणि मी काय तुम्हाला देणार! देवाने जावयाच्या रुपात दुसरा मुलगाच दिला आहे मला. " सुमन ताई

"हो ना, मग आज पासून आठ दिवस शीतल इकडे आमच्या सोबत तिच्या घरी राहणार आहे. सगळया मुली लग्न झालं की माहेरवाशीण म्हणून चार आठ दिवस माहेरी राहून येतात. गेली दोन वर्षे शीतल कुठेच गेली नाही म्हणून इथून पुढे तुमची लेक तुमच्या घरी माहेरपणाला येण्याआधी माझी ही बहिण तिच्या माहेरपणाला तिच्या या माहेरी येईल माहेरवाशीण म्हणून..
समाप्त..
@श्रावणी लोखंडे.


0

🎭 Series Post

View all