Login

मैत्री एक मखमली धागा भाग २

मैत्री- एक मखमली धागा भाग २
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक -मैत्री- एक मखमली धागा भाग २

लहान लहान तीन दीर, एक नणंद, सासू-सासरे असे कुटुंब.तीन दीर, नणंद यांचे शिक्षण, त्यांना हवा नको ते बघणं अगदी आईसारखी जबाबदारी होती माझ्यावर. पण माझे दीर आणि नणंद एवढे स्वभावाने छान होते की, अगदी बहिणभावासारखे राहायचो आम्ही.

" अगंबाई,एवढे मोठे कुटुंब! किती कामं निघत असतील गं. मला नसते बाई जमले हे सर्व." सीमा म्हणाली.

"मग आमच्या जीजूंची तर पंचाईत झाली असेल." वसुधा खट्याळपणे म्हणाली.

"काहीतरीच काय गं वसुधा." माधुरी लाजत म्हणाली.

"अगं सीमा, सुख हे मानण्यावर अवलंबून असतं. मला या कुटुंबातच सुख वाटत होतं."

"हो गं माधुरी, तुझा स्वभाव पहिल्यापासूनच प्रेमळ होता."रितू म्हणाली.

"आज सर्व दीर नोकरीवर आहेत. सर्वांची लग्न झाली आहेत. नणंदेचेही लग्न झाले आहे. मलाही दोन मुले आहेत. तेही आपापल्या संसारात खुश आहेत. सर्वजण आपापल्या ठिकाणी मजेत आहेत. अधूनमधून येत असतात सर्व.आजही आम्ही सर्वजण सणावाराला एकत्र येतो खूप मजा येते गं." माधुरी म्हणाली.

आता चुलबुली सरिता सांगू लागली, " ग्रॅज्युएशन नंतर पीएचडी केले व त्याच कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून रुजू झाले. माझ्या लग्नात तर गंमतच झाली. तुम्हाला माहीतच आहे माझा स्वभाव. म्हणूनच तुम्ही मला नेहमी चुलबुली म्हणायच्या. माझ्या लग्नाची गंमत सांगते. मंगलाष्टके झाली. आम्ही दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. थोड्यावेळात सुलग्न सुरू झालं. सुलग्न लावताना माझ्या मामेभावाने मला एवढा जोरात चिमटा काढला की, मी जोरात ओरडले. माझा नवरा, इतर मंडळी माझ्याकडे पाहू लागले. जेव्हा नवऱ्याला कळलं की, माझ्या मामेभावाने  चिमटा काढला. तेव्हा माझ्याकडे पहात त्याचे डोळे आग ओकू लागले.

लोकांना ऐकू जाणार नाही अशा शब्दांत त्याने माझ्यावर राग काढायला सुरुवात केली. माझ्या मामेभावाचा तसा काही उद्देश नव्हता. तो थोडा खोडकर स्वभावाचा होता. बाकी काही नाही. प्रकरण हाताबाहेर गेले. मग मीही माझ्या नवऱ्याला ठणकावून सांगितलं, मला आता तुझ्यासोबत यायचंच नाही. मग सासरकडचे सारवासारव करू लागले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. "

"आज तुम्ही केवळ गंमतीसाठी माझ्यावर संशय घेतला. उद्या तुमच्या घरी आल्यावर काय खात्री?  एकदा संशयाचे भूत मानगुटीवर बसले की, सर्व संपलं म्हणून समजा."

"अगदी बरोबर." माधुरी म्हणाली.

"नवरदेव व सर्व वऱ्हाडी मंडळी तशीच आल्या पावली परत गेली. नंतर मी बरेच वर्ष लग्नाचा विचारही केला नाही. माझ्या लहान बहिणभावंडांची लग्न झाल्यावर मी लग्न केलं. आज मी सुखी आहे."

"आता माझंही ऐका." रितू म्हणाली.

"मैत्रिणींनो, तुम्ही मला नेहमी म्हणायच्या, तू पक्की रडूबाई आहेस. सदैव तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात. हो ना? आमच्या ह्यांना एक लहान बहीण. तिचे लग्न व्हायचे होते. ती थोडी खट्याळ स्वभावाची होती. ती मला नेहमी म्हणायची, अगं वहिनी, हस नां गं थोडी. माझ्या दादाचा चेहरा बघ किती हसरा आहे."

"अरे दादा, वहिनीला  दंतकांती टूथपेस्टची जाहिरात करायला पाठवायचं काय रे ?" काय हो वन्स, तुझं आपलं काहीतरीच. असं म्हणून मी वेळ मारून न्यायची.

"मी लग्नाआधी बँकेत नोकरी करायची. पुढे मी माझ्या सासरच्या गावी बदली करून घेतली."

पुढील भाग अवश्य वाचा.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
0

🎭 Series Post

View all