पहाटेच्या प्रहरी कडव्या पठाणांची फौज घेऊन हुसेन खान मियाना याने मराठ्यांवर हल्ला केला. गाफील मराठे सहज कापले जातील असे त्याला वाटले. पण त्याचा भ्रमनिरास झाला. मराठे मोर्चेबांधणी करत होते. युद्ध सुरू झाले. मराठे जराही न डगमगता यवनांशी झुंज देत होते.
" हर हर महादेव "
" अल्लाहुअकबर दिन दिन " असे जयघोष आसमंतात घुमत होते.
मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. नागोजीनेही रौद्र रूप धारण केले आणि सर्व शत्रूंना तो कापत सुटला.
दुर्बिणीतून हुसेनला नागोजी दिसला.
दुर्बिणीतून हुसेनला नागोजी दिसला.
" हा किती कोवळा तरुण आहे ! या वयात आम्ही दारूच्या नशेत आणि सुंदर सुंदर स्त्रियांच्या मिठीत असायचो. अल्लाहने काफरांच्या मुलांना कोणत्या मातीने बनवले आहे कुणास ठाऊक. या वयात रणभूमीवर मरायला आला आहे आणि पराक्रम गाजवत आहे. "
मराठ्यांची फौज जिंकत होती. हुसेन खानाने हत्ती काढला आणि तो हत्तीवर बसला. आपला पराभव होईल हे त्याने जाणले. म्हणून त्याने रणभूमीवरून पळ काढण्याचा निर्णय घेतला. नागोजीचे लक्ष हुसेनकडे गेले. आपला घोडा त्याने हुसेनकडे वळवला.
" हुसेन , पळून कुठे जातोय ? युद्ध कर. "
" कोण आहेस तू ?"
" आम्ही कान्होजीराजे जेधेचे नातू नागोजी आहोत. "
" वाह ! रक्तातच पराक्रम आहे. आम्ही असे ऐकले आहे की स्वराज्यात वतन दिले जात नाही. त्या शिवाजीने.."
" छत्रपती शिवाजी महाराज. "
" हा. छत्रपती शिवाजी महाराजने तुझ्या आजोबांचे वतन घेतले. आम्ही तुला वचन देतो की जर तू आमच्यात सामील झाला तर तुला तुझे वतन मिळेल."
" मियाना , तुझे वतन नको. तुझे मुंडके हवे आम्हाला. कान्होजीच्या नातवाला लाच देतोस ? आमच्या रक्तातच निष्ठा वाहते. "
नागोजीने एक भाला हुसेनच्या दिशेने फेकला. दुर्दैवाने हुसेनने तो भाला चुकवला. मग हुसेनचा हत्ती वळला. तो पळून जाऊ नये म्हणून नागोजीने घोड्यावरून एक उडी मारली आणि त्या हत्तीच्या गंडस्थळात एक भाला घुसवला. तो हत्ती वळला आणि बिथरला. नागोजीने त्या हत्तीच्या सोंडेवर वार केले. हुसेनने इशारा देताच काही पठाणांनी नागोजीला घेरले. नागोजी त्वेषाने लढत होता. मग हुसेनने एक बाण मारला आणि तो बाण नागोजीच्या डोक्यात घुसला. नागोजी जमिनीवर पडले. तेव्हा तिथे धनाजी जाधव आणि काही मराठा सैनिक आले. त्यांनी हुसेनला कैद केले. युद्ध संपले. सर्जेरावांनी नागोजीचे डोके आपल्या मांडीवर टेकवले. त्याच्या डोक्यात घुसलेला बाण काढला. तो बाण काढताना नागोजी वेदनेने किंचाळला.
" महाराजांना शेवटचा मुजरा. "
इतके बोलून नागोजीने प्राण सोडले.
" गुणवंता , काल संध्याकाळपासून डोके दुखत आहे. कुणीतरी बाण मारला आहे डोक्यात असे वाटत आहे."
" मी तेल लावते. बरे वाटेल. "
" चल ना. प्राजक्ताची फुले वेचून आणू. त्या प्राजक्ताच्या झाडापाशी गेल्यावर मनाला शांत वाटते."
दोघीही डोंगर चढून प्राजक्ताच्या झाडाजवळ गेल्या. ते झाड जळालेल्या अवस्थेत होत्या. गावातील एक स्त्री तिथे लाकूड गोळा करायला आली होती.
" बाईसाहेब , काल मुसळधार पाऊस झाला. वीज कोसळली झाडावर. " ती स्त्री म्हणाली.
दोघीही परत वाड्यावर परतल्या.
" गुणवंता , काही तरी अशुभ घडणारे. आम्हाला भास होत आहेत. "
" काही अशुभ घडणार नाही. आपण वाड्यातच नवे झाड लावू. "
तेवढ्यात तिथे तुळजाबाई आल्या. गोदूने पदर सावरले.
" सुनबाई , आमच्या कानावर बातमी आली आहे. जेधेंची फौज आपल्याच गावाच्या दिशेने येत आहे. तुम्ही स्वागताची तयारी करा. "
गोदूच्या आनंदाला पारावर तो उरला नाही. गोदूने नागोजीने दिलेला निळा बुंदेली शालू नेसला. कमरेला सुवर्णकमरबंध घातला. गळ्यात हिऱ्यामोत्यांचे दागिने घातले. कपाळी सुवर्णरौप्यमुकेशाने मळवट भरला. गोदू लाजत होती. तेवढ्यात दारात नागोजी आला. गोदू उठली. पदर सावरला. नागोजी तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.
" मला माफ करा गोदूबाई. इतकाच संसार होता आपला."
" म्हणजे ?"
गोदूने प्रश्न विचारताच नागोजी अदृश्य झाला. गोदूच्या कानावर रडण्याचा आवाज आला. गोदू धावतच वाड्याचा प्रवेशद्वाराजवळ आली. धरणीवर कोसळलेल्या तुळजाबाई हाताने डोक्याला मारत होत्या. आक्रोश करत होत्या. औक्षण करण्यासाठी सजवलेली थाळी जमिनीवर पडली होती. नागोजीचा मृतदेह पाहताच गोदू मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळली.
***
गोदूला जाग आली. क्षणभर आपण एक वाईट स्वप्न पाहिले की काय असा भास झाला. पण दुर्दैवाने ते कसलेच स्वप्न नव्हते तर वास्तव होते. गोदूने हंबरडा फोडला. अवघा गाव रडत होता. गोदूचे आईवडील आले. गावातल्या काही बायका कुजबुज करत होत्या.
"जेध्यांची सून पांढऱ्या पायाची निघाली."
" लग्न होताच नवऱ्याला गिळून टाकले. "
गोदूच्या कानावर ही कुजबूज गेली.
" आई , मी पांढऱ्या पायाची आहे का ?" गोदूने गंगाबाईना विचारले.
" नाही बाळा. असे नाही बोलायचं. मराठ्यांच्या स्त्रियांचे लग्न तलवारीशी होत असते. रणांगणावर तलवार तुटली तर इकडं बाईच्या कपाळावरचे कुंकू मिटते. " गंगाबाई म्हणाल्या.
काही बायका गोदूचे सौभाग्य अलंकार हिसकावून घ्यायला आल्या. पण गोदूने आपले अश्रू पुसले. धीर एकवटून ती उभी राहिली.
" सतीची वस्त्रे मागवा. "
एक भयाण शांतता पसरली.
" गोदू , असा अविचार नको करू. " सरदार घोरपडे म्हणाले.
" सुनबाई , सती जाऊ नका. आपल्या मांडीवर एक मूल दत्तक देऊ. " बाजी जेधे म्हणाले.
" नागोजी सोडून गेला आता तुम्हीही. " तुळजाबाई हुंदका देत म्हणाल्या.
" माझा निर्णय झाला आहे. नागोजी रावांची बायको आहे मी. हट्ट पूर्ण होईपर्यंत ऐकणार नाही. "
सर्वांनी खूप समजवले. पण गोदूने ऐकले नाही. तिने सतीची वस्त्रे घातली.
" गोदू , जाऊ नको सती. तुला माझी शपथ. " गुणवंता म्हणाली.
" मला जावे लागेल गुणवंता. ह्यांची सेवा करायला स्वर्गात कुणीतरी हवे ना. यांच्याशिवाय जीवन व्यर्थ."
" मीही जाणार तुमच्यासोबत सती."
गोदू हसली.
" वेडी , मैत्रीणीसाठी कुणी सती जाते का ?"
" का नाही ? पतीसाठी जाऊ शकतो तर मैत्रिणीसाठी का नाही ?"
गोदाने गुणवंताला कवटाळले. गोदा बाहेर आली. गावकऱ्यांनी तिचे चरणस्पर्श केले.
" आबासाहेब , स्वतःची आणि आईची काळजी घ्या. गुणवंताचे चांगल्या इसमासोबत लग्न लावून द्या. तिचे या जगात कुणीच नाही. तिला स्वतःची लेक मानून तिचे कन्यादान करा. "
मग गोदूने गंगाबाई आणि तुळजाबाईकडे पाहिले.
" आई आणि सासूबाई, स्वतःची काळजी घ्या. "
गोदू बाजी जेधेंजवळ आली.
" आबासाहेब , आपण कान्होजी जेधेंचे सुपुत्र आहात. रणांगणावर महाराजांना आपली गरज आहे. फौज सोडून इथं पुत्रशोकात रडत बसणे आपल्याला भूषणावह नाही. आपण तातडीने निघायला हवे. सुतक करत बसू नका. माझ्या कुंकवाला आवडणार नाही. "
" सुनबाई , तुम्हाला आगीचे चटके सहन होणार नाहीत. " बाजी जेधे म्हणाले.
" माझ्या पतीने स्वराज्यासाठी असंख्य जखमा सहन केल्या मग मीही त्यांच्यासाठी आगीचे चटके सहन करेल. "
गोदूची नजर संताजी घोरपडेवर पडली. बहिणीचे कुंकू डोळ्यासमोर पुसले गेले आणि आपण काहीही करू शकलो नाही याची खंत त्यांना वाटत होती.
"संताजी दादा , आमचे दुःख करत बसू नका. यवनांशी झुंज द्या. असा पराक्रम गाजवा की शत्रूंच्या घोड्यांनीही धास्ती घेतली पाहिजे. "
गोदा नागोजीच्या चितेजवळ आली. नागोजीचे डोके आपल्या मांडीवर टेकवून त्याच्या जवळ जाऊन मांडी घालून बसली. तांब्याभर पाणी पिले. नागोजीच्या कपाळावर झालेली जखम पाहून गोदाला वाईट वाटले. नागोजीने दिलेला शालू आणि दागिने गोदाने सोबत घेतले. उर्वरित सर्व वस्तू सेवकवर्गाला दान केल्या. गोदाने नागोजीच्या केसांवरून हात फिरवला आणि खुदकन हसली.
" माझा सरदार !"
चितेला अग्नी देण्यात आली. लोकांना शालू जळताना दिसला. पण गोदाच्या मुखातून एक शब्दही फुटला नाही. जीवनाने ज्यांना दूर केले त्यांना मृत्यूने एकत्र आणले होते.
***
छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांना फार दुःख झाले. पुत्रशोक विसरून सर्जेराव पुन्हा फौजेत सामील झाले. मोहीम काही काळ थांबवून आणि थोडी कुमक सोबत घेऊन महाराज कारीगावी आले. मातोश्री तुळजाबाई यांचे सांत्वन केले.
" महाराज , तुम्ही दुःख करू नका. स्वराज्यासाठी असे शंभर नागोजी ओवाळून टाकेल ही तुळजा. दुःख एकाच गोष्टीचे वाटते की फारच अल्पायुषी ठरला माझा नागोजी. लग्नात लावलेली हळद उतरली नव्हती तेवढ्यात रक्ताने देह माखला गेला. असो. सुभद्रानेही महाभारतात अभिमन्यू गमावला होताच की. माझे दुर्भाग्य इतकेच की मला माझी उत्तराही सांभाळता आली नाही. फार गुणाचा होता माझा नागोजी. लहानपणीच घोडेस्वारी , तलवार चालवायला , भाले फेकायला शिकला. खूप चपळ होता. समजूतदार होता. त्याचे हट्ट कसले तर मोहिमेवर जायचे. सतत महाराज महाराज करायचा. आजोबांचा , वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घराण्याची कीर्ती वाढवायची होती त्याला. "
महाराजांच्या कंठातून शब्द फुटत नव्हता. त्यांनी तुळजाबाईंना प्रतिवर्षी एक शेर सोने देण्याचा आदेश दिला. नंतर महाराजांनी गोदूबाई आणि नागोजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुणवंताने तिथे प्राजक्ताचे झाड लावले होते. वाऱ्याची झुळूक आली आणि प्राजक्ताच्या झाडावरची पानेही हालचाल करू लागली. जणू ती पाने महाराजांना मुजरा करत होते. प्राजक्ताच्या फुलांचा सडा महाराजांच्या पायावर पडला.
वीर नागोजी जेधे आणि सती गोदूबाई यांना कथा समर्पित !
©® पार्थ धवन