Login

मैत्रीची वेल

माझ्या मैत्रीचे दोन शब्द.... गुंफलेली वेल... मैत्रीच्या धाग्यात विणणार.
मैत्रीच्या वाटेवरून जाताना
गाव तुझे लागले.....
विसावा घेण्यासाठी
मन माझे थांबले....
........................ नकळत जुळत गेली मैत्रीची नाती. कधी हे बंध घट्ट मैत्रीचे बनले कळलेच नाही. मी फेसबुकवर ईराची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आहे हे बघितले आणि जॉईन झाले. पण या स्पधेबदद्ल काहीच माहित नव्हते. कशी असेल स्पर्धा? कसा ग्रुप असेल? सगळं काही नवीन होत माझ्यासाठी. मी ग्रुप नंबर चार मध्ये होते. सुरुवातीला मला काहीच समजत नव्हते, नक्की काय चाललं आहे. ग्रुपमध्ये सगळे अनोळखीच होते. जशी स्पर्धा सुरू झाली तशी हळूहळू सगळ्यांची ओळख झाली. तशी आमची टिम खूप भारी आहे. जेव्हा स्पर्धा सुरू झाली, त्यातील सेतू बंध हे कोणकोणाबदद्ल लिहिणार सर्वांनी सांगितले. मी लगेच नम्रताचं नावं घेतलं, मी तिच्याबद्दल लिहिणार. त्याक्षणी मला वाटलं, अरे मी नाव तर सांगितले पण माझी साधी ओळखही नाही, आपण कसं लिहिणार तिच्यावर?
      
अचानक एक दिवस नम्रतानेच मेसेज केला. त्या दिवसापासून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला असं झालं की नक्की ताई कोणाला बोलायचं? ती मला बोलायची तुझं लग्न झालं म्हणजे तू मोठी आहे. मी लहान यावरून किती वेळ गप्पा मारत बसलो. ती एक फुलपाखरू, एक सुंदर मन, निरागस असे भाव. डोळे म्हणजे चमकणाऱ्या चांदण्या, नेहमी हसतमुख, बडबड करणारी नम्रता असं म्हणायलाही हरकत नाही. कोणालाही आपलेसे करेल अशी नम्रता. मुर्ती लहान पण किर्ती महान. तिच्यामध्ये खूप कला आहेत. मला नेहमी तिचं कौतुक वाटत. मी तिला बोलते पण तु खूप हुशार आहेस. हुशार माणसाचं नेहमी कौतुक करावं. असं मला वाटतं.
            
तिची लेखणी मनाला एकदम भावते. त्या ओळी आपल्या सोबत घडत आहे असं वाटतं. तिचं वास्तव  दर्शी लेखन मनाला आपलसं करतं. चारोळी असो किंवा कथा असं वाटत आपणच तिच्या कथेमध्ये आहोत. लिखाणासोबत तिच्याकडे वेगवेगळ्या कला आहेत. डान्स, वकृत्व यासुद्धा कला खूप छान करते. स्कूलमध्ये असताना तिला डान्स आणि वकृत्व स्पर्धेत बक्षिसेही मिळाली आहेत. तिचा एक गुण मला खूप आवडतो. जर कोणी नाराज असेल तर त्याला हसवायचं कसं, हे तिला चांगलं माहीत आहे. ती आपल्या माणसांची खूप काळजी करते. नकळत जुळलेली नाती घट्ट कधी होतात समजतच नाही. नम्रता नेहमी सकारात्मक असते.
    
एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते. एक दिवस अचानक नम्रताने फोन केला. तेव्हा आम्ही दोघी दिड तास बोलत होतो. मैत्रीला गप्पा मारायला विषय लागत नाही. किती बोललो तरी कमीच वाटते ना? तिला नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. जशी तिची लेखणी आहे तशी ती संवाद सुद्धा छान करते.
      
नम्रताचं लेखिका होण्याचं स्वप्न पूर्ण होवो आणि ते होणार याची मला खात्री आहे. नम्रता खूप पुढे जा. खूप मोठी हो. पुढील यशस्वी आयुष्यासाठी माझ्याकडून नम्रताला खूप खूप शुभेच्छा. हसत रहा आणि हसवत रहा. हे मैत्रीचे बंध कधी न तुटो.

दिले वचन मैत्रीला
अतुट बंधनाचे....
जपून ठेवूया
नाते ऋणानुबंधनाचे....
©® रेश्मा बोडके. ✍
0