मैत्रीचा हळवा धागा. विषय…आपलेच दात, आपलेच ओठ लघुकथा
मोहनपूर गावात सध्या खूप धावपळ आणि लगबग दिसत होती. कारण गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीचा महिना होता. अर्जुनराव आणि विश्वासराव ही दोन नावे गावात सगळीकडे चर्चेत होती. दोघेही दहावीपासूनचे मित्र.
अर्जुनराव पाटील म्हणजे शांत स्वभावाचा माणूस. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊन काम करणारा, गावाचा विचार करणारा. तर विश्वासराव शिंदे थोडा तडकफडक, जलद निर्णय घेणारा होता आणि बऱ्याचदा आक्रमक होणारा होता. दोघे मित्र असले तरी राजकारणाच्या या वेगळ्या वाटांमुळे त्यांच्यात कटुता निर्माण झाली होती.
विश्वासराव एकदा अर्जुनरावांच्या घराच्या पायरीवर उभा राहून म्हणाला,
“मित्रा, एकदा समोरासमोर निवडणूक लढवूया. लोकांचा निर्णयच आपल्यातला खरा नेता ठरवेल.”
अर्जुनराव शांतपणे म्हणाला,
“ठीक आहे. पण तू जिंकण्यासाठी काही चुकीचे मार्ग वापरशील का?”
विश्वासराव हसत म्हणाला,
“राजकारणात काहीच चुकीचं नसतं, मित्रा. जिंकणं महत्त्वाचं!”
विश्वासरावाचे हे बोलणे ऐकून अर्जुन राव जरा चिंतेत पडले कारण अर्जुन रावांचा स्वभाव मुळातच शांत संयमी आणि कामावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर विश्वासराव सत्तेचा लालसी होता
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विश्वासरावने अर्जुनरावांच्या घराण्यावर टीका करत गावकऱ्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. काही लोक विश्वासरावच्या शब्दांना बळी पडले.
गावकऱ्यांत हलकाशी कुजबुज सुरू झाली. काही लोक अर्जुनरावांच्या शांत स्वभावाला ओळखून होते, तर काही विश्वासरावच्या जोशाने प्रभावित होत होते.
विश्वासरावने गावभर आपला डंका वाजवायला सुरुवात केली होती. मोठ्या सभा, ढोलताशांचा गजर, मोठमोठ्या घोषणा – सगळीकडे त्याचाच गाजावाजा.
अर्जुनराव मात्र थोडा वेगळ्या पद्धतीने प्रचार करत होता. शांतपणे, घराघरात जाऊन, लोकांना भेटून त्यांची समस्या ऐकून घेत होता.काहींना अर्जुनरावाचे शांत वागणे भावले.
निवडणूक संपल्यानंतर एके दिवशी अर्जुनराव आणि विश्वासराव मंदिराच्या मागच्या गल्लीत अचानक समोरासमोर आले.
“विश्वास, मी कधी तुझ्यावर व्यक्तिगत टीका केली नाही, मग तू का करतो आहेस?” अर्जुनराव विचारत होता.
“राजकारण आहे हे! कोण जिंकतो आणि कोण हरतो, याला कुणी मित्र नसतो!” विश्वासराव उत्तरला.
“ मित्राचा अपमान करून जर का जिंकायचं असेल, तर त्या विजयाचा उपयोग काय?” अर्जुनराव शांतपणे म्हणाला.
विश्वासराव काहीच बोलला नाही, फक्त निरुत्तर होऊन तिथून निघून गेला.
****
निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अर्जुनराव सरपंच झाले. गावकऱ्यांनी त्यांच्या सचोटीवर आणि कामावर विश्वास ठेवला.
निवडणुकीत हरल्यावर विश्वासराव एकदम चिंतातूर झाले आणि एकटेच बसले असताना त्यांचं दुसरं मन त्यांना म्हणू लागलं,
“विश्वासराव अर्जुन रावाने जे केलं त्यापेक्षा तू किती चुकीचं केलं. तू त्याच्या घराण्यावर, त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस असं करून तुला सत्ता मिळणार होती का? मिळाली का? का म्हणून तू असं वागलास ? त्या उलट अर्जुन राव घरोघरी जाऊन शांतपणे सगळ्यांच्या समस्या विचारून त्या सोडवण्याचा शब्द देत होते. म्हणून जनतेने त्यांना स्वीकारलं.
बराच वेळानंतर विश्वासरावांना आपली चूक कळली आणि ते शर्मिंदे झाले.
विश्वासराव निकालानंतर अर्जुनरावांकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर पराभवाचं दु:ख होतं, पण त्याच वेळी त्याच्या डोळ्यांत खेद दिसत होता. तो म्हणाला,
“मित्रा, मी तुला नको ते बोललो, निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते केलं. आज वाटतंय, मी तुला शब्दांनी खूप दुखावलंय. हे घाणेरडे शब्द माझ्या तोंडून या ओठांनी बाहेर कसे येऊ दिले? तुझं माझं नातं इतकं जवळचं असतानाही मी सत्तेच्या लालसेने तुझ्या मनाला जखमा केल्या. मला क्षमा कर.”
विश्वासराव रडत आपले दोन्ही हात जोडून म्हणाला.
यावर अर्जुनरावांनी हसत विश्वासरावांचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले,
“विश्वासराव , दात ओठांवरच येतात, पण शेवटी आपणच ठरवायचं की त्यांनी जखम करायची की माफ करायचं. चल, निवडणूक संपली आता विसर सगळं. मला माहित आहे तुझं आपल्या गावावर किती प्रेम आहे.”
“काय उपयोग? या निवडणुकीत माझ्या जवळच्या मित्राला मी कायमचा गमाऊन बसलो.”
विश्वासराव अजूनही रडत होते.
“ कोण म्हणतं तू मला गमावलस. विश्वासराव तुला निवडणूक जिंकायची होती ते गावाचं भलं करण्यासाठी. मी तुला लहानपणा पासून ओळखतो तू मनाने दुष्ट नाहीस. तुझ्यात संयम नाही. तुला सगळं झटपट करायचं असतं. त्यामुळे ही चूक तुझ्या कडुन घडली. आपल्या दोघांचंही या गावावर प्रेम आहे. आपण दोघं मिळून आपल्या गावाचं भलं करूया.”
विश्वासरावने आपलं डोकं झुकवलं आणि दोघांनी हात मिळवला. गाव पुन्हा एकसंध झालं, राजकारणाच्या डावपेचांपेक्षा माणुसकी जिंकली.
आपलेच दात, आपलेच ओठ या म्हणी नुसार अर्जून रावांनी आपल्या मित्राचे दोष वेळीच सावरून त्याला जगासमोर अपमानित होऊ दिलं नाही. शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ आपल्या जवळ असले तरच आपण हसू शकतो. अर्जूनरावांच्या कृतीमुळे पुन्हा दोघं मित्र एक झाले. आता गावात खेळीमेळीचे वातावरण राहणार होतं म्हणून गावकरी निर्धास्त झाले.
—-----------------------------------------------
©® मीनाक्षी वैद्य.
—-----------------------------------------------
©® मीनाक्षी वैद्य.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा