माझा सरदार ! 4

.
संध्याकाळी वाड्यावर एक बातमी येऊन धडकली. महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले होते. बाजी जेधे मोहिमेवर निघण्याची तयारी करत होते. नागोजीलाही मोहिमेवर जाण्याची फार इच्छा होती पण बाजी जेधे यांनी स्पष्टपणे नकार दिला. महाराजांनी नागोजीला येण्यास मनाई केली.

" नागोजीराव , तुमचा विवाह होऊन एक मासही उलटला नाही आणि तुम्ही मोहिमेवर जाण्याच्या गोष्टी करताय ? सूनबाईंचा विचार करा. " सर्जेराव बाजी जेधे म्हणाले.

" आधी लगीन कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणणारे तानाजीराव मालुसरे यांचाच वारस आहोत आम्ही. आबासाहेब आम्हाला मोहिमेवर येऊ द्या. आम्हाला आजोबांचा गौरव वाढवायचा आहे. पराक्रम गाजवायचा आहे. "

" ही मोहीम काही शेवटची आहे का ? अजून तुमचे वय काय ?"

" आबासाहेब , हात जोडतो. सेनापतीपद नको. महाराजांचा एक सर्वसामान्य सैनिक म्हणून फौजेत सामील करून घ्या. दस्तुरखुद्द छत्रपतींच्या झेंड्याखाली लढण्याची संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. वय म्हणाल तर तुम्हीही माझ्याच वयाचे असताना स्वराज्याचा ध्वज राखला होता. "

" सूनबाईंचे काय ? त्या नवीन आहेत इथे. सोडून जाणार त्यांना ?" तुळजाबाई म्हणाल्या.

तेवढ्यात तिथे गोदू आली.

" ह्यांना मोहिमेवर जाऊ द्या. जर इथे राहिले तर कायम अस्वस्थ राहतील. मन रमणार नाही. स्वराज्य महत्वाचे. मग संसार. स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजीआजोबांचे घर आहे हे. यांना अडवणे योग्य नाही. "

नागोजीला गोदूचा अभिमान वाटला. मोहीमेला जाण्याची तयारी सुरू झाली. अखेरीस तो दिवस उजाडला. नागोजीने गोदूच्या कक्षात प्रवेश केला. गोदूने त्याचे औक्षण केले.

" गोदूबाई , तुमच्यासाठी हा शालू आणि काही दागिने आणले आहेत. "

" पण याची काहीच आवश्यकता नव्हती. "

" असू दे. आम्ही मोहिमेत पराक्रम गाजवून जेव्हा परत येऊ तेव्हा तुम्ही हा शालू नेसून , दागिन्यांनी सजून आमची आरती ओवाळायला या. येणार ना ?"

गोदूने होकारार्थी मान हलवली.

" आपल्या प्राजक्ताच्या झाडाचीही काळजी घ्या. वेळेवर पाणी घालत जा त्याला. "

गोदूचे नेत्रे पाणावली. हुंदका देत तिचे मुख कधी नागोजीच्या छातीवर स्थिरावले तिलाही कळले नाही. नागोजीने बोटांनीच तिचे अश्रू पुसले. तिच्या गालावर हात ठेवला.

" काळजी घ्या. स्वतःचीही आणि कुटुंबातील सदस्यांची. येतो आम्ही. "

नागोजी निघाला. वाड्यातून जेधे पुरूष मंडळी बाहेर पडली. गोदू धावतच गच्चीवर आली. पांढऱ्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन नागोजी दिमाखात मोहीमेवर जात होता. डोळ्यात स्वप्ने होती. गोदू त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच बसली. गोदूला खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. गोदू वळली. समोर गुणवंता उभी होती.

" गोदू , तू प्रेम करते ना भाऊजींवर मग का जाऊ दिलेस मोहिमेवर ? हट्ट का नाही धरला ?"

" गुणवंता , माझे प्रेम माझ्या सरदारावर. पण माझ्या सरदाराचे प्रेम स्वराज्यावर. खऱ्या प्रेमात जोडीदाराला त्याचे ध्येय गाठण्यात मदत करायची असते. त्याच्या वाटेतला काटा बनायचा नसतो तर पाठीवरची ढाल बनायची असते. मीही तेच केलं. त्यांना मदत केली. "

***

मराठ्यांची भलीमोठी फौज घेऊन महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले होते. या फौजेत हंबीरराव मोहिते , धनाजी जाधव , संताजी घोरपडे , म्हाळोजी बाबा घोरपडे , बहिर्जी घोरपडे , येसाजी कंक अशी मातब्बर मंडळी होती. सध्याच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराजांच्या फौजेचा मुक्काम होता. महाराज आपल्या शामियान्यात विसावा घेत होते. रात्रीचा प्रहर होता. गार वारा सुटला होता. नागोजीला निंद्रा येत नव्हती. गोदूसोबत आपण अन्याय केला अशी खंत त्याला वाटत होती. प्राजक्ताचे झाड दिसले की त्याला गोदूची आठवण यायची. छावणीत इकडेतिकडे फिरत असतानाच त्याची नजर काही कानडी लोकांवर पडली. त्या लोकांना महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण सैनिक त्यांना अडवत होते. नागोजी त्या दिशेने गेले.

" काय भानगड आहे ? कसला गोंधळ आहे ?"

" महाराजांना भेटायचं म्हणत आहेत. घातपात असू शकतो. "

त्या लोकांनी नागोजीसमोर हात जोडले.

" फार दुःखी आणि त्रस्त वाटत आहेत. बहुधा यवनांनी यांचा छळ केला असावा. यांच्याकडे शस्त्रे आहेत का तपासा आणि महाराजांसमोर घेऊन चला."

सैनिकांनी त्या लोकांना तपासले. मग नागोजी त्या लोकांना घेऊन महाराजांजवळ गेला. महाराजांना पाहताच ती लोक गुडघ्यावर टेकून रडू लागली.

" न्याय करा छत्रपती. न्याय करा. "

" तुमची कैफियत मांडा. "

" मियाना बंधू हिंदूंचा फार छळ करतात महाराज. आमचे रक्षण करा. आम्हाला भयमुक्त करा. त्यांच्याकडे कडव्या पठाणांची फौज आहे. गोठ्यातील गायी कापतात आणि घरातील माय भ्रष्ट करतात. मंदिरे फोडतात. बायकांना भर बाजारातून उचलून नेतात. हिंदूंना बाटवतात. " ते लोक गाऱ्हाणी मांडत होते.

शिवरायांचे डोळे पाणावले.

" हिंदुस्थानात हिंदूंची काय ही अवस्था ? गागाभट्ट यांनी जेव्हा आमचा राज्याभिषेक केला तेव्हाच सर्व हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली. नागोजी , तातडीने सर्वाना बोलवा. या पीडित रयतेला नवे वस्त्र आणि हातात काही सोनेनाणे देऊन पाठवा. "

" जी महाराज. " मुजरा करून नागोजी निघून गेले.

" आपण काळजी करू नका. मियाना बंधूंना आम्ही बुडवू. " छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले.

***

महाराजांनी योजना आखली. चाळीस हजाराची फौज घेऊन महाराज विजापूरच्या उत्तरेच्या दिशेने जात गोवळकोंड्याच्या बादशहाला भेटायला निघाले. सोबत येसाजी कंक आणि इतर काही मंडळी होती. दहा हजाराची फौज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवली. या फौजेत बहिर्जी घोरपडे , संताजी घोरपडे , धनाजी जाधव , सर्जेराव जेधे आणि नागोजी जेधे हेदेखील सामील होते. महाराजांनी मियानाला बुडवण्याचा आदेश दिला आणि त्यांनी पुढे कूच केले. सरसेनापती हंबीरराव यांनी मोहिमेची आखणी केली.

***

कारीगावात राजस्थानहून एक व्यापारी आला होता.
महाभारताच्या विविध प्रसंगावर एका चित्रकाराने काढलेली सुरेख चित्रे त्याच्याजवळ होती. तुळजाबाईंनी श्रीकृष्णाचे चित्र विकत घेतले.

" हे कसले चित्र आहे ?" गोदूने विचारले.

" अभिमन्यूच्या बलिदानानंतर शोक करणाऱ्या उत्तरेचे. " व्यापारी म्हणाला.

गोदूच्या मनात विचारांचे काहूर माजले. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर तरुण उत्तरेने आपले उभे आयुष्य एकटेपणात कसे कंठले असेल ? उत्तरेबद्दल नकळतपणे मनात सहानुभूती निर्माण झाली. गोदूने ते चित्र विकत घेतले.

***

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सर्वत्र आपले हेर पेरले. त्यांना नागोजीचे विलक्षण कौतुक होते. सर्जेरावांना नेहमी म्हणत तुमचा मुलगा इतिहासात नाव काढेल. पराक्रम गाजवेल.

बेळगाव , हुबळी , संपगाव मार्गे फौज कोप्पळच्या दिशेने निघाली. मराठ्यांनी घटप्रभा , मलप्रभा नद्या ओलांडल्या. रावणाची जशी लंका तशी मियाना बंधूसाठी कोप्पळचा गड होता. एकेकाळी जैन लोकांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेला हा बलाढ्य गड " दक्षिणेचे द्वार " म्हणून ओळखला जाई. हा गड चंद्रगुप्त मौर्यच्या काळात बांधला गेलेला होता. सर्वप्रथम सरसेनापतीनी घोरपडे सरदारांना पाठवून आजूबाजूचे किल्ले जिंकले. मग मराठ्यांचा मुक्काम येलबुरगाला पडला. आजूबाजूच्या किल्ल्यावर भगवा फडकल्याचे कळताच मियाना बंधूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी तक्रार केलेल्या रयतेची छळवणूक केली. त्यांच्यावर चौकी पहारे बसवले.

***

रात्रीचा प्रहर होता. अब्दुल रहीम याने हुसेनखानच्या कक्षात प्रवेश केला.

" भाईजान , आपण बोलावले ? काफरांची एखादी नवी स्त्री हवी आहे का उपभोगायला ?" हुसेनच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेल्या एका स्त्रीकडे पाहत हुसेनचा भाऊ अब्दुल रहीम म्हणाला.

" नाही. आधी मराठ्यांना चिरडून टाकू मग काफरांच्या स्त्रियांना नासवू. "

" म्हणजे ?" अब्दुल रहीम म्हणाला.

" येलबुरग्याला फौज आहे हंबीररावची. आपण उद्या पहाटे अचानक त्यांच्या फौजेवर हल्ला करायचा. गाफील असलेले मराठे कापले जातील. सरसेनापतीच मृत्युमुखी पडला तर छत्रपतीचे बळ कमी होईल. विजापूर दरबारात आपला वचक वाढेल. बादशहाची आपल्यावर कृपा होईल. "

" सुभान अल्लाह. काय योजना आहे ! " अब्दुल रहीम म्हणाला.

" तयारी सुरू कर. "

हुसेनखानच्या गादीवर एक नग्न स्त्री मरणप्राय अवस्थेत पडली होती. हुसेनखान दुसरीकडे जाताच ती स्त्री उठली. हुसेनखानने तिला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली थैली दिली होती. सैनिकांना लाच देऊन कशीबशी ती किल्ल्याबाहेर पडली. धावत धावत , देहातील सर्व प्राण एकवटत ती मराठ्यांच्या छावणीत पोहोचली. नागोजीने तिला जखमी अवस्थेत पाहिले. तिच्या पायातून रक्त वाहत होते. नागोजीने लगेच तिला पाणी दिले.

" यवन पहाटे हल्ला करणार आहेत. गाफील राहू नका. "

" ताई , हे तुम्हाला कसे कळले ?"

" त्या हुसेनने मला उचलून रात्रभर उपभोगले. माझ्यासमोरच त्या राक्षसाने ही योजना बनवली. "

त्या स्त्रीने शेवटचा श्वास घेतला. नागोजीला फार वाईट वाटले.