माहेरपण हवं-1

माहेरपण, एक हळवा कोपरा
सूर्य मावळतीला झुकला होता आणि सोसायटीच्या बागेत एक वेगळीच गडबड होती. संध्याकाळी सर्व आज्या एकत्र जमत, गप्पा मारत. त्या साऱ्या आजी आपल्या रोजच्या कामकाजातून काही काळ आराम करत आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या होत्या. त्या आपापल्या “माहेरपणाच्या” कथा सांगत होत्या आणि हसत हसत त्यांच्या आयुष्यातले अनमोल क्षण उलगडत होत्या.

कुसुम आजी आपल्या आवाजातला कंप लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या,

“माझी आई किती प्रेमळ होती. तिच्या हातच्या चविष्ट पदार्थांचा गंध आजही मनात रेंगाळतो. तिच्या कुशीत बसून जेवण करणं म्हणजे पर्वणीच होती.”

सुमती आजींनी हाताच्या बोटांवर हळूच पाणी पुसलं.

“आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपणं, तिच्या हातून डोकं कुरवाळून घेणं, हे सुख काही औरच होतं,”

त्या उदास स्वरात म्हणाल्या.

हे सगळं अनुजा कान देऊन ऐकत होती. ती त्यांच्या भावना समजून घेत होती. सासूच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिला खूप काही सांगून गेले. त्या अश्रूंमध्ये अनुजाला एक वेदना, एक ओलावा जाणवला, जणू त्यातून तिच्या माहेरच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.

अनुजाच्या मनात एक कल्पना चमकली. ती तिच्या वयाच्या इतर मैत्रिणींकडे वळली.

“आपल्या सासूबाईंना त्यांच्या माहेरच्या आठवणी जगण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे,”

ती मनोमन ठरवून सांगू लागली.अनुजाला आपल्या सासरी इतकं प्रेम मिळत होतं की सासर आणि माहेरचा फरक तिला कधी कळलाच नव्हता.

अनुजाला लहानपणापासूनच कथा ऐकायला आवडायचं. ती लहानपणी आईला ऐकायची आणि विचारायची,

"आई, माहेर म्हणजे काय? तिथं कसं असेल?"
क्रमशः

🎭 Series Post

View all