माझा सरदार ! क्रमांक 2

.
दुसऱ्या दिवशी सकाळी उमाजी घोरपडे आपल्या कुटुंबकबिल्यासह गडावर पोहोचले. गडावर सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. जवळपास दहा-अकरा हजार माणसे जमली होती. बारा-तेरा दिवस रोज हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगती उठत होत्या. सर्व अधिकारी आपापल्या कामात व्यग्र होते. कुणालाही क्षणभरही उसंत लाभत नव्हती. सर्वच पाहुण्यांचा उचित मान-सत्कार केला जात होता. देशभरातून आणलेल्या पवित्र जलाने महाराजांचा जलाभिषेक झाला. ते गंगा-यमुनेचे जल महाराजांना काय म्हणत असेल ?
" महाराज , जसे गोदावरी-तुंगभद्रेला मुक्त केले तसेच आम्हालाही मुक्त करा. " या त्यांच्या भावना असतील का ?
असो. नंतर महाराजांचे " तुलादान " झाले. त्यांनी प्रचंड दानधर्म केला. वेगवेगळ्या चीजवस्तू रयतेत वाटल्या गेल्या. ब्राह्मणांना दक्षिणा मिळाल्या. उपस्थित सर्वांना भेटवस्तू आणि किमान एक सुवर्ण होनाचे नाणे देण्यात आले. गंगाबाई गोदूला घेऊन महाराणी सोयराबाईला भेटल्या.

" आम्ही कालच विचारपूस केली आपली. " महाराणी सोयराबाई म्हणाल्या.

" हो. पण परवानगी घेऊन यावे असे वाटले. महाराणी , गडाची भव्य सजावट केली आहे. डोळ्याचे पारणेच फिटले. " गंगाबाई म्हणाल्या.

" अधिकारी रात्रंदिवस एक करून डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. असा सोहळा रोज रोज थोडी चालून येतो. या धाकट्या बाईसाहेब कोण ?"

" आम्ही गोदूबाई. "

" गोदू.." गंगाबाईने गोदूच्या पाठीवर हलकेसे मारले आणि चरणस्पर्श करण्याचा इशारा केला. गोदूने लगेच महाराणी सोयराबाईंचे चरणस्पर्श केले.

तेवढ्यात तिथे महाराणी पुतळाबाई आल्या. गोदूने त्यांचेही चरणस्पर्श केले.

" फारच गोड मुलगी आहे हो !" पुतळाबाई गोदूच्या गालांवरून हात फिरवत म्हणाल्या.

" लवकर हात पिवळे करून टाका लेकीचे. " सोयराबाई म्हणाल्या.

" आम्ही आबासाहेबांना सोडून कुठेच नाही जाणार. " गोदू म्हणाली.

सर्वजण हसले.

" मासाहेबांना भेटण्याची फार इच्छा आहे. " गंगाबाई म्हणाल्या.

" त्या जगदीश्वर मंदिरात असतील. येतीलच आता. त्यांचा मुक्काम बऱ्याचदा पाचाडलाच असतो.
राज्याभिषेकनिमित्ताने गडावर आल्या आहेत. " पुतळाबाई म्हणाल्या.

थोड्या वेळाने तिथे मासाहेब जिजाऊ तिथे आल्या. गोदू आणि गंगाबाईंनी त्यांची भेट घेतली. चरणस्पर्श केले.

" आमचे आबासाहेब आपल्या आणि शिवबांच्या गोष्टी फार सांगतात. आम्हालाही आपल्याप्रमाणे काही तरी भव्यदिव्य करून दाखवायचे आहे. " गोदू म्हणाली.

जिजाऊ हसल्या आणि गोदूच्या गालांवरून मायेने हात फिरवला.

" प्रजेच्या मनात स्वातंत्र्याचा विचार रुजला. आमच्या जीवनाचे सार्थक झाले. स्वराज्य म्हणजे गडकिल्ले , आरमार , लष्कर , हिरे-मोत्यांचा खजिना किंवा मुलुखही नाही. तो एक विचार आहे. जोपर्यंत रयतेच्या मनात तो विचार जिवंत आहे तोपर्यंत स्वराज्याला कुणीही गिळंकृत करू शकत नाही. "

" खरे आहे आऊसाहेब. "

थोड्या वेळाने गुणवंताने गोदूला इशारा करून दूर आणले.

" काय ग गुणवंता ? आईने सांगितले आहे ना गडावर नीट वागायचे. "

" ते बघ. ज्यांनी आपले प्राण वाचवले ते सरदार. "

गोदाने तोंड वर करून पाहिले तर समोर तोच व्यक्ती उभा होता. गोदू पुन्हा त्या राजस राजबिंड्या तरुणाच्या देखण्या रुपात हरवली.

" त्यांना त्यांची अंगठी देऊन ये. " गुणवंता म्हणाली.

" नाही नाही. अस पुरुषांच्या घोळक्यात जाऊन कशी अंगठी देऊन येऊ ?"

" मग मी देऊन येते. दे ती अंगठी. " गुणवंता म्हणाली.

" माझी अंगठी तू का देणार ? सोड तो विषय. चल. जगदीश्वराचे दर्शन घेऊन येऊ. "

दोघींनीही जगदीश्वराचे दर्शन घेतले. त्या तरुणासारख्या पराक्रमी व्यक्तीसोबत भविष्यात आपला विवाह होऊ दे हीच प्रार्थना गोदूने मनोमन जगदीश्वराकडे केली.

मंदिराच्या बाहेर येताच गुणवंता घाबरली.

" गोदू , पांढरा माकड. पळ. "

आजूबाजूचे लोक हसू लागले.

" गुणवंता , तो माकड आपल्याच दिशेने येतोय. "

गुणवंताने एक हात वर केला.

" अस्तिक अस्तिक अस्तिक. " गुणवंता म्हणाली.

" अरे मुलींनो , तो व्यक्ती माकड नाही. इंग्रज अधिकारी हेनरी आहे. " एकजण म्हणाल्या.

सर्वजण दोघींवर हसले.

***

रायगडावर भव्य बत्तीस मण सोन्याचे सुवर्णसिंहासन तयार करण्यात आले होते. नामांकित रत्नांनी संपूर्ण मढविलेले ते भव्य सुवर्णसिंहासन अष्टकोनी होते. आठ कोनांवर सुवर्णसिंह बसविले होते. सिंहांचे डोळे माणकांनी जडविले होते. प्रत्येक सिंहावर एक एक सुवर्णस्तंभ उभारला होता. त्या आठ सुवर्णस्तंभांवर सिंहासनाची मेघडंबरी सावरली होती. सिंहासनाच्या पायांवर चारही बाजूंनी वृषभ, मार्जार, तरस, सिंह, व्याघ्र यांची चित्रे कोरली होती. सुवर्णस्तंभांवर वृक्ष, फळे, वेली, पक्षी व मत्स्यकूर्मादी जलचर दाखविले होते. अखेर तो मंगलप्रसंग आला. धीमी पावले टाकत महाराजांनी राजदरबारात प्रवेश केला. एक भयाण शांतता पसरली. महाराजांचे लक्ष सिंहासनावर गेले. त्यावर कसलेच रत्न नव्हते. मग महाराजांनी आजूबाजूला बघितले. त्यांना कान्होजी जेधे , बाजी पासलकर , मुरारबाजी , बांदल , बाजीप्रभू देशपांडे , शिवा काशीद , रामजी पांगेरा , तानाजी मालुसरे , प्रतापराव गुजर अशी सर्व मंडळी दिसली. सर्वजण आनंदी होते. सर्वांनी महाराजांना मुजरा केला. महाराजांना त्या सर्वांचे बलिदान आठवले. त्यांची नेत्रे पाणावली. एक-एक जण अदृश्य झाला आणि सिंहासनावर रत्न बनून जोडला गेला. महाराज भानावर आले. सिंहासन आता विविध मौल्यवान रत्नांनी सुशोभित दिसत होते.

संध्याकाळी सुरू झालेला सोहळा मध्यरात्रीपर्यंत चालला. मंत्रजप , होमहवनने दरबाराचे वातावरण पवित्र झाले. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. महाराज " छत्रपती " झाले. सिंहासनाच्या पायऱ्या चढताना जिजाऊंच्या मनात काय विचार येत असतील ?

जिजाऊंना शहाजी राजे दिसले.

" जिजाबाई , स्वराज्याचे स्वप्न जरी आपण दोघांनी मिळून पाहिले असले तरी तुम्ही एकट्याने ते पूर्ण केले. तुम्हाला आमचा मुजरा. " शहाजी महाराजांनी मुजरा केला.

" जिजा.." एक भारदस्त आवाज घुमला.

" जिजा , अल्लाहुदीनने जेव्हा यादवांचा पराभव केला तेव्हा यादवांची एक कन्या दिल्लीला पाठवण्यात आली. आपण जाधव म्हणजे यादवांचे थेट वंशज. आज याच यादवांच्या एका लेकीने दिल्लीकरांच्या काळजात धडकी भरवेल असे स्वराज्य घडवले. तुमचे विचार आम्ही समजू शकलो नाही. क्षमा कर आम्हाला. राजा लखुजीराव जाधवांचा तुला मुजरा. "

जिजाऊंचे डोळे पाणावले. पुतळाबाईंनी त्यांना आधार दिला.

" छत्रपती शिवाजी महाराज की जय !" सर्वत्र जयघोष झाला.


" या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह.. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही.."

***

राज्याभिषेकाचा भव्य सोहळा संपल्यावर सरदार घोरपडे आपल्या कुटुंबकबिल्यासह परत मूळगावी परतले. राज्याभिषेकाच्या वातावरणाने गोदू भारावून गेली होती. तिच्यात आमूलाग्र बदल घडला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊंनी तिच्या व्यक्तीमत्वावर प्रभाव टाकला होता. आता ती स्वराज्याबद्दल बोलत. महाराजांनी दिलेले एक होन किंमतीचे सोन्याचे नाणे आणि सुवर्णफुल गोदाने देवघरात ठेवले. त्याची ती रोज पूजा करू लागली. कुणी विचारले तर म्हणत ,

"या वस्तूंना माझ्या महाराजांचा स्पर्श झाला आहे. माझ्यासाठी या वस्तू पूजनीय आहेत. "

" यथा राजा तथा प्रजा " उक्तीप्रमाणे आता लहान मुलांचे खेळही बदलले होते. ते मातीचा लहानसा किल्ला बांधत आणि महाराजांचे मावळे बनून गनिमांशी लढण्याचे खेळ खेळत. असेच दिवस भुर्रकन उडून गेले. गोदू तेरा वर्षाची झाली. सरदार घोरपडे तिच्यासाठी स्थळ शोधू लागले. अखेरीस गोदूसाठी कान्होजी जेधे यांचा नातू नागोजी जेधे यांचे स्थळ आले. जेधे घराणे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित घराणे होते. त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता. उमाजी घोरपडे यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

नागोजीला बायका हळद लावत होत्या. तेवढ्यात एक सेवक धावत आला.

" शेतात एक रानडुक्कर शिरला आहे. पिकांची नासधूस करत आहे. " तो सेवक मोठमोठे श्वास घेत म्हणाला.

नागोजी उठला.

" हळद लावल्यावर घराबाहेर पडू नये. चांगले नसते. अशुभ घडते. " तुळजाबाई म्हणजे नागोजीच्या मातोश्री काळजीच्या स्वरात म्हणाल्या.

" आऊसाहेब , रयत महत्वाची. मी बंदोबस्त करून येतो. " नागोजी निघून गेला.
रात्रीचा प्रहर होता. गोदू गाढ झोपेत होती. उमाजी आणि गंगाबाई तिला दुरूनच पाहत होते.

" गंगा , तुला आठवते का गोदू जन्मल्यावर मी हत्तीवरून गावात साखर वाटली होती. गोदूच्या रुपात आपल्या घरात लक्ष्मीच आली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिला. ती कधी इतकी मोठी झाली कळलेच नाही. "

गंगाबाईंनी पदराने डोळे पुसले.

क्रमश..


🎭 Series Post

View all